अजूनकाही
दिग्दर्शक मिलिंद कवडे विनोदी अंगानं बहरत जाणारे सिनेमे करतात. ‘येड्याची जत्रा’, ‘शिनमा’, ‘जस्ट गंमत’ यांसारख्या सिनेमाचं त्यांनी याआधी दिग्दर्शन केलं आहे. आता मोठ्या ब्रेकनंतर ते ‘टकाटक’ हा सिनेमा घेऊन आले आहेत. मात्र आधीच्या सिनेमासारखी अपेक्षा ‘टकाटक’कडून ठेवणं थोडं घाईचं होऊ शकतं.
या सिनेमाची कथा दोन तरुण मुलांची आहे. (त्यातला एक ग्रामीण भागाचं आणि दुसरा शहरी भागांचं प्रतिनिधित्व करणारा आहे.) एक विवाहित, तर दुसरा महाविद्यालयीन तरुण. विवाहित तरुण पॉर्न व्हिडिओंचा व्यसनी, तर महाविद्यालयीन तरुण मैत्रिणीवर जीवापाड प्रेम करणारा. अशा दोन तरुणांची ही कथा आहे. सिनेमात दोन्ही व्यक्तिरेखा उभ्या करण्यात दिग्दर्शकाला सूर गवसला आहे. मात्र त्याचा सिनेमावर सकारात्मक म्हणावा असा परिणाम होत नाही. कारण सिनेमाची मांडणी!
दिग्दर्शकानं प्रेम, मैत्री, नाती, संघर्ष यांच्यावर मार्मिकपणे भाष्य केलं आहे. या सर्व गोष्टींच्या परिघावर सिनेमातली सेक्स कॉमेडी हिंदी सिनेमाच्या वळणाची असली तरी त्यातलं मराठीपण लपून राहत नाही. सिनेमा एकाच वेळी अनेक घटनांवर समतोल साधत भाष्य करतो. सिनेमाची एकूण थीम सेक्स कॉमेडीची असून त्याची कथा लैंगिक समस्या, वैवाहिक नात्यातील गुंता, आजच्या तरुणांची मनोभूमिका यांचा गंभीरपणे अंदाज घेत पुढे जाते. मात्र सिनेमाची कथा फारशी प्रभावी नाही. पण हलकेफुलके विनोदी संवाद खिळून ठेवतात.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
सिनेमातली वेगवेगळी लोकेशन्स लक्ष वेधून घेतात. त्यामुळे सिनेमा नावीन्यपूर्ण वाटतो. पटकथा आणि त्यातले संवाद सेक्स कॉमेडीला साजेसे आहेत. संवादातला चढउतार हा कथेला पूरक ठरणारा आहे. मात्र पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यातला ब्रेक कथेला खीळ घालतो. कारण दिग्दर्शकानं कथेला एका टोकावरून दुसऱ्या टोकावर नेलं आहे. सुरुवात गंमतीदार पद्धतीनं केलेली असल्यानं मध्यंतरानंतर अनपेक्षितपणे सिनेमाचा ‘टोन’ अधिक गंभीर होत जातो. परिणामी सिनेमा लयबद्ध राहत नाही.
प्रथमेश परब, रसिका श्रोत्री, अभिजीत अमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे यांचा अभिनय चांगला आहे. प्रथमेशचा ‘टाइमपास’मधला अंदाज त्याला या सिनेमात पेलला नाही. नेहमीच्या बेफिकिर तरुणाची भूमिका त्याने नेहमीच्या शैलीत केली आहे. अभिजीत अमकर हा नवखा कलाकार त्याच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देऊ शकलेला नाही. भारत गणेशपुरेचे विनोदी संवाद मात्र मनमोकळे हसायला लावतात.
तांत्रिकदृष्ट्या सिनेमावर घेतलेली मेहनत पडद्यावर चांगलीच प्रभावी ठरली आहे. मराठी सिनेसृष्टीतला हा एक अभिनव प्रयोग आहे. कारण दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या पोटातल्या गोष्टी ओठावर (आणि पडद्यावर) आणण्याचं काम केलं आहे.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment