अजूनकाही
‘मिस यू मिस्टर’ या सिनेमात नात्यातले चढउतार टिपताना त्यातल्या बारीकसारीक गोष्टीची केमिस्ट्री दिग्दर्शक समीर जोशी यांनी चांगल्या प्रकारे घडवून आणली आहे. प्रेम हे असंच प्रकरण असतं, जे प्रेमात पडलेल्यांना आणि नंतर आयुष्यभरासाठी एकत्र आलेल्यांना सतत जोडून ठेवण्याचं निमित्त बनतं. त्यामुळे माणसं एकमेकांत विरघळून जातात. त्यांच्या नात्यातला गोडवा आणि तिखटपणा अनुभवायला मिळतो. परिणामी प्रेमाच्या वर्तुळाचा आकार जसजसा मोठा होत जातो, तसतशी नाती आणखी घट्ट होत जातात. त्यात समजूतदारपणा येतो, तेव्हा दोघांचं आयुष्य खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतं. हे अतिशय चांगल्या पद्धतीनं दिग्दर्शक समीर जोशी यांनी ‘मिस यू मिस्टर’ या सिनेमात मांडलं आहे.
बदलत्या काळानुसार नातेसंबंधांची परिभाषा बदलत असते. त्यात जुनं मागे पडून बरंच काही नवीन आकाराला येत राहतं. अशा बदलांना कधी प्रेमानं, कधी रागानं, कधी हक्कानं आपलंसं करायचं असतं. हे सर्व स्वीकारताना नात्याचं ओझं दोघांवरही होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. रुसवा, फुगवा यांच्या पलीकडे जाऊन जोडीदाराला माणूस म्हणून समजून घ्यावं लागतं. हे सगळं किती महत्त्वाचं आहे, हे दाखवताना सिनेमाला ड्रामा आणि रोमान्सचा तडका दिग्दर्शकानं दिला आहे. त्यामुळे सिनेमा बदलत्या काळाचं चित्रण उभं करतो.
नात्यातील गमती-जमती, खोडसाळपणा, दोन पिढ्याच्या विचारांतील विसंगती, शहरी वातावरण, मैत्री, निखळ विनोद, करिअर आणि प्रेम यांचा सुरेख मिलाफ करत गुंफलेली कथा मनोरंजक आहे. शहरी मध्यमवर्गाची जीवनपद्धती दाखवताना सेटल (?) असणाऱ्या तरुण पिढीची जी काही ओढाताण होते, त्यावर हा सिनेमा प्रकाश टाकतो.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
सिनेमाची कथा प्रेमविवाह केलेल्या एका तरुण जोडप्याची आहे. वरुण (सिद्धार्थ चांदेकर) आणि कावेरी (मृण्मयी देशपांडे) दोघं लग्न करतात. त्यानंतर थोड्याच दिवसांत वरुण करियरच्या दृष्टीनं योग्य ठरेल असा निर्णय घेतो. तो लंडनला जायचं ठरवतो. वडिलांचा व्यवसाय कर्जापायी बंद पडलेला असतो. वरुणवर कुटुंबाची जबाबदारी असते. लंडनला नोकरीची चांगली संधी मिळते. पण तो एकटाच जायचं ठरवतो. भरपूर पैसे कमवून भारतात परतायचं आणि सगळे व्यवहार पूर्ण करायचे, असं वरुणचं स्वप्न असतं.
कावेरी ते मान्य करून त्याला जाऊ देते. मात्र तो गेल्यानंतर तिची घुसमट व्हायला लागते. विवाहानंतर काही दिवसांतच असं एकटं राहणं तिला आवडतं नाही. पण पर्याय नसल्यानं ती त्याचा स्वीकार करते. परंतु एकटेपणाची भावना तिला आतून पोखरत जाते. या सगळ्या घटना घडत असताना दोघांमध्ये ताणतणाव निर्माण होतो. त्यात नातेसंबंध बिघडतात आणि मग पुन्हा सगळं व्यवस्थित करण्याची धडपड सुरू होते.
सिनेमात मोजून दहा-बारा पात्रं आणि दोन कुटुंबं आहेत. या परिघात फिरताना कथा मानवी मनाच्या अंतर्बाह्य जाणिवांना हळूच स्पर्श करते. स्वतःच्या आत डोकावण्याची संधी देते. दिग्दर्शकानं कथेच्या मर्यादा आणि शक्तीस्थळं ओळखून जे काही निर्माण केलं आहे, ते आजच्या तरुणांना कमी-अधिक फरकानं लागू होतं. त्यामुळे सिनेमा आनंद देतो.
शहरी मध्यमवर्गातील पालक आणि पाल्य यांच्यातले नातेसंबंध कसे बदलत आहेत, याची दिग्दर्शकानं केलेली मांडणी नाविन्य निर्माण करते. त्यातून नव्या पिढीची भाषा समजून घेता येते. मात्र तरीही सिनेमा एकाच गृहितकावर थांबत नाही. प्रत्येक घटनेनंतर तो आपली वाट बदलत राहतो.
संवाद, मांडणी, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, पटकथा आणि तांत्रिक बाबी या सर्वपातळीवर सिनेमा यशस्वी ठरतो. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची केमिस्ट्री चांगली जमली आहे. सविता प्रभुणे, राजन भिसे आणि अविनाश नारकर यांनी आपापल्या भूमिकांचं आव्हान पेललं आहे. सिद्धार्थ आपल्या नेहमीच्या चॉकलेट बॉयच्या भूमिकेत असला तरी त्याची व्यक्तीरेखा बरीच वेगळी आहे, तर मृण्मयीमधली अस्सल अभिनेत्री या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळते.
सिनेमा संथ आणि संयमित पद्धतीनं पुढे जात राहतो. मध्यांतरानंतरही कथेची लयबद्धता टिकून राहिली आहे. त्यामुळे सिनेमात काय घडतंय हे समजायला सोपं जातं.
‘मिस यू मिस्टर’ प्रेम आणि वैवाहिक आयुष्य यांच्यातल्या मध्याचा शोध घेत असल्यामुळे त्याचं मूल्य कलाकृती म्हणून अधिक वाटत राहतं.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment