अजूनकाही
साहित्याच्या संदर्भात इलस्ट्रेशन म्हणजे ललित किंवा ललितेतर वाङ्मय चित्रित करणारं चित्र. यासाठी इतका सर्वसमावेशक मराठी शब्द मला माहीत नाही. या लेखात, सोयीसाठी, कथाचित्र हा शब्द इलस्ट्रेशनला समानार्थी म्हणून वापरला आहे.
कथाचित्रांबद्दल माझ्यात कळत-नकळत जी जाण येऊ लागली होती तिला आकार देण्यात ‘लाल फीत झिंदाबाद’ या १९५४\५५च्या सुमारास ‘वसुधा’च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या दीर्घकथेच्या वेळच्या माझ्या अनुभवाचा महत्त्वाचा वाटा आहे. लेखक होते रघुनाथ तेंडुलकर (विजय तेंडुलकरांचे थोरले भाऊ). चित्रं मी काढायची असं ठरल्यावर पूर्ण कथेच्या हस्तलिखिताऐवजी पात्रांची नावं, प्रत्येकाचं ठळक स्वभाववैशिष्ट्यं, समाजातलं स्थान, कथेमधली त्याची भूमिका इत्यादी नोंद असलेला कागद त्यांनी माझ्या हातात दिला. मी विचारलं : कथेतले प्रसंग समजल्याशिवाय मी चित्रं कशाची काढू? ते म्हणाले : मी दिलेल्या माहितीवरून पात्रांची व्यक्तिचित्रं तुम्ही काढून घ्या. कथेचा ढोबळ आराखडा माझ्या डोक्यात आहे. तुमच्या चित्रांवरून पात्रं प्रसंगाप्रसंगांत कशी वागतील त्याचा तपशील मी लिहीन. त्यांच्या जंत्रीत पात्रांचं शारीरिक वर्णन नव्हतं. माझ्या कल्पनेने इतर तपशिलावरून ते मी ठरवायचं होतं. माझ्या दृष्टीने हा एक अभिनव न अदभुत असाच अनुभव होता. कथानिर्मितीमध्ये चित्रकाराचा असा सक्रिय सहभाग मी पूर्वी कधी ऐकला नव्हता, अनुभवणं तर दूरच! माझ्यासारख्या अननुभवी चित्रकाराला हे काम अवघड होतं, कष्टदायक होतं. पण मी जमेल तसं ते केलं. माझी काही व्यक्तिमत्त्वं लेखकाने स्वीकारली; काही चर्चा करून परस्परसंमतीने बदलून घेतली.
कथा चित्रकारीतला पहिला महत्त्वाचा धडा मी यामधून शिकलो. कथाचित्रामध्ये व्यक्तिचित्र हा महत्त्वाचा घटक आहे व लेखकाने शब्दांतून उभं केलेल्या व्यक्तीला यथायोग्य चित्ररूप दिल्याखेरीज परिणामकारक कथाचित्र उभं राहणार नाही, हा तो धडा. यासाठी लिखाणात शारीरिक वर्णनं\लकबी दिलेल्या नसतील तर चित्रकाराने आपली कल्पनाशक्ती वापरून लेखकाच्या आशयाशी सुसंगत असं पात्राचं दृश्यरूप निर्माण केलं पाहिजे. एक वेगळ्या प्रकारची चित्रकाराची निर्मितीक्षमता इथे पणाला लागते. संहितेवरून नाट्यप्रयोग किंवा पटकथेवरून सिनेमा निर्माण करतेवेळी प्रोड्युसर-दिग्दर्शक यांची लागते तशी.
‘बटाट्याची चाळ’साठी मी चित्रं केली तेव्हा ही जाणीव मनाशी होती. इथे कितीतरी पात्रं पु.लं.नी शब्दांमधून आणली आहेत. मात्र फार थोड्यांची शारीरिक वर्णनं त्यांनी केली आहेत. पण पुस्तकभरातल्या विविध प्रसंगांमधल्या वागण्याबोलण्यातून सगळी पात्रं उभी राहतात. त्यांना चित्ररूप देताना माझ्या कल्पनाशक्तीला मी काही वर्षं मुंबईला चाळीत राहिलो होतो त्यावेळच्या निरीक्षण-अनुभवाचा आधार मिळाला. त्रिलोकेकर (शेट), आचार्य बाबा बर्वे, बाबुकाका खरे, समेळकाका, एच्च. मंगेशराव, ‘साहित्यिक’पोंबुर्पेकर, जाकीट टोपीवाला वसईवाला (दूधवाला) इत्यादी इत्यादी सर्व मंडळी चित्ररूपात आणताना निर्मात्याच्या ‘कास्टिंग’च्या वेळच्यासारखा आनंद मला वाटला. पात्रंच काय, पण खुद्द चाळीला चित्ररूप देताना चाळीइतकं वृद्ध शेजारचं वडाचं झाड, शेजारची छपरी, त्यावरचं झोपलेलं मांजर, सकाळचा वसईहून आलेला दूधवाला, गाईला चारा घातल्याचं पुण्य उपलब्ध करून देणारी बाई (‘फी’आकारून!) इत्यादी इत्यादी तपशील माझ्या चाळीतल्या सहवासाने मला पुरवले.
वसंत सबनीसांच्या ‘भारुड’ या विनोदी लेखसंग्रहात सर्व लेखांमध्ये निवेदक ‘मी’ आहे. साहजिकच त्याचं थेट शारीरिक वर्णन कुठेही नाही. हे लेख मासिकांतून प्रसिद्ध झाले त्या वेळी त्या त्या चित्रकारांनी त्याला वेगवेगळं रूप दिलेलं होतं. या संग्रहात एकत्र येणाऱ्या लेखांमध्ये मी त्याला एकच रूप द्यायचं ठरवलं व सर्व लेखांत तेच व्यक्तिमत्त्व फिरवलं. एवढंच नव्हे तर सबनीसांच्या पुढील ज्या ज्या संग्रहासाठी मी चित्रं काढली (‘मिरवणूक’, ‘पंगत’ इत्यादी) त्यामध्ये हेच रूप ‘मी’ ला कायम ठेवलं. त्यामुळे या प्रकारच्या सबनीसांच्या लेखांना एक सलगता प्राप्त झाली असं मला वाटतं.
अर्थात मराठीतला हा काही पहिलाच प्रयोग नव्हता. यापूर्वी कितीतरी वर्षं आधी चित्रकार सी. गं. जोशी यांनी चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव, गुंड्याभाऊ, त्यांचे कुटुंबीय, शेजारीपाजारी इत्यादी पात्रांच्या बाबतीत हे केलेलं आहे.
रमेश मंत्रींच्या ‘जनू बांडे’च्या वेळी त्या वेळच्या जेम्स बाँड (ज्याचं जनू बांडेमध्ये मंत्रींनी विडंबन केलं आहे) फिल्ममधील हिरोचं काम करणारा सीआँ कॉनेरी माझ्या डोळ्यांसमोर होता. त्याच्यावर बेतलेल्या जनू बांडेला त्यामुळे वाचकांची तात्काळ दाद मिळायला अडचण आली नाही.
‘ठणठणपाळ’ची गोष्ट मात्र अगदी वेगळी होती. त्याचं रेखाटन करण्याचं काम माझ्याकडे आलं त्यापूर्वी या टोपणनावाखाली सात\आठ लेख आधीच प्रसिद्ध झालेले होते. आणि त्यामधील साहित्यिकांच्या केलेल्या प्रच्छन्न चेष्टामस्करीमुळे साहित्यक्षेत्रात चांगलीच खळबळ माजलेली होती आणि हा ठणठणपाळ कोण याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालेलं होतं. अनेक नावांचा संशय होता. पण संपादकांनी नावाच्या गुप्ततेचा कडेकोट बंदोबस्त केलेला होता. त्यामुळे काही पत्ता लागत नव्हता. मलाही काही माहीत नव्हतं. पण एकूण लिखाणाची शैली, त्यातली मतं आणि वाक्यरचनेतल्या काही लकबी (अशा लकबी नकळत लिखाणात उतरतात असं मला वाटतं) ज्या दळवींच्या जवळच्या सहवासामुळे ओळखल्या असं मला वाटलं, त्यामुळे बराचसा अंदाज मला आला होता. म्हणून ठणठणपाळ रेखाटताना त्याला दळवींची वाटावी अशी अंगलट दिली न ‘कशी गंमत केली! द्या टाळी!!’ असा भाबडा आनंद दाखवणारी भावमुद्रा असलेला, म्हटलं तर दळवींची आठवण करून देणारा खरा चेहरा, म्हटलं तर मुखवटा वाटावा असा चेहरा दिला. हातोड्यावर रेलून उभे राहण्याच्या पवित्र्यामुळे हा भाव अधोरेखित व्हायला मदत होत होती. एकूण लिखाणातल्या मजेशीर, खेळकर, निर्विष विनोदाच्या स्वरूपाशी या व्यक्तिमत्त्वाचं रूप जुळणारं होतं. वाचकांनी तर याला उत्स्फूर्त दाद दिलीच पण खुद्द दळवींनीही (अर्थात ठणठणपाळ कोण हे उघड झाल्यानंतर.) ‘या चित्राचा पुढील वर्षांत माझ्या मनावर सतत परिणाम होत गेला असावा असं मला नेहमीचं वाटतं’ असं लिहिलं.
पात्राचं यथायोग्य ‘कास्टिंग’ हा कथाचित्रणामधला अग्रक्रमाचा महत्त्वाचा घटक असला तरी त्यामुळे अर्धीच लढाई जिंकली म्हणता येईल. सिनेमा-नाटकांमध्ये नुसतीच सुयोग्य पात्र-योजना असून पुरत नाही; त्या पात्रांच्या हालचाली, बोलण्याची शैली (आणि सिनेमाच्या बाबतीत कॅमेऱ्याचा अँगल) यांचा जाणीवपूर्वक उपयोग हेही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोहोचवण्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं. कथाचित्रांविषयी बोलायचं तर रेषा, आकार व रंग आणि त्यांची कागदावरील चौकटीतली रचना (कॉम्पोझिशन) हे दृश्य घटक ही चित्रकाराच्या हातातली हत्यारं.
एक रेषा घेतली तरी, हरतऱ्हेच्या भावछटा व्यक्त करण्याची तिच्यात ताकद असते. जोमदार रेषा, हलक्या हाताने काढलेली रेषा, त्वेषाने वार करावा तशी काढलेली रेषा, मजेमजेने जशी वळेल तशी काढलेली रेषा, किडकी रेषा...अशी रेषेची कितीतरी रूपं असू शकतात. तसंच, हिशेबाने कमीत कमी रेषा वापरून केलेलं चित्रण, रेषांच्या गुंतवळीतून केलेलं उत्स्फूर्त चित्रण, गिचमिड वाटावी अशी रेषांची गर्दी...अशा अनेक प्रकाराने रेषांचा उपयोग भावछटा व्यक्त करण्यासाठी करता येतो.
आता, इथे प्रश्न उपस्थित होतो की चित्रकाराने किती स्वातंत्र्य घ्यावं? मला वाटतं, याचं सरसकट उत्तर देता येणार नाही.
लेखक आणि चित्रकार यांचे परस्परसंबंध, लेखकाचा चित्रकाराच्या कर्तृत्वावरचा विश्वास आणि आपल्या बरोबरीने चित्रकाराला बसू देण्याचा मनाचा मोठेपणा व खिलाडू वृत्ती यावर वरील प्रश्नाचं उत्तर अवलंबून राहील.
एक म्हणता येईल की, चित्राचा आशय लेखकाच्या आशयाशी सुसंगत असावा. पण इथेसुद्धा एखादा लेखक चित्रकाराला या बाबतीत पूर्ण मूभा देणारच नाही असं नाही. लेखक-लेखकातही फरक असतोच की! म्हणजे याचंही निश्चित असं उत्तर नाहीच.
काही जणांना या संदर्भात नाटककाराने न लिहिलेली आणि स्वत:चीच वाक्यं रंगभूमीवर ठोकणाऱ्या नटाचं किवा मैफलीत गवयावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तबलजीचं उदाहरण आठवेल. मला विचाराल तर इथेही मी वर दिलेल्या कसोट्याच लागू होतील.
पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रमेश मंत्री, आनंद साधले, मंगेश पाडगावकर यांच्यासारख्या मान्यवर साहित्यश्रेष्ठींसाठी मी खूप कथाचित्रं केली आहेत. यांपैकी कुणाहीबरोबर मतभेदाचा प्रसंग आला नाही हे मी माझं भाग्य समजतो. तुरळक अपवाद सोडला तर रफ स्केच तर सोडाच, पण फेअर ड्राइंगही मी कुणालाही छापून येण्याआधी दाखवलेलं नाही.
आजही मला आठवतं, ‘साठवण’ची प्रत पु.लं.च्या हातात प्रकाशनसमारंभाच्या जेमतेम तासभर आधी पडली होती आणि त्याच वेळी त्यांनी यातली माझी चित्रं पाहिली. या चित्रांमध्ये तर मी जास्तीत जास्त स्वातंत्र्य घेतलेलं होतं. चित्रं पाहून ‘कांपिटिशन केलीय काय?’ असं कौतुकाने म्हणून त्यांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. (गाण्याच्या मैफलीतल्या तबलजीच्या वाजवण्याच्या संदर्भातला ‘कांपिटिशन’चा अर्थ जाणकार ओळखतातच. ‘साठवण’च्या प्रस्तावनेत “…मैफल रंगवायचा चंग बांधून थिरकवा खां साहेबाच्या तोलाचा तबलजी आणि कादरखां सारखा सारंगिया यांनी डावी उजवी बाजू उचलून धरण्यासारखे झाले आहे...”असं पु.लं.नी म्हटलेलं होतं, त्याचा संदर्भ कदाचित त्या क्षणी त्यांच्या मनात आला असेल.)
जयवंत दळवींनी ‘ठणठणपाळ’साठीच्या माझ्या चित्रांबद्दल लिहिताना “ती रुढार्थानं चित्रं, इलस्ट्रेशन्सही नव्हती. ठणठणपाळच्या चेष्टामस्करीचा ते चित्ररूप विस्तार करीत होते. कधी कधी तर त्यांची चित्रं माझ्या मजकुरापेक्षाही अधिक गमतीदार होती,” अशी हातचं न राखता दिलखुलास प्रशंसा केली आहे.
(‘व्यंगकला-चित्रकला’ या पुस्तकातील लेखाचा संपादित भाग. प्रकाशक- मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, २००५.)
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Sun , 25 December 2016
सरवटे स्वतःच्याच शब्दांमध्ये सुंदर!