पुरोगामी महाराष्ट्राची साथ मिळूनही वंचित बहुजन आघाडी सत्तेपासून वंचितच!
पडघम - राज्यकारण
प्रज्वला तट्टे
  • प्रकाश आंबेडकर
  • Sat , 15 June 2019
  • पडघम राज्यकारण प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi भाजप BJP संघ RSS काँग्रेस Congress

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तेव्हापासून त्याचे विश्लेषण अनेक अंगाने होत आहे. भाजपच्या साम-दाम-दंड-भेदापुढे विखुरलेल्या विरोधी पक्षांचा निभाव लागला नाही. मायावतींना पंतप्रधानपदाचे गाजर दाखवून काँग्रेससोबत युती करण्यापासून रोखले गेले आणि महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने सर्व जागांवर उमेदवार उभे करून आठ ते दहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नुकसान केले. फक्त दोन ठिकाणे सोडली तर वंचितचे अन्य सर्व ठिकाणचे डिपॉझिट जप्त झाले! कर्नाटक, राजस्थान नंतर आता महाराष्ट्रातही अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘डिपॉझिट’ गमावण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवला!

पण यावेळी प्रथमच अ‍ॅड. आंबेडकरांवर भाजपची ‘बी’ टीम असल्याचे उघड आरोप होत आहेत. त्यावर अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘मुसलमानांनी काँग्रेसला एकगठ्ठा मते दिली नसती तर आमच्या जागा निवडून आल्या असत्या’ असे वक्तव्य केले आहे. मतांच्या राजकारणात भाजपला अडचण ठरत असलेला मुसलमान मतदार आपल्यालाही अडचणच ठरतोय, असेच अ‍ॅड. आंबेडकरांना म्हणायचे आहे का? अन्यथा मग मुसलमानांनी वंचितला मते का द्यायला हवी होती, त्यांचे कोणते प्रश्न हाती घेऊन तडीस नेण्यास ‘वंचित’ कटिबद्ध आहे, हे अ‍ॅड. आंबेडकरांनी त्याच दमात सांगायला हवे होते.

उत्तर प्रदेशात जाटवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मायावती चार वेळा मुख्यमंत्री होऊ शकतात, त्यांना तिथला ओबीसी, ब्राह्मण, मुसलमान समाज पाठिंबा देतो, तर पुरोगामी महाराष्ट्रात अ‍ॅड. आंबेडकरांना इथले दलितेतर पाठिंबा देत नाहीत, असे का होते?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar

.............................................................................................................................................

खरे तर वेगवेगळ्या टप्प्यांवर अ‍ॅड. आंबेडकरांच्या भारिपला अनेकांनी भरघोस पाठिंबा दिलेला आहे असे लक्षात येते. अनेक बिनीचे समाजसेवक-विचारवंत-कलावंत जात-धर्म भेद सोडून अ‍ॅड. आंबेडकरांसोबत होते. नीलम गोऱ्हे, निळू फुले, राम नगरकर, माधवराव नाईक (हिंगोली), हरिभाऊ शेळके (नांदेड), माधवराव पिसाळ (पूर्णा), अनंत पाटील (मंगरूळ पीर), लिंबाजी गाभणे (शिरपूर), डॉ. ज्ञानेश्वर शेवाळे (गणेशपूर), मखराम पवार, रामदास बोडके, सुखदेवराव जाधव, प्रसेनजीत पाटील, हनुमंतराव उपरे, डॉ. सुभाष राठोड, डॉ. सुभाष पटनाईक (प्राचार्य अकोला) अशी सर्व जातींमधली मंडळी अ‍ॅड. आंबेडकरांसोबत गेली. पण सोबत राहू शकली नाहीत, हे वास्तव आहे.

१९९५ साली भारिपकडून धनगर जातीचे अत्यंत अभ्यासू आंबेडकरी विचारवंत हरिभाऊ शेळके नांदेडमधून उभे होते. ‘वंचित बहुजन आघाडी’चे उमेदवार यशपाल भिंगे यांचे हरिभाऊ शेळके सासरे. २०१९ मध्ये लोकसंख्या वाढलेली असली तरी भिंगेंना शेळकेंच्या आसपास मते मिळाली. हटकर समाजाचे माधवराव नाईक हिंगोलीमधून उभे होते, ते केवळ दहा हजार मतांनी पडले. माधवराव पिसाळ तर सत्यशोधक विचारांचे कट्टर पुरस्कर्ते. स्वतःच्या मुलीचे लग्न त्यांनी सत्यशोधक पद्धतीने लावून दिले, तेव्हा व्यासपीठावर शाहू-फुले-आंबेडकरांची छायाचित्रे होती. मुलाचे लग्न आपल्या अटीवर लावणे सोपे असते. (पिसाळांनी मुलाचेही लग्न सत्यशोधक पद्धतीने लावले होते.) पण मुलीचे लग्न सत्यशोधक पद्धतीने लावण्यासाठी त्यांना तिच्या सासरच्यांना तसे मान्य करायला भाग पाडण्यात काय कसरत करावी लागली असेल? २५ वर्षे सरपंच राहिलेले पिसाळही भारिपकडून लोकसभेला उभे होते, तेव्हा सर्व जाती-धर्माची मते पडली, पण नंतर तेही दुरावले.

प्रसेनजीत पाटील मराठा असले तरी त्यांची धम्मविचाराशी असलेली निष्ठा लक्षात येते. हनुमंतराव उपरे भावसार जातीचे असून त्यांनी ओबीसींना धम्माकडे वळवण्याची मोठी चळवळ उभारली होती. पंधरा वर्षे प्राध्यापकी करूनही ते नावापुढे ‘प्राध्यापक’ लावत नसत. सुमारे दशकभर ते भारिपचे अध्यक्ष होते. मात्र तेही नंतर दुरावले. पुढे त्यांनी धम्मदीक्षेच्या चळवळीवर लक्ष केंद्रित केले.

अशी पुरोगामी, सत्यशोधक, फुले-शाहू आंबेडकरी विचारांनी भारलेली विविध माणसे अ‍ॅड. आंबेडकरांकडे ‘बाबासाहेबांचे वारसदार’ म्हणून मोठ्या आशेने आकृष्ट झाली होती असे लक्षात येते. पण पुढे काहीतरी बिनसले आणि ही मंडळी सोडून गेली. यातले अनेक जण दुसऱ्या पक्षांनी टाकलेल्या चिरीमिरीवर भाळणारे नव्हते, हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे.

नाव न लिहिण्याच्या अटीवर दोनदा भारिपकडून लोकसभा लढलेल्या एका मराठा समाजाच्या उमेदवाराने प्रस्तुत लेखिकेस सांगितले की, दुसऱ्यांदा ज्या वेळी त्यांच्या निवडून येण्याची संपूर्ण खात्री होती, त्यावेळी भाजपसोबत अ‍ॅड. आंबेडकरांचे सेटिंग झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भारिप सोडले. वंजारा समाजाचे अनेक आंबेडकरी विचारांनी भारलेले कार्यकर्ते भारिप सोडून गेले. महादेव राठोड मंगरुळपीरहून १९९९ मध्ये भारिपकडून उभे होते आणि केवळ १३०० मतांनी पडले. डॉ. गाभणे २००० मतांच्या फरकाने पडले. थोडक्यात, वरील सर्व मंडळी आज ज्याला वंचित बहुजन म्हणता येईल अशी किंवा मराठा असली तरी सत्यशोधक विचारांनी भारलेली होती, आहेत. ती अ‍ॅड. आंबेडकरांसोबत वेगवेगळ्या टप्प्यांवर राहिलेली आहेत.

वंजारा, बारी, आदिवासी, हटकर, धनगर, कुणबी, मराठ्यामधले वंचित अ‍ॅड. आंबेडकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत दिलेल्या वेगवेगळ्या घोषणांकडे आकर्षित होतात असे दिसते. पहिल्या निवडणुकीत उमेदवाराचा आपण ‘निवडणूक जिंकू शकतो’ असा आत्मविश्वास वाढतो. आपण जास्तीत जास्त किती जागा घेऊ शकतो याचा अंदाज येतो. परंतु दुसऱ्या निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकरांचं काहीतरी सेटिंग लक्षात येतं आणि विश्वासघात झाल्याची जाणीव होते. मग ते पक्ष सोडतात, असे एका भारिपच्या तिकिटावर दोन निवडणुका लढलेल्या आणि आता त्यांच्यापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यानं सांगितलं. प्रमोद महाजांना निवडून आणण्यासाठी भारिपनं नीलम गोऱ्हे यांना उत्तर मुंबईतून उभं केलं होतं, असं वक्तव्य शरद पवार यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत केलं होतं. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी भारिप सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

एका निवडणुकीत उमेदवार किती मतं घेऊ शकतो, हे जोखायचं आणि दुसऱ्यांदा त्याच्या मतांवरून सौदा करायचा असा काही पॅटर्न तयार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं. हे बकऱ्याचा बळी देण्यापूर्वी त्याला चांगलं खाऊ घालून धष्ट-पुष्ट करण्यासारखं झालं! पण प्रत्येक निवडणुकीच्या आधी ‘सर्वांना सोबत घेण्याचे’ जुनेच प्रयोग नव्या नावानिशी केले जातात.

२००४-२००९ लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या काळात ‘भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’ ही घोषणा होती. २०१४ मध्ये ‘माझा पक्ष, सत्ताधारी पक्ष’ ही घोषणा होती. अ‍ॅड. आंबेडकर आधी ‘जातीअंताची लढाई’ हाती घेतात आणि नंतर त्याच जुन्या जातीतील नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांच्या जाती उघड करणारी ‘वंचित बहुजनांची आघाडी’ लढवतात. जणू जातीअंताच्या लढाईला अपयश आल्याचे मान्यच करतात!

कार्यकर्ते सोडतात तितक्याच सहजपणे आंदोलनाचे मुद्देही अ‍ॅड. आंबेडकर सोडून देतात, असे या लोकसभा निवडणुकीच्या काळात उठून समोर आलेले आणखी एक वास्तव. भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेवरून उभा महाराष्ट्र् ढवळून निघाला होता. मराठा जातींपासून तर मुसलमान समाजापर्यंत सर्वांनी भीमा-कोरेगावच्या सरकार-संघप्रणीत दंगलीचा निषेध केला होता. देशभरातल्या पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात अ‍ॅड. आंबेडकरांना आपला नेता मानले होते. पण लोकसभा निवडणुकांमध्ये भिडे-एकबोटे-पेशवाई हे मुद्दे कुठे दिसलेच नाहीत. जणू या सर्वांच्या विरुद्धची तलवार अ‍ॅड. आंबेडकरांनी म्यानच करून टाकली! त्याऐवजी प्रचारात सापनाथ-नागनाथची (काँग्रेस-भाजप)ची पुंगी वाजवली. यावरून आणखी एक स्पष्ट झाले, ते हे की, निवडणुका नसतात तेव्हाचे आंदोलक अ‍ॅड. आंबेडकर वेगळे आहेत आणि निवडणूक काळातले वेगळे!

मुस्लीम मुल्ला-मौलवींनी काँग्रेसलाच मते द्या असे फतवे काढले म्हणून ‘वंचित’ काही ठिकाणी निवडून येऊ शकली नाही, असे आता अ‍ॅड. आंबेडकर म्हणत आहेत. पण मुसलमानांना वेगळे पडण्याच्या संघ-भाजपच्या राजकारणाला भारिपने जोरकस विरोध केला का? कधी काळी त्यांनी टाडा विरोधात, इशरत जहाँ बनावट चकमकी विरोधात, अफझल गुरूला फाशीची शिक्षा देण्याविरोधात भूमिका घेतली होती. ती तलवार २०१४ नंतर अगदीच म्यान झालेली दिसते.

मोदी सरकार सत्तेत आल्याबरोबर मोहसीन शेखला पुण्यात ठेचून मारले गेले. त्यावर अ‍ॅड. आंबेडकर यांनी काहीही भूमिका घेतली नाही. जम्मू-काश्मीरचे कलम ३७० घेऊन भाजप-संघ सर्व भारत भरात मुस्लीम विरोधी आग लावत आहेत. १० जून रोजी आसाम राज्यापुरते सीमित असलेले नागरिकत्व अभियान देशभर राबवण्यासाठीचे बिल भाजपने गाजावाजा न करता पास करवून घेतले. म्हणजे आसाम मध्ये मुस्लिमांना आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागत आहे, ते आता संपूर्ण देशातल्या मुस्लिमांना करावे लागेल. त्याबद्दल अ‍ॅड. आंबेडकर यांनी भूमिका घेणे आवश्यक होते.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर भाजप-काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, असा विश्वास जर महाराष्ट्र्राच्या आणि मुस्लिमांच्या मनात त्यांच्या ३८ वर्षांच्या राजकीय आयुष्यात निर्माण करू शकले नाहीत, तर त्याचा दोष वंचितला मते न देणाऱ्यांकडे कसा काय जातो?

.............................................................................................................................................

लेखिका प्रज्वला तट्टे सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

prajwalat2@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Rohidas B

Mon , 17 June 2019

हा लेख बारामती-पुरस्कृत वाटतो. बारामतीतले काही लोक आमच्या बाळासाहेब आंबेडकरांचा छुपा द्वेष करतात. हे आता सगळ्यांनाच माहित झालेले आहे. वंचिताना पुढे येऊ द्यायचे नाही, व आपल्याच कुटुंबियांची दुकानदारी चालू ठेवायची हेच काम बारामतीने गेली ४० वर्षे केले. बाळासाहेबांचे कार्यकर्ते फोडायचे, आणि बाजारू पत्रकार, तज्ञ वगैरे मंडळींना पैसे चारून बाळासाहेबांवर टिकेची राळ उडवायची व भोळ्याभाबड्या वंचित समाजाच्या मनात शंका निर्माण करायचे धंदे बारामतीच्या जाणत्या (?) राजाने नेहमीच केले. मुळात वंचित राज्यकर्ते झालेले यांना नको आहेत. म्हणून आणि फक्त म्हणूनच बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली जाते. पण यामुळे आम्ही खचणार नाही. एक दिवस आमचे बाळासाहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्की बनतील, तुमचं पोट मात्र नक्की दुखेल तेव्हा.


Ram Jagtap

Mon , 17 June 2019

@ Hemant Mirje - लेख कॉपी पेस्ट करू नयेत. कारण 'अक्षरनामा' हे ऑनलाईन पोर्टल आहे. त्यामुळे लेख वाचकांनी पोर्टलवर येऊन वाचले तरच कुठल्याही पोर्टलचे अर्थकारण चालू शकते. त्यामुळे लेख कॉपी-पेस्ट न करता त्याची लिंक शेअर करावी ही विनंती. - राम जगताप, संपादक, अक्षरनामा


Hemant Mirje

Mon , 17 June 2019

मी या पोर्टलचे लेख सोशल मीडियावर कॉपीपेस्ट करू शकतो का? कॉपीपेस्ट सोबत लेखकाचे नाव सुद्धा प्रदर्शित करणार आहे, कृपया परवानगी द्यावी।


Hemant Mirje

Mon , 17 June 2019

मी या पोर्टलचे लेख सोशल मीडियावर कॉपीपेस्ट करू शकतो का? कॉपीपेस्ट सोबत लेखकाचे नाव सुद्धा प्रदर्शित करणार आहे, कृपया परवानगी द्यावी।


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......