अजूनकाही
गुन्हेगारी वृत्तीवर आधारित मसालापट म्हणजे ‘अधम’ हा सिनेमा. आयुष्याच्या एका वळणावर चुकलेला निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्यात गुन्हेगारी जगाशी संबंधित माणसं कशी पिचली जातात, त्यांच्या आयुष्याचं ध्येय काय असतं, अशा प्रश्नांभोवती हा सिनेमा फिरतो.
सिनेमाची कथा स्टोन क्रेशर (खडी मिशन)च्या व्यवसायातील चढाओढीची आहे. वर्चस्व, पैसा, सत्ता आणि भ्रष्ट व्यवस्था यांच्या जोरावर माणसं कशी क्रूर होतात, हा सिनेमाचा गाभा आहे. अण्णा भोसले (किशोर कदम) हा खडी व्यवसायात मुरलेला व्यावसायिक. धूर्तपणा त्याचा स्वभाव गुण बनलेला. बेकायदेशीर मार्गानं तो स्वतःचा कारभार प्रचंड मोठा करतो. त्याच्या या बेकायदेशीर वृत्ती विरुद्ध न्यायाच्या मार्गानं बंड पुकारणारा त्याच गावातील शिक्षक सतीश देशपांडे (सुहास पळशीकर) आवाज उठवतो. शेवटी अण्णा त्याला संपवण्याचा आदेश विक्रम (संतोष जुवेकर) ला देतो. देशपांडेचा खून करताना विक्रमला त्याची प्रेयसी नंदिनी (गौरी नलावडे) पाहते आणि तिथून पुढे कथेचा एकेक पदर उलगडत जातो.
दिग्दर्शकानं निष्कर्षापर्यंत येण्याचं टाळलं आहे. त्यामुळे सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. गुन्हेगारी जगतावर अधूनमधून सिनेमे तयार होतात. मात्र ‘अधम’ हा गुन्हेगारी जगताच्या वृत्तीवर बोट ठेवतो आणि कुठल्याही निष्कर्षापर्यंत येत नाही, हे त्याचं वेगळेपण आहे. दोन गट, खंडणी, खून, मारधाड या सिनेमाच्या मध्यवर्ती संकल्पना असल्या तरीही त्याचा वापर सिनेमात अचूक केला आहे. म्हणजे एखादी घटना घडल्यास त्याचा चांगला-वाईट परिणाम लक्षात घेणं, ही मानवी प्रवृत्ती सिनेमातली पात्रं सोडत नाहीत. म्हणून तो अतिरंजित वाटत नाही.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
अभिषेक केळकर यांची दिग्दर्शन कला आणि त्याला पटकथेची मिळाली साथ सिनेमाला लयबद्ध करतात. संवाद ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. त्यातली सहजता आणि नैसर्गिकपणा कोठेही अतिशयोक्त वाटत नाही. सिनेमाचं संकलनही चांगलं आहे. त्यामुळे मांडणीत एकसंधपणा आला आहे. मात्र तरीही अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमाचा स्पर्श ‘अधम’ला झाल्याचं नजरेआड करता येत नाही.
सिनेमातली अपरिणामकारक बाब म्हणजे सिनेमात खडी व्यवसाय आणि गुन्हेगारी मध्यवर्ती असूनही त्यातलं वास्तव चित्र उभं करताना तो आदर्शवादाची बाजू सोडत नाही. म्हणून कथा वास्तवाच्या जवळ जाताना तिने अचानक घेतलेला यू-टर्न नीरस वाटायला लागतो. अशा साधारण पण लक्ष वेधणाऱ्या घटना नजरेआड घालूनच सिनेमा पाहायला हवा.
दिग्दर्शक म्हणून अभिषेक केळकर यांचा हा पहिला प्रयोग आहे. संतोष जुवेकर, गौरी नलावडे, किशोर कदम, शशांक शेंडे, सुहास पळशीकर यांचा अभिनय उत्तम आहे. खलनायक म्हणून किशोर कदम आणि शशांक शेंडे यांनी बाजी मारली आहे. सिनेमाचा विषय गंभीर असल्यानं आपल्या अभिनयातील खास शैलीमुळे या दोघांचा प्रभाव सिनेमाला पुढे घेऊन जातो.
सिनेमाचा पूर्वार्ध हा लयबद्ध असला तरी त्यात कथा थोडी ब्रेक होते, तर उत्तरार्ध हा खूपच गतीनं पुढे जातो. दोन्हीचा समतोल साधण्यात गडबड झाली आहे. मात्र तरीही त्याचा कथेवर नकारात्मक परिणाम जाणवत नाही. थोडक्यात हा सिनेमा म्हणजे खलनायकांच्या टोळीतला नायक कोण या पार्श्वभूमीला अधोरेखित करताना अत्यंत चकमकरीत्या पुढे जातो. कथा नेहमीची असली तरी त्यात सूक्ष्म अशी वळणं आहेत, जी पारंपरिक गुन्हेगारी जगावरील इतर सिनेमापेक्षा ‘अधम’ला वेगळं ठरवतात.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment