‘आम्ही भूतकाळातल्या त्या चेटकिणीच्या नाती आहोत!’
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मीना कर्णिक
  • इस्त्रा आणि बशाक तिच्या पाहुण्यांसह
  • Mon , 17 June 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र फ्लाईंग ब्रूम इंटरनॅशनल वीमेन्स फिल्म फेस्टिव्हल Flying Broom International Women's Film Festival

२३ ते ३० मे तुर्कस्तानातल्या अंकारा इथं २२वा ‘फ्लाईंग ब्रूम वीमेन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ झाला. त्या निमित्तानं तिथल्या तरुण मुलींना भेटण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. त्याविषयी-

.............................................................................................................................................

फ्लाईंग ब्रूमवर - लांबलचक झाडूवर - बसून उडणारी चेटकीण आपण चित्रांमधून खूप वेळा बघितलीये. ‘आम्ही भूतकाळातल्या त्या चेटकिणीच्या नाती आहोत,’ अंकाराच्या फ्लाईंग ब्रूम या संस्थेच्या तरुण मुली अभिमानानं सांगतात.

महिला दिग्दर्शकांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून गेली २२ वर्षं या संस्थेतर्फे महिलांसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जातो. मी या महोत्सवाला गेले होते ती फिप्रेसी, म्हणजे सिनेमाच्या समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची सभासद म्हणून. माझ्याबरोबर नॉर्वेची क्रिस्टिन होती आणि बेल्जियमची सारा. आम्ही तिघी फिप्रेसी ज्युरी होतो आणि या स्पर्धेत असलेल्या एकूण १२ सिनेमांमध्ये एका सिनेमाला आम्हाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार द्यायचा होता.

केवळ स्पर्धेसाठीच नाही, तर एकूणच महोत्सवामध्ये दाखवण्यात आलेल्या सिनेमांची निवड करतानाही संस्थेनं आपल्या वैचारिक बैठकीशी फारकत घेतलेली नव्हती. याचा अर्थ सगळेच सिनेमे महिला सक्षमीकरण किंवा महिलांच्या प्रश्नाला वाहिलेले होते असं नाही. पण अनेक सिनेमांमधून स्थलांतर, निर्वासितांच्या कहाण्या सांगितलेल्या होत्या. लिबियाच्या सारा फताहीच्या सिनेमाचा उल्लेख इथं करता येईल. स्पर्धेमध्ये असलेल्या या सिनेमाला आम्ही पारितोषिक जरी दिलं नाही, तरी साराच्या प्रयोगशीलतेला दाद मिळाली. सारा मूळची सिरियाची. गेली काही वर्षं ती ऑस्ट्रियामध्ये, व्हिएन्नात राहतेय. रेफ्युजी म्हणून. स्वाभाविकच, तिला मतदानाचा हक्क नाही, तिच्यावर अनेक निर्बंध आहेत. तिच्या ‘केऑस’ या सिनेमामध्ये तीन बायकांची गोष्ट आहे. एक आहे सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये राहणारी. आजुबाजूच्यांशी तिनं संवाद करणंच सोडून दिलंय. आपल्या घरात ती पूर्णपणे एकटी जगतेय. दुसरी आहे ती युद्धापासून दूर जायचं म्हणून दमास्कस सोडून स्वीडनला राहायला गेलीये. पण तिला आपला भूतकाळ विसरता येत नाहीये आणि आपल्या चित्रांमध्ये स्वत:ला रमवण्याचा प्रयत्न ती करतेय. तिसरी व्हिएन्नामध्ये राहतेय. भविष्यकाळाविषयी पूर्णपणे अंधारात, दुसऱ्या महायुद्धात ऑस्ट्रिया सोडून पळून गेलेल्या एका बाईच्या भूतासारखी. या तीन बायकांचा संवाद म्हणजे हा सिनेमा आहे. आयुष्यात असलेल्या गोंधळाला, केऑसला सामोरं जाताना स्वत:चं अंतरंग शोधणाऱ्या बायकांचा संवाद.

अर्थात सगळेच सिनेमे काही निराशावादी किंवा राजकीय भूमिका मांडणारे होते असं नाही, पण राजकारण आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलंय याचं भान फ्लाईंग ब्रूमच्या निवड समितीला निश्चितच होतं. आणि आपल्या स्वत:च्या देशातल्या राजकीय वास्तवाची जाणीव होती.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4861/Kon-hote-sindhu-loka

.............................................................................................................................................

अंकाराला जाण्यापूर्वी मनात अनेक विचार होते. तुर्कस्तानाचे अध्यक्ष एरडोगन यांनी हजारो पत्रकार, मानवाधिकारासाठी लढणारे कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते यांना तुरुंगात डांबून ठेवलंय ही माहिती काही नवीन नव्हती. त्यातून (भारताप्रमाणेच) तिथंही धार्मिक वातावरण वाढतंय याचीही कल्पना होती. त्यामुळे उत्सुकता आणि कुतूहल दोन्ही मनात होतं. फ्लाईंग ब्रूमसारख्या एका फेमिनिस्ट संस्थेत काम करत असल्यामुळे ठराविक साच्यात जगणाऱ्या मुली आपल्याला भेटणार नाहीत याची साधारण जाणीव होती, पण त्यांचे विचार काय असतील, त्यांना स्वत:च्या भविष्याविषयी काय वाटत असेल, आपलं काम करताना मनात भीती असेल का, असे बरेच प्रश्न डोक्यात होते.

अंकाराला महोत्सवाच्या दरम्यान आठ दिवस या मुलींशी संवाद होत होता. चागला, चेमरे, बशाक, एस्त्रा, युलुल या सगळ्याच जणी आपल्या भोवतालाविषयी जागरूक होत्या. काहींना युरोपातल्या दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याची इच्छा होती, तर काहींना इथेच राहून बदल घडवायचा होता. आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्दही दिसत होती आणि दिवसेंदिवस मोकळं जगणं कदाचित कठीण होत जाणार आहे, याचं भानही होतं. पण आपण हार मानणार नाही, हे सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवायचं.

नुकतीच तिशी पार केलेली बशाक एक दिवस सांगत होती, ‘माझा बॉयफ्रेंड खूप चांगला आहे. पण लग्नाचा विचार मला भीतीदायक वाटतो. टर्किश मुलगे मित्र म्हणून छान असतात, पण नवरा झाले की त्यांना आपल्या मैत्रिणीनं टिपिकल बायको व्हावं असं वाटू लागतं. नवऱ्याला हवं-नको बघणं, घरच्यांची काळजी घेणं या तिच्याच जबाबदाऱ्या आहेत असं वाटू लागतं. मला हे मान्य नाही. मला स्वत:चं करिअर आहे. आज मी माझ्या वडिलांबरोबर त्यांच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करतेय. ते सगळं मी सोडून द्यायचं का?’

तिचं बोलणं ऐकताना मला गंमत वाटत होती. बशाकच्या जागी कोणत्याही भारतीय मुलीला मी बघू शकत होते.

भारतातल्या नुपूर बासूची ‘वेल्वेट रेव्होल्युशन’ ही जगभरातल्या सहा महिला पत्रकारांवर केलेली डॉक्युमेंटरी महोत्सवामध्ये दाखवण्यात आली. सिरियाचं युद्ध कॅमेऱ्यात पकडणारी झैना, बस्तरसारख्या नक्षलवादी भागात काम करणारी मालिनी सुब्रमण्यम, फिलिपाईन्समध्ये सरकारी भ्रष्टाचारावर बातम्या दिल्यामुळे धमक्यांचा सामना करावी लागलेली इंदे व्हेरॉना, बांगला देशात आपल्या नवऱ्याचा डोळ्यासमोर खून झाल्यानंतरही दुसऱ्या देशात राहून आपलं काम चालू ठेवणारी रफिदा बोनया अहमद, कॅमरूनमध्ये रेडिओवरून बातम्या देणारी मौसा मरादात अशा काही महिलांचं आयुष्य या डॉक्युमेंटरीमध्ये चित्रित करण्यात आलंय. फिल्म संपल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुण टर्किश मुलीनं म्हटलं, ‘मलाही पत्रकार बनायचंय. पण इथं स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करणं शक्य होईल का असा प्रश्न आज माझ्या मनात आहे. पण या डॉक्युमेंटरीमध्ये अतिशय विपरित परिस्थितीत काम करणाऱ्या बायकांना पाहून मला धीर आलाय.’ संपूर्ण थिएटरनं टाळ्या वाजवून या मुलीचं कौतुक केलं.

फ्लाईंग ब्रूमसाठी काम करणाऱ्या या मुलींना आपण एका चांगल्या संस्थेसाठी काम करतोय याचा सार्थ अभिमान वाटत होता. चागला सांगत होती, ‘बायकांनी समर्थ व्हायला हवं, एकत्र यायला हवं हे फ्लाईंग ब्रूमचं तत्त्व आहे. त्यामुळे व्हॉलिंटिअर म्हणून काम करताना आपण या चळवळीला काहीतरी योगदान देतोय असं वाटतं. अंकाराच्या प्रेक्षकांसाठी कला आणि सिनेमा महत्त्वाचा आहे याची आम्हाला जाणीव आहे. बायकांनी निर्माण केलेली कला जगासमोर यायला हवी असे आमचे प्रयत्न आहेत. मग त्यासाठी कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड द्यायची आमची तयारी आहे.’ चागलाच्या बोलण्यात ठामपणा होता.

या चित्रपट महोत्सवासाठी पहिल्यांदाच काम करणारी इस्त्रा तर हिजाब घालून वावरत होती. आणि त्यासाठी तिच्याकडे सविस्तर कारणही होतं. ‘सुरुवातीला मी हिजाब घालायला लागले, ती अर्थातच धार्मिक कारणांमुळे. माझी आई अतिशय जुन्या विचारांची आहे. पण वडिलांनी पाठिंबा दिल्यामुळे मी शिक्षण चालू ठेवलं, शिकण्याच्या निमित्तानं मी अंकाराला आले, एकटी राहू लागले, वाचू लागले, विचार करू लागले आणि ही जबरदस्ती योग्य नाही असं मला वाटायला लागलं. मग मी हिजाब घालणं सोडून दिलं. त्यानंतर काही काळानं माझ्या असंही मनात यायला लागलं की, हिजाब ही केवळ माझी धार्मिक ओळख नाही, ती माझी सांस्कृतिक ओळखही आहे. आणि केवळ युरोपियन संस्कृती आपलीशी केली तरच मी पुरोगामी ठरते असंही नाही. माझी सांस्कृतिक ओळख मी का हरवावी? म्हणून मी पुन्हा हिजाब घालू लागले. पण माद्रिदला गेले असताना यामुळे माझ्याकडे लोकांचं लक्ष वेधलं जातं असं मला जाणवलं, त्याची गरज नाही असं वाटलं आणि तिथं असतानाच्या काळात मी तो काढून ठेवला. म्हणजे हिजाब नाही घातला तर फार काही बिघडतं असं मला वाटत नाही. आतासुद्धा रमझान चालू असताना मी रोज उपास करत नाही. माझ्या आईला वाटतं मी करते म्हणून, पण मी तिला सांगत नाही. ती खुश, मीही खुश. मला गंमत याची वाटते की, डाव्या विचारसरणीचे लोक मी हिजाब घालते म्हणून मला चुकीची मानतात आणि उजव्या विचारसरणीचे लोक मी जीन्स घालते म्हणून चुकीची मानतात. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये लवचीकता नाही. मला या दोन्ही टोकाच्या भूमिकांच्या विरोधात उभं रहायला हवं असं वाटतं.’ इस्त्राचं म्हणणं पटो किंवा न पटो, पण ती आपल्या भूमिकेशी ठाम आहे.

अंकारातल्या या मुलींच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दाखवण्यात आलेली पाच मिनिटांची एक फिल्म मला महत्त्वाची वाटली. महोत्सवात झालेल्या फिल्म मेकींगच्या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतलेल्या तरुण मुलींनी ही फिल्म बनवली होती.

एक बारा-पंधरा वर्षांची मुलगी रस्त्यानं चालत येतेय. वाटेत ती काही पुस्तकं घेते. आनंदानं पुढे जात असताना कुणीतरी येऊन तिच्या हातात टोपली देतं. मग दुसरा माणूस त्या टोपलीत काहीतरी टाकतो. तिसरी त्या वजनात भर घालते. असं करत अखेरीला हा बोजा सहन न होऊन ती मुलगी खाली पडते. सगळं सामान विखुरलं जातं. फ्रेममध्ये एक मुलगा येतो. पुस्तकं उचलून तिच्या हातात देतो. आणखी एक जण येतो, टोपलीतलं काही सामान स्वत: उचलतो. एक बाई येते, ती टोपली उचलून घेते. आणि पुन्हा एकदा ती मुलगी आनंदानं आपली पुस्तकं घेऊन रस्त्यानं चालू लागते. बस्स, इतकीच फिल्म. म्हटलं तर ढोबळ. पण त्यातून अंकारामधल्या तरुण मुलींच्या मनातली खळबळ दर्शवणारी. समाजाकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे सांगणारी.

.............................................................................................................................................

लेखिका मीना कर्णिक पत्रकार व चित्रपट समीक्षक आहेत.

meenakarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख