आज आचार्य अत्रे यांचा ५०वा स्मृतिदिन. त्यानिमित्त हा विशेष लेख. अत्रे यांचा काळ ज्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे, अशा व्यक्तींच्या लेखनात जी बहार येते, जो काळ येतो, ज्या उपमा आणि अलंकार येतात; जी विश्वसनीयता येते, ती अत्रे यांचा काळ न पाहिलेल्या व्यक्तींच्या लेखात येऊ शकत नाही. अत्रे ही केवळ त्यांची पुस्तके वाचून समजून घेण्याची व्यक्ती नव्हती, नाही. त्यामुळेच अत्रे गेले त्यानंतरचा हा लेख, ५० वर्षांपूर्वीचा.
‘नवयुग’ साप्ताहिकाने अत्र्यांच्या निधनानंतर म्हणजे ऑक्टोबर १९६९ साली ‘आचार्य अत्रे स्मृति विशेषांक’ प्रकाशित केला होता. प्रस्तुत लेख त्या अंकातून घेतला आहे.
............................................................................................................................................................
अत्रे गेले. डोंगराएवढा माणूस एकाएकी नाहीसा झाला. साडेतीन कोटी मराठी माणसांवर त्यांचे अंतोनात प्रेम होते; त्यांच्या ओढीनेच अत्रे क्षणभर उंबऱ्यापाशी घुटमळले. पण काय करणार? लहान आणि महान सर्वांना जावे हे लागतेच. तसे तेही गेले. तेव्हा अज्ञाताच्या राज्यातले सगळे बुलंद दरवाजे झंझावाताने थरथरले असतील आणि हरामखोर मृत्यु अगदी हबकून गेला असेल. अत्रे नावाचे एक पिसाट वादळ इहलोकातून नाहीसे झाले एवढे खरे.
सतत ४० वर्षे अत्र्यांचा डंका मराठी मुलखात झडत राहिला. आडदांड शरीर, अचाट उत्साह आणि आडमाप कर्तुकी. असा मेळ विरळा. काय कारकीर्द. केवळ अदभुत! उदात्त, उत्तुंग आणि उत्कट तेवढे त्यांना हवेहवेसे वाटे. घारापुरीच्या प्रचंड शिला-शिल्पांना जन्म देणाऱ्यांचे आणि अत्र्यांचे गोत्र एकच असावे. अल्प तेवढे त्याज्य. बहु तेवढे ग्राह्य. बारीक नक्षीकाम नापास. महाप्रमाण भव्य काम एकदम पास. हरकती-मुरकतीपेक्षा ढाल्या आवाजातले तुफानी गाणे विशेष पसंत. असा त्यांचा स्वभाव होता. युरोपमध्ये त्यांनी प्रचंड पुतळे पाहिले तेव्हापासून त्यांना आपल्याकडच्या फुटकळ पुतळ्यांचा विलक्षण तिटकारा वाटू लागला. “रशियात असतो तो ‘पुतळा’; आपल्याकडे असतो तो पुतळू” (गुजरातीत पुतळ्याला असलेला शब्द) असे ते म्हणत. माणसाच्या बाबतीत त्यांचे हेच सूत्र होते. माफक मोजमोपाची मने त्यांना आवडत नसत. मर्यादित गुणांची, आटोपशीर महत्त्वाकांक्षेची, रेखीव चालीची, आखीव आयुष्यात रमलेली माणसे त्यांना कुठून रुचायला? त्यांना आवडायची बलदंड माणसे, उभारीची माणसे.
त्यांच्या मनाला प्रतिभेचे विलक्षण आकर्षण होते. प्रत्येक क्षेत्रातली प्रतिभावंत माणसे त्यांना आपलीशी वाटत. त्यांचा गौरव किती करू आणि किती नको, असे त्यांना होई. कर्तृत्वशून्य सज्जनापेक्षा पराक्रमी दुर्जन त्यांना जवळचा वाटते. शिष्ट पांढरपेशा संभावितांपेक्षा रांगडी, जिवंत मनाची माणसे त्यांना प्रिय होती. भणंग अवलिये, कफल्लक कलावंत, बेछूट बहाद्दर यांची कदर करावी ती अत्र्यांनीच. गांधीजी आणि सावरकर, सुभाषचंद्र आणि जवाहरलाल, साने गुरुजी आणि सेनापती अशा लोकोत्तर पुरुषांच्या व्यक्तित्वाचे व कर्तृत्वाचे भरघोस कौतुक अत्र्यांप्रमाणे कोणीच केले नसेल. रागावले की बापाला बाप न म्हणण्याची वृत्ती असल्याने थोर पुरुषांना वाटेल तशी दूषणेही देत. भूषणे आणि दूषणे देताना हात कधी आखडत नसत, आवाज कधी चोरत नसत. द्यायचे ते भरभरून देत. ‘ज्ञानोबा ते विनोबा’ असा विनोबांचा गौरव करणारे अत्रे त्यांना ‘वानरोबा’ म्हणायलाही कचरले नाहीत. शिव्याशाप देत असतानाही त्या त्या व्यक्तीची किंमत मनोमन ओळखून असत ते. असे नसते तर ज्या जवाहरलाल नेहरूंना औरंगजेबाच्या पायरीवर त्यांनी बसवले, त्यांच्यावरच ‘सूर्यास्त’ हे सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेच नसते. केवळ महापुरुषांनाच हा न्याय लागू नव्हता. आपल्या परिघात आलेल्या प्रत्येकाचे मूल्यमापन करून ते आपल्या मनाच्या कप्प्यात ठेवून द्यायचे आणि मग प्रसंगविशेषी त्याला ओवी किंवा शिवी वाहायची हा अत्र्यांच्या स्वभावाचा एक विशेष होता. त्यामुळे ज्याची खूप स्तुती केली त्याचीच जहाल शब्दांत निंदा होते, किंवा ज्याला जूते पैजार केली होती, त्याला गौरवाचे हार मिळत आहेत… अशा घटना अत्र्यांच्या जीवनांत कितीतरी असतील. या विरोधाभासाच्या आड गुण आणि गुणी यांच्याबद्दलचे अत्र्यांचे प्रेम दडलेले असे.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4901/Startup-marnarach-mi-udyojak-honarach-mi
...............................................................................................................................................................
१३ ऑगस्ट १८९८ हा अत्र्यांचा जन्मदिवस. त्यांचे वडील अल्पायुषी ठरले. आई त्र्याहत्तराव्या वर्षी गेली. तेवढे आयुष्य आपल्यालाही मिळेल असे अत्रे म्हणत असत. पण नियतीने थोडी घाईगर्दीच केली आणि हा मोहरा उचलला. वयाची पहिली पंचवीस-तीस वर्षे उमेदवारीची; पण या काळात राष्ट्रात आणि विशेषत: महाराष्ट्रात नव्या तेजाचा संचार झालेला असल्यामुळे लोकमान्य टिळक, परांजपे, खाडीलकर, अच्युतराव कोल्हटकर यांच्यासारखे खंदे लोकनेते आणि पत्रकार, तरुणांच्या संवेदनाक्षम मनात अंगार पेटवत होते. तसेच गडकरी, बालकवी यांच्यासारखे प्रतिभाशाली कवी सौंदर्याचे बेहोषीचे कलात्मकतेचे संस्कार करत होते. त्यामुळे राजकारणातील प्रचंड जिवंत नाट्याने आणि साहित्यातील सुंदरतेच्या उत्कट आविष्काराने अत्र्यांच्या पिढीची मने भारून व भारावून गेली होती. अत्र्यांची विद्यार्थिदशा चारचौघांसारखीच होती. त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि कर्तबगारीला खरी पालवी फुटली ती त्यांच्या तिशीमध्ये. मुळात किडकिडीत असलेली त्यांची शरीरयष्टी पुढे अवाढव्य देहवत्ता झाली. आणि बालकवी गोविंदाग्रजांच्या काव्यकौतुकाच्या भाराखाली संकोचाने वावरणारी त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर अशी विक्रमी झाली की, तिने साहित्य व कलेची सर्व क्षितिजे काबीज केली. एक कवी म्हणून शारदेच्या अंगणात चोरून वावरणारे केशवकुमार विडंबनाचा परशू घेऊन भल्या रुजलेल्या वृक्षस्कंधावर प्रहार करू लागले. महाराष्ट्र-शारदेच्या अंगणात झेंडूच्या फुलांचा एक अभिनव ताटवा आजही आपल्या रंगश्रीमंतीने उठून दिसतो आहे. मराठीतला पहिला आणि शेवटचा थोर विडंबक कवी म्हणून केशवकुमारांच्या नावानेच करंगळी मुडपून ठेवायला हवी. गीतगंगेतल्या भाबड्या कवित्वापेक्षा झेंडूच्या फुलातली विनोद-विडंबनाची कविता अत्र्यांना खूप लोकप्रिय करू शकली. ज्या दिवशी पुण्याच्या किलोर्स्कर थिएटरात काव्यगायनाची मैफल केशवकुमारांनी गाजवली, त्या दिवशी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा नव्याने जन्म झाला! अत्र्यांना लोकांनी डोक्यावर घेतले आणि अत्र्यांनीही लोकांना शिरोधार्य मानले. गर्दीचे अत्र्यांवर प्रेम बसले आणि अत्र्यांचे गर्दीवर. हशा आणि टाळ्या यांची नशा सर्वांत मादक खरी. लवकरच पेशाने शिक्षक असलेल्या अत्र्यांना आपल्या अंगच्या नाट्यलेखनाच्या शक्तीचा साक्षात्कार झाला. ‘साष्टांग नमस्कार’ने अत्र्यांची लोकप्रियता दशगुणत केली. मग एकामागून एक यशस्वी नाटकांनी त्यांची वाङमयीन महात्मता भली बलवत्तर केली. खदखदून हसवावे तर अत्र्यांनीच, गदगदून रडवावे तर अत्र्यांनीच, असा कायदा झाला. पुण्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीची गादी प्रल्हाद केशव यांनी विक्रमार्जित हक्काने काबीज केली.
थांबणे माहीतच नसल्यामुळे पुण्याच्या राजकीय रिंगणांत अत्रे सिंहासारखे उतरले. त्यांचे वक्तृत्व तडाखेबंद आणि तुफानी होते. सभा जितकी मोठी तितके वक्तृत्व अधिक प्रभावी. प्रतिपक्षाची चामडी लोंबवत आणि स्वपक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर मिरवत अत्र्यांनी राजकारणातल्या चारी धाम यात्रा सुखेनैव पार पाडल्या. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांचा विजयी वारू दिमाखाने थरकत मुरकत फिरला. मुंबईच्या मायाबाजारात लाखो रुपयांची उलाढाल अत्रे करू लागले. मार खाल्ला तोही जबरदस्त. मूळ स्वभाव मात्र कधी गेलाच नाही. पराभव झाला तर हिंस्त्र श्वापदासारखे अत्रे दबा धरून बसत आणि संधी सापडताच नव्या चेवाने हल्ला करत. दुर्दैवाचे दशावतार त्यांनी चिवट मनाने पाहिले. स्टुडिओ स्थापन केला आणि फुंकून टाकला. नाटक कंपनी उभारली आणि मोडीत काढली. छापखाना घातला आणि त्याला टाळे लागलेलेही पाहिले. वैयक्तिक आणि संस्थात्मक जीवनातले भयानक चढउतार सोसले. जिद्द आणि साहस यांच्या जोरावर त्यांनी स्वत:ला तारले.
आयुष्याच्या शेवटच्या पर्वात संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्व शक्ती पणाला लावून अत्रे लढले. मंगल कलश आपण आणल्याचे श्रेय घेणारे खुशाल घेवोत. आचार्य अत्रे नसते तर महाराष्ट्राच्या या अपूर्व संग्रामांत हजारो अनामिक स्त्री-पुरुष सामीलच झाले नसते. संयुक्त महाराष्ट्र समितीची रणनौबत अत्रे. या महाभारतातला भीमसेन अत्रे. या काळात अत्र्यांना विश्रांती हा शब्द माहीत नव्हता. एखाद्या झपाटलेल्या माणसासारखे अत्रे रात्रंदिवस एकाग्र, एकाकार, एकचित्त, एकघोष झालेले होते. त्यांचा देह शिणला तरी सत्त्व हटले नाही. घसा - अक्षरक्ष: नरडे - चालले तोवर ते बोलत राहिले. त्यांचे दौरे, त्यांची व्याख्याने… सगळेच अतिप्रमाण, अदभुत होते. अत्र्यांच्या सार्वजनिक कार्यांतला हा सर्वोच्च कळस आहे यात काय संशय! दैनिक मराठा हे धाडस अत्र्यांनी केले, यशस्वी केले, तेही याच पर्वातले. प्रस्थापित सत्तेविरुद्ध, ढोंगधत्तुऱ्याविरुद्ध मुलुखमैदानी आवाज काढणारा पत्रकार, ही अत्र्यांची कीर्ती आज भारतभर आहे.
अत्र्यांनी काव्य, विडंबन, लघुकथा, कादंबरी, नाटक, हास्यकथा, वृत्तपत्रीय लेखन, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा… या साहित्याच्या सर्व दालनांत लीलया संचार केला आहे. त्यांच्या आयुष्यात शेकडो उलथापालथी झाल्या, आयुष्याची दिशा अनेकवार बदलली. पण अत्र्यांचे साहित्यावरचे प्रेम ढळले नाही. संपन्न आणि विपन्न अवस्थांतही अत्रे लिहीत राहिले. साहित्यावरची त्यांची निष्ठा अभंग होती. उनाडक्या करतानाही त्यांची साहित्यप्रीती अविचल राहिली. जगातल्या उत्तमोत्तम ग्रंथांवर त्यांचा जीव जडलेला होता. पण मराठी साहित्यातल्या अमोल रत्नभांडारावरून त्यांनी आपला जीव ओवाळून टाकला होता. ज्ञानेश्वर-तुकारामांशी त्यांचे जीवीचे मैत्र होते. मुक्ताईपासून बहिणाईपर्यंत अनपढ पण जातिवंत कवयित्रींनी आपल्या हृदयीची वेदना कवितेत सहज प्रकट केली आहे. अत्रे त्यांचे बंधू झाले. चिपळूणकर-टिळक-अच्युतरावजी-गडकरी-बालकवि… या सर्वांचे साहित्य अत्र्यांना अत्यंत प्रिय होते. बापूसाहेब माटे यांच्याशी प्रसंगपरत्वे भांडण झाले तरी बापूसाहेबांच्या साहित्याचे सामर्थ्य ओळखले अत्र्यांनीच. विनोबांच्या साहित्यावर अत्रे फारच लुब्ध होते. त्यांच्या उत्कृष्ट विचारांचा आणि शैलीचा परिचय त्यांच्या निकटवर्तीयांपेक्षाही अत्र्यांनीच अधिक चांगला करून दिला. मराठी भाषेवर तर अत्र्यांचे केवढे प्रेम! बाळबोध पण बलवान, प्रभावी आणि प्रसन्न मराठी गद्याचे सर्वोत्कृष्ट नमुने हवे असतील तर आपल्याला अत्र्यांच्या साहित्यात ते वाटेल तेवढे मिळतील. किंबहुना अत्र्यांच्या शैलीतला सर्वांत लक्षणीय भाग हाच आहे. क्लिष्ट लिहिणे या लेखणीला अशक्यच होते! जडजंबालाचा तिने सदैव तिरस्कार केला. अत्र्यांची मराठी, तुकारामाची मराठी. तिची धिटाई उदंड. तिचा उमाळा अमाप. तिची चाल सरळ. तिचे रूप साधे. ती कोड्यात बोलत नाही. तिला अंगापेक्षा मोठा बोंगा आवडत नाही. तिचे नग नेमके आणि मोजके. सरळसरळ लेखकाच्या मनाचा तळ दाखवणारी आणि सरळसरळ वाचकाच्या मनाच्या गाभ्याला भिडणारी अशी प्रसन्नसुंदर भाषा लिहिणारा एकमेवाद्वितीय मराठी लेखक म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. प्रस्तावनेसाठी आणि पसायदानासाठी शब्दांचे बुडबुडे उधळणे अत्र्यांच्या लेखणीला माहीत नाही. शब्दांच्या साबणफेसात अर्धेकच्चे विचार झाकण्याची कसरत अत्र्यांनी कधीच केली नाही. अत्र्यांची मते भले न पटोत, पण ‘अत्र्यांचे म्हणणे काय आहे तेच नीट समजले नाही’ ही स्थिती अशक्य! जे म्हणावयाचे असेल ते सुबोध पण सुंदर भाषेत, खणखणीत स्वरात म्हणणे हा या भाषेचा उपजत गुण आहे. अत्र्यांचे व्यवहार, अत्र्यांचे राजकारण, अत्र्यांचे सामाजिक-सांस्कृतिक विचार, अत्र्यांचे विभूतिमत्त्व वा विभूतीपूजन हे सर्व साफ नामंजूर असणाऱ्या माणसांना, इतकेच काय, अत्र्यांच्या शत्रूंनाही खुल्या दिलाने एक गोष्ट कबूल करावी लागेल की, या माणसाने मराठीवर फार फार प्रेम केले, मराठीची थोर सेवा केली आणि मराठी भाषा कशी उघड आहे, याचा कित्ता पुढीलांच्या हाती दिला.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4861/Kon-hote-sindhu-loka
.............................................................................................................................................
आचार्य अत्रे यांच्या जीवनाचा समग्र विचार करताना त्यांच्या महान गुणसंपदेबरोबर त्यांच्या दोषांचीही सहज आठवण होते. येथे महाप्रमाण हेच मुख्य सूत्र असल्यामुळे अत्र्यांचे दोषही महानच होते. अत्रे मुळात कवि होते. त्यांची वृत्ती काव्यात्म होती. ते सहृदय होते, दुसऱ्यांच्या दु:खाने ते द्रवत आणि अन्याय झाला तर खवळत. पण सार्वजनिक जीवनात दर वेळी ते शिष्टसंमत मार्गांनीच लढले असे म्हणता येणार नाही. एकदा एका मित्राजवळ ते म्हणाले, ‘I use good means; but they fail. Then I use the bad ones, they invariably succeed!’ आजच्या समाजाची ही शोकांतिका आहे. आणि अत्र्यांनी स्वानुभवाच्या आवरणाखाली ती व्यक्त केली असली तर ते योग्य ठरेल. पण अशीही शंका येते की, कालांतराने माणूस रामबाण ठरणाऱ्या अशा Bad means कडेच वळतो की काय! आचार्यांच्या महान दोषांमध्ये फाजील आत्मगौरव हा प्रमुख होता. आपण, आपली धनसंपत्ती, आपले वक्तृत्व, आपले साहित्य, आपले यश, आपली संकटे… सर्वच बाबतींत ते इतक्या नि:संदिग्धपणे आत्मस्तुती करत की, आचार्यांसारख्या बुद्धिमान माणसाला याच एका बाबतीत अंधत्व कसे याचा सहृदयाला अचंबा वाटावा. अर्थात लोकांनी हेही सर्व गोड करून घेतले. किंबहुना अपरंपार लोकप्रियतेमुळेच स्वत:चा असा बिनदिक्कत गौरव करायला अत्रे धजावत. लोकप्रियता आणि आत्मगौरवाची कॉकटेल माणसाला चढत गेली की, ती शेवटी त्याच्या संवेदना बोथट करून टाकते. आपला मित्र कोण आणि खुशमस्कऱ्या कोण हे माणसाला कळेनासे होते. एवढासा विरोधही मानवत नाही. तात्त्विक मतभेद म्हणजे आगळीक वाटू लागते. शेवटी तोंडपुजांच्या घोळक्यांत बसून आपली आरती ऐकणे गोड वाटू लागते. त्यांना एक-दोन अपवाद वगळल्यास मित्र असे नव्हतेच. होते ते अंध भक्त; किंवा होते ते स्तुतिपाठक; किंवा लाचार; किंवा स्वार्थ साधण्यासाठी जवळ आलेले. आचार्य अत्रे हे अशा सहवासाला कधीमधी कंटाळत. निर्बुद्ध, संवेदनाशून्य, अरसिक अशा सुमार कोंडाळ्याचा त्यांना उबग येई. पण करतील काय? पुढे पुढे अफाट लोकप्रियतेसाठी करावयाच्या प्रचंड उद्योगांच्या आवर्तांत त्यांची काव्य-शास्त्र-विनोदाची भूकही मंदावत गेली.
आता त्याचे काय म्हणा! माणूस गेला की त्याचे दोषही जळाले म्हणावे. आता उरेल ते अत्र्यांचे उदंड साहित्य. आता अत्रे म्हणजे ‘साष्टांग नमस्कार’, ‘घराबाहेर’, ‘लग्नाची बेडी’, ‘उद्याचा संसार’ आणि ‘तो मी नव्हेच’. आता अत्रे म्हणजे धारावाही विनोद लिहिणाऱ्यांच्या परंपरेतला श्रेष्ठ मानकरी, हास्यकथांचा राजा. अत्रे म्हणजे मराठी भाषेचा आणि साहित्याचा असामान्य प्रेमिक. आठवणी राहतील आणि पुन्हा पुन्हा काढल्या जातील त्या एका धुंद जीवनाच्या. इतके ओघवान, इतके वेगवान, इतके विचित्र, इतके जबरदस्त, इतके रंगतदार आणि इतके कृतार्थ जीवन विरळा. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर, विसाव्या शतकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणांचा इतिहास, विशेषत: सांस्कृतिक इतिहास लिहिताना, प्रल्हाद केशव अत्रे या प्रचंड व्यक्तित्व असलेल्या असामान्य पुरुषाचा उल्लेख प्रत्येक पानावर करावा लागेल. राजकीय रंगमंचावरचे नाट्यही आता वर्षानुर्वे मिळमिळीत वाटेल. सामान्य जनता सत्ताधाऱ्यांना घाबरते, तर सत्ताधारी अत्र्यांना घाबरतात, हे दृश्य आपण पाहिले आहे. भित्यापाठी ब्रह्मराक्षस लागावा त्याप्रमाणे लप्पेछप्पे कारभार करणाऱ्या आणि म्हणून मनात टरकून असलेल्या झब्बूंना अत्रे सळो की पळो करून सोडत. मस्तवाल किंवा मठ्ठ मंत्र्याबिंत्र्यांची हबेलंडी उडवण्यात अत्रे तरबेज झालेले होते. ‘सामान्यांचा असामान्य कैवारी’ ही जनमानसातली अत्र्यांची प्रतिमा आहे. आपला निर्भय आणि समर्थ कैवारी गेला या भावनेने मराठी जनतेत दु:खाचा हलकल्लोळ उडावा हे स्वाभाविक आहे. आघात मोठाच आहे. एक फुलझाड कोमेजलेले नाही, एक वटवृक्ष उन्मळला आहे. एक खांब कलथलेला आहे, एक पिरॅमिड उदध्वस्त झालेला आहे. एक युगंधर निघून गेला आहे. काही वर्षे तरी मराठीचिये नगरी भग्न विजयनगरची कळा दिसत राहील.
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment