लाल श्याम शाह यांचा वारसा चालवण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारतासाठी आणि प्रेरणा मिळवण्यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे!
ग्रंथनामा - झलक
रामचंद्र गुहा
  • ‘लाल श्याम शाह’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 22 June 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक लाल श्याम शाह Lal Shyam Shah सुदीप ठाकूर Sudeep Thakur रामचंद्र गुहा Ramachandra Guha

“लाल श्याम शाह यांचे सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले चरित्र वाचून मला खूप आनंद झाला. हे पुस्तक वाचकांना कुशलतेने त्या काळाशी जोडते. प्रवाही निवेदन आणि सुबोध लेखन यांच्या साह्याने सुदीप ठाकूर आदिवासींच्या एका असाधारण नायकाची कहाणी या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम शाह यांना गोंडवाना प्रदेशात चांगल्या प्रकारे ओळखले जात होते. पण त्यांनी केलेले काम आणि त्यांनी घालून दिलेली उदाहरणे मात्र भारतभरात परिचित झाले पाहिजे. त्यामुळे त्यांचा आदर्श पूर्ण देशात सगळ्यांसमोर ठेवला जाऊ शकतो,” असे इतिहासकार, चरित्रकार, स्तंभलेखक रामचंद्र गुहा ज्या पुस्तकाबद्दल म्हणाले आहेत, त्याचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेलं हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. मूळ पुस्तकाला गुहा यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

...............................................................................................................................................................

चरित्रलेखन हा आपल्या देशातील एक अविकसित साहित्यप्रकार आहे. आपण भारतीय लोक जिवंत असलेल्या माणसांचे गुणगान करतो. पण कुणा दिवंगत व्यक्तीच्या बाबतीत अधिकारवाणीने लिहिणे आपल्याला जमत नाही. अर्थात, आपल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांची चरित्रात्मक म्हणावीत अशी पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्यातील थोडीच पुस्तके विद्वत्ता आणि साहित्य या कसोट्यांवर उतरतात. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद व अन्य काही नायकांवर अशी पुस्तके लिहिली गेली आहेत. परंतु अशा अनेक उल्लेखनीय व्यक्ती आहेत, ज्यांना अखिल भारतीय पातळीवर ओळख प्राप्त झालेली नाही आणि त्यांच्या जीवनाच्या बाबतीत योग्य प्रकारे लिहिलेही गेलेले नाही. उदाहरणेच सांगायची तर ई.एम.एस. नंबूद्रीपाद, मास्टर तारासिंह, वाय.एस. परमार, ज्योती बसू, एन.टी. रामाराव आणि शेख अब्दुल्ला. वरील प्रत्येकाने अनुक्रमे केरळ, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांच्या इतिहासाला आकार देण्यासाठी गांभीर्याने योगदान दिले आहे. मात्र या मोठ्या व्यक्तींपैकी कुणाच्याही बाबतीत संशोधनपर किंवा अभ्यासपूर्ण लिहिले गेलेले चरित्र अद्याप उपलब्ध झालेले नाही.

ही कमतरता केवळ राजकीय किंवा सार्वजनिक जीवनापुरतीच मर्यादित नाही. आपला साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहासदेखील इतक्याच विपन्नावस्थेत आहे. उदाहरणार्थ बहुश्रुत शिवराम कारंथ, बांगला लेखिका व कार्यकर्त्या महाश्वेतादेवी, जागतिक स्तरावर ठसा उमटवणारे संगीतकार रविशंकर यांची चांगली चरित्रे वाचायला मला आवडतील, पण ती उपलब्ध नाहीत.

भारतातील उत्तम चरित्रलेखनाच्या अभावाबद्दल दु:ख व्यक्त केल्यानंतर, मला हेही सांगितले पाहिजे की, लाल श्याम शाह यांचे सुदीप ठाकूर यांनी लिहिलेले चरित्र वाचून मला खूप आनंद झाला. हे पुस्तक वाचकांना कुशलतेने त्या काळाशी जोडते. प्रवाही निवेदन आणि सुबोध लेखन यांच्या साह्याने सुदीप ठाकूर आदिवासींच्या एका असाधारण नायकाची कहाणी या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम शाह यांना गोंडवाना प्रदेशात चांगल्या प्रकारे ओळखले जात होते. पण त्यांनी केलेले काम आणि त्यांनी घालून दिलेली उदाहरणे मात्र भारतभरात परिचित झाले पाहिजे. त्यामुळे त्यांचा आदर्श पूर्ण देशात सगळ्यांसमोर ठेवला जाऊ शकतो.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

आदिवासी हा भारतीय समाजातील सगळ्यात वंचित वर्ग आहे. त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती, ही मुसलमानांपेक्षा आणि दलितांपेक्षाही अधिक अनिश्चित आहे. आपल्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये ते अधिकच काठावर ढकलले गेलेले आहेत. जमीनदार घराण्यात जन्मलेले लाल श्याम शाह, स्वतः विलासी आणि आरामदायक जीवन जगू शकले असते. तरीही त्यांनी आपल्या समाजातील लोकांची सेवा करणे पसंत केले. आदिवासी सभेचे नेता या नात्याने त्यांनी, जमीन आणि जंगलावरील आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण केले. आदिवासींचा इतिहास आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी संघर्ष केला. मध्य भारतातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात दौरे केले. आदिवासी लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्यांचा खूप सन्मान करत होते.

लाल श्याम शाह यांनी दशकानुदशके ज्या विभिन्न चळवळी केल्या, त्याबाबत सुदीप ठाकूर या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका लढवल्या, त्याच्या हकिगतीही या पुस्तकात आहेत. काही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय प्राप्त केला होता, तर काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र निवडणुका जिंकल्यानंतरही त्यांनी सिद्धान्ताच्या आधारावर राजीनामे दिले हेही यात आले आहे. आदिवासींना संविधानाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारे अपयशी ठरली, हेच मुख्य कारण त्यामागे होते. निवडणुकीच्या राजकारणाव्यतिरिक्त ज्या आंदोलनांचे नेतृत्व शाह यांनी केले होते, त्यात नैसर्गिक संसाधनांवरील आदिवासींचे हक्क व अधिकार यावर त्यांनी जोर दिला होता. विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात जी आंदोलने झाली होती, त्यातही लाल श्याम शाह आघाडीवर होते. यासंदर्भात सुदीप ठाकूर यांनी बरीच तपशीलासह माहिती दिलेली आहे.

लाल श्याम शाह हे विचारवंत तर होतेच, पण कार्यकर्तादेखील होते. त्यांना आदिवासींच्या स्थितीबरोबरच कायदेशीर चौकटीचीही चांगली समज होती. ते नेहमीच (आणि हे खरेही आहे) असा युक्तिवाद करत असत की, एकीकडे संविधानाने देशाचे राष्ट्रपती व विविध राज्यांचे राज्यपाल यांना आदिवासींच्या अधिकारांचे संरक्षक बनवले आहे, तर दुसरीकडे या उच्च पदावर बसलेल्यांनी आपल्या जबाबदारीपासून तोंड फिरवून आदिवासींना अधिक शक्तिशाली आर्थिक वर्गाच्या दयेवर सोडून दिलेले आहे.

स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेल्या लाल श्याम शाह यांनी स्वतःला कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधून घेणे अविवेकपूर्ण मानले. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते, पण आयुष्यभर ते राजकीयदृष्ट्या सक्रीय राहिले. त्यामुळेच, १९७५ च्या आणीबाणीच्या काळात काँग्रेस सरकारने त्यांना अटक केली होती आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवले होते. पण अशा घटनांमुळे ते घाबरले नाहीत आणि थांबलेही नाहीत. १९८०च्या दशकात (तेव्हा त्यांच्या वयाची साठी उलटलेली होती) ते ‘जंगल बचाओ, मानव बचाओ’ या आंदोलनात सक्रीय झाले. आणि जल, जंगल, जमीन यावरील आदिवासींच्या अधिकारासाठी लढा दिला. कारण स्थानिक अर्थव्यवस्थेचे हे तीन आधारस्तंभ आहेत. शिवाय, ही अशी तीन संसाधने आहेत, ज्यांची लूटमार बाहेरील माणसे सातत्याने करत असतात. मार्च १९८६मध्ये लाल श्याम शाह यांचे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते सक्रीय राहिले, लढत राहिले.

सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके आणि अहवाल यावर आधारित आहे. खूप सावधपणे केलेल्या संशोधनाबरोबरच खूप प्रेमाने लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एका असाधारण भारतीयाला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे. लाल श्याम शाह हे मध्य भारतातील आदिवासींचा आवाज होते, त्यांचा अंतरात्मा होते. ते सही करताना स्वत:च्या नावाच्या बरोबर ‘आदिवासी’ हा शब्दही लिहीत असत. ‘लाल श्याम शाह, आदिवासी’ असे ते गर्वाने आणि निर्भयतापूर्वक लिहीत असत. आपल्या लोकांविषयी, समाजाविषयी पूर्ण एकरूपता आणि बांधिलकी दाखवण्याचा तो एक मार्ग होता. आजच्या राजकीय नेत्यांच्या विपरीत त्यांचे वर्तन म्हणावे लागेल. कारण त्यांनी स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाच्या स्वभिमानासाठी संघर्ष केला.

लाल श्याम शाह यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटावे व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......