अजूनकाही
काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदाचा घोळ अजून संपायला तयार नाही. १७व्या लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे २१ मे रोजी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘काँग्रेस मेली पाहिजे’ असे विधान मतदानोत्तर निकाल अंदाजाच्या अनुषंगाने बोलताना केले होते. त्यावरून लगेचच सोशल मीडियावर वाद-विवादाला सुरुवात झाली. दरम्यान २३ मे रोजी १७व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने २०१४पेक्षा जास्त जागा मिळवल्या. भाजप व मित्रपक्षांचे तीनशेपेक्षाही जास्त खासदार निवडून आले. काँग्रेसचे २०१४पेक्षा थोडे जास्त खासदार निवडून आले असले तरी शंभरी तर सोडाच पण विरोधी पक्षनेता मिळवण्याइतपतही जागा या पक्षाला मिळवता आल्या नाहीत. त्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पण तेव्हापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींचे मन वळवण्यापलीकडे इतर काहीच करायला तयार नाहीत. ना ते आत्मपरीक्षण करायला तयार आहेत, ना पराभवाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहेत, ना स्वत:च्या संस्थानिक वृत्तीतून बाहेर यायला तयार आहेत. गांधी घराण्याच्या वारसाकडे काँग्रेस नेतृत्व येणकेणप्रकारे सोपवून आपापले उद्योग करायला कधी मिळतील, याच एका गोष्टीची ते वाट पाहत आहेत. आणि राहुल गांधी आपला राजीनामा मागे घ्यायला तयार नाहीत. अशा विचि६ कोंडीमुळे काँग्रेस पक्षाची घरघर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
योगेंद्र यादव यांच्या ‘काँग्रेस मेली पाहिजे’ या विधानावरून वादंग माजले. या विधानाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी दै.“लोकसत्ता’मधील (२२ मे २०१९) त्यांच्या पाक्षिक सदरात ‘काँग्रेस मेली पाहिजेच; पण कशी?’ हा लेख लिहून आपली भूमिका सविस्तर मांडली. यादव यांचा लेख हा उथळ शेरेबाजी नव्हती किंवा मतदानोत्तर चाचण्यांच्या आकड्यानंतरचा तो भावनिक उद्वेगही नव्हता. त्या आशयाची मांडणी यादव यांनी आणि इतरही अनेकांनी यापूर्वीही अनेक वेळा केलेली आहे. दुसरे म्हणजे यादव यांचा काँग्रेसवर डूख असण्याचेही किंवा काँग्रेस नेत्यांविषयी जळफळाट असण्याचेही कारण नाही. गेली अनेक वर्षे निवडणुकीचे विश्लेषण करणाऱ्या आणि भारतीय लोकशाहीचे मर्म चांगल्या प्रकारे ठाऊक असलेल्या यादव यांना आजवर ‘बिगर काँग्रेसवादा’चे जे जे प्रयत्न झाले तेही चांगलेच ठाऊक आहेत. आणि काँग्रेससारखा मोठा राजकीय पक्ष निवडणुकीतील एक-दोन पराभवाने मरत नसतो, हेही ते पुरते जाणून आहेत. तरीही त्यांनी असे विधान का केले, याचे स्पष्टीकरण त्यांनी या लेखात दिले आहे.
ते म्हणतात - “माझ्या मते, आजघडीला खरा प्रश्न आहे तो आपल्या प्रजासत्ताकाचा पाया शाबूत ठेवण्याचा आणि त्या दृष्टीने आजचा काँग्रेस पक्ष हा काही भरीव बांधबंदिस्तीसाठी उपयोगी पडेल, अशी शक्यता दिसत नाही. मी येथे दोन मुद्दे गृहीत धरलेले आहेत. पहिले गृहीतक : मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपमुळे आपल्या राज्यघटनेतील ‘लोकशाही’ आणि ‘विविधता’ या दोन मूल्यांनाच धोका आहे आणि दुसरे गृहीतक : सर्वात मोठा, राष्ट्रव्यापी विरोधी पक्ष म्हणून त्या धोक्याशी दोन हात करण्याची पहिली जबाबदारी काँग्रेसवर येते. माझ्या विधानावर टीका करणाऱ्यांना ही गृहीतके मान्य असतील असे मी मानतो. ती मान्य असतील, तर मग चर्चा आणि मतभेद पुढे जाऊ शकतात ते पुढील प्रश्नांच्या आधारे : या जबाबदारीला गेल्या पाच वर्षांत काँग्रेसने न्याय दिलेला आहे का? किंवा, नजीकच्या भविष्यकाळात ही जबाबदारी काँग्रेसला पेलवेल, असा विश्वास बाळगता येतो काय? दोन्ही प्रश्नांना माझे उत्तर ‘नाही’ असे आहे. काँग्रेसने ही जबाबदारी पार पाडण्याचे काम केलेले नाहीच. उलट ज्यांनी ही जबाबदारी आपापल्या पातळीवर पार पाडण्यासाठी काम सुरूही केले, त्यांच्यापुढे काँग्रेसमुळे अडथळाच उभा राहिला.”
पुढे ते म्हणतात - “जर काँग्रेस काही करू शकणार नसेल, तर आपले प्रजासत्ताक वाचवण्यासाठी काँग्रेसच हवी अशी आवश्यकता तरी का म्हणून मानावी? त्याहीपेक्षा वाईट भाग असा की, पर्याय उभा करण्यासाठी जे-जे घटक प्रयत्नशील आहेत, त्यांच्यापुढे काँग्रेसमुळे अडथळाच येतो आहे. काँग्रेस स्वत:देखील काम करीत नाही आणि इतर- विशेषत: आकाराने लहान – पक्षांनाही काम करू देत नाही, अशी स्थिती आपसूकच आलेली आहे. आपसूक अशासाठी की, मैदानात अनेक लहान आणि एखादा मोठा पक्ष असेल, तर लोक विनाकारण मोठय़ा पक्षाकडे जातात. त्याहीमुळे, काँग्रेस असू नये असे मला वाटते.”
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
यादव यांच्या या लेखाचा प्रतिवाद राजकीय अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी ‘मध्यममार्गी राजकारण टिकवण्याचा प्रयत्न’ (२३ मे २०१९) हा लेख लिहून केला. पळशीकर हे काँग्रेसच नव्हे तर कुठल्याच राजकीय पक्षाचा कैवार घेणारे अभ्यासक नाहीत. राज्यशास्त्राचे प्राध्यापक असल्याने राजकीय सिद्धान्त, संसदीय लोकशाही, भारतीय लोकशाहीचा प्रवास आणि भारतीय राजकारणाचा प्रवास हे लक्षात घेऊन ते राजकीय घटना-घडामोडींचे विश्लेषण करतात. त्यानुसार त्यांनी यादव यांच्या लेखाचा प्रतिवाद करताना म्हटले की, “जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस इंदिरा गांधी यांच्यामुळे इतकी बदलली की, या पक्षाची जुनी ओळखच नाहीशी झाली. त्यामुळेच पुढल्या काळात- १९८० च्या दशकाच्या अखेरीपासून- तो पक्ष घसरणीला लागला. तेव्हापासून आजतागायत, काँग्रेसला स्वत:चे पुर्नसघटन करता आलेले नाही. कार्यकर्त्यांना नव्याने हेतूचे भान देता आले नाहीच, पण मतदारांनी का म्हणून पाठराखण करावी, हेही पटवून देता आले नाही, ही काँग्रेसची अवस्था तेव्हापासून होत गेलेली आहे. मग अनेकांना, अनेकदा असे मनापासून वाटत राहिले की, काँग्रेसची घसरण आणि त्या पक्षाचा अस्त हीच आपल्या देशातील नव्या राजकारणाची पहाट ठरेल. या तीनही दशकांच्या काळात ते नवे- पर्यायी राजकारण उदयास आणण्याकामी उदारमतवादी, डावे, जहाल अशा सर्वाना शोचनीय अपयश येत राहिले. यादव हे ज्या पर्यायी राजकारणाची नव्याने उभारणी करू पाहत आहेत, त्यात आधीपासूनच असलेले कच्चे दुवे हे या अपयशातून घट्ट होत गेल्याचे न ओळखता काँग्रेसवरच खापर फोडणे, हा सोपा मार्ग ठरतो.”
योगेंद्र यादव यांच्या पर्यायी राजकारणाच्या स्वप्नाविषयी सुहास पळशीकरांनी लिहिले आहे की, “स्वायत्त पण सशक्त अशा ‘पर्यायां’च्या राजकारणासाठीदेखील आपल्याकडे पुरेशी जागाच नाही. मुळात, हे पर्यायांचे राजकारण आधी समाजाला बदलून मग स्वत:ला राजकारणाच्या मध्यभागी आणू पाहते. समाजात जोवर चांगले बदल घडत नाहीत, तोवर पर्यायी राजकारण हे मुख्य धारेतल्याच कुणा ना कुणा राजकीय शक्तींचे बोट धरून चालवावे लागेल. त्यामुळेच, काँग्रेस संपली पाहिजे, असे म्हणताना स्वत:च्या राजकारणाची व्यवहार्यता यादव यांनी कदाचित पुरेशी जोखलेलीच नसावी असे म्हणावे लागते. माझे म्हणणे कुणाला साध्य-साधनवादी वाटेल, पण बदल घडवू पाहणाऱ्या राजकारणालाही राजकीय पाठिंबा लागतोच, त्यासाठी राजकीय वाहन लागतेच आणि राजकीयदृष्ट्या मोठ्या जनसमूहाची सहानुभूतीदेखील हवीच असते. म्हणजे गरज आहे म्हणून तरी काँग्रेसचा ‘वैद्य’ हवा, पण गरज सरल्यानंतर तो मरूनच जावा असे मी म्हणणार नाही, त्याला कारणे आहेत.
“पहिले कारण म्हणजे, बिगरभाजप राजकीय शक्ती बऱ्याच विखुरलेल्या असूनसुद्धा प्रत्येक दहा मतांपैकी किमान दोन मते काँग्रेसला आजही मिळतात, तर भाजपला या दहापैकी तीन. काँग्रेसला मिळणारी मते ही त्या पक्षाच्या पूर्वापार मतांमधली, भाजपकडे जाऊन आता उरलेली अशी मते आहेत. तरीही काँग्रेसचा राजकीय अवकाश नगण्य नाही. म्हणजे जर काँग्रेसने मरायचे असेल, तर हा अवकाश केवळ भाजपच व्यापणार.
“दुसरे कारण असे की, सध्या तरी भाजपला वैचारिक उत्तर काँग्रेसच देताना दिसते. आज काँग्रेसची ही उत्तरे पुरेशी सक्षम नाहीत असे कुणी म्हणेल, ते मान्यच. पण प्रादेशिक पक्षांकडून दिली जाणारी हेतुहीन, तरीही कर्कश प्रत्युत्तरे लक्षात घेता, काँग्रेसने केलेला किमान युक्तिवाददेखील प्रतिकाराच्या शक्यता निर्माण करतो, एवढे तरी श्रेय त्या पक्षास द्यायला हवे.
“तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, काँग्रेस जर संपणारच असेल, तर विरोधी पक्ष म्हणून जो अवकाश उरेल तो भरण्यासाठी प्रादेशिक पक्षच सरसावतील. या पक्षांपैकी बहुतेक साऱ्या पक्षांनी कधी ना कधी भाजपशी एक तर आघाडी केलेली आहे किंवा आपापल्या राज्यात भाजपचा प्रवेश सुकर केला आहे- उदाहरणार्थ ओडिशा आणि बिहार. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, काँग्रेस पक्ष कसाही असला तरी निवडणुकीच्या राजकारणात तोच भाजपचा विरोधक ठरतो एवढे नक्की.”
लेखाच्या शेवटी सुहास पळशीकर यांनी अधिक व्यापक आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो राजकीय सिद्धान्ताच्या आणि भारतीय जनमानसाच्या आजवरच्या वर्तनावर आधारित आहे. तो असा - “अलीकडच्या काही दिवसांत तर यादव स्वत:च भारताचा स्वभाव आणि स्वधर्म यांच्या पुनरुत्थानाची भाषा करीत असतात. या तत्त्वांच्या जपणुकीसाठी काँग्रेस आज काहीही करताना दिसत नसेल, परंतु तिचे अस्तित्व हे अनेक भारतीयांना आजही त्यांचा स्वधर्म जपण्याची मुभा देते- म्हणजे या भूमीत मुरलेली शहाणीव व्यक्त होऊ देते आणि भारतीयत्वाचा अंगभूत चारित्र्यगुण टिकवू देते.”
यादव यांच्या ‘काँग्रेस मेली पाहिजे’ या विधानावर एनडीटीव्हीचे वरिष्ठ संपादक प्रियदर्शन यांनी लगोलग लेख लिहिला. त्याचा मराठी अनुवाद ‘काँग्रेस मरत का नाही?’ (२२ मे २०१९) या नावाने ‘बिगुल’वरही प्रकाशित झाला.
त्यात ते म्हणतात - “काँग्रेसच्या अंताबद्दल कुणी बोलण्याची ही पहिली वेळ नाही. महात्मा गांधींनीच पहिल्यांदा काँग्रेस बरखास्त करून त्याजागी लोकसेवक संघाची स्थापना करण्याची सूचना केली होती हे सर्वज्ञात आहे… १९६७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा नऊ राज्यांमध्ये बिगर काँग्रेस सरकारे स्थापन झाली, तेव्हाही म्हटले गेले की काँग्रेस संपली आहे. १९६९ मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हाही, काँग्रेस बचावणार नाही, असे म्हटले गेले. १९७७ मध्ये इंदिरा गांधींच्या पराभवानंतर काँग्रेस संपली असेच मानले जाऊ लागले. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरही काँग्रेस पुन्हा उभी राहणार नाही असे बोलले जाऊ लागले. १९६६ मध्ये नरसिंह राव सरकारचा पराभव आणि आघाडी सरकारांचे युग सुरू झाले, तेव्हाही काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होणार नसल्याचे भविष्य वर्तवले गेले. १९९८ मध्ये राजकारणात आलेल्या सोनिया गांधींची अशीच टिंगलटवाळी केली जात होती, जशी गेली काही वर्षे राहुल गांधींची केली जाते… १९८४ मध्ये राजीव गांधींच्या पराभवाची घोषणा करणाऱ्यांवर माफी मागण्याची वेळ आली आणि भाजपचे अस्तित्व दोन जागांपुरतेच उरले. २००४ मध्ये अटल-अडवाणी यांच्या महाकाय जोडीला हरवून सोनिया गांधी यांची काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.”
यादव यांच्या ‘काँग्रेस मेली पाहिजे’ या विधानाचा योग्य अर्थ लावत प्रियदर्शन यांनी पुढे लिहिले आहे - “काँग्रेसच्या नव्हे, तर भारताच्या विचारांची चिंता आहे म्हणून ते असं विधान करतात… हा भारताचा विचार – आयडिया ऑफ इंडिया – काय आहे? हा विचार एक विविधतावादी-बहुसांस्कृतिक-बहुधार्मिक-बहुभाषिक भारताचा विचार आहे. या विचारामध्ये कोणती एक धार्मिक पद्धती, कोणती एक भाषा, कोणती एक संस्कृती फक्त आपल्या बहुसंख्येच्या बळावर दुसरे धर्म, दुसऱ्या भाषा आणि संस्कृतींना दुय्यम मानत नाहीत. भारत नावाचा एक विचार सर्वांच्या एकोप्यातून, समानतेतून आणि सर्वांच्या सहभागातून वृद्धिंगत होतो… …स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं या भारताचं प्रतिनिधित्व केलं. हरतऱ्हेची मतमतांतरे, विचार, वेगवेगळ्या भाषा आणि प्रदेशांना आपसात काँग्रेस जोडत राहिली.”
काँग्रेसच्या आजकारणाचा अलीकडच्या काळात सातत्याने पराभव होत असला तरी काँग्रेसचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना लेखाच्या शेवटी प्रियदर्शन यांनी सुहास पळशीकर यांच्यासारखाच महत्त्वाचा निष्कर्ष नोंदवला आहे. तो असा - “काँग्रेसला जर बचावायचं असेल तर याच स्वरुपात बचावायला हवं आणि पर्यायाच्या राजकारणात गरज पडली तर स्वत:ला मागे ठेवायला हवं. काँग्रेसचा खात्मा म्हणजे वर्चस्वाच्या राजकारणाच्या तिच्या लालसेचा खात्मा. तरीही काँग्रेसच्या अंताची घोषणा करणाऱ्या लोकांना इतिहासात डोकावून समजून घ्यायला पाहिजे की, काँग्रेस एक राजकीय पक्ष नाही. काँग्रेस ही एक सामाजिक प्रवृत्ती आहे, जिच्याकडं पुन्हा पुन्हा परत येण्यासाठी हा देश अगतिक बनतो.”
राजकीय अभ्यासकांच्या मते काँग्रेसचे राजकारण हे भारताच्या विविधतेसाठी, एकोप्यासाठी गरजेचे आहे. किंबहुना काँग्रेसी राजकारण हाच एकप्रकारे भारताचा स्वभावधर्म आहे. त्यामुळे काँग्रेस राहिली पाहिले, टिकली पाहिजे. पण असे काँग्रेसच्या नेत्यांना खरोखरच वाटते आहे का, हा प्रश्न आहे. गांधी घराण्याशिवाय काँग्रेस जगू शकत नाही आणि गांधी घराण्यामुळे काँग्रेसला या देशात असलेले भवितव्य दिवसेंदिवस आटत चालले आहे. राहुल गांधींच्या राजीनामा नाट्यावर काँग्रेसी नेते ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत किंवा राहुल नाही तर पुन्हा सोनिया गांधींनाच राजकारणात सक्रिय करण्याचे प्रयत्न करत आहेत, यातून हेच सिद्ध होते की, काँग्रेस मरणपंथाला लागली आहे. धूर्त, आत्मलुब्ध आणि संस्थांनी काँग्रेसी नेत्यांनीच काँग्रेसला आत्मघाताच्या टकमक टोकावर पोहचवले आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजप-संघ आणि मोदी-शहा यांच्या ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’वर आधारलेल्या राजकारणाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे, या जयघोषातून कृतक आत्मसमाधानापलीकडे काहीही साध्य होऊ शकत नाही, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
भारतीय परंपरा पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पूर्णपणे नव्या स्वरूपातल्या पुनर्जन्माची किंवा नव्या अवताराची नितांत निकडीची गरज आहे. तसे झाले नाही तर काँग्रेस आत्मघाताच्या टकमक टोकावरून खाली कोसळल्याशिवाय राहणार नाही!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment