जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल, तर या बदलाचे स्वागत करावे लागेल!
पडघम - राज्यकारण
नीलेश नीमकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 20 June 2019
  • पडघम राज्यकारण संख्यानामे संख्या मुलं शाळा शिक्षण जोडाक्षरे

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात दोन अंकी संख्यांच्या नामात केलेला बदल सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘एकवीस’, ‘बावीस’ या ऐवजी ‘वीस एक’, ‘वीस दोन’ अशी पर्यायी संख्यानामे पाठ्यपुस्तकात सुचवली आहेत. अनेक जणांना हा बदल अजब वाटतो आहे. या संख्यानामांतील बदलामुळे मुलांना नेमके काय म्हणायला शिकवायचे या बाबत शिक्षक आणि पालक यांच्यात बराच गोंधळ उडालेला दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर हा बदल का करण्यात आला आहे, हे समजून घेणे अगत्याचे ठरेल.

मराठी आणि बऱ्याचशा उत्तर भारतीय भाषांत शंभरपर्यंतच्या संख्यांच्या नावांमध्ये फारशी सुसंगती आढळत नाही. पुढील काही उदाहरणे ही विसंगती लक्षात यायला पुरेशी ठरावीत. एकक स्थानी २ असणाऱ्या या संख्यांची नावे पाहा. ‘बावीस’, ‘बत्तीस’, ‘बेचाळीस’, ‘बहात्तर’, ‘ब्याण्णव’. बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की, एकक स्थानची २ ही संख्या वाचताना आपण ‘बा’, ‘बत्’, ‘बे’, ‘ब’, ‘ब्या’ असे वेगवेगळे उच्चार करतो आहोत. आता जी बाब दोनाच्या बाबतीत आहे, ती इतरही संख्यांच्या बाबतीत खरी आहे हे सहजच लक्षात येईल.

आपण ४२सारखी संख्या लिहिताना आधी ४०तील ४ लिहितो आणि नंतर २ लिहितो. मात्र तीच संख्या  वाचताना आधी २ (बे) आणि मग ४० असे वाचतो. अजून एक बाब म्हणजे एकक स्थानी ९ आला की, आपण पुढच्या दशकाचा संदर्भ घेतो. उदाहरणार्थ ४६ (शेहेचाळीस), ४७ (सत्तेचाळीस), ४८ (अठ्ठेचाळीस) या पुढे येणारी  संख्या मात्र ‘नवचाळीस’ न राहता ४९ (एकोणपन्नास) होते. एकक स्थानच्या नवाचा हा  नियमही नेहमीच वापरला जातो असे नाही. ९७ (सत्याण्णव), ९८ (अठ्ठ्याण्णव) नंतर ‘एकोणशंभर’ न येता ९९ (नव्याण्णव) येतात!

उत्तर भारतातील भाषांत अशी विसंगती का निर्माण झाली, याचे स्पष्टीकरण प्राध्यापक मनोहर राईलकर यांनी त्यांच्या संख्यावाचन या लेखात दिले आहे. या बाबतचे त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दांत समजून घेणे उचित ठरेल.

“संस्कृतमध्ये संख्यावाचनाचा नियम ‘अंकानां वामतो गती’ म्हणजे ‘अंक उजवीकडून डावीकडे वाचावेत’ असा आहे. १४७ ही संख्या ‘सप्तचत्वारिशत् अधिक शतम’ अशी वाचतात. म्हणजे ‘सात चाळीस आणि एकशे’, म्हणूनच मराठीत आपण पाढे म्हणताना ‘सत्तेचाळासे’ असं म्हणत असतो. पण संख्यावाचनाचा हा नियमसुद्धा आपण, म्हणजे मराठीनं धडपणं पाळला आहे, असं दिसत नाही. पाढ्यांव्यतिरिक्त वरील संख्या आपण ‘एकशे सत्तेचाळीस’ अशीच वाचतो. याचा अर्थ, लिहिण्याचा क्रम १-४-७ तर वाचण्याचा क्रम मात्र १-७-४ असा. अधिक मोठ्या संख्यांच्या वाचनात तर हा गोंधळ आणखी प्रकर्षानं जाणवतो. उदा. ३५७४ ह्या संख्येच्या पस्तीसशे चौऱ्याहत्तर अशा वाचनातील अंकांच्या वाचनाचा क्रम ५-३-४-७ असा असल्याचं दिसून येईल. संस्कृतमधून घेतलेली ही ‘वामतो गती’ व्यवहारात आणि प्रत्यक्षात फक्त दोन अंकी संख्यांपुरतीच मर्यादित राहिली असल्याचं आढळून येते.”

इंग्रजी किंवा दक्षिण भारतीय भाषांत संख्या ज्या क्रमाने लिहिल्या जातात, त्याच क्रमाने वाचल्या जातात. उदाहरणार्थ ‘35437’ ही संख्या आपण इंग्रजीत ‘Thirty five thousand four hundred and thirty seven’ अशीच वाचतो. आता या विवेचनानंतर एक बाब अगदी स्पष्ट आहे की, मराठीतील संख्यानामांतील ही विसंगती लहान मुलांना  संख्या शिकताना अडचणीची ठरू शकते. या बाबतचा माझा अनुभव असा की, बहुसंख्य मुले संख्यानामांत अशी विसंगती असली तरी त्यावर थोड्याफार प्रयत्नाने  प्रभुत्व मिळवतातच. मात्र ज्या मुलांची घरची भाषा शाळेच्या भाषेपेक्षा (प्रमाण मराठीपेक्षा) वेगळी आहे, अशा आदिवासी मुलांसाठी संख्यानामांची  ही अडचण फारच मोठी ठरते. विशेषतः ज्या घरांतील पहिलीच पिढी शाळेत आली आहे किंवा ज्या घरांत पाठांतराची परंपरा नाही, अशा मुलांना शंभरपर्यंतच्या संख्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी फारच कष्ट करावे लागतात. अशा वेळी ही मुले सामान्यपणे वर्गात मागे पडतात. माझ्या मते गणिताची भीती किंवा नावड निर्माण होण्याचे हे एकमेव नसले तरी एक महत्त्वाचे कारण आहे. गेले काही महिने मी वीटभट्टीवर स्थालांतरित झालेल्या मुलांना गणित शिकवत आहे. या मुलांना ८० नि ४ विटा हे सहज समजते, मात्र चौऱ्यांशी असे संख्यानाम सांगितले की, ती गोंधळतात.  

मराठी व काही उत्तर भारतीय भाषांत असणारी संख्या नामांची विसंगती आणि त्यामुळे मुलांना संख्या शिकताना येणाऱ्या अडचणी हेच बालभारतीतील संख्यावाचनाची पद्धत बदलण्यामागचे कारण आहे. अर्थातच गणितातील अत्यंत पायाभूत अशा संकेतांमध्ये केलेल्या या बदलाचे परिणाम दूरगामी आहेत. दोन अंकी संख्यानामे नवीन संकेतांनुसार वापरायची झाली तर मोठ्या संख्या वाचताना त्या कशा वाचाव्यात याचे संकेतही निश्चित करावे लागतील. उदाहरणार्थ ‘पस्तीस हजार सातशे बेचाळीस’ (३५७४२) ही संख्या ‘तीस पाच हजार सातशे चाळीस नि दोन’ अशी वाचावी लागेल. या प्रकारे सांगितलेली संख्या समजून घेताना जुन्या संकेतांचा वापर करणाऱ्या अनेकांना फारच बिचकायला होईल. मात्र मुले लहानपणापासून नव्या संकेतांप्रमाणे वाचन शिकत असतील तर त्यांचे फारसे काही अडणार नाही.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/yxsk9jgd

.............................................................................................................................................

मात्र अशा प्रकारचा बदल केवळ पाठ्यपुस्तकांत येणे पुरेसे नाही. कारण पाठ्यपुस्तकांचा संबंध केवळ शाळा, मुले आणि शिक्षक यांच्याशी आहे. त्या पलिकडील मराठीतून चालणारा गणित व्यवहार हा सामाजिक स्वरूपाचा आहे. नव्या संकेतांनुसार शिकणाऱ्या मुलाने दुकानात गेल्यावर ‘तीस सात किलो तांदूळ द्या’ अशी  मागणी केली किंवा कंडक्टरला ‘दोन तिकिटांचे दोनशे तीस नि आठ झाले ना? असा प्रश्न आज विचारला तर गोंधळ माजेल. कारण जुनी संख्यानामे समजून घ्यायला आपण इतके सरावलो आहोत की, ती आपल्याला मुद्दाम विचार करून समजून घ्यावी लागत नाहीत. नवे संकेत मात्र आपल्याला पदोपदी विचार करायला भाग पाडणार आणि त्याचा आपल्याला त्रास होणार.

संकेतांतील हा बदल एखाद-दोन नाही तर कोट्यवधी व्यक्तींनी स्वीकारायला लागेल. अशा प्रकारचे बदल करणे ही केवळ शैक्षणिक बाब नसून तो एक सामजिक आणि राजकीय निर्णय ही आहे. म्हणून या प्रकारचा बदल करण्याची गरज समाजातील बहुतेकांना पटल्याशिवाय तो प्रत्यक्ष व्यवहारात येणे अवघड आहे. भारताने  लांबीचे फूट हे एकक सोडून मीटर हे प्रमाणित एकक स्वीकारल्याला अनेक वर्षे झाली तरीही जाहिरातीतील  फ्लॅटचे दर आपल्याला प्रती चौरस फूटच दिलेले दिसतात. कारण जनमानसांत चौरस फूट या एककाचा एक ढोबळ अंदाज आहे. जाहिरातदाराने जरी स्पष्टपणे चौरस मीटरचा दर दिला तरी तो चौरस फुटाचा आहे, असा समज होऊन, ग्राहकाला तो जास्त वाटण्याची शक्यता आहे. म्हणून चौरस मीटरचा दर देण्याचा धोका कोणीही जाहिरातदार पत्करत नाही.

गणिताच्या संकेतांतील असे बदल शालेय अभ्यासक्रमात या आधी झालेलेच नाहीत असे नाही. एक पंचमांश या प्रकारचे व्यवहारी अपूर्णांकांचे वाचन बदलून ते एक छेद पाच किंवा एक अंश छेद पाच असे करावे हा बदल गेल्या काही वर्षांत केला गेला आहे. मात्र एकूणच व्यवहारी अपूर्णांकांचा वापर कमी होत असल्याने (दशांश अपूर्णांकांच्या तुलनेत) त्या बाबत फार गदारोळ झालेला दिसत नाही. मात्र आता रोजच्या वापरातील १०० पर्यंतच्या संख्यांच्या नावात बदल करायचा म्हटल्यावर त्याला विरोध होणे साहजिकच आहे.

आता प्रश्न उरतो तो हा बदल करावा की नाही याचा. जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे लागेल. कारण त्यामुळे पाठांतराची परंपरा नसलेल्या घरांतील मुलांना गणिताशी जमवून घेणे थोडे सुलभ होईल. मात्र हा बदल केवळ एका पाठ्यपुस्तकांत येणे पुरेसे नाही. यानंतर येणाऱ्या प्रत्येक पाठ्यपुस्तकाने तो विचार उचलून धरावा लागेल व नेटाने पुढे न्यावा लागेल.

नवे संकेत स्वीकारताना समाजातील जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात बदल करावा लागेल. नवे संकेत एखाद्या महिन्यात किंवा वर्षात समाजात रुळणार नाहीत. त्यासाठी सांधेबदलाच्या काळात जुनी व नवी अशा दोन्ही संकेतव्यवस्था सुरू ठेवाव्या लागतील. नवे संकेत शिकणाऱ्या मुलांना काही काळ तरी दोन्ही संकेतप्रणालींशी जमवून घ्यावे लागेल.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे बदल टिकाऊ स्वरूपात होण्यासाठी समाजातील सर्वच व्यवस्थांना ते स्वीकारावे लागतील. उदाहरणार्थ शासनातील विविध विभागांत नवे संकेत कसे व कधी लागू करायचे याचा आराखडा तयार करावा लागेल किंवा आर्थिक क्षेत्रात बँकांनी चेकवर नव्या संकेतांनुसार लिहिलेली अक्षरी रक्कम मान्य करावी लागेल. बालभारतीने मुलांना केंद्रस्थानी ठेवून हा बदल करण्याचे धाडस दाखवले आहे. मात्र हे बदल टिकण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणे अत्यंत गरजेचे आहे.   

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

लेखक नीलेश निमकर १९९४पासून शिक्षणक्षेत्राशी संबंधित आहेत. ते ‘क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट’ (QUEST) या संस्थेबरोबर काम करतात. 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

parag magar

Sat , 22 June 2019

बालभारतीच्या नव्या नियमावर सध्या चहुबाजूने विनोद सुरु आहे. तो यासाठीच की अचानक या सर्वांची गरज काय. ज्यांना आता या प्रकारे शिकवावे लागणार आहे त्यांची बैठक बेचाळीस, चौरेचाळीस या पठडीतली आहे. त्यामुळे ही नवी गोष्ट शिकविताना त्यांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. आमची किंवा तुमचीही पिढी बेचाळीस स्वरुपात शिकली. पण बेचाळीस म्हणजे चाळीस चार हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. मला उलट हे शब्द शोर्ट वाटतात. इ ई उ ऊ हे अनावश्यक बदलही बालाभारतीला दिसावे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......