अजूनकाही
पार्श्वभूमी
जागतिक तापमानवाढ आणि निसर्गाचं अतोनात नुकसान यांमुळे २०६०पर्यंत पृथ्वी हा ग्रह माणसांसाठी राहण्यास अयोग्य झाला. ओझोनचा थर पूर्णपणे नष्ट होऊन सूर्याची अतिनील किरणं पृथ्वीवर पोचायला लागली आणि कर्करोगासारख्या आजारांचं प्रमाण भयंकर वाढलं. घरटी एकजण तरी कॅन्सरनं दगावू लागला. उत्तर व दक्षिण ध्रुवांवरचं बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ झाली. पृथ्वीवरचं राहण्यायोग्य क्षेत्र आक्रसलं. सगळीकडचंच संतुलन बिघडलं. पावसाचं चक्र थांबलं. अन्नधान्य उत्पादन १० टक्क्यांवर आलं. तीव्र दुष्काळामुळे माणसं मेली. पृथ्वी हा माणसांसाठी अयोग्य ग्रह झाला. शेवटी सर्व मोठ्ठ्या कंपन्या आणि सरकारांनी एकत्र येऊन पृथ्वी सोडण्याचा निर्णय घेतला. सर्व सोयीसुविधांयुक्त पाच मोठी अंतराळयानं बनवली गेली आणि पृथ्वीवरचे उरलेसुरले लोक घेऊन त्यांनी ग्रह सोडला. तारीख होती २० एप्रिल २०६८.
पृथ्वी
साल ४०८६
त्या दिवशी थकून जेव्हा रात्री टोनी उर्फ तन्मय स्त्राकनं अंथरुणावर डोकं टेकवलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. दिवसभर खूप वणवण करून शेवटी त्याच्या हाती - ज्यासाठी तो पृथ्वीवर आला होता - ती गोष्ट लागली होती. त्यासाठी तो एवढा धोकादायक प्रवास करून पाच प्रकाशवर्षं दूर पृथ्वीवर परत आला होता. त्याचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झालं होतं. टोनीला पडल्या पडल्या त्याचे लहानपणीचे दिवस आठवायला लागले, ज्या सगळ्यामुळे त्याच्या आयुष्यभराच्या संशोधनाची सुरुवात झाली. त्यामागची प्रेरणा त्याला आठवायला लागली.
लहान असताना जेव्हा टोनीचे आजी-आजोबा त्याला देव-दानवांमध्ये झालेल्या अंतिम युद्धाच्या आणि त्यामध्ये लढलेल्या, बलिदान दिलेल्या योद्ध्यांच्या गोष्टी सांगायचे; त्यावेळी टोनी त्यात अगदी तल्लीन होऊन जायचा. आयर्न मॅन म्हणजेच बुद्धीच्या आणि अस्त्राच्या देवानं कसा एक अद्भुत चिलखती सूट तयार केला आणि त्यातील विविध अस्त्रं वापरून मानवजातीचा रक्षणासाठी थेनॉस नावाच्या दानवाशी लढताना तो कसा रणांगणावर धारातीर्थी पडला, हे ऐकताना टोनीच्या तोंडातील घास तोंडातच राहायचा. विद्युत शक्तीचा देव कसा त्याचा जादुई हातोडा आपटून शत्रूसेनेवर विजांचा वर्षाव करायचा, सर्वशक्तीशाली आदिमाया अर्थातच मार्व्हल देवी कशी एकट्यानेच शत्रूसेनेचा सर्वनाश करायची, मित्राच्या प्रेमाखातर अनंतमणी मिळवण्यासाठी जीवाचे बलिदान दिलेली ब्लॅकविडो देवी त्याला आदर्श वाटायची, महाबली विनाशक हल्क, धनुर्धर हॉकाआय, मा-गरिमेची सिद्धी प्राप्त असणारा अँट मॅन, जादूगार डॉ. स्ट्रेंज आणि या सर्वांचा लीडर मर्यादा पुरुषोत्तम कॅप्टन स्टीव्ह रॉजर्स यांचा दंतकथा लहानग्या टोनीचं सगळं भावविश्व व्यापून टाकायच्या.
जसा जसा टोनी मोठ्ठा होऊ लागला, तसतसा तो ‘अवेंजर्स पुराण’, ‘अवेंजर्स आणि अलट्रॉन दानव युद्ध’, ‘थॉर पुराण’, ‘स्ट्रेंज पुराण’, ‘हल्क पुराण’ इत्यादी चित्रमय पुराणकथा वाचायला लागला. त्या त्याच्या पूर्वजांनी पृथ्वी सोडण्यापूर्वी जवळ बाळगल्या होत्या. त्याच दरम्यान पृथ्वीवर पाठवलेल्या यंत्रमानवांकडून काही महत्त्वाची माहिती मिळत होती.
.............................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
फार फार पूर्वी म्हणजे २०३० साली उभारण्यात आलेल्या सॅन दिएगो येथील देवतांचा मेळाव्यात अवेंजर्स देवांना मानवंदना देण्यासाठी स्मारक उभारण्यात आल्याची माहिती यंत्रमानवांनी पाठवलेल्या फोटोंतून मिळत होती. त्यामुळे टोनीच्या eco ग्रहावरचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.
निरो मॉडीफायर आणि ऍटम शॉ या नेत्यांनी संपूर्ण पृथ्वीवर अवेंजर्सचं स्मारक बांधावं म्हणून ‘स्मारक वही बनाएंगे’ अशी मोहीम सुरू केली होती. खरं तर आघाडी सरकारचं मत जी काही उरलीसुरली साधनसंपत्ती पृथ्वीवर आहे, ती परत आणावी आणि त्याचा योग्य वापर करावा असं होतं. मॉडिफायर आणि शॉ या नेत्यांच्या नेतृत्वाखाली हल्क सेना, आयर्न मॅन दल असे गट सक्रिय व्हायला लागले, आयर्न मॅन देवासारखे लाल-पिवळ्या रंगांचे ड्रेस घालून हल्क देवाच्या नावानं हिरवा गुलाल उधळत मोर्चे निघायला लागले.
हे सर्व घडत असताना mythologicl science या विषयात संशोधन करत असलेल्या टोनीला काही महत्त्वाची जुनी हस्तलिखितं आढळून आली. त्यात कॉमिक कॉन संग्रहालयात MCU archaives या ठिकाणी अवेंजर्स आणि दानवांमध्ये झालेल्या युद्धाच्या चित्रफिती असल्याचा उल्लेख आणि त्याचा नकाशा मिळाला होता. टोनीच्या या संशोधनामुळे माणसांनी परत पृथ्वीवर जाऊन प्रत्यक्ष आपल्या पूर्वजांनी लढलेल्या युद्धाचा चित्रफिती आणाव्यात, असा प्रस्ताव मॉडिफायर आणि शॉ यांनी मांडला. साहजिकच टीममध्ये टोनीची निवड झाली.
पृथ्वीवर न्यूयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को इत्यादी युद्धस्थळांना भेटी देताना टोनीचा उर अभिमानानं भरून येत होता. शेवटी खूप धुंडाळून टोनी आणि त्याच्या टीमला MCU archaives आणि त्यात ठेवलेल्या एकूण २२ युद्धाच्या चित्रफिती सापडल्या. सलग बसून टोनी आणि त्याच्या टीमनं त्या कॉमिक कॉन ऑडिटोरियममधल्या मोठ्ठ्या पडद्यावर बघून काढल्या. सर्वच जण भारावून गेले होते. आनंदानं एकमेकांना मिठ्या मारत होते. टोनी आजवर ज्या अवेंजर्स देवांच्या स्वप्नमय जगात रमला, ते सर्व बघताना त्याला रडायला यायला लागलं. आयर्न मॅन देवाचा वीरमरणाचा प्रसंग पाहताना तर तो ढसाढसा रडला. Teasers आणि trailers नावावं २२ युद्धाचं संक्षिप्त चित्रिकरण त्यांनी eco ग्रहावर पाठवून दिलं.
eco वर निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मॉडिफायर आणि शॉ यांचा पक्षाला चित्रफितींचा प्रचारासाठी फार उपयोग झाला. ‘स्मारक वही बनाएंगे’ हेच त्यांच्या निवडणूक प्रचाराचं ब्रीदवाक्य ठरलं. टोनी जेव्हा चित्रफिती घेऊन eco वर परतला, तेव्हा त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं, मॉडिफायरनं त्याला त्यांच्या पक्षातर्फे उमेदवार घोषित केलं.
मॉडिफायर याचंच सरकार बहुमतानं निवडून आलं. त्यांनी टोनीलाच ‘स्मारक वहीं बनाएंगे’ या मोहिमेसाठी परत पृथ्वीवर पाठवलं. उरलीसुरली साधनसंपत्ती स्मारक बनवण्याचा कामी आली. सर्व अवेंजर्स देवांचे २०० मीटर उंचीचे गगनचुंबी पुतळे उभे राहिले. त्या वर्षीच्या science congress मध्येही पुराणात उल्लेखल्याप्रमाणे time machine, हँक पीम ऋषींनी शोधून काढलेले पीम कण, पुराणात सांगितलेले vormior, morag इत्यादी ग्रहांचा शोध या विषयांवरचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. अखेर पुराणातील देव पुन्हा एकदा युद्धभूमीवर अवतरले!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment