अजूनकाही
काल तुकाराम महाराज आणि आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. १२ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तोवर या आणि इतर अनेक पालख्या पायी वारी करत महाराष्ट्रभरातून पंढरपुरात दाखल होतील. महाराष्ट्राच्या गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
....................................................................................................
महाराष्ट्रीय संतांनी आत्मदेवदर्शनविरहित तीर्थयात्रेतील व्यर्थता सांगितली आहे. उदा. संत श्रीनामदेव म्हणतात, “तीर्थां जाऊनी तुवा काय केले । चर्म प्रक्षाळिले वरीवरी ॥’’ आणि संत श्रीतुकाराम म्हणतात, “तीर्थीं धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥’’
सज्जनांच्या ठिकाणी किंवा सज्जनांच्या रूपात देव प्रत्यक्ष उभा असतो. म्हणून ज्या व्यक्तीस संतसज्जनांचे ठिकाणी देवदर्शन घडत नाही त्या व्यक्तीला संत श्रीतुकाराम म्हणतात की, तीर्थक्षेत्राचे ठिकाणी काय दिसणार तर धोंडा व पाणी!; आणि संत श्रीनामदेव म्हणतात, की अशा व्यक्तींनी तीर्थक्षेत्रांचे ठिकाणी जाऊन स्नान करताना खरे तर केवळ आपले चर्म म्हणजे कातडे धुतलेले असते.
अर्थात, मक्केची यात्रा करणार्या व्यक्तीकडून जुनियाद या परमार्थनिष्ठ ज्ञानी व्यक्तीने जी ‘मी-माझे’ या भावनेने युक्त असलेल्या विचारांचा समूळ त्याग करत जाण्याची जी अपेक्षा व्यक्त केली आहे, तीच जणू श्रीतुकाराम व श्रीज्ञानेश्वर या महाराष्ट्रीय संतांनीदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केलेल्या उपदेशात अनुस्यूत आहे. उदा. तीर्थयात्रा करताना जे करावयाचे असते ते तुम्ही घरी ध्यान करतानाही करू शकता. म्हणूनच ते म्हणतात,
१) ठायींच बैसोनी करा एकचित्त । आवडीं अनंत आळवावा ॥- संत श्रीतुकाराम
२) तुम्ही व्रतवैकल्य करू नका, उपासतापास करून शरीराला कष्ट देऊ नका, तीर्थयात्रेकरिता दूर जाण्याचे श्रम करू नका. (त्याऐवजी स्वधर्माचे आचरण करा.) - संत श्रीज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी, ३.८९)
तीर्थक्षेत्रेही संतसज्जनांच्या स्पर्शाने पुनीत होत असतात
ज्या सज्जनांच्या रूपात देव प्रत्यक्ष उभा (उपलब्ध) असतो, त्या संतसज्जनांचे पावनकर पाय आपल्याला कधी लागतील व आपण शुद्ध होऊन जाऊ, अशी मोठ्या आतुरतेने तीर्थक्षेत्रे त्यांची वाट पहात असतात, असे श्रीतुकाराम व श्रीकबीर या दोन्ही संतांनीही म्हटले आहे. त्यांचे संबंधित अभंग व दोहा असा आहे -
१) ‘तीर्थे त्याची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणासी ॥’ - श्रीतुकाराम
२) ‘निहकामी निर्मल दशा, नित चरणोंकी आस । तीरथ इच्छा ता करै, कब आवै वे दास ॥’ (भावानुवाद : निरपेक्ष निर्मळ सदा इच्छी गुरूचरण । इच्छीतसे त्या दासाचे तीर्थ आगमन ॥)
जगद्गुरू श्रीहंबीरबाबा यांनीही ‘संत हे तीर्थांनाही पावन करणारे म्हणजे सर्वश्रेष्ठ तीर्थ असतात’ हा स्वहितकर विचार पटवून देताना ‘पायीं तीर्थयात्रा घडो । देह संतांघरीं पडो ॥’ हा श्रीतुकारामांचा अभंगही उदधृत केला आहे.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
श्रेयस्कर स्वधर्माचरणाचे स्वरूप
श्रीज्ञानेश्वरांनी स्वधर्माचे आचरण करावयास सांगितले असल्याचे यापूर्वी उल्लेखिले आहे. स्वधर्म आचरावयाचा म्हणजे नेमके काय करावयाचे ते त्यांनी ज्ञानेश्वरीत स्पष्ट केले आहे; तर, स्वधर्माचरणाचे सारलक्षण श्रीतुकारामांनी ‘ठायींच बैसोनी करा एक चित्त । आवडीं अनंत आळवावा ॥’ या अभंगचरणात सांगितले आहे.
जगद्गुरू श्रीहंबीरबाबा यांनी मात्र स्वधर्माचरणाचे स्वरूप अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून दिले आहे. त्यांच्या त्या विवरणाचा सार असा : स्वधर्म म्हणजे ‘स्व’चा धर्म. देहरूपी स्व, जीवरूपी स्व आणि देवरूपी स्व असे तीन प्रकार त्यांनी केले आहेत. विश्वातील कोणत्याही जातीधर्माच्या माणसाने आपल्या प्राप्त कर्तव्याचे पालन करणे व समाजमान्य सदाचरण करणे हा देहरूपी स्वचा धर्म होय. गीतेत म्हटल्याप्रमाणे आपण सारे मानव देवाचे अंश आहोत. म्हणून जीवरूपी ‘आपण’ने देवरूपी ‘आपण’ची सोऽहंभावाने भक्ती करणे म्हणजे श्रीतुकाराम म्हणतात तसे ठायीच बसून मोठ्या आवडीने देवाला आळवणे हा जीवरूपी ‘स्व’चा धर्म होय. अशी भक्ती करून आपण सर्वव्यापी आत्मारूपी देव आहोत असे सदोदित ज्ञान झाल्याने सर्वजीवांशी संत जसे निरहंकारपणे समतायुक्त निष्काम बुद्धीने वागतात तसे आचरण करणे हा देवरूपी ‘स्व’चा धर्म होय. अशा प्रकारे स्वधर्माचे आचरण करणे हेच श्रेयस्कर होय, असा गीता-ज्ञानेश्वरीचा अभिप्रायही त्यांनी आपल्या ‘जीवनकलेची साधना’ या ग्रंथाचे शेवटी व्यक्त केला आहे.
आधी जातो देहभाव । मग दिसतो सर्वत्र देव॥
देव एका विशिष्ट ठिकाणी व विशिष्ट रूपाचाच आहे, असा श्रीनामदेवांचा दृढ समज झाला होता. तो समज त्यांचे सद्गुरू श्रीविसोबा खेचर दूर करतात आणि देव सर्वत्र म्हणजे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी व सर्व प्राणिमात्रातही भरून उरलेला आहे, असे त्यांना दिव्यज्ञान दृष्टी देऊन दाखवून देतात.
अशा प्रकारे पंढरपूर नामक एका तीर्थक्षेत्राचे रहिवासी असलेल्या श्रीनामदेवांना देवाचे सर्वव्यापक स्वरूप दिसले. आणि मगच त्यांनी मला सर्वत्र असलेला देव सापडला म्हणून मी आता कळिकाळाला भीत नाही, अशा अर्थाचा मार्गदर्शक अभंग आपल्यासाठी लिहून ठेवला. देवदर्शन घडण्यापूर्वी त्यांचा ‘देह म्हणजेच मी’ हा अभिमान, तज्जन्य अज्ञान व काम, क्रोधादी दोष गळून पडले. मक्का-यात्रा करतानाही असे झाले, की अल्लाहचे दर्शन घडते, हा विचार या लेखाचे सुरुवातीस दिलेल्या संवादातून अभिव्यक्त झाला आहे. हाच विचार संत श्रीनामदेव यांच्या सत्शिष्या संत श्रीजनाबाई यांनीदेखील ‘विराल्यावाचून देहअहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥’ या अभंगचरणातून व्यक्त केला आहे.
शरीराने व मनाने सशक्त आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक प्रौढ मुस्लीम व्यक्तीवर हज्ज-यात्रा करणे बंधनकारक होय. हज्ज-यात्रा करून आलेला एक माणूस इस्लामधर्मीय सुफी ज्युनियाद यांच्याकडे येतो. त्या दोघांच्यात पुढीलप्रमाणे संभाषण होते -
ज्युनियाद : कोठून आलास?
यात्रिक : यात्रेवरून!
ज्युनियाद : यात्रेसाठी घरून निघालास तेव्हापासून सर्व (वाईट) पापी विचारांपासून दूर जाणेरूपी प्रवास तू केलास काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग, यात्रा म्हणून करावयाचा तो प्रवास तू केलाच नाहीस. देवाकडे घेऊन जाणार्या मार्गावरील एकेक टप्पा आपण पार केला आहे असे, रात्री तू थांबलास त्या प्रत्येक ठिकाणी तुला जाणवले काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग मजल-दरमजल करत तो मार्गच तू आक्रमिला नाहीस. यात्रेत एका विशिष्ट ठिकाणी कफणी (यात्रिकाचा वेश) घालताना नेहमीचे कपडे काढून टाकलेस, तसे मनुष्यत्वाचे गुणविशेषही तू सोडून दिलेस काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग, तू ती यात्रिकाची कफणीच घातलेली नाही. जेव्हा ‘अराफत’वर थांबलास तेव्हा तिथे क्षणभर फक्त देवाचेच ध्यान (कम्टेम्प्लेशन) करत तू अगदी स्थिर उभा राहिला होतास काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग, तू ‘अराफत’वर थांबलाच नाहीस. जेव्हा तू ‘मुझदालिफा’ला गेलास आणि देवदर्शनाची तुझी प्रामाणिक इच्छा तू पक्की केलीस (अचिव्हड् यूवर डिझायर) तेव्हा तू तुझ्या सर्व विषयवासनांचा त्याग केलास काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग, तू मुझदालिफाला गेलाच नाहीस. जेव्हा तू मंदिराला (टेम्पल) प्रदक्षिणा घातलीस तेव्हा तुझ्या त्या शुद्ध अवस्थेत (अबोड ऑफ प्युरिफिकेशन) देवाचे चिन्मय सौंदर्य (इम्मटेरियल ब्युटी) तू पाहिलेस काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग, तू मंदिराला (टेम्पल) प्रदक्षिणाच घातली नाहीस. जेव्हा तू सफा आणि मारवा यांमध्ये धावलास तेव्हा शुद्धतेचा (सफा) व सद्गुणाचा (मुरुव्वत) दर्जा प्राप्त करून घेतलास काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग तू तिथे त्यांमध्ये धावलाच नाहीस. जेव्हा तू ‘मीना’नामक ठिकाणी आलास तेव्हा आता मनात कोणतीही इच्छा राहिलेली नाही, असे झाले काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : तर मग तू ‘मीना’नामक त्या स्थळाला भेट दिलीच नाहीस. नंतर बळी देण्याच्या जागी जेव्हा पोचलास तेव्हा बळी अर्पण करताना विषयसुख देणार्या सर्व गोष्टी तू अर्पिल्यास काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग तू बळी दिलाच नाहीस. जेव्हा तू (त्या विशिष्ट ठिकाणी) खडे फेकलेस, तेव्हा तुझ्या मनात अजूनही तुझ्याबरोबरच (मनात) होत्या त्या विषयवासनाही तू फेकून दिल्यास काय?
यात्रिक : नाही.
ज्युनियाद : मग, तू तिथे खडे फेकलेच नाहीस आणि तू यात्राही केली नाहीस. तर, तू परत जा आणि आता तुला मी जशी सांगितली आहे तशी यात्रा कर म्हणजे अब्राहम यांच्या त्या स्थळी तू येशील.
या संवादाचा पुढील निष्कर्षही ‘कश्फ अल् महजूब’ (अन्व्हेलिंग ऑफ दि व्हेल्ड) या पुस्तकात व्यक्त केला आहे : ‘एनीवन हू इज् अॅबसेंट फ्रॉम गॉड अॅट मक्का, इज् इन द सेम पोझिशन अॅज् इफ ही वेअर अॅबसेंट फ्रॉम गॉड इन हिज् ओन हाऊस; अँड, एनीवन हू इज् प्रेझेंट विथ गॉड इन हिज् ओन हाऊस, इज् इन द सेम पोझिशन अॅज् इफ ही वेअर प्रेझेंट विथ गॉड अॅट मक्का.... द ट्रू ऑब्जेक्ट ऑफ पिलगि‘मेज इज् नॉट टू विझिट दि काबा बट टू ऑब्टेन कन्टेम्प्लेशन ऑफ गॉड,’ असे एका सुफीने मक्का-यात्रेबाबत मार्गदर्शक विधान केले आहे. अर्थात, ज्याला ‘मक्केमध्ये देवाचे दर्शन घडत नाही त्याची अवस्था स्वत:च्या घरी देवाचे दर्शन घडत नसताना जशी होती अगदी तशीच असते; आणि ज्याला स्वत:च्या घरी देवाचे दर्शन होत असते त्याची अवस्था मक्केमध्ये देवाचे दर्शन घडत असताना जशी होती अगदी तशीच असते.... हज्जयात्रेचा खरा हेतू काबाला भेट देणे हा नसून देवाचे अखंड ध्यान लागून राहण्याची मन:स्थिती प्राप्त करून घेणे हा आहे. थोडक्यात, अल्लाच्या अनुभूतिशिवाय हज्ज-यात्रा सफल होत नाही.
‘मी देह’ हा भाव व विविध विकार नष्ट करणे, हा कोणतीही वारी वा तीर्थयात्रा करण्यामागील मुख्य हेतू
श्रीजुनियाद यांनी आपल्या घरी ज्याला देवदर्शन घडते त्याला मक्केतही देवदर्शन घडते आणि ज्याला मक्केत देवदर्शन घडते त्याला आपल्या घरीही देवदर्शन घडते, असे म्हटले आहे. हेच स्वानुभवगन्य सत्य महाराष्ट्रीय संतांनीदेखील व्यक्त केले आहे. उदा. ‘हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं’, असे एक संतवचन आहे. सुफी शेख मौलाना अब्दुल रहीम रायपुरी यांच्या एका शिष्याला अल्लाहचा प्रकाश (अभंड प्रकाश) चोहीकडे भरून राहिला असल्याचा सदोदित अनुभव येऊ लागल्यामुळे कुठेही लघवीला जाणे प्रशस्त वाटेनासे झाले होते, असे ‘दि टीचिंग्ज ऑफ इस्लाम’ या पुस्तकातील ‘दि व्हर्च्युज् ऑफ जिक’ या पुस्तकात म्हटले आहे. हिंदुधर्मीय संत श्रीएकनाथ यांनाही अनंत प्रकाशस्वरूप देव सर्वत्र असल्याचा प्रत्यय आला होता. त्यांनीही ‘चिन्मात्र पूर्ण कोंदिले’ असे वर्णिले आहे. (सुरुवातीस मक्का-यात्रावर्णनात टेम्पलला प्रदक्षिणा घालताना ‘इम्मटेरियल ब्युटी’ म्हणजे चिन्मात्र सौंदर्याचा अनुभव येतो, असे उल्लेखिले आहे.)
‘मी देह’ हा भाव व त्यामुळे निर्माण होणारे विविध विकार पूर्णत: नष्ट करणे, हा कोणतीही वारी वा तीर्थयात्रा करण्यामागील मुख्य हेतू आहे. तो हेतू जसा दूरगावी असलेल्या तीर्थक्षेत्राला जाऊन साध्य होईल, असे लोकांना वाटत असते, तसाच तो हेतू बाहेर कुठेही न जाता घरच्या घरी एकाग्र ध्यानरूपी अंतर्निष्ठ यात्रा करूनही साध्य होतो, असे अभिवचनही संतांनी दिले आहे. उदा. ‘न लगती सायास जावे वनांतरां । सुखें येतो घरां नारायण ॥, असे संत श्रीतुकाराम म्हणतात आणि ‘तुम्ही (श्रीहंबीरबाबा यांनी समजावून सांगितले आहे त्याप्रमाणे) स्वधर्माचरण कराल तर जिथे असाल तिथे सर्व सुखे तुम्हास शोधत येतील’, असे संत श्रीज्ञानेश्वर म्हणतात. (ज्ञानेश्वरी, ३.१०१ ते ११२)
थोडक्यात, श्रीजुनियाद यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मार्गदर्शिल्याप्रमाणे मी देह हा भाव, मी-माझेपणयुक्त विचार, अहंकार व तज्जन्य कामक्रोधादी विकार हे सारे नि:शेषपणे सोडून देत केवळ एक देवाचाच विचार मनात बाळगून जो कोणी भाविक मक्कायात्रा वा पृथ्वीवर असलेल्या अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्राची यात्रा करील त्या भाविकाला श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीज्ञानेश्वर, श्रीतुकाराम या सर्व संतांप्रमाणे सर्वत्र श्रीहरी म्हणजे देव असल्याचे सदोदित होईल.
.............................................................................................................................................
लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
vijaymaher@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment