अक्षय इंडीकर : “सिनेमा आयुष्यातला उत्तरं देणारा नव्हे, तर प्रश्न निर्माण करणारा घटक आहे. तो संदेश वगैरे देण्यासाठी नसतो.”
संकीर्ण - मुलाखत
अक्षय शेलार
  • अक्षय इंडीकर
  • Thu , 20 June 2019
  • संकीर्ण मुलाखत अक्षय इंडीकर त्रिज्या Trijya डोह Doh भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade उदाहरणार्थ नेमाडे Udaharnarth Nemade

आधी ‘डोह’ या लघुपटाची बरीच चर्चा झाली. मग आला ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा मराठीतला पहिला डॉक्यु-फिक्शन चित्रपट. तोही बराच गाजला. आणि आता आलाय ‘त्रिज्या’ हा चित्रपट. या तिन्हींचा कर्ता आहे तरुण मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर. त्याच्या ‘त्रिज्या’ या चित्रपटाची ‘एशियन न्यू टॅलेंट अॅवार्ड’साठी निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या पुरस्कारांसाठी ‘त्रिज्या’चं नामांकन झालं आहे. त्यानिमित्तानं या दिग्दर्शकाची ही खास मुलाखत...

.............................................................................................................................................

प्रश्नांकडे वळण्यापूर्वी पहिल्यांदा तुझ्या नव्या चित्रपटाविषयी, ‘त्रिज्या’विषयी थोडंसं सांग. म्हणजे मला आणि वाचकांनाही कथानकाची कल्पना येईल.

‘त्रिज्या’ला सेमी-ऑटो बायोग्राफिकल चित्रपट म्हणता येईल. अकलूजसारख्या गावातून पहिल्यांदा स्थलांतरित झाल्यानंतर जेव्हा शहर समोर येऊन आदळतं, आणि शहर समोर येऊन आदळल्यानंतर जी अवस्था होते, त्यानंतर आपला स्वतःशी एक झगडा सुरू असतो. हा झगडा या नव्या वातावरणात आपली स्वतःची अशी जागा शोधण्याचा असतो. याच शोधण्याविषयीचा हा चित्रपट आहे. स्वतःला शांत वाटेल अशी कुठली जागा असते का? आणि ती असेल तर ती बाहेर कुठे असते की, आपल्या आतच असते, अशा वाटेने हा चित्रपट जातो. अवधूत नावाच्या एका पंचवीस वर्षाच्या पात्राने केलेला हा प्रवास आहे.

तू एफटीआयआयमध्ये शिकला आहेस. तिथे प्रवेश घेण्यापूर्वीही तू जागतिक चित्रपट पाहत असशील, साहित्य वाचत असशील. मग फिल्म इन्स्टिट्यूटने तुझ्या चित्रपट, साहित्य आणि एकूणच जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काय बदल घडवले?

फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तुमची बहुभाषिक संस्कृतीशी ओळख होते. तुम्ही एकाच वेळी अनेक संस्कृतींशी जोडले जाता. अर्थातच तुमचा अनेक संस्कृतींशी संपर्क, संबंध येतो. कारण तिथं वेगवेगळ्या भाषिक प्रदेशांतून आलेली मुलं असतात. त्यामुळे वेगवेगळ्या भाषा अवगत असलेली मुलं तुमच्यासोबत असल्यानं वेगवेगळे बहुसांस्कृतिक पैलू तुम्हाला कळत जातात. हा मला फिल्म इन्स्टिट्यूटचा एक महत्त्वाचा भाग वाटतो.

त्यानंतर चित्रपटाबद्दल बोलायचं तर सिनेमासाठी चोवीस तास असणारी जागा. जिथं सिनेमा बघितला तर जातोच, पण तो जगलासुद्धा जातो. आम्ही तिथं प्रत्येक दिवशी चित्रपट बघत तर होतोच, पण दुसऱ्या दिवशी वर्गात त्यावर चर्चा व्हायची. शिवाय, अनऑफिशियली कॅन्टीनमध्ये, मित्रांसोबत होणाऱ्या चर्चा या सगळ्यांमधून सिनेमा म्हणजे एक गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे हे जाणवू लागतं. जे आधीही कळत होतं, पण आपण जेव्हा एखादी गोष्ट व्यवसाय म्हणून स्वीकारतो, तेव्हा त्याला जे गांभीर्य लाभतं ते फिल्म इन्स्टिट्यूटने दिलं असं वाटतं. म्हणजे या गोष्टींबाबत जो हौशीपणा असतो, तो राहिला नाही. याच गोष्टीवर शिस्तबद्ध पद्धतीनं आपण आयुष्य जगणार आहोत आणि हे पुढची ३०-४० वर्षं करणार आहोत याचं भान येत गेलं. म्हणजे करू, नाही करू हा पुढचा भाग झाला. पण ही गोष्ट अशी आहे, जी तुमचं आयुष्य घेणारी आहे. चित्रपट तुम्ही करत नाही. तुम्हाला नाही काही करावं लागत, चित्रपट तुमच्याकडून करवून घेतो. जरी चित्रपट इतर कलांच्या इतिहासात वयानं सगळ्यात छोटी कला असली तरी इतक्या कमी कालावधीत तिनं इतकं सगळं अचिव्ह केलं आहे. जे चित्रकलेनं केलं, तेच चित्रपटानं फक्त १००-१२५ वर्षांत केलं. चित्रपट तुमचं आयुष्य व्यापून टाकणारी कला आहे याचं भान फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आलं. एखाद्या लेखकाला चेकॉव्हसारखं काहीतरी लिहून व्हावं यासाठी आयुष्यभर वाट पाहत बसावी लागते. तसं सिनेमाविषयी गंभीर भान येणं, चित्रपट ही काहीतरी खूपच मोठी गोष्ट आहे, हे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असताना खूप जास्त चांगलं कळालं.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

तू आधी ‘डोह’सारखी शॉर्ट फिल्म बनवलीस. मग ‘अरण्य’च्या निमित्तानं भालचंद्र नेमाडे यांना भेटलास आणि तुला ‘उदाहरणार्थ नेमाडे’ करावासा वाटला. त्याच्या रूपात तू मराठीतील पहिला डॉक्यु-फिक्शन सिनेमा बनवला. आता तू कथात्म चित्रपटाकडे वळला आहेस. या सगळ्या वेगवेगळ्या चित्रपट प्रकारांनी तुला लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कशा पद्धतीनं समृद्ध केलं?

फिल्म इन्स्टिट्यूटला असताना शांत नाही बसलं पाहिजे, अभ्यासाच्या व्यतिरिक्तही अधिक काहीतरी केलं पाहिजे असं माझं मत होतं. आणि मुख्य म्हणजे मला शूटिंगचं भय घालवायचं होतं. मी शूटिंगला खूप घाबरतो अॅक्च्युअली. शूटिंगची प्रोसेस मला सारखी छळते की - नाही, आपण शूटिंग केलं पाहिजे. ज्या सगळ्याची भीती वाटते, ते शूटिंग केलं पाहिजे. तर मग लोकांना जमवणं आणि इतर सगळ्या गोष्टींचा रियाज व्हावा म्हणून मी ‘डोह’ केली. ती करतानाच ठरवलं होतं की, आपण मुद्दाम झिरो बजेट करावी. कारण लोकेशन भाड्यानं घेणं ही अगदीच सोपी गोष्ट आहे. पण जागेसाठी दहा ठिकाणी जाणं, त्यातील चौघांनी नकार देणं यातून तुम्ही नकार पचवता, लोकांशी भेटता. आणि शॉर्ट फिल्म का, तर त्या कथेचा आवाकाच तेवढा होता. तीन दिवसांचं शूट होतं, उपलब्ध असलेल्या रिसोर्सेसमध्ये ते करायचं होतं. मला कथा सुचलीच तशी होती की, एका दिवसात, काही तासांमध्ये घटनाक्रम घडतो. त्यामुळेच ती शॉर्ट फिल्मच्या रूपात येत गेली.

डॉक्यु-फिक्शनचं असं झालं की, नेमाडेंना भेटल्यावर मला असं वाटलं की, या माणसाला आपण टिपलं पाहिजे. मग या माणसाला टिपताना हा माणूस म्हणजे फक्त हाच माणूस आहे का, की त्यानं निर्माण केलेलं साहित्य पण असेल का? कारण ते साहित्यही तितकंच खरं आहे, जितके नेमाडे खरे आहेत. मग त्या साहित्याचं काय करायचं? आणि फक्त साहित्य घेतलं तर ते निर्माण करणाऱ्या नेमाडेंचं काय करायचं? त्यामुळे असं वाटलं की, आपण दोन्हींना एकत्र करू. त्यामुळे एकीकडे डॉक्युमेंटरी चालू आहे, तर एका बाजूला फिक्शन चालू आहे. त्यातून मग डॉक्यु-फिक्शन हा फॉर्म - माहीत नाही कसा, पण आला.

मी आधीही हा फॉर्म पाहिला होता. मणी कौलची एक फिल्म आहे - ‘सतह से उठता आदमी’. त्याच्यामध्ये त्यांनी मुक्तिबोध यांचं छायाचित्र फोटो आणि त्यांचं साहित्य याची सांगड घातली होती. मुक्तिबोधांच्या मृत्यूनंतरची ती फिल्म असल्यानं त्यांचं छायाचित्र वापरलं आहे. त्यामुळे कुठेतरी मला वाटलं की, नेमाडे आपल्यात आहेत आणि त्यांचं डॉक्युमेंटेशनसुद्धा व्हायला हवं. मग म्हटलं नेमाडेंना आपण टिपू आणि त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा, ते ज्या पद्धतीनं वातावरणनिर्मिती करतात ते पकडू शकू का, याचा विचार आला. ‘झूल’च्या शेवटी ज्या पद्धतीनं पाऊस येतो किंवा ‘कोसला’मध्ये अजिंठ्याचं चित्र ज्या पद्धतीनं उभं केलं जातं किंवा त्यांच्या घरातील साहित्य, ज्याचं अस्तित्व म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही - ही जी एक प्रकारची समृद्ध अडगळ आहे, ती आपण त्यांच्या गावात राहून टिपली तर कसं होईल, अशा आशयाशी निगडित गोष्टींमधून एक फॉर्म आकाराला येत गेला.

‘त्रिज्या’ पूर्णतः फिक्शन फिल्म आहे. कारण एक नवीनच जग उभं करायची इच्छा होती, ज्या जगामध्ये मी माझे नियम चालवू शकेन. त्यामुळे ‘प्युअर फिक्शन’ निर्माण करायचं होतं. अर्थात ‘प्युअर फिक्शन’ असं काही नाहीच. फिक्शन म्हणजे वास्तवाला दिलेला प्रतिसाद आहे, असं मला वाटतं. त्यातून या चित्रपटाचा फॉर्म काल्पनिक आहे, असं म्हणत असताना तोदेखील वास्तवच आहे. पण टोल्ड इन अ डिफरन्ट वे.

आता ‘त्रिज्या’बाबत. पहिल्यांदा मला सांग की, ‘त्रिज्या’चं आधीचं नाव ‘अरण्य’ असं असल्याचं कळतं. मग आता ते बदलावंसं का वाटलं?

‘अरण्य’चं असं झालं की, दुसऱ्या कुणीतरी ते शीर्षक आधीच रजिस्टर केलं होतं, अशी तांत्रिक बाब समोर आली. मग आम्ही विचार केला की, अजून सिनेमा प्रदर्शितही झाला नाही, की कुठे प्रीमियरदेखील झालेला नाही. त्यामुळे मग आम्ही नाव बदलून ‘त्रिज्या’ हे नाव रजिस्टर केलं.

‘त्रिज्या’ हा तुझा पहिला कथात्म चित्रपट आहे. तू या प्रोजेक्टवर कधीपासून काम करत आहेस?

‘त्रिज्या’ची पटकथा साधारण २००९-१० मध्ये लिहून झाली होती. या चित्रपटाचं नाव आधी ‘यात्रा’ होतं, मग ‘यात्रा’वरून ‘अरण्य’ केलं. दरम्यान ‘जायंट व्हील’ असंही एक शीर्षक समोर होतं. शेवटी ‘अरण्य’चं बदलून ‘त्रिज्या’ झालं. माझी लिखाणाची प्रक्रिया म्हणजे आता या चित्रपटाची सहा-सातशे पानं लिहिलेली आहेत. ज्यातून पुनर्मांडणी, पुनर्लेखन करत दीडशे पानांची पटकथा तयार झाली. पण माझ्या मते फिल्म तयार होत जाते, ती बदलत जाते. कारण मी २००९ नंतर बदललो आहेच ना! माणूस बदलतो, भोवताल बदलतो, भोवतालाकडे बघण्याची दृष्टी बदलते. जगाविषयीचं तुमचं आकलन बदलतं. तुम्ही बदलता तशी तुमची पात्रंही बदलत जातात, कारण शेवटी पात्रं तुमच्याच विचारांतून निर्माण झालेली असतात. अगदी चित्रीकरण पूर्ण झालं तरी पोस्ट-प्रॉडक्शनदरम्यान संकलन सुरू असतानाही चित्रपटात बदल घडत असतात. कारण पोस्ट-प्रॉडक्शनदरम्यान मला पटकथेच्या बाहेर जाऊन दृश्य-ध्वनी एकत्र करून काहीतरी नवीन सांगू पाहावंसं वाटू शकतं. त्यामुळे असं म्हणता येईल की, लिहिणं ही प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असते.  

मग चित्रपट पूर्ण कधी झाला?

आता २०१९ मध्येच पूर्ण झाला. म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं तर शेवटची डीसीपी (डिजिटल कॅमेरा पॅकेज - सोप्या भाषेत: चित्रपट वितरणाच्या स्तरावर चित्रपट थेट चित्रपटगृहामध्ये दाखवता येईल अशी प्रत) ३ जूनला काढली.

अल्पावधीत लोकप्रिय पावलेला ‘उदाहरणार्थ नेमाडे’ आणि आता जगभर फिरत असलेला ‘त्रिज्या’ या दोन्ही चित्रपटांच्या निमित्तानं तू सिनेमॅटोग्राफर स्वप्नील शेटेसोबत काम केलं. तर त्याबाबत काय सांगशील?

अॅक्चुअली, ‘त्रिज्या’मध्ये स्वप्नीलसोबत मीदेखील को-सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे. स्वप्नीलबाबत सांगायचं झालं तर सिनेमा कसा दिसला पाहिजे, म्हणजे त्यातली जी दृश्यं आहेत (त्यातली दृश्यरचना म्हणू हवं तर); चित्रपटाची दृश्यरचना आम्हा दोघांचे आवडते चित्रपटकर्ते एक असल्यानं आम्हाला जोडणारा समान दुवा आहे असं म्हणता येईल. ज्यामुळे चांगला सिनेमा म्हणजे काय, तो कसा दिसायला हवा, याविषयीची आमची मतं साधारणतः सारखीच होती. सिनेमा चांगला असण्याचे प्रत्येकाचे आपापले असे निकष असतात. जीवनाबाबत जसं असतं अगदी तसंच. प्रत्येक जण चांगल्या सिनेमाचे स्वतःचे असे निकष ठरवतो. स्वप्नील आणि माझं असं आहे की, आम्ही जिवंतपणा टिपण्याला अधिक महत्त्व देतो. समोर वादळी वारा आलाय किंवा विजा चमकत आहेत, तर माझं असं असतं की, ती दृश्यं आपण कॅमेऱ्यात कैद करायला हवीत, जी मी माझ्या खोलीत बसून लिहू शकलो नाही. सिनेमा म्हणजे तोच असतो. खूप जण म्हणतात की, मला गोष्ट सांगायची आहे, पण माझं असं मत आहे की, मग गोष्टच सांग ना तू. त्यासाठी सिनेमा का करावा? आम्हाला दोघांनाही गोष्ट सांगण्यात रस नव्हता. गोष्टीच्या पलीकडेही सिनेमा बऱ्याच काही गोष्टी करू शकतो की, ज्या गोष्टी शब्दांमध्ये सांगताच येत नाहीत. त्या शब्दांच्या पलीकडील ज्या गोष्टी आहेत, त्या निर्माण करणं दोघांनाही चॅलेंजिंग वाटत असावं. त्यामुळेही आम्ही एकत्र काम करत असू.

‘त्रिज्या’ची निर्मिती ‘उदाहरणार्थ नेमाडे’ची निर्मिती करणाऱ्या अरविंद पाखलेंच्या चित्रकथीचीच आहे. तर फायनान्सची प्रोसेस कशी होती? म्हणजे याचीही आणि ‘उदाहरणार्थ नेमाडे’चीही.

अरविंद पाखले यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच इन्व्हॉल्व्हड होते. ‘उदाहरणार्थ नेमाडे’ आम्ही शूट केली होती. त्यादरम्यान आम्ही ज्या दोन-तीन लोकांशी बोललो, त्यामध्ये पाखले होते. त्यानंतर आम्ही त्यांना झालेल्या शूटमधील काही भाग दाखवला. मग ते ‘उदाहरणार्थ नेमाडे’ची निर्मिती करतील असं ठरलं. त्यानंतर चित्रकथीची संकल्पना आकाराला आली. दरम्यान तेव्हा जी ‘यात्रा’ची, म्हणजे आताच्या ‘त्रिज्या’ची पटकथा तयार झाली होती, ती मी त्यांना ऐकवली. ती त्यांना आवडली. त्यातही ते पहिल्यापासूनच इन्व्हॉल्व्ह झाले. त्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शनदरम्यान जर्मन चित्रपट निर्मिती संस्थादेखील निर्मिती प्रक्रियेत सामील झाली. त्यामुळे आता ‘त्रिज्या’ला जर्मन को-प्रॉडक्शनसुद्धा आहे. कॅटरिना झिकारोना आमच्या जर्मन प्रोड्युसर आहेत. शिवाय, अर्सी लाम्बा हे आणखी एक भारतीय प्रोड्युसर आहेत.

कथेच्या आणि व्हिज्युअल्सच्या पातळीवर तुझ्यावर एखाद्या व्यक्तीच्या कामाचा किंवा शैलीचा प्रभाव आहे असं तुला स्वतःला वाटतं का? किंवा तुझ्यावर कुणाचा प्रभाव आहे?

खरं तर खूप दिग्दर्शक आहेत. आपण जागतिक सिनेमा पाहतो, एखादी फ्रेम लक्षात राहते, एखादं व्हिज्युअल लक्षात राहतं. त्यामुळे तुम्ही नकळत त्याच्या प्रभावाखाली असता. पण आयुष्यात ज्यांनी सिनेमाला गंभीरपणे घ्यायला शिकवलं अशा काही तीन-चार लोकांची नावं मी जरूर घेईन. ती म्हणजे अब्बास किअरोत्सामी, मायकलअँजेलो अंतोनिओनी आणि आंद्रे तारकोवस्की. या तिघांचीही गोष्ट अशी की, तिघांनाही कथा सांगण्यात रस नव्हता. गोष्ट सांगण्यापेक्षा स्वप्नवत असं वातावरण निर्माण करायचं आणि माणसाच्या अंतरंगात डोकवायचं. सिनेमा आयुष्यातला उत्तरं देणारा नव्हे, तर प्रश्न निर्माण करणारा घटक आहे. तो संदेश वगैरे देण्यासाठी नसतो, असं मी नेहमी म्हणतो.

आपल्याकडे नेहमी यातून काय संदेश द्यायचा आहे असं विचारलं जातं. माझं मत असं पडतं की, ‘मेसेज’च द्यायचा असेल तर मी मेसेज पाठवीन ना! तसा ठराविकपणा असेल तर त्याचं कामच संपतं ना! एवढ्याच एका गोष्टीसाठी सिनेमा वापरायचा का? आपल्याकडे ‘सामाजिक सिनेमा’ अशीही एक संकल्पना आहे. मला असं वाटतं की, कुठलाही सिनेमा सामाजिक सिनेमा असू शकतो, किंबहुना असतोच. आता आपण दोघं बोलतो आहोत, आपणही समाजाचे घटक आहोत. तर मग आपल्यावर बनलेला सिनेमा सामाजिक नसतो का? तर असतो. आपल्यालाही भावना आहेत, आयुष्य आहे, आनंद आहे, दुःख आहे. हे सगळं मांडलं तर सामाजिक होतं का, तर होतंच की! त्यामुळे सामाजिक अशी काही सिनेमाची वेगळी संकल्पना नसते. सिनेमा म्हणजे तुम्ही काहीतरी दाखवता आणि काहीतरी ऐकवता.

...आणि त्यातून प्रेक्षक हवं ते घेतात.

घेतात, आणि मी तर म्हणतो घ्यावं. याच्यापलीकडे वेगळं असं काही नसतं. सिनेमावर हे संदेश देण्याचं काम लादणं म्हणजे त्याचं एक्सप्लॉयटेशन आहे. ही त्याच्याशी केलेली प्रतारणा आहे. अशा वेळी त्याला तुम्ही खोट्या पद्धतीनं काहीतरी सांगायचं माध्यम बनवता. म्हणजे त्याची काहीतरी चौकट असते, सौंदर्य असतं; त्या सौंदर्याला तुम्ही तुमच्या या अट्टाहासापायी धक्का पोचवता. सिनेमा प्रचारासाठी वापरला गेला आहे आधी, किंबहुना आजही वापरला जातो. हाही त्यातलाच प्रकार म्हणायचा.

‘त्रिज्या’मधील अभिनेत्यांबाबत काय सांगशील? त्यांची निवड प्रक्रिया कशी होती?

‘त्रिज्या’मध्ये बरेचसे नवीन चेहरे आहेत. अभय महाजन आहे. आर्या रोठे म्हणून एक मुलगी आहे. गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, मकरंद सप्तर्षीदेखील आहेत. अभिनेत्यांच्या निवडीचं असं आहे की, मला हवेसे लोक मिळेपर्यंत मी वेगवेगळ्या लोकांना भेटत राहतो. म्हणजे पडद्यावर तुम्ही स्वतः आहात त्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी करायची गरज मला भासत नाही. त्यामुळे मी वेगवेगळ्या लोकांना भेटत राहतो, मुलाखत किंवा ऑडिशन घेणं म्हणण्यापेक्षा मी त्यांच्याशी गप्पा मारतो. त्यातून हा माणूस ही भूमिका करू शकतो का, तो ती करण्यास पात्र आहे का, हे आपसूक कळतं. महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी नटानं थोडंफार वाचन केलेलं गरजेचं आहे किंवा किमान वाचायची इच्छा तरी हवी. त्यामुळे मी काय म्हणतो आहे ते कळतं त्यांना. माझ्या दृष्टीनं - मी नट आहे, मी अमुक अमुक बक्षीसं मिळवली आहेत, तमुक एकांकिका केली आहे - अशा गोष्टींना फारसं महत्त्व नाही. त्यामुळे चित्रपट आणि त्याच्या पटकथेविषयी फारसं काही न सांगता त्यांचं निरीक्षण करत मला कितपत गोष्टी काढून घेता येतील हे मी पाहतो.

अभिनय करणं आणि पडद्यासाठीचा अभिनय या दोन्ही पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत. फिल्ममध्ये तुमचा प्रत्येक श्वास ऐकू येतो. त्यामुळे इथे अभिनेत्यानं तो नेहमीच्या आयुष्यात जसं बोलतो, वागतो तेच करणं अपेक्षित आहे. चित्रपटगृहातल्या शेवटच्या रांगेतील व्यक्तीपर्यंत आवाज जाईल असा अभिनय करणं इथं अपेक्षितच नाही. त्यासाठी ध्वनी आहे, तो त्याचं काम करेल. नटानं आवाजात अतिरेकी चढउतार करणंही गरजेचं नाही, कारण खऱ्या आयुष्यात तो ते करत नाही. अशा ज्या लहानसहान गोष्टी आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे अभिनेत्यानं जसं आहे तसंच रहावं. मात्र तेच अधिक कठीण असतं. त्यामुळे अनलर्निंगच्या प्रक्रियेत फार वेळ जातो. म्हणजे अभिनेत्यांनी आधी जे शिकलं आहे, ते बाजूला सारायला सांगावं लागतं. कारण या गोष्टी सिनेमासाठी फार घातक आहेत. ब्रेसाँचं एक फार छान वाक्य आहे - ‘सिनेमामध्ये नाटकातील नट तितकाच उपरा, जितका काचेवर घोडा.’

उदाहरणार्थ, मला दुःख झालं ही भावना उसने हावभाव घेत तुम्ही (अभिनेत्यानं) नसते दाखवायची, ती त्या दृश्याच्या आधी काय घडून गेलं आणि नंतर काय घडलं यामध्ये वसते. सिनेमा म्हणजे एक स्वतंत्र शॉट नसतो. सिनेमा हा रेफ़रन्शियल आहे. कारण आधीचा आणि नंतरचा शॉट यांच्या दरम्यान एक तिसरा पूल बांधत जातो आपण. जो एडिटिंगचा, संकलनाचा भाग आहे. मग पुन्हा कुलशॉव्ह इफेक्टकडे जाता येईल आपल्याला. सांगायचा मुद्दा असा की, सिनेमा हा कायम संदर्भित अर्थ शोधत असतो. ज्यात अभिनेत्यांनी काही करायची गरज नसते. म्हणजे मी माझ्या सिनेमातील अभिनेत्यांना सांगत असायचो की ,तू नुसता बसून रहा हॉटेलमध्ये. मी तुकडे जोडून उदासी निर्माण करतो. मला उदासी तुझ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांतून आणायची आहे, ना की तुझ्या शारीरिक हावभावांमधून. अभिनेता या सगळ्या गोष्टींमधून चेहऱ्यावर किती दुःख आणलं असं दाखवायला लागला की, ते नाटक व्हायला लागतं, आणि मग ते खोटं वाटायला लागतं. हेच संवादफेकीबाबत. आता आपण दोघं बोलत आहोत त्याहून वेगळा हेल काढण्यात अर्थ नाही. साध्या, शांत पद्धतीनं बोलावं. म्हणजे वास्तवाकडे पाहण्यासाठी एक खिडकी उघडी ठेवली आहे, असं वाटायला हवं. मग चित्रपटही एखाद्या माहितीपटासारखा भासून खरा, अस्सल व्हायला लागतो. त्यामुळे माझ्यापुरत्या तरी या सगळ्या गोष्टी कुठेतरी महत्त्वाच्या ठरतात.

‘उदाहरणार्थ नेमाडे’ डॉक्यु-फिक्शन असला तरी मला आठवतं तसं त्यातील पार्श्वसंगीत आणि ध्वनी आरेखन फारच सुरेख आहे. ‘त्रिज्या’चं संगीत-पार्श्वसंगीत आणि ध्वनी आरेखनाबाबत काय सांगशील?

‘त्रिज्या’मध्ये संगीत नाहीच. अजिबात नाही. ‘त्रिज्या’मध्ये जे ध्वनी आरेखन केलेलं आहे, त्यात पाण्याचे, विजांचे, ट्रॅफिकचे, पैंजणांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आम्ही रेकॉर्ड केले आहेत. संगीत असं नाहीये, म्हणजे इंस्ट्रुमेंटल ज्याला म्हणतो ते नाहीये. नाही म्हणायला तिबेटी बाउल वापरला आहे, पण इतर सगळे रोजच्या जगण्यात ऐकू येणारे आवाज आहेत. त्या सगळ्या आवाजांतून एक सिम्फनी, साऊंड्सची सिम्फनी तयार केली आहे.

जे अभिनेत्यांच्या बाबतीत आहे, तेच ध्वनीबाबत आहे. म्हणजे नट जसे प्रसंग दुःखाचा आहे म्हटलं तर एक ठरलेला हेल काढला जातो. तसंच संगीताबाबत पात्रांना दुःख झालेलं असेल, तर ठरलेलं काहीतरी संगीत वाजवण्याचं काम केलं जातं. अशानं भावनिकरीत्या मॅनिप्युलेट करायचं हेच काय ते ध्वनीचं काम उरतं. त्यामुळे प्रेक्षागृहात शंभर लोक बसले असतील तर शंभरच्या शंभर लोकांना एकाच पद्धतीनं भावनिकरीत्या हेलावून टाकायचं. माझी अशी इच्छा असते की, प्रत्येकाला त्याच्या आकलनशक्तीनुसार वेगवेगळ्या भावना जाणवायला हव्यात. गणित आणि कवितेतला फरक जो आहे, तसंच हे आहे. जगभरात सगळीकडे व्यावसायिक सिनेमा इमोशनल मॅनिप्युलेशनवर भर देतो. त्यामुळेच प्रेक्षकाला वेगळं काही जाणवलं की, गणितं गडबडतात त्यांची. आमचा प्रयत्न असा आहे की, कवितेसारखं प्रत्येकाला वेगळं वाटू दे. जे शब्दांत सांगता येत नाही त्याची अनुभूती करून देण्याइतपत ‘प्युअर फॉर्म’ला सिनेमा जाऊ शकतो का, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्रेसाँ म्हणतो की, ‘सिनेमामध्ये ध्वनीला गुलामासारखं वागवलं जातं’, जे व्हायला नको. सिनेमानं पडद्याबाहेरील जग दाखवायला हवं, असं मला वाटतं. ज्यात ध्वनी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

तू कुठेतरी म्हणाला आहेस की, तुला सध्या आणि नजीकच्या भविष्यात तरी फक्त मराठीमध्येच काम करायचं आहे. मग समकालीन मराठी सिनेमाबाबत तुझं काय मत आहे?

मराठीत सिनेमा करण्याचं असं आहे की, तुमची जी खरी निर्मिती आहे ती तुमच्या मातृभाषेत होते. सिनेमा जर स्वप्नासारखा असला पाहिजे, अंतरंगात डोकावणारा असला पाहिजे तर तुम्ही ज्या भाषेत स्वप्न बघता, त्या भाषेत तुमची कलाकृती असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदी सिनेमा करणं हे मला मोठं वाटतच नाही. म्हणजे ते मोठं कसं असू शकतं, शेवटी एक भाषा आहे तीही. ठीक आहे, जास्त प्रमाणात बोलली जात असेल ती, पण आपण अब्बास किअरोत्सामी बघतोच ना? किंवा इराणचा माजिद माजिदी बघतोच ना? तसं मग भाषेचा अडसर येतो म्हणून तुम्ही तुमच्या पात्रांचीच भाषा बदलणं हे मला योग्य वाटत नाही. आता मी पुढची फिल्म लिहितोय, ‘कन्स्ट्रक्शन’ नावाची. तिच्यामध्ये काही गोष्टी महाराष्ट्राच्या बाहेर घडतात. मग कथानकातील तो भाग त्या भाषिक प्रदेशात घडतोय म्हटल्यावर मी तिथली भाषा नक्कीच वापरेन. पण मला हिंदी सिनेमा किंवा बॉलिवुड यांचं तसं आकर्षण नाहीये. त्यामुळे मी म्हणतो की, मला मराठीत काम करायचं आहे. ‘हिंदीत कधी जाणार?’ असं जे काही विचारलं जातं ना, ते आणि हिंदी म्हणजे काहीतरी मोठी पायरी आहे, हे मला फारसं पटत नाही.

जगातल्या उत्तमोत्तम दिग्दर्शकांनी त्यांच्या मातृभाषेत कामं केलेली आहेत. किअरोत्सामीला थेट देशाबाहेरच हाकललं असल्यानं त्यानं शेवटचा चित्रपट जपानी भाषेत केला. पण ती अपवादात्मक गोष्ट होती. त्याला देशात यायला बंदी होती आणि त्याला सिनेमा तर करायचाच होता, त्यामुळे त्यानं तो केला. मला माझ्या जगण्याविषयी काहीतरी सांगायचं आहे, तर मी ते मराठीतच करेन. ‘सिनेमा इज अ पर्सनल एक्स्पीरिअन्स मेड फॉर मास’ असं मला वाटतं. त्यामुळे मला असं कट्टरपणे म्हणायचं नाहीये की, मी मराठीतच करेन. म्हणजे खूपदा आपण चित्रपटांत पाहतो की, वातावरण इथलं, महाराष्ट्रातलं, मराठी भाषिक भागातलं आहे, पण पात्रं हिंदी बोलत आहेत - तर असं व्हायला नको.

समकालीन सिनेमा मी फारसा पाहत नाही आणि त्याबाबत बोलण्यासारखं फारसं काही नाही असं वाटतं. कारण मराठी चित्रपटसृष्टीची अवस्था कशी आहे, ते तुलाही माहीत आहे. वितरणाच्या आणि चित्रपटगृहांच्या समस्या, पुरेशी चित्रपटगृहं नसणं या गोष्टी तर आहेतच. पण मुळातच मराठी सिनेमा म्हणजे एका विशिष्ट भाषिक आणि भौगोलिक भागापुरता मर्यादित बनून राहिलेला आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता मराठी सिनेमा कधी कोकणात गेलाय का, विदर्भात गेलाय का, तर नाही. कोकणात ‘उदाहरणार्थ नेमाडे’ घेऊन गेलो होतो, तर तिथं चित्रपटगृहंच नाहीत. कुठेतरी सिंधुदुर्ग किंवा सावंतवाडीत एखादं थिएटर सापडतं, ही तिथं सिनेमाची पोहोच! त्यामुळे सिनेमा बनतो, पण सर्वांपर्यंत पोचतो का हेही पहायला हवं. लोक म्हणतात टीव्हीवर बघू, टीव्ही वाहिन्यांना द्यायला गेलं तर ते म्हणतात थिएटरचा गल्ला किती ते दाखवा, त्यानंतर बघू. त्यामुळे सिनेमा बनवूनही न संपणारं असं हे एक दुष्टचक्र आहे.

बरोबर. हिंदीबाबतही पुन्हा हेच आहे. निर्माण होणाऱ्या चित्रपटांची संख्या, एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याचा चित्रपट, इत्यादी गोष्टींनुसार हिंदीतला प्रायोगिक सिनेमाही मागे पडतो. आणि मराठी आणि इतर प्रादेशिक सिनेमाही. त्यामुळे एखाद्या आठवड्यात १०-१२ विविध भाषिक चित्रपट रिलीज होतात. त्यामुळे मग दर्जाची आणि ते थिएटरमध्ये टिकायची बोंबाबोंब आहेच.

हो, भांडवलशाही व्यवस्थेचं हे अपत्य. त्यातही मग स्टारचा सिनेमा म्हणजे सिनेमा व्यक्तिकेंद्री होत जाण्याचं लक्षण, जे पुन्हा सिनेमाला मारक ठरणारं.

हाच प्रश्न पुढे नेत विचारायचं झाल्यास समकालीन फिल्ममेकर्सविषयी तुझी काय मतं आहेत? तुला त्यापैकी कुणाची शैली आवडते किंवा अधिक जवळची वाटते?  

माझे जे चार सर्वाधिक आवडते दिग्दर्शक आहेत, त्यात नुरी बिल्गे जेला (Nuri Bilge Celyan) आहे. नुरीचं दिग्दर्शन खूप फॅसिनेटिंग आहे. तो कथनावरची पकडही ढिली होऊ देत नाही आणि वातावरणही तितक्याच प्रभावीपणे निर्माण करतो. म्हणजे चेकॉव्हच्या कथांसारखी वातावरणनिर्मिती करतो आणि सोबतच दृश्यभाषादेखील श्रीमंत असेल हे पाहतो.

भारतातील माझ्या मते सध्या कार्यरत असलेला सगळ्यात चांगला चित्रपटकर्ता म्हणजे अमित दत्ता. आणि तो मला जगातलाही एक महत्त्वाचा चित्रपटकर्ता वाटतो. त्याचे ‘क्रमशः’ (२००७), ‘नैनसुख’(२०१०), इत्यादी महत्त्वाचे चित्रपट आहेत. तो पहाडी भागामध्ये राहून काम करतो. अतिशय मोजके चित्रपट फिल्म्स केले आहेत, पण तिकडे राहूनच चित्रपट करतो तो. माझ्या मते तो सध्या भारतात सगळ्यात चांगलं काम करणारा माणूस आहे.

बाकी होऊन गेलेले बरेच आहेत. मणी कौल आहेत, सत्यजित रे, ऋत्विक घटक, अदूर गोपालकृष्णन, जी. आर. नंदन... बाकी समकालीनांमध्ये एखादा विशिष्ट चित्रपटकर्ता निवडता येत नाही. प्रत्येकाची एखाद-दुसरी कामं भरपूर आवडतात मला. म्हणजे चैतन्य ताम्हाणेचा ‘कोर्ट’ (२०१४) जरी आवडला असला तरी त्याने पुढे काही केलेलंच नसल्यानं तो आवडतो असं म्हणता येणार नाही, त्याचा सिनेमा आवडला असं नक्कीच म्हणता येईल. असे एक एक चित्रपट खूप आवडलेले आहेत, पण त्यांचा पुढचा प्रवास कसा असेल ते आपल्याला माहीत नाही.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxsk9jgd

.............................................................................................................................................

‘त्रिज्या’नंतर काय? काही कल्पना मनात आहेत किंवा ऑलरेडी काही प्रोजेक्टवर कामाला सुरुवात केली आहेस?

कथा-पटकथा लिहून ठेवलेल्या आहेत. काही वेळापूर्वी उल्लेख केला ती पुढची फिल्म करतोय, ‘कन्स्ट्रक्शन’ नावाची.

आधीच्या कुठल्यातरी मुलाखतीत ‘स्थलपुराण’ असा उल्लेख केलेला आढळला, तर त्याबाबत काय सांगता येईल?

‘स्थलपुराण’चं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे. तो माझा दुसरा किंवा तिसरा चित्रपट होऊ शकतो. आधी ‘कन्स्ट्रक्शन’ पूर्ण होईल की तो, हे सांगता येणार नाही, पण त्याचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. ‘स्थलपुराण’चं चित्रीकरण गोव्यात झालं आहे. हा चित्रपट म्हणजे एका आठ वर्षाच्या मुलाच्या नजरेतून दिसणारी एका जागेची गोष्ट आहे. त्याचा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन आणि त्याचं अनुभवविश्व या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

एखाद्या विशिष्ट थीमवर किंवा एखाद्या विशिष्ट जान्रमध्ये (Genre) काम करण्याची इच्छा आहे का?

म्हणजे थ्रिलर, कॉमेडी, हॉरर असे जान्र म्हणायचे आहेत का तुला?

हो.

जान्रबाबत असं आहे की, एखाद्या विशिष्ट जान्रपेक्षा मानसशास्त्रीय-थरारपट (सायकॉलॉजिकल थ्रिलर), थरार आणि विनोदाचं मिश्रण अशा उपप्रकारांमध्ये मला अधिक रस आहे. आणि माझी स्वतःची विचारप्रक्रिया आणि पद्धती पाहता ठरवून एखाद्या विशिष्ट जान्रमध्ये काम करता येईल असं मला वाटत नाही. तितकी शिस्त नाही माझ्यात. म्हणजे समजा ‘फिल्म न्वार’ म्हटलं, तर त्या प्रकाराचे काही नियम असतात. असे त्या त्या जान्रचे नियम पाळता येतील की, नाही हे मला माहीत नाही.

एकूणच मी सध्या ज्या कुठल्या प्रकारात काम करतो, ते करण्यातच मला रस आहे. इथंही मला मी कुठल्या प्रकारात काम करतो याचं वर्गीकरण करता येत नाही. म्हणजे आता ‘त्रिज्या’ मला नाइलाजानं ‘ड्रामा’ प्रकारात मोडतो असं मांडावं लागतंय. खरं तर तो ड्रामासुद्धा नाहीच म्हणता येणार. तो कॉमेडी आहे का, तर नाही. ती थ्रिलर आहे का, तर नाही. मग इकडून तिकडून फिरत ड्रामा. पण ड्रामा तरी कसा? मी माझ्या अभिनेत्यांना सांगतो ड्रामा टाळा, ध्वनी विभागाला सांगतो की ड्रामा नाही. अशा वेळी तो चित्रपट ड्रामा कसा असेल, असं मला वाटतं. मग मला वाटतं त्याला एखाद्या कप्प्यात का टाकायचं!

थोडक्यात, तुला फ्री फॉर्ममध्येच काम करत रहायचं आहे असं आपण म्हणू शकतो.

हां. फ्री फॉर्ममध्ये काम करत राहणं जास्त चांगलं आहे. जे दाखवायचं आहे, सांगायचं आहे, ते करत रहायचं. त्यातून जे आकाराला येईल तो फॉर्म.

‘त्रिज्या’ सामान्य प्रेक्षकांसमोर कधीपर्यंत येईल?

सध्या तरी जगभरातील आणि भारतातील विविध चित्रपट महोत्सवांत फिरत आहोत. चित्रपट याच वर्षी प्रदर्शित व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याविषयी बोललं जातं की, चित्रपट प्रदर्शितच होत नाही, तर अशा वेळी चित्रपटकर्त्यानं काय करायचं? याचं उत्तर मलाही माहीत नाही. चित्रपट बनवण्यापर्यंत माझी जबाबदारी आहे. चित्रपट महोत्सवांत चित्रपट पाहिला जातोय, म्हणजे प्रेक्षक आहे. फक्त आपल्याला अशा जास्तीत जास्त जागा निर्माण करण्याची गरज आहे. आता आम्हाला मल्टिप्लेक्स मिळणार नाही, कारण आमच्या चित्रपटाला मध्यांतरच नाहीये. त्यामुळे ते म्हणणार की, आमचे खाद्यपदार्थ विकले जाणार नाहीत, तुमचा चित्रपट घेऊन काय करू?

तू म्हणालाच आहेस की, झुंडीनं पाहण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर अनुभव घ्यावा असा हा चित्रपट आहे, तर अॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्ससारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आता अधिक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत…

हो, इंटरनेटवर पाहिला तर मला जास्त आवडेल. नेटफ्लिक्स आहे, व्हिमिओ आहे. थिएटरला मोठ्या पडद्यावर येणं हे आनंददायी असेलच. पण अगदी तसं होणारच नाही अशी परिस्थिती असेल तर छोटा पडदादेखील एक चांगला मार्ग आहेच. आता चित्रपट बनवणारेही बदलले आहेत आणि पाहणारेसुद्धा. त्यामुळे चित्रपट त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांनीही एखाद्या चित्रपटाचा आवर्जून शोध घेणं सुरू असतंच. अमित दत्ता मला म्हणाला होता की, तुझा प्रत्येक नवीन चित्रपट तुझ्या जुन्या चित्रपटात प्राण फुंकत त्याला नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणजे आताही आपण कश्यपचे जुने चित्रपट आणि लघुपट शोधून शोधून पाहतोच, त्यातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे प्रेक्षक आहे, तो चित्रपट, चांगले चित्रपट पाहणारही आहे. त्यामुळे पाहूयात, शक्यतो तरी याच वर्षी चित्रपट सर्वांसमोर येईल यासाठी प्रयत्न करणारच आहोत.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Manasi Kul

Wed , 03 July 2019

सिनेमावर हे संदेश देण्याचं काम लादणं म्हणजे त्याचं एक्सप्लॉयटेशन आहे. ही त्याच्याशी केलेली प्रतारणा आहे. अशा वेळी त्याला तुम्ही खोट्या पद्धतीनं काहीतरी सांगायचं माध्यम बनवता." सिनेमात काम करणाऱ्या तंत्रज्ञ व्यक्तींचे एक्सप्लॉयटेशन करणे ही सिनेमाची प्रतारणा नाही का? लेखकाला लेखकाचे, कॅमेरा मन ला कॅमेरा मन चे क्रेडिट ना देता बनवला गेलेला सिनेमा फक्त धंद्यासाठी केला जातो. असे लोक जेंव्हा कला किंवा समाज यांच्या विषयी बोलतात तेंव्हा त्यांचे हसे होते.


Bhagyashree Bhagwat

Fri , 21 June 2019

wow! मुलाखत खूपच आवडली. चित्रपट समजून घेण्यासाठी दृष्टीकोन स्वच्छ करणारी आहे एकदम. चित्रपटाकडे कसं पाहिलं पाहिजे, हे अगदी नेमकेपणाने आणि तरी सोप्या भाषेत सांगितलंय. सर्वसामान्य प्रेक्षकाला स्वतःला ग्रो करण्यासाठी याचा नक्की फायदा होईल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......