अजूनकाही
प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्त १ व २ जून रोजी एसेम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने साळुंखे यांचा साहित्य अभिवादन आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. बहुजनांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे यासाठी आणि अनार्य संस्कृतीच्या महामानवाचे मोठेपण समाजासमोर आणण्यासाठी साळुंखे यांनी दिशादर्शक लिखाण केले आहे. त्यामुळे फाउंडेशनचे सुभाष वारे यांनी साळुंखे यांच्या ७५ पुस्तकांविषयी ७५ कार्यकर्त्यांकडून लेख लिहून घेतले. या ७५ कार्यकर्त्यांच्याच हस्ते २ जून रोजी साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्या ७५ लेखांपैकी तीन लेख ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत आहेत. त्यातील हा दुसरा.
.............................................................................................................................................
जीवन जगण्याचे अत्यंत साधे, सोपे मार्ग आपल्याला महापुरुष आणि संतपरंपरेनं दिले आहेत. मात्र हे सुलभीकरण मूठभर मार्तंडांची दुकानदारी संपवेल म्हणून समाजासमोर येणार नाहीत किंवा गूढ तत्त्वज्ञान म्हणूनच कसं येईल आणि पुन्हा हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी त्या कथित मार्तंडांचीच गरज कशी लागेल, अशी व्यवस्था जाणीवपूर्वक निर्माण केली गेली. या व्यवस्थेला छेद देण्याचं काम ज्यांनी केलं, त्यात आ. ह. साळुंखे यांचं नाव घ्यावं लागेल.
संत तुकाराम हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी पर्व. तुकाराम समजणं म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणं. ‘न सरे ऐसे ज्याचे दान, त्याचे कोण उपकार?’ असं स्वतः तुकारामांनीच सांगितलं होतं. त्याच तुकारामांनी आपल्या अभंगांमधून जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची जी शिदोरी दिली, ते ज्ञान जगणं सोपं करणारं आहे. म्हणूनच हे दान कधीच संपणारं नाही. आपल्या प्रत्येक अडचणीत, द्विधा मन:स्थितीत मार्ग दाखवणारं आहे. म्हणूनच ‘न सरे ऐसे ज्याचे दान’ या अभंगाचं कृतिशील अनुपालन म्हणून ‘न सरे ऐसे तुकोबांचे दान’ या पुस्तकाकडे पाहावं लागेल. साळुंखे यांच्या आकाशवाणी सातारा केंद्रावरील विवेचनाचा संग्रह असलेलं हे पुस्तक तुकारामांचा जीवनविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणारं आहे.
तुकाराम जगण्याकडे कसं पाहत होते आणि समाज तुकारामांना आदर्श का मानत होता, हे सांगताना ‘स्वतः तुकारामांनीही तितकंच उत्कट प्रेम या लोकांवर केलं होतं’, हे सोप्या शब्दांत मांडण्यात आलं आहे. विद्रोही विचार मांडणाऱ्या कोणत्याही महापुरुषाला बदनाम करायचं, नकारात्मक रंगवायचं आणि ते जमलं नाही तर देवत्व बहाल करायचं, हा इथल्या व्यवस्थेचा आवडीचा खेळ. संत तुकारामदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत.
तुकारामांचं व्यक्तिगत आयुष्य नकारात्मक रंगवलं गेलं, त्यांना पलायनवादी दाखवलं गेलं, या मनोवृत्तीचा समाचार घेत, तुकारामांच्याच अभंगाचा आधार घेत त्यांचं खरं रूप साळुंखे मांडतात. ‘त्यांचं (तुकारामांचं) संतत्व असहायतेतून निर्माण झालेलं नव्हतं. ते काही त्यांनी परिस्थितीच्या रेट्यापुढे झुकून पत्करलेलं नव्हतं. ती पलायनवादातून निर्माण झालेली नकारात्मक घटना नव्हती. ते त्यांनी स्वीकारलेल्या एका उत्कट जीवननिष्ठेचं भावात्मक फळ होतं. बुडणाऱ्या, रंजलेल्या-गांजलेल्या लोकांना धीर देणं, दिलासा देणं, त्यांच्या जीवनात आनंद फुलवणं, हीच ती जीवन निष्ठा होती’ असं तुकारामाच्या जीवननिष्ठेचं वर्णन साळुंखे यांनी केलं आहे.
‘उच्च निच काही नेणे हा भगवंत’ हा तुकारामांचा अभंग म्हणजे ‘ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आणि अधिकार फक्त विशिष्ट लोकांनाच असतो, हा काही लोकांनी मांडलेला विचारही त्यांनी नाकारला. याबाबतीत जात वर्णच नव्हे तर, वय आणि लिंग हे भेदही त्यांना मान्य नव्हते’ असं जेव्हा साळुंखे मांडतात, त्यावेळी तुकारामांनी त्या काळात कशी क्रांतिकारी भूमिका घेतली, हे स्पष्ट होतं.
‘मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या अभंगातून मनाच्या प्रसन्नतेला महत्त्व देणारे तुकाराम, ‘साधूंनी बचनाग खाती तोळातोळा’ यातील ‘बचनाग’ म्हणजे जालीम विष. म्हणजे सरावानं जालीम विषदेखील पचवता येतं, हा ‘असाध्य ते साध्य’चा संदेश देणारे तुकाराम, ‘भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे’ या अभंगातून समोर येणारा तुकारामांचा प्रयत्नवाद वाढवणारा वास्तववादी दृष्टिकोन, संसार करायचा पण त्यातच गुरफटून राहायचं नाही असं ‘सुखे करावा संसार, परी न सांडावे दोन्ही वार’ सांगणारे वास्तववादी तुकाराम, ‘जाऊनिया तीर्था काय तुवा केले? चर्म प्रक्षाळिले वरी वरी’ या शब्दांत कर्मनिष्ठा मांडणारे तुकाराम, अशी तुकारामांची वेगवेगळी रूपं आपणास या पुस्तकातून पाहायला मिळतात.
तुकारामांनी अंधश्रद्धेवर केलेला प्रहार, मग तो ‘नवसे कन्यापुत्र होती, तरी का करणे लागे पती?’ हा अभंग असेल अथवा ‘देव्हारा बैसोनि हालविती सुपे, ऐसी पापी पापे लिंपताती’ हा अभंग, ‘ईश्वराच्या नावावर चालणारी अंधश्रद्धाही त्यांना सहन होत नव्हती’ हे साळुंखे यांनी केलेलं विवेचन डोळे उघडवणारं आहे.
‘तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बीबुडी करी आधी’ या अभंगात आशेचं बी बुडवून टाकलं पाहिजे हे सांगण्यासाठी ‘बीबुडी’ हा शब्दप्रयोग वापरणारे शब्दप्रभू तुकाराम समोर येतात. रुक्ष, भावनाशून्य शहाणपणावर ‘आणिकां छळावया जालासी शहाणा’ असा प्रहार करणारे, ‘काही वेळा माणसं ग्रंथाच्या पाठांतरातच अडकून पडतात, अर्थाची फिकीरच करत नाहीत, अर्थाची उपेक्षा करून नुसतं पाठांतर करणं व्यर्थ आहे’ हे ‘घोडे काय थोडे वागविले ओझे? भावेविण तैसे पाठांतर’ या रूपकातून मांडणारे तुकाराम या पुस्तकातून समोर येतात.
‘नका दंत कथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी, बोल कोण?’ अर्थात पोकळ गप्पांपेक्षा अनुभवाला महत्त्व देण्याचा तुकारामांनी दिलेला संदेश सांगतानाच त्याचा आजच्या जगण्याशी कालसंगत धागा साळुंखे जोडतात. ‘आजचं विज्ञान सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्यांकडून याच अपेक्षा बाळगत असतं. त्यांनी त्याच कसोट्यांचं पालन केलं पाहिजे, ही त्यांची भूमिका असते.
दंतकथा, ऐकीव माहिती, परंपरा, ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्य अशा गोष्टींपेक्षा चिकित्सा, प्रयोग, स्वानुभव यासारख्या गोष्टींच्या आधारे सत्याच्या जवळ जाता येतं व सत्य जाणता येतं, ही विज्ञानाची संशोधनशैली आहे. तुकारामांना आधुनिक विज्ञानाचे असे सिद्धांत माहीत होते, असं मला मुळीच म्हणायचं नाही. तथापि ते आपल्या विवेकाच्या आधारे त्याच पद्धतीचा विचार करत होते, एवढं मात्र नक्की म्हणता येत, या शब्दांत साळुंखे विवेकवादी तुकाराम मांडतात.
तुकारामांची अशी वेगवेगळी रूपं मांडताना तुकारामांनी गुरुशिष्य नात्यावर केलेलं भाष्य महत्त्वाचं आहे. ‘गुरुशिष्याचं चाकोरीतलं कृत्रिम नातं तुकारामांना मान्य नव्हतं. गुरूनं समवृत्तीनं आणि निरपेक्ष भावनेनं सर्वांना उपदेश करावा, हा विचार मांडताना तुकाराम म्हणतात ‘मेघवृष्टीने करावा उपदेश....’ मेघ जसा कसलाही भेदभाव न करता सर्वांसाठी जलाचा वर्षाव करतो, सर्वांची तहान भागवतो, तसंच गुरूचं वागणं हवं.
एखाद्यालाच जवळ करून त्याला शिष्य करायचं आणि इतरांना वाऱ्यावर सोडायचं असा दुजाभाव गुरूनं करता कामा नये. म्हणूनच मेघवृष्टीनं उपदेश करावा असं सांगून झाल्यावर तुकाराम लगेच म्हणतात ‘परी गुरुने न करावा शिष्य’. सगळ्या समाजाच्या कल्याणाची काळजी वाहणारानं फक्त एखाद्याला जवळ करून शिष्य बनवणं तुकारामांना मान्य नव्हतं. द्रोणानं अर्जुनाच्या बाजूनं आणि एकलव्याच्या विरोधात केलेला पक्षपात संवेदनशील मनावर जखमा करणारा होता. तुकाराम अशा पक्षपाताला मान्यता देणं कदापि शक्य नव्हतं. त्यांनी याच अर्थाचं आणखी एक सुरेख वचन एका अभंगात लिहिलं आहे. ते म्हणतात ‘मेघवृष्टी काही न विचारी ठाव, जैसा ज्याचा भाव त्यासी फळे’.
या आणि अशा विविध अभंगांचं विवेचन करत तुकारामाची जीवननिष्ठा ते त्यांनी जीवन जगण्यासाठी दिलेलं ज्ञान, तत्त्वज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणूनच साळुंखे यांना महत्त्वाचा वाटतो. ज्याचं कोणत्याही क्षेत्रातील योगदान आयुष्यभर, अनेक पिढ्यांपर्यंत टिकत नाही, मध्येच संपून जातं, त्याचं कार्य समाजाला फार उपकृत करणारं नसतं. त्याचे काही फार मोठे उपकार नसतात. ज्यानं दिलेलं दान कधी संपत नाही, त्याचे खरे उपकार असतात.
तुकाराम आणि त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं योगदान असंच न सरणारं आहे. म्हणूनच ‘न सरे ऐसे तुकोबांचे दान’ हे पुस्तक जगण्याची शिदोरी आहे.
.............................................................................................................................................
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment