‘वेलकम होम’ : आदर्शवादाची परिसीमा ओलांडून वास्तवाशी नातं घट्ट करणारा सिनेमा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘वेलकम होम’चं पोस्टर
  • Sat , 15 June 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie ‘वेलकम होम Welcome Home सुनील सुकथनकर Sunil Sukthankar सुमित्रा भावे Sumitra Bhave

सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्यात अनेक साम्यं दिसतात. त्यातलं एक म्हणजे सामाजिक जीवनात सामाजिक बंधनांमुळे मुक्तपणे वाहवत जाता येत नाही, तर व्यक्तिगत आयुष्यात त्या बंधनाची जागा जबाबदारी घेते आणि मुक्त वाहवत जाण्याला आडकाठी निर्माण होते. दोन्ही पातळीवर मर्यादा असतात. त्यातून निर्माण होणारा गोंधळ, कौटुंबिक कलह, आयुष्यातले प्राधान्यक्रम, दुरावणारे नातेसंबंध, अपेक्षांची ओझी, प्रत्येकाची स्वत्वाची भाषा, त्यात सांभाळून घेणारी माणसं आणि त्यातला प्रवृत्ती भेद यांचं तात्त्विक पातळीवरील दर्जेदार मिश्रण सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘वेलकम होम’ या सिनेमात पाहायला मिळतं.

हा सिनेमा एका विवाहित स्त्रीभोवती फिरतो. मात्र तो कुठेही पुरुषाची बाजू किंवा स्त्रीची बाजू न घेता तटस्थपणे परिघावरून सगळं नोंदवत राहतो, हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.

सौदामिनी आचार्य हे या सिनेमातलं मुख्य पात्र. तिचा विवाह सदानंद आचार्य (सीए) या व्यक्तीशी झालेला असतो. पीएच.डी. धारक सौदामिनी नोकरी करतात. आर्थिकदृष्ट्या दोघंही सधन असतात. या दाम्पत्याला एक मुलगी असते. मात्र विवाहानंतर आचार्य दाम्पत्यात वाद व्हायला लागतात. हळूहळू वादाचं रूपांतर नेहमीच्या कटकटीत व्हायला लागतं. शेवटी कंटाळून सौदामिनी सासू (त्यांना डिमेन्शिया नावाचा आजार असतो) आणि मुलगी यांना सोबत घेऊन सोडून माहेरी येतात. इथून त्यांची जी काही घुसमट होते, त्यावर सिनेमाचा गाभा आधारलेला आहे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4902/anartha

...............................................................................................................................................................

सौदामिनी या एक कणखर, त्याचबरोबर एक कर्तव्यदक्ष आणि जबाबदारीची जाणीव असलेली स्त्री असतात. त्यांच्या मनाच्या द्विधा स्थितीत त्या पूर्णतः अडकलेल्या असतात. अशा कठीण प्रसंगी त्यांच्यासोबत ठाम उभी राहणारी, त्यांला एकाच वेळी पाठिंबा देणारी आणि त्यांची समजूत काढणारी अनेक पात्रं येत राहतात. त्या त्यांचं घर सोडून आल्यानंतर ‘कुणाचं वैवाहिक आयुष्य नाकाच्या सरळ नसतं’ असं म्हणणारे वडील त्यांच्या सासर सोडण्याच्या निर्णयाला अप्रत्यक्ष पाठिंबा देतात.

‘तडजोड ही तपशिलाची करायची असते, मूल्यांची नाही,’ अशी शिकवण दिलेल्या आई-वडिलांकडे राहायला आल्यानंतर तिला स्वत्वाची ओळख व्हायला लागते. आपलं स्त्री म्हणून वास्तव्य कुठल्या घरानं स्वीकारलं आहे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण व्हायला लागतो. हा गुंता किती किचकट आहे, हे हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागतं. अशा वेळी जवळचा मित्र त्यांचा आधार बनतो. हे सगळं चित्र उभं करताना दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी हळूहळू समाज आपली कूस कशी बदलतो आहे, याचं यथार्थ चित्रण केलं आहे. म्हणून सिनेमा सृजनाची मांडणी करताना मूलभूत समाजरचनेचा तुकड्या-तुकड्यात आणि त्याच वेळी समग्र असा विचार करायला प्रवृत्त करतो.

दोन पिढ्यांतलं अंतर अधोरेखित करताना त्यांच्या विचार करण्याचा पद्धतीतला फरक सिनेमात अप्रतिम रीतीनं आला आहे. नव्या पिढीच्या गरजा, आवडी-निवडी, दृष्टिकोन या सगळ्या गोष्टीबाबत वेगवेगळे प्रवाह पाहायला मिळतात. त्याबद्दल एकच एक मुद्दा रेटलेला नाही.

‘व्यवहार आणि भावना याच्यात फरक असतो’ असं सांगणारे वडील आणि ‘आपण आपल्या चौकटीत राहायचं आणि आलेली जबाबदारी स्वीकारायची’ असं लेकीच्या मायेपोटी म्हणणारी आई! या दोन्ही अंतर्विरोधी विचारांचा अत्यंत सावधपणे मेळ घातला गेला आहे.

सिनेमाची कथा पूर्वार्धात एका बंद घरात चालणाऱ्या चर्चाने अत्यंत संथगतीने पुढे जात राहते, तर उत्तरार्धात अनेक चढउतार येत राहतात. मात्र तरीही कथेची सिनेमावरची पकड सैल होत नाही. दिग्दर्शन, पटकथा, संगीत, संवाद, अभिनय, तांत्रिक बाबी या सर्वच बाबतीत सिनेमा अत्यंत प्रभावी आहे. मृणाल कुलकर्णी, स्पृहा जोशी, सुमित राघवन, मोहन आगाशे, उत्तरा बावकर यांच्या दर्जेदार अभिनयानं अभिनयाची बाजू सांभाळली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कुणीही खलनायक नाही.  

थोडक्यात, माणूस म्हणून प्रत्येकाच्या मनातल्या रंगांचा वेध घेऊन त्यावर अचूक बोट ठेवण्याचं काम हा सिनेमा अगदी छोट्या-मोठ्या तपशिलासहित करतो. यातली स्त्री अस्तित्वाची लढाई प्रतीकात्मक असली तरीही व्यापक अर्थानं सिनेमा मानवी मनाच्या विविध प्रवाहाचा एका समांतर रेषेत सृजनशीलपणे विचार करायला प्रवृत्त करतो. त्यामुळे तो आदर्शवादाची परिसीमा ओलांडून वास्तवाशी नातं अधिक घट्ट करतो. म्हणून हा सिनेमा आवर्जून पाहावा असा आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख