अजूनकाही
वर्तमानपत्रासाठी करावं लागणारे रोजचं लेखन आणि ग्रंथलेखन या दोहोंसाठी वस्तुत: परस्परांपेक्षा फार वेगळी मानसिक बैठक आवश्यक असते. त्यातही पुन्हा एखाद्या अग्रगण्य आणि लोकमानस प्रभावीत करण्याचं सामर्थ्य असलेल्या वर्तमानपत्राचं संपादकपद पेलत असताना रोजच्या धबडग्यातून मानसिक उसंत मिळवत स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करणं, ही सहजसाध्य बाब नव्हे. वर्तमानपत्रात आपणच केलेल्या स्तंभलेखनाला यथावकाश ग्रंथरूप देणं त्या मानानं सोपं असतं. परंतु, वर्तमानपत्राच्या रोजच्या कामाशी थेट संबंध नसलेला एखादा प्रांत स्वत:चा व्यासंगविषय बनवून त्या प्रांतात स्वतंत्र ग्रंथनिर्मिती करणारे अभ्यासू पत्रकार कोणत्याही काळात विरळच सापडतात. गिरीश कुबेर यांची गणना अशा मूठभर विरळांध्येच होते. खनिज तेल, तेलाचे भू-सामरिक राजकारण यांसारखे अवघड विषय कमालीच्या रोचक शैलीत शब्दबद्ध करून सर्वसामान्य वाचकांची तेलसाक्षरता उंचावणाऱ्या कुबेर यांनी अक्षरांकित केलेला ‘टाटायन’ हा नवीन ग्रंथ म्हणजे आंतरिक समृद्धी वाढवणाऱ्या आनंदानुभवाचा उदंड ठेवाच जणू.
‘टाटायन : एक पोलादी उद्यमगाथा’ हे या ग्रंथाचं शीर्षकच मोठं अर्थवाही आहे. ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणून गणल्या गेलेल्या दाशरथी रामाबद्दलचं सर्वकाही ज्यांत नमूद केलेलं आहे, त्या रामकथेला ‘रामायण’ असं आपण संबोधतो. त्याच धर्तीवर, जमशेटजी नुसरवानजी टाटा यांनी बीजारोपण केलेल्या टाटा उद्योगसमूहाचा आजच्या सायरस मिस्त्री यांच्यापर्यंत गेली सुमारे पावणे दोनशे वर्षं होत आलेल्या वाढविस्ताराची सम्यक् कहाणी एकत्रित मांडणारा ग्रंथ, असं ‘टाटायन’चं स्वरूप आहे.
जमशेटजी टाटा, जेआरडी टाटा, टाटा समूहातील कंपन्या यांबाबत आजवर प्रकाशित झालेलं साहित्य, टाटा समूहाच्या पुराभिलेखागारातील पत्रव्यवहार व अन्य दस्तऐवज, संकेतस्थळांवरील तपशील आणि मुख्य म्हणजे अर्थविषयक नियतकालिकांध्ये काम करत असताना कमावलेली सघन अंतर्दृष्टी इतक्या औरसचौरस आणि बुलंद शिदोरीच्या बळावर कुबेर यांनी ही कहाणी सिद्ध केलेली आहे. बऱ्याचदा असं घडतं की, इतक्या साक्षेपानं केलेल्या लेखनउद्योगाला व्यासंगातून निपजणाऱ्या बोजडपणाचा संसर्ग होतो आणि ग्रंथाचं अंतरंग क्लिष्ट बनतं. ‘टाटायन’ला मात्र त्या संसर्गाची बाधा अजिबात झालेली नाही, याचं संपूर्ण श्रेय सर्वस्वी कुबेर यांच्या लेखनकौशल्याला द्यायला हवं. हेवा वाटावा अशीच कुबेर यांची शैली आहे. ओघवती भाषा, सुटसुटीत वाक्यं, संवादप्रधानता, भाषेचं प्रवाही चलन, यामुळे जवळपास सव्वाचारशे पानांचा हा ग्रंथराज अथपासून इतिपर्यंत कमालीचा वाचनीय बनलेला आहे.
‘टाटा’ हे नाव उच्चारलं की बहुतेकांच्या मनीमानसी संदर्भ जागे होतात ते जेआरडी टाटा यांचे. ते स्वाभाविकही आहे. त्या खालोखाल आठवतात ते या समूहाची पायाभरणी करणारे जमशेटजी. उदारीकरणाच्या पर्वाचा उदय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झाल्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला परिचित आहेत ते रतन टाटा. अर्थात, रतन टाटा यांच्यासंदर्भात इंग्रजी भाषेतील प्रकाशनांमधून आजवर जे व जितकं लिहून आलेलं आहे, त्या मानानं मराठीमध्ये फारच तुटपुंजं वाचायला मिळतं. तो सगळा अनुशेष ‘टाटायन’ भरून काढतं. या पुस्तकातील पहिली जवळपास ९०-९२ पानं जमशेटजी आणि त्यांच्या पश्चात टाटा उद्योगसमूहाचा पाया विस्तारणाऱ्या सर दोराब टाटा आणि सर रतन टाटा यांच्या धडाडीचा, अचाट हिकमतीचा आणि चिवट, दुर्दम्य प्रयत्नवादाचा आलेख चितारणारी आहेत. ‘टाटायन’चं हे खरोखरच मोठं योगदान होय. कारण, जमशेटजींच्या या दोन अत्यंत कर्तबगार सुपुत्रांबाबत एके ठिकाणी, तपशीलवार असं मराठीमध्ये फार काही वाचायला मिळत नाही. त्या नंतरची जवळपास १५० पानं व्यापलेली आहेत ती जेआरडींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वानं. जेआरडींबद्दल मराठी वाचकांना तुलनेनं बरंच माहिती असलं तरी कुबेर यांनी ‘टाटायन’च्या पानापानांत खच्चून भरलेल्या तपशीलातील अनेक बारकावे जेआरडींबाबतचं आपलं आकलन अधिक समृद्ध बनवतात.
त्या पुढील जवळपास १५० पानं वाचकांच्या पुढ्यात उभी करतात गाथा रतन टाटा यांच्या संघर्षमय कारकिर्दीची. ‘इंडिका’ आणि ‘नॅनो’ या दोन खरं म्हणजे भारतीय वाहन उद्योगाच्या विेशातील नवलकथाच! ही दोन्ही स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी रतन टाटा यांनी प्रयत्नांची जी पराकाष्ठा केली आणि त्या स्वप्नांना त्यांच्या सहकाऱ्यांनी जे पंख पुरवले त्याचा साद्यंत इतिहास बारीकसारीक तपशीलासह मराठीमध्ये बहुधा प्रथमच ‘टाटायन’च्या माध्यमातून येतो आहे. त्याबद्दल कुबेर यांचं कौतुक व अभिनंदन करावं तेवढं थोडंच ठरेल.
‘गाथा’ या शब्दाला अनेक छटा आहेत. ‘इतिहास’, ‘हकिकत’ असेही या शब्दाचे अर्थ असले तरी ‘गाथा’ म्हणजे मुख्यत: धार्मिक-पारमार्थिक श्लोक अथवा साहित्याचं संकलन, असाच अर्थ कोणाच्याही मनात चट्कन येतो. तो बरोबरही आहे. धार्मिकतेच्या प्रांतात हुकूमत चालते भावनेची. तिथं तर्काला कुंपण पडतं अथवा घातलं जातं. ‘टाटायन’च्या उप-शीर्षकामध्ये ‘गाथा’ हा शब्द असल्यामुळे असेल कदाचित पण, या संपूर्ण लेखनात कुबेर यांनी त्यांच्यातील पत्रकाराला आणि प्रत्येक पत्रकाराला जोपासाव्या लागणाऱ्या काकदृष्टीला मुरड घातलेली असावी. व्यावसायिकतेला जोडलेले नीतिमत्तेचं अस्तर विरळ होऊ नये याची दक्षता बाळगणारा आणि त्यांपायीच विधिनिषेधशून्य व्यापार-व्यवसायाच्या दलदलीपासून चार अंगुळं वर राहणारा टाटा समूहाचा रथ अखेर नीरा राडिया प्रकरणामुळे भूमीवर आदळला, हे सत्य अप्रिय असलं तरी मान्य करावंच लागतं. विस्मयाची बाब म्हणजे या प्रकरणाचा उल्लेखदेखील ‘टाटायन’मध्ये नाही! वालीवध आणि सीताशुद्धी हे, नाही म्हटलं तरी, रामाच्या धवल चरित्रावरील डागच. अगदी निस्सीम रामभक्तांनी देखील रामकथेमधून त्या दोन प्रसंगांना थेट फाटा दिल्याचं दिसत नाही. ते बघता ‘टाटायन’मध्ये नीरा राडिया प्रकरणाचा उल्लेखही नसावा, हे खटकतंच. ‘टाटायन’मध्ये मांडलेल्या टाटा उद्योगसमूहाच्या कथेचं ‘गाथा’पण या एका गोष्टीमुळे अधोरेखित होतं.
आपल्या देशातील उद्योगसंस्कृतीचं भरणपोषण करणाऱ्या एका अतीव आदर प्राप्त औद्योगिक घराण्याची वाटचाल अक्षरबद्ध करणाऱ्या या मूल्यवान दस्तऐवजाच्या एक ‘ग्रंथ’ म्हणून ज्या शबलता आहेत, त्यांचा निर्देश इथं करणं क्रमप्राप्त ठरतं. ४०० पानांहून अधिक ऐवज असणाऱ्या, अनेकानेक व्यक्ती, संस्था, घटना, कंपन्या, देश, उत्पादनं यांचा निर्देश असणाऱ्या या ग्रंथास व्यक्तिनामांची आणि संस्थानामांची सूची जोडलेली नसावी, हे आश्चर्यकारकच केवळ नव्हे तर खेदकारक आहे.
अत्यंत गचाळ संपादन आणि मुद्रितशोधन ही या देखण्या ग्रंथाची डोळ्यांत खुपणारी अन्य दोन वैगुण्यं. काही ठिकाणी सदोष राहिलेली वाक्यरचना, अपूर्ण राहिलेली अवतरण चिन्हं, एकच व्यक्तिनाम वेगवेगळ्या पानांवर वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं असणं, टाटा समूहातील काही कंपन्यांची स्थापना वर्षं दिलेली नसणं, उद्योगसमूहांच्या उलाढाली वा नफ्यासंदर्भातील आकडेवारी नमूद करताना तो तपशील कोणत्या वर्षासाठीचा आहे त्याचा निर्देश नसणं... ही त्या ढिसाळपणाची वानगीदाखल काही उदाहरणं. केस कापून झाल्यानंतर अंगावरील कपडे कितीही झटकले तरी अंगावर पडलेले केस कोठे ना कोठे कपड्यांना चिकटून राहतातच. त्याच न्यायानं, कितीही वेळा मुद्रितं तपासली तरी काही ना काही नजरेतून सुटतंच. लेखन-मुद्रण व्यवहारात हे अपरिहार्यच असतं. हे मान्य करूनही काही चुका या अक्षम्यच ठरतात. याची दोन उदाहरणं बघण्यासारखी आहेत. जेआरडी टाटा यांच्या अर्धांगिनीचं नाव होतं ‘थेल्मा’. बोलीव्यवहारात ‘थेल्मा’चं ‘थेली’ असंही बोलीरूप वापरलं जात असे. मात्र, ‘टाटायन’मध्ये एके ठिकाणी चक्क ‘थैली’ असं छापलं गेलं आहे (पृष्ठ २४१). ‘टेल्को’चे शिल्पकार सुमंत मुळगावकर यांच्या पत्नी लीलाताई मुळगावकर यांचं निधन १९९२ साली झालं, असा उल्लेख २६३ पानांवर सापडतो. तर, त्याच्याच आधीच्या, म्हणजे, २६२ क्रमांकाच्या पानावर तळाशी, ‘‘१९९८ चा इंडियन लेपर्स अॅक्ट बदलला गेला, तो त्यांच्या प्रयत्नामुळे’’, असा लीलाताईंच्या कार्याचा गौरव आहे. आता, १९९२ सालीच निवर्तलेल्या लीलाताईंच्या प्रयत्नामुळे १९९८ साली अस्तित्वात आलेला कायदा कसा काय बदलला असावा, अशी शंकादेखील मुद्रितशोधक अथवा संपादकांना आली नाही, असं म्हणायचं का?
इथं दोष दोघांचाही आहे. मूळ कायदा १८९८ सालातील. मुद्रणदोषामुळे छापलं गेलं १९९८! संपादकीय संस्करण करणारे काय करत होते कोण जाणे! हाच गोंधळ कंपन्यांच्या नावांबाबतही दिसतो. सुमंत मुळगावकर यांचं नाव अभिन्नपणे जोडलं गेलेलं आहे ते ‘टेल्को’शी. ‘टाटा मोटर्स’ असं ‘टेल्को’चं नामांतर झालं आता अगदी अलीकडे. त्यामुळे, सुमंत मुळगावकर यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दलच्या विवरणात कंपनीचं नाव ‘टेल्को’ असंच निर्देशित केलं जाणं संयुक्तिक ठरतं. बरं, नसेल ‘टेल्को’ छापायचं तर ‘टाटा मोटर्स’ असं अभिधान वापरण्यात तरी सर्वत्र सातत्य हवं ना? तेही नाही. एकाच पानावर एकाच संदर्भात ‘टेल्को’ आणि ‘टाटा मोटर्स’ ही दोन्ही नावं मनपसंत वापरल्याचे नमुने ग्रंथात आहेत (पृष्ठे २०७, २७५, २७६, ३५६). या संदर्भात संपादकीय धोरण म्हणून काही होतं की नाही, असाच प्रश्न कोणाही सुज्ञ वाचकास पडावा. ‘गियानी बर्टोली’ ही व्यक्ती जेआरडी टाटा यांची साडू असल्याचं १६८ पानावर म्हटल्यानंतर पुढे २४१ पानावर त्या व्यक्तीलाच ‘जिन बार्टोली’ असं बारसं नव्यानं करून तिला जेआरडी टाटांचा मेव्हणा बनवलं आहे!
अशी मजा पुस्तकात बरीच असली तरी ‘टाटायन’च्या वाचनामुळे मिळणारा आनंद दशांगुळे वरच उरतो.
.............................................................................................................................................
टाटायन हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
गिरीश कुबेर यांची इतर पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
.............................................................................................................................................
लेखक पुण्यातील अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक आहेत.
agtilak@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment