तुझे आहे तुजपाशी । परि तू जागा चुकलासी ॥
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • पंढरपूरचा श्रीविठ्ठल
  • Mon , 24 June 2019
  • पडघम सांस्कृतिक विठोबा Vitthoba विठ्ठल Vitthal आषाढी एकादशी Ashadhi Ekadashi पंढरपूर वारी PANDHARPUR WARI

आज तुकाराम महाराज आणि उद्या ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. १२ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तोवर या आणि इतर अनेक पालख्या पायी वारी करत महाराष्ट्रभरातून पंढरपुरात दाखल होतील. महाराष्ट्राच्या गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

....................................................................................................

देव आपल्या प्रत्येकाच्या जवळ असूनही लोक त्याबाबत चुकत असतात आणि देवाप्रत जाण्यासाठीची देहनगरातून असलेली देवकृत वाट तुलनेत अगदी सोपी आहे, असे अनुक्रमे श्रीतुकाराम व श्रीज्ञानदेव या दोन्ही संतांनी म्हटले आहे. म्हणून देव व देवाप्रत नेणारी पायवाट याबाबत त्यांचा व इतर काही संतांचा अभिप्राय समजून घेऊयात.     

ज्या वाटेने चालत जाता येते ती ‘पायवाट’ होय, हा या शब्दाचा शब्दश: अर्थ म्हणजे त्याचा वाच्यांश होय; तर, त्या वाटेने जाताना अष्टसात्त्विक भाव निर्माण होणे आणि सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चारी मुक्तींचा लाभ होणे म्हणजे थोडक्यात देवरूप झाल्याचा अनुभव येणे, हा त्याचा स्वहितसूचक लक्ष्यांश होय.

यावरून, पायवाट हा त्या भक्तिमार्गाविषयीचे रहस्य जाणून घेण्यासाठीची उत्सुकता निर्माण करणारा संतांनी योजिलेला सामान्य भाषेतील एक असामान्य शब्द आहे, असे आपल्या लक्षात येते.

त्या रहस्यमय भक्तिमार्गाबाबतची प्राथमिक माहिती संत श्रीकबीरकृत दोह्यांच्या पुढील भावानुवादांतून आपल्याला मिळते -

चालून थकले पाय राहिले नगर नऊ कोस ।

मध्येच तळ पडला तों म्हणू कुणाचा दोष ॥

चालशील तू कुठवर ते ठाऊक नसता नांव ।

गेले युगही जरी होते ते पाव कोसचि गाव ॥

या भावानुवादांमध्ये मूळ दोह्यांमधले बहुतेक शब्द आहेत. त्यांचा परम अर्थ समजून घेताना देवाप्रत नेणाऱ्या वाटेबाबत आपल्याला पुढील गोष्टी माहीत होतात - 

अध्यात्मशास्त्रानुसार मानवी देहाचे दोन भाग पडतात. पायांपासून भुवयांपर्यंतचा भाग म्हणजे पिंड व भुवयांवरील मस्तकाचा भाग म्हणजे ब्रह्मांड होय. पिंडात जीव राहतो व ब्रह्मांडात देव राहतो. श्रीकबिरांनी नगर व गाव या दोन्ही शब्दांनी ब्रह्मांडरूपी देवस्थानाचा निर्देश केला आहे. पिंडाला दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, मुख, लिंग व गुद अशी नऊ द्वारे असतात. या नऊ द्वारांनी आपला जीव सुखदु:खे उपभोगत असतो. तो जणू नऊ द्वारे असलेल्या आपल्या देहरूपी गावामध्येच रमलेला असतो. या अर्थाने, देव राहतो त्या नगरापासून नऊ कोस अंतरावरील गावामध्ये तो रहात राहतो. देव डोळ्यादी ज्ञानेंद्रियांना दिसत नाही. याही अर्थाने देव राहतो ते नगर, जीव राहतो त्या नऊ द्वारेरूपी गावापासून (नऊ कोस) दूर असते.

शारीरिक, वाचिक व मानसिक हालचाली श्वासोच्छ्वास असेपर्यंतच चालू राहतात. फक्त त्यांसाठीच अविरत श्वासोच्छ्वास करून जीव थकून जातो व एक दिवस देह सोडून जातो; पण, पिंड व ब्रह्मांड यांच्या सीमेवरील भूमध्याजवळील दशवेद्वारातून वर ब्रह्मांडात असलेल्या देवाप्रत तो जात नाही.  

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

श्रीकबिरांनी संबंधित दोह्यात ‘बीचमेंही डेरा परा’ असे म्हटले आहे. म्हणजे, ‘मध्येच तळ पडला’ होय. ‘मध्येच तळ पडणे’ म्हणजे ‘देवाची भेट होण्यापूर्वीच मरण येणे’ होय. काही लोक योगसाधना करत असतात; पण मृत्यू आल्यामुळे ती अपुरी राहते. याही गोष्टीला श्रीकबीर ‘मध्येच तळ पडणे’ असे म्हणतात. अशा प्रकारे, ‘चालून थकले पाय’ याचा अर्थ मृत्युची वेळ येऊन ठेपली म्हणून श्वास घेण्याची शक्ती संपली, हा होय.

देवाची भेट न होता असे लाखो वेळा घडलेले असते, घडते. पण नऊ द्वारे असलेल्या पिंडरूपी नगरात हिंडता हिंडता जन्म जातो तरी देव राहतो त्या ब्रह्मांडरूपी मंदिरात ज्या एका द्वारातूनच प्रवेश करावयाचा असतो ते द्वार जीव जाणून घेत नाही, असे श्रीज्ञानदेवदेखील म्हणतात. अर्थात ‘देवाचे द्वार’ या त्यांच्या ‘हरिपाठारंभींच्या’ शब्दांचा लक्ष्यांश म्हणजे भूमध्याजवळील ‘दशवे द्वार’ हा होय.

नयनाचे शेजारी दशवेद्वार बापा ।

एक मार्ग सोपा बोलतसे ॥1॥

अशा अगदी सुस्पष्ट शब्दाद्वारे त्या द्वाराची महतीही त्यांनी आपल्या एका अभंगात उल्लेखिली आहे.

तर, श्रीज्ञानदेव म्हणतात, की देवाप्रत जाण्यासाठीचा सोपा मार्ग आपल्या देहातच आहे; श्रीतुकाराम व श्रीनामदेव म्हणतात, की भक्ती करता यावी म्हणून तुमच्यासाठीचा देव तुमच्याजवळच आहे; श्रीविवेकानंद सांगतात की रानावनांत, गिरिकंदरात, तीर्थोतीर्थीं, देवळारावळात आहे वा स्वर्गातील सिंहासनावर बसलेला आहे, अशी ज्या देवाविषयी आपण कल्पना करत असतो, तो आपला आत्माच असल्याचा अनुभव येतो आणि श्रीकबीर म्हणतात की, देव अगदी पाव कोसावरच आहे.

पायवाटेचे हे पाव कोस म्हणजे पिंडातील नाभिकमलनिवासी जीव व ब्रह्मांडातील सहस्त्रदलकमलनिवासी देव यांच्यामधील अंतर होय. रत्नागिरी जिल्ह्यातील पावसच्या ‘स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने’ प्रकाशित केलेल्या ‘आत्मप्रभा’नामक ग्रंथातील पुढील ओव्यांतही ‘नाभिकमळ ते सहस्त्रदलकमळ’ ही देवकृत पायवाट असल्याचे अनुस्यूत आहे -

देह नगरातूनि आहे वाट। चढोनि षड्चक्रांचा घाट।

सहस्त्रदळ समाधी अघाट। भोगिती योगी ॥

सहस्त्रदळाचे शेवटीं ।.... दिसे मूर्ति चिन्मय ॥

ही आपल्या देहात असलेली पायवाट चढत चिन्मय देवाप्रत कसे जावयाचे ते श्रीसद्गुरू शिकवितात. त्याबाबत श्रीकबीर म्हणतात,

“नामजप जो सहज देहीं दाविती गुरुराव ।

श्वासोच्छ्वासीं नाम स्मरिता भेटे देवराव ॥”

आणि, सर्व प्राण्यांच्या देहात चालू असलेला सोऽहं हा जप जाणून घेऊन जीव सर्व बंधनांपासून मुक्त होतो, असे श्रीशंकराचार्य ‘विवेकचूडामणि’तील पुढील श्लोकात सांगतात -

सर्वत्र प्राणिनां देहे जपो भवति सर्वदा ।

हंस सोऽहं इति ज्ञात्वा सर्वबंधै: प्रमुच्युते ॥

श्रीकबीर व श्रीएकनाथ अजपाजपास गुप्त आदिनाम म्हणतात. हे आदिनाम जपत राहणे म्हणजे श्वासोच्छ्वासरूपी पायवाटेने जात राहणे होय, असे ‘गती तेचि मुखीं नामाचे स्मरण’ या अभंगचरणातून श्रीतुकारामांनी सूचित केले आहे. श्रीकबीर म्हणतात त्याप्रमाणे आपल्या श्वासोच्छ्वासात अहोरात्र चालू असलेल्या अजपाकडे लक्ष देणे हे सर्वोत्तम भक्तिकर्म होय. ते अभंग साक्षीभावाने करता येणे म्हणजे निजध्यान होय. इथे, निज म्हणजे आपले. आपला जीव हा मुळात देवच आहे, असे अखंड स्मरण राहणे म्हणजे निजध्यान होय. उपवास, तीर्थाटने, शास्त्राभ्यास तसेच योगाभ्यास वगैरे गोष्टींचा ‘गलबला’ केवळ हेच ‘ध्यान’ प्राप्त व्हावे म्हणून होत असतो. म्हणून, देवाने आपल्या जन्माबरोबरच आपल्या प्रत्येकाला देऊन ठेवलेला किंवा आपल्या प्रत्येकात निर्माण करून ठेवलेला म्हणजे ‘सहज’ असलेला अजपाजप सोडून दुसरे काही करणेरूपी ‘सायासीं पडोच नये’ असे श्रीरामदासस्वामींनी ‘दासबोधात’ सविस्तर पटवून दिले आहे.

मोक्ष मिळवून देणाऱ्या साधनांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे, असे सुस्पष्ट ‘मार्ग’दर्शन श्रीशंकराचार्य यांनी पुढील श्लोकातून केले आहे -

मोक्षकारणसामग्ऱ्यां भक्तिरेव गरीयसी ।

स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयते ॥

या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ‘भक्ती म्हणजे स्वस्वरूपानुसंधान’ होय. ‘मी आत्मा आहे’ या अर्थाचे स्मरण म्हणून ‘सोऽहं’-जप करणे म्हणजे स्वस्वरूपानुसंधान वा आत्मानुसंधान करणे होय. ‘मी देह’ या भावामुळे (देहात्मभावामुळे) जीव देवापासून जणू विभक्त झालेला असतो. देह नाशिवंत म्हणजे असत् आहे व आत्मा अविनाशी म्हणजे सत् होय. म्हणून देवाचा अविभक्त भक्त होता यावे या एकमेव हेतूने अजपाजप जपत राहणे किंवा स्वरूपानुसंधान करणे म्हणजे ‘तो (देव) मी आहे’ हा सद्भाव आळवत राहणे होय. मोक्षकारी हा सद्भाव आळवत राहिल्याने ‘मी देह आहे’ हा भाव लय पावतो. देहभाव लय पावला की संसारास कारणीभूत असणारी अविद्या किंवा माया लय पावते. माया म्हणजे स्वरूपविषयक अज्ञान होय. ते अज्ञान लय पावले की, ‘मी देव आहे’, असे ज्ञान होते. अशा प्रकारे सज्ञान होऊन अखंड सोऽहं-ध्यान करीत राहिले की संसाररूपी माया पूर्णत: लय पावते. थोडक्यात, अखंड सोऽहं-ध्यान करणे वा लागणे म्हणजे श्रीतुकारामांनी सूचित केलेली ‘देवाला आवडणारी थोर भक्ती’ करणे होय.

ही भक्ती करताना श्रीतुकाराम आपल्या ‘हरिपाठात’ म्हणतात त्याप्रमाणे, फक्त मनरूपी मोगरा, मनरूपी शेवंती किंवा मनरूपी तुळस देवाला अर्पण केली की मुक्ती मिळते; त्यासाठी इतर कोणतेही पूजासाहित्य लागत नाही. ते सांगतात त्याप्रमाणे ‘ठायींच बैसोनी एकचित्ताने देवाला आळवीत’ राहिल्याने अन्यत्र बाहेर कुठेही व्यक्ती जात नसल्याने घरच्या घरीदेखील क्षेत्रसंन्यास घडतो, मन एकाग्र करताना श्वासावर नियंत्रण येते व प्राणायाम आपोआप घडतात, ज्ञानेंद्रियांचा बाह्य जगाशी संबंध संपतो म्हणजे प्रत्याहार घडतो, देव जवळ असल्याची भावना जोपासत राहिल्याने उप-वास म्हणजे देवाजवळच राहणे व त्याची उपासनाही घडते, दहा इंद्रिये व अकरावे मन एकत्र आणून देवाचे स्मरण होत असल्याने आध्यात्मिक एकादशी केल्याचे पुण्य लाभते, ‘मी आत्मा आहे’ हा सद्भाव जोपासत राहिल्यामुळे श्रीरामदास ‘दासबोधा’त म्हणतात व अपेक्षितात ते ‘स्वरूपीं राहणे’रूप सर्वोत्तम स्वधर्माचरणही घडते, भगवान श्रीकृष्ण ‘गीतेत’ म्हणतात त्याप्रमाणे आत्मानुसंधानाने मनातील संकल्प नि:शेषपणे जळतात व परिणामी नित्ययज्ञ केल्याचे फळ मिळत राहते; श्रीज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे तीर्थयात्रेला जायचे श्रम व त्यासाठी धनही खर्चावे लागत नाही; श्रीकबीर म्हणतात त्याप्रमाणे देवनिर्मित २१६०० श्वासोच्छ्वासांची जपमाळ अंतरीं जपली जात असल्याने मानवनिर्मित माळ लागत नाही आणि श्रीज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे आपल्या श्वासातच देवदत्त अजपाजप चालू असल्यामुळे आपली स्नानादी कर्मेदेखील त्याच्या आड येत नाहीत. म्हणूनच, जीवशिवैक्य घडवणाऱ्या या ‘अद्वय’ भक्तीशिवाय बाकीच्या कठीण गोष्टीत तू व्यर्थ आपले मन घालू नकोस, असे श्रीज्ञानदेवांनी ‘हरिपाठातही’ उपदेशिले आहे.

लाखो-कोटी वेळा पशुपक्षीकिडामुंगी म्हणून जन्मल्यानंतर भोगलेली प्रचंड दु:खे व कष्ट यांच्या तुलनेत स्वदेहातच असलेली ‘नाभिकमल ते सहस्त्रदलकमल’ ही देवकृत वाट चढून जाण्याचे कष्ट हे नगण्य होत. म्हणूनच जणू ‘एऱ्हवी या योगासारखे सोपे काय आहे’, असे आश्वासक विधान श्रीज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरीत’ करून ठेवले आहे.

अशा प्रकारे, देहरूपी नगरातच देवाने करून ठेवलेल्या वाटेने श्रीसद्गुरुनाथ शिष्यांना हाताला धरून देव राहतो त्या आपल्या देहातच असलेल्या ब्रह्मांड-मंदिरात घेऊन जातात व तिथे त्याला त्याच्या मूळ देवस्वरूपाची ओळख करून देतात. अशा प्रकारे, ‘सदासर्वदा सन्निध’ असलेल्या कृपाळू देवाला एकचित्ताने आळवणेरूपी अल्प धाडस करणाऱ्या सत्शिष्याला ‘याच देहीं याच डोळां मुक्तीचा सोहळा पहावयास’ मिळतो.

थोडक्यात, ‘तुझे आहे तुजपाशी । परि तू जागा चुकलासी ॥’ या आपल्या अभंग वाणीतून संत श्रीतुकारामदेखील, स्वत: गेले व श्रीनिळोबा म्हणतात त्याप्रमाणे ज्या मार्गाने संत आधी स्वत: गेले व आपल्याला दावून गेले, त्या देवकृत सोप्या पायवाटेने जावयाचे आवाहन करून गेले आहेत.

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 27 June 2019

विष्णू जाधवर यांच्याशी सहमत. तसेच यौगिक रहस्य सोप्या शब्दांत मांडल्याबद्दल प्रा.बाणकर यांना विनम्र अभिवादन! -गामा पैलवान


vishnu jadhvar

Mon , 24 June 2019

सर अशा विचारांची आज खूप गरज आहे आपण केलेली सर्व मांडणी पुराव्यानिशी आहे त्यामुळे ती मनाला खूप भावते संत साहित्यातील विचारांची समाजाला खूप गरज आहे आपण अशा विषयावर नेहमी लिहावे अशी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......