आज आचार्य अत्रे यांचा ५०वा स्मृतिदिन. त्यानिमित्त हा विशेष लेख. अत्रे यांचा काळ ज्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे, अशा व्यक्तींच्या लेखनात जी बहार येते, जो काळ येतो, ज्या उपमा आणि अलंकार येतात; जी विश्वसनीयता येते, ती अत्रे यांचा काळ न पाहिलेल्या व्यक्तींच्या लेखात येऊ शकत नाही. अत्रे ही केवळ त्यांची पुस्तके वाचून समजून घेण्याची व्यक्ती नव्हती, नाही. त्यामुळेच अत्रे गेले त्यानंतरचा हा लेख, ५० वर्षांपूर्वीचा.
‘नवयुग’ साप्ताहिकाने अत्र्यांच्या निधनानंतर म्हणजे ऑक्टोबर १९६९ साली ‘आचार्य अत्रे स्मृति विशेषांक’ प्रकाशित केला होता. प्रस्तुत लेख त्या अंकातून घेतला आहे.
............................................................................................................................................................
आचार्य प्रल्हाद केशव उर्फ बाबुराव अत्रे यांच्या मृत्युने साहित्य, नाट्य, राजकारण व पत्रव्यवसाय या क्षेत्रांतील एक भारी आसामी गेली यात काहीच शंका नाही. या प्रत्येक क्षेत्रात असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या अनेक व्यक्ती आपणांस सापडतील. साहित्य घेतली तरी आचार्य अत्रे यांच्याच जोडीने फडके, खांडेकर आदि नावे आपोआपच आठवतात. तीच गोष्ट नाट्यसृष्टीची, राजकारणाची व पत्रव्यवसायाची. या प्रत्येक क्षेत्रांत आचार्य अत्रे यांच्याबरोबरीने आणि काही गोष्टीत तर त्यांच्यापेक्षा कांकणभर जास्त कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या हयातीत होऊन गेल्या आणि पुढेही होतील. पण या चारही क्षेत्रांत एकदम मर्दुमकी गाजवण्याचे श्रेय केवळ आचार्य अत्रे यांनाच दिले पाहिजे. असे चौफेर कर्तृत्व गाजवण्याच्या कामी त्यांची तुलना कै. न. चिं. उर्फ तात्यासाहेब केळकर यांच्याशीच होऊ शकेल. अर्थात् तात्यासाहेब केळकरांचे स्थान आचार्यांपेक्षा नि:संशय मोठे होते आणि खुद्द आचार्यांनीच तात्यासाहेबांचे मोठेपण अनेक वेळा मान्य केले आहे.
पण केळकर-अत्रे यांत तरतमभाव ठरवण्यासाठी मी आचार्य अत्र्यांची तात्यासाहेब केळकरांशी तुलना केलेली नाही. साहित्य, नाट्य, राजकारण व पत्रव्यवसाय असे चौफेर व्यक्तिमत्त्व जसे तात्यासाहेबांचे होते, तसेच आचार्य अत्रे यांचे होते. त्यामुळे तात्यासाहेबांच्या ‘केसरी’च्या अग्रलेखात साहित्यातील लालित्य, नाट्यातील चमत्कृती व राजकारणातील आक्रमकता हे गुण प्रकर्षाने प्रकट होत असत व त्यांच्या लिखाणाला एक प्रकारचा खमंगपणा येई. तसेच आचार्य अत्रे यांच्या लेखनकामाठीविषयी सांगता येईल. अत्र्यांच्या साहित्यात राजकीय आक्रमकता आहे, त्यांच्या राजकारणात साहित्यातील लालित्य व नर्मविनोद सापडतो, त्यांच्या नाट्यात पत्रकाराचे हरहुन्नरीपण आढळते आणि वृत्तपत्रीय लिखाणात लालित्य, नाट्य व आक्रमकता यांचा सुरेख संगम झालेला दिसून येतो. ही चारही क्षेत्रे सुटीसुटी घेतली तर प्रत्येक क्षेत्रात काही व्यक्तींच्या मानाने अत्रे कदाचित थिटे पडतील. पण या चारही क्षेत्रांच्या असाधारण धर्मांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत असा काही सुंदर गोफ विणला गेला होता की, नाटककार, साहित्यिक, पत्रकार, राजकीय फड मारणारा वक्ता, या प्रत्येक अंगात या चारही गुणांचा खमंग वास येत असे. साजुक लोणी कढवल्यावर जो वास येतो ना तसा, आणि त्यामुळे त्यांच्या नाट्यकृतीला, साहित्याला, वृत्तपत्रीय लिखाणाला वा राजकीय वक्तृत्वाला वेगळी धार नि आगळी शान प्राप्त होत असे.
आपण विसाव्या शतकांतील पहिल्या पंचविशीच्या महाराष्ट्राचा इतिहास तपासला, तर त्या इतिहासात पुणे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी होते असे आढळेल. या पुण्यात लोकमान्यांच्या तेजोलयाभोवती कै. शि. म. उर्फे अण्णासाहेब परांजेप, न. चिं. तथा तात्यासाहेब केळकर, कृ. प्र. तथा काकासाहेब खाडीलकर हे चमकणारे व्यक्तिविशेष लक्षात घेतले तर आचार्य अत्र्यांच्या चतुरस्त्र व चतुरंग व्यक्तिमत्त्वाची जडणघडण एकाएकी वा अकस्मात झालेली नाही. हे सहज लक्षात येईल. या वर उल्लेखित व्यक्तींपैकी प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असे चतुरस्त्र व चतुरंगी होते. कै. शिवरामपंतांच्या लेखणीतील व वाणीतील लालित्य, जिव्हारी लागणारी वक्रोक्ती किंवा तात्यासाहेबांची शैलीदार निबंधमाला अथवा काकासाहेबांची सडेतोड लेखनशैली या गुणविशेषामागे साहित्य, नाट्य, पत्रकार, राजकारण असे चतुरंग व्यक्तिमत्त्व दडलेले होते. आणि याच काळात अत्र्यांची पुण्यात जडणघडण होत होती. तेव्हा असे म्हटले तर त्यांत बिलकूल अतिशयोक्ती होणारी नाही की, परांजपे-केळकर-खाडीलकर प्रभृतींनी जो संप्रदाय निर्माण केला, त्या संप्रदायाचे आचार्य अत्रे अखेरचे वारसदार होत.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4902/anartha
...............................................................................................................................................................
राजकारणात कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाचा आरंभ शिक्षकाच्या पेशापासून व्हावा असा एक अलिखित संकेत होऊन गेला आहे की काय कोण जाणे! पण विष्णुशास्त्री चिपळूणकर, ना. गोखले, लो. टिळक अशी काही राजकीय अग्रणींची नावे आठवली की, हा संकेत खरा असावा असा भास होतो, तेव्हा आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिगत कर्तृत्वाचा प्रारंभ शिक्षकाच्या पेशापासून झाला हेही महाराष्ट्रीय परंपरेला धरूनच झाले असे म्हणावे लागते. त्यांच्या शिक्षणविषयक कामगिरीची व्यक्तिश: मला ओळख नाही. त्यावेळी त्यांच्या सार्वजनिक जीवनाला नुकतीच कोठे सुरुवात होत होती. अत्र्यांच्या वैवाहिक जीवनावर त्यावेळी कोणी एका इसमाने कविता लिहिली असून, त्या इसमाविरुद्ध अत्र्यांनी बदनामीची फिर्याद गुदरली होती एवढीच त्यावेळी म्हणजे १९३५ साली त्यावेळच्या आम्हा तरुण मंडळींना अत्र्यांची ओळख होती. त्यानंतर अत्रे यांनी महाराष्ट्र शारदामंदिर ही साहित्यसंस्था निर्माण केली. आचार्य अत्रे, प्रा. श्री. क्षी. व गोपीनाथ तळवलकर हे त्यावेळचे त्या संस्थेतील साहित्यिक त्रिकूट. या साहित्यसंस्थेचा व माझा परिचय होण्याचे कारण असे घडले की, त्यावेळी लखनौला एक पुरोगामी लेखक परिषद भरवण्याचे घाटत होते. ही पुरोगामी लेखक परिषद अर्थातच मार्क्सिस्टांच्या पुढारीपणातून निर्माण झाली होती. त्यावेळी या परिषदेला जे प्रतिनिधी पाठवावयाचे, त्यांची निवड करताना आचार्य अत्रे यांनी ही कम्युनिस्टांच्या छायेखाली वाढणारी एक संघटना म्हणून या शारदामंदिराचे अध्यक्ष या नात्याने विरोध केला होता. ३५ वर्षांत आचार्य अत्रे व सार्वजनिक जीवन किती झपाट्याने पालटले याची या घटनेवरून कल्पना यावी.
पण पुण्याच्या सार्वजनिक जीवनात आचार्य अत्रे यांचा उदय झाला तो त्यांचा ‘ब्रह्मचारी’ चित्रपट कमालाची यशस्वी झाल्यानंतर. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या चित्रपटात काही प्रसिद्ध गांधीवादी व्यक्तींचे विडंबन असूनही अत्रे त्यावेळी काँग्रेसच्या गोटात होते. या कालखंडात आचार्य अत्रे यांच्या सार्वजनिक कर्तृत्वाला चौफेर बहर आला होता. ब्रह्मचारीच्या यशानंतर नवयुग चित्रपटसंस्था निर्माण झाली. त्याचवेळी अत्र्यांच्या संपादकत्वाखाली नवयुग साप्ताहिक सुरू झाले. पुणे नगरपालिकेवरही त्यांनी आपला मोर्चा वळवला. साहित्यात अत्रे-खांडेकर यांची मैत्री तळपू लागली, तर पन्नास हजारांच्या सभेत अत्रे-माटे वाद गरजू लागला. सारांश, पुण्याच्या सार्वजनिक जीवनात व सार्वजनिक व्यासपीठांवर आचार्य अत्रे अग्रभागी तळपू लागले. त्यावेळी पुण्यात ही काही साधी घटना नव्हती. पुण्याच्या सार्वजनिक व्यासपीठाचा न्या. रानडे, गोखले, लोकमान्य आदि मान्यवरांनी जो दबदबा निर्माण केला होता, तो शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, बापूसाहेब माटे आदि व्यक्तींनी कायम ठेवला होता. विनोदाच्या देणगीमुळे आचार्य अत्रे यांनी फड जिंकले असे म्हणावे तर केळकर-माटे प्रभृती वक्तेही तसे कसलेले होते. अशा या सुप्रतिष्ठित व्यासपीठाचा ताबा घेणे ही काही लहानसहान घटना मानता येणार नाही.
कदाचित आचार्य अत्रे यांचा झालेला बोलबाला ही एक नव्या युगाची नांदी मानावी लागेल. १९३५नंतर महाराष्ट्रात फेरनाफेरवाद समाप्त झाला होता. काँग्रेसने सनदशीर राजकारणाची ललकारी पुकारल्यानंतर पूर्वीचा सत्यशोधक समाज काँग्रेसमध्ये सामील झाला होता. केळकर-भोपटकरांचे युग तर मग मागे पडलेच, पण देवदास्तान्यापेक्षाही जेधे-गाडगीळ ही जोडी अधिक तेजाने तळपू लागली. समाजांतील बुद्धिजीवी वर्ग व बुद्धिवाद यांची पीछेहाट होत चालली. उलट, या वर्गाची ‘सदाशिवपेठी संस्कृती’ म्हणून हेटाळणी होऊ लागली. थोडक्यात पण स्पष्टच बोलायचे तर बहुजन समाजाच्या या राजकारणाची पातळी थोडी खाली आली होती. या परिस्थितीत बहुजनसमाजाला समजेल अशा सोप्या भाषेत आपले विचार रोखठोक मांडणारी आणि त्याचबरोबर लालित्य, विनोद, विद्वत्ता आदि गुणांनी बुद्धिमान वर्गालाही आकर्षित करणारी आचार्य अत्रे यासारखी व्यक्ती पुढे न येते तरच नवल मानावे लागले असते. शिवरामपंतांचे उपरोधिक वक्तृत्व, तात्यासाहेब केळकरांचे नर्मविनोद व मार्मिक युक्तिवाद, बापूसाहेब माटे यांचे अभ्यासपूर्ण प्रस्ताव यांचे जनमानसाला आवाहन होण्याचे दिवस संपले होते. आता सभासंमेलनाला, वसंत व्याखानमालेला किंवा राजकीय परिषदांना शेकड्यांनी मोजता येणारा शेलका समाज जमत नव्हता, हजारांनी किंवा लाखांनी तो समाज मोजावा लागत होता. आणि या समाजाला आवाहन करण्याचे सामर्थ्य ज्या व्यक्तिपाशी असेल अशीच व्यक्ती अग्रभागी तळपणार हे ठरलेले होते. म्हणून १९३५ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत काँग्रेस राजकारणात काकासाहेब गाडगीळ आणि सार्वजनिक व्यासपीठावर आचार्य अत्रे अग्रभागी आले.
पुण्यातील कर्तृत्वाच्या पुण्याईची शिदोरी बांधून आचार्य अत्रे यांनी या मुंबानगरीत प्रवेश केला खरा, पण १९४५ ते १९५५ ही दहा वर्षे त्यांना अति जिकिरीची व खडतर अशीच गेली. ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’ आदि चित्रपटांनी त्यांना ज्या रजतसृष्टीत विजेत्यांच्या उमेदीने पाऊल टाकण्यास प्रवृत्त केले, ती रजतसृष्टी त्यांना मुंबईत व्हावी तशी फलद्रूप झाली नाही. ‘जयहिंद’ हे सायंदैनिक, ‘नवयुग’ हे साप्ताहिक व ‘समीक्षक’ हे मासिक असा पत्रसृष्टीत तिहेरी पसारा मांडून या व्यवसायातही त्यांनी विजिगीषु वृत्तीने पर्दापण केले. पण ‘जयहिंद’ सायंदैनिक व ‘समीक्षक’ हे मासिक लवकरच बंद करण्याचा प्रसंग येऊन एकट्या ‘नवयुग’ची ललकारी तेवढी कायम राहिली. पण तीदेखील एवढी जोरकस नव्हती. नाट्यसृष्टीला तर त्यांनी तात्पुरता विराम दिल्यासारखेच केले होते. राजकारणात स्वातंत्र्यप्राप्तीबरोबरच देशाची फाळणी झाली. आचार्यांच्या पिंडाला ही फाळणी मानवणारी नव्हती. त्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकून समाजवादी पक्षाशी त्यांनी राजकीय सोयरीक करून पाहिली. १९५२च्या निवडणुकीत जोरदार भागही घेतला. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यांची झुंजार वृत्ती व लढाऊ बाणा प्र. स. पक्षाच्या सौम्य भूमिकेशी जुळणारा पण नव्हता.
या दहा वर्षांत आर्थिक, राजकीय व वैयक्तिक जीवनामध्ये आचार्य अत्रे यांनी इतके वेळा चढउतार पाहिले की, सामान्य मनुष्य त्यांच्या जागी असता तर प्रतिकूल परिस्थितीच्या तडाख्याने तो खचूनच गेला असता, पण जणू आपल्यावर काही आपत्ती आलीच नाही आणि येणे शक्य नाही इतक्या बेफिकिरीने व तितक्याच दुर्दम्य आशावादाने ते जीवनाकडे पाहत असत. या प्रतिकूल परिस्थितीत भेटण्याचे अनेक प्रसंग मला मिळाले. पण प्रत्येक प्रसंगी तीच हसरी मुद्रा, तोच विनोदी स्वभाव, ‘काय नाना’ म्हणून तीच तारस्वरात हाक मारण्याची लकब! त्यांचे परममित्र नाना कुळकर्णी (प्रो. कृ. पां. कुळकर्णी) यांना बाबुरावांच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. अनेक वेळा त्यांनी बाबुरावांच्या गुणांची माझ्यापाशी डोंगराएवढी स्तुती केली होती आणि त्यांच्या वागण्याविषयी मित्रत्वाच्या नात्याने तक्रारी केल्या होत्या. पण अखेर नाना म्हणायचे, “हा बाबुराव म्हणजे एक कोडे आहे. याच्यावर जे प्रसंग आले ते माझ्यावर आले असते तर एकतर मला वेड लागले असते किंवा मी मरण पत्करले असते. पण याही परिस्थितीत हा गृहस्थ तसाच धिम्मा, खेळाडू, खिळाडू, विनोदी, चार घाव देणारा व घेणारा, हे दृश्य पाहिले की मोठा अचंबा वाटतो बुवा!” प्रतिकूल परिस्थितीत जीवनाचा रसास्वाद घेण्याची हिंमत व कसब आचार्य अत्रे यांनी किती आत्मसात केले होते, याची ही एका परममित्राने दिलेली साक्ष आहे.
पुणे ते मुंबई हा रेल्वेचा प्रवास सरळ व सुरळीत असला तरी राजकीय प्रवास तितका धोपटमार्गी नाही. एके काळी किंवा अगदी चले जावची चळवळ होईपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुणे हाच केंद्रबिंदू होता आणि केवळ राजकारणाचाच नव्हे तर सामाजिक, नाट्य, गायन आदि सांस्कृतिक जीवनाचाही त्यावेळी मुंबई ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या मुंबई इलाख्याची राजधानी असली तरी शासन व व्यापारी केंद्र यापलीकडे या शहराला अव्वल दर्जाचे राजकीय महत्त्व नव्हते. गांधीजींच्या नेतृत्वाखाली ते महत्त्व येऊ लागले, पण मुंबईला राजकीय महत्त्व येऊ लागले असले तरी या शहरांतील मराठा समाजाला व त्या समाजाच्या नेत्यांना दुय्यमच स्थान होते हे सत्य नाकारण्यात हशील नाही. स. का. पाटील हे या शहराचा पुढारी महाराष्ट्रीय असले तरी या शहरातील महाराष्ट्रीय समाजाला राजकीयदृष्ट्या पुढे आणण्याचे कार्य त्यांच्या हातून झाले नाही. या विशिष्ट परिस्थितीत आचार्य अत्रे यासारखा जो कोणी पुण्याचा सार्वजनिक फड मारल्यानंतर या शहरातही फड मारू म्हणेल, त्या व्यक्तीला या शहरातील राजकीय वातावरण अनुकूल मिळणे शक्य नव्हते. पुणे-मुंबई या शहरातील राजकीय पुढारीपणाचा हा वाद अत्रे आले त्यावेळचाच नाही. फेरोजशहा मेहतांच्या काळापासूनचा आहे. अशा प्रतिकूल वातावरमात, महाराष्ट्रीय समाजाचे या शहरातील गौण स्थान लक्षात घेतल्यास आचार्य अत्रे यांना दहा वर्षं या शहरात प्रतिकूल परिस्थितीत काढावी लागली याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तसाच विचार केला तर दहा वर्षांचा उमेदवारीचा काळ हा त्या मानाने अल्पकाळच म्हटला पाहिजे. या कालखंडात या शहरातील विशिष्ट वातावरण पचवण्यास, राजकीय पक्ष, पुढारी, व्यक्ती व वल्ली यांची ओळख करून घेण्यास आचार्य अत्रे यांना जी संधी मिळाली, तीच त्यांना पुढील काळात उपयोगी पडली.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man
...............................................................................................................................................................
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा काल हा आचार्य अत्रे यांच्या जीवनातील तेजस्वी व भाग्यशाली काळ होय. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने या शहराचा राजकीय नूर व सूर पार बदलून टाकला. एकेकाळचे राजकारणातील अग्रणी मागे रेटले गेले आणि नवे पुढारी पुढे आले. आणि मुख्य म्हणजे या शहरातील महाराष्ट्रीय समाजाची अस्मिता खडबडून जागी झाली आणि बाकीच्या समाजांना, या घटकराज्याच्या व देशाच्या नेहरूंसारख्या राज्यकर्त्यांना त्या अस्मितेची दखल घ्यावी लागली. महाराष्ट्रीय समाजाची ही अस्मिता जागे करण्याचे कार्य म्हणजे आचार्यांच्या पुढे चालून आलेली सुवर्णसंधीच होय. या संधीचा योग्य फायदा घेण्यास ज्या गुणसमुदायाची गरज असते, तो सारा गुणसमुदाय आचार्य अत्रे या व्यक्तीपाशी होता. घणाघाती वाणी, ओघवती लेखणी, महाराष्ट्राविषयी अनन्य निष्ठा, त्या महाराष्ट्रावर अन्याय झालेला पाहून येणारा सात्त्विक संताप, त्या संतापातून लेखणीद्वारा प्रकट झालेला आवेश, प्रतिपक्षाचे वाभाडे काढणारा विनोद इत्यादी सारे गुण आचार्य अत्र्यांच्या वाणी-लेखणीतून इतक्या प्रकर्षाने प्रतीत झाले की, या मुंबापुरीतीलच काय, पण महाराष्ट्रातील जनताही ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार?’ अशी दिङ्मूढ झाली होती. आचार्य अत्रे यांचे त्यावेळच्या नवयुगातील लिखाण म्हणजे त्यांचे अत्यंत तेजस्वी वाङमयीन दर्शन होय.
त्यांच्या आयुष्यातील हा काळ जसा तेजस्वी होता, तसाच तो भाग्यशाली होता. केवल महाराष्ट्र विधानसभेत ते दोनदा निवडून आले म्हणून हा काळ भाग्यशाली होता असे नव्हे. या कालखंडात त्यांनी ‘मराठा’ दैनिक सुरू करून यशस्वी केले. अत्रे थिएटर ही नाट्यसंस्था स्थापन केली. स्वत:चा छापखाना, त्यासाठी स्वत:च्या मालकीची इमारत, एक नाट्यसंस्था, एक कलासंस्था असा त्यांनी आपल्या कार्याचा चोहो बाजूंनी व्याप वाढवला होता. अत्रे ही आता एक व्यक्ती राहिली नव्हती. ती एक संस्था बनली होती. ते लाखांचे पोशिंदे झाले होते. राज्यकर्त्यांमध्ये त्यांचा मित्रपरिवार पसरला होता. अर्थात त्यापैकी पुष्कळच भीतीने मित्र झाले होते, काही तुरळक प्रीतीने, विद्वान, संशोधक, कवि, तत्त्ववेत्ते यांचा सत्कार करावा, प्रतिपक्षावर घणाघाती टीका करावी, सत्ताधारी पक्षावर सतत आसूड उगारावा आणि लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन त्यातच गुंग व्हावे, असा आचार्यांचा मोठा मजेशीर, रसीला, परिपूर्ण जीवनक्रम या काळात चालू होता.
म्हणून मी म्हणतो की आचार्य अत्र्यांनी महाराष्ट्राला जसे पुष्कळ दिले, तसेच या महाराष्ट्रानेही त्यांना काही कमी दिले नाही. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे कार्य लाखमोलाचे होते. त्यातून त्यांनी बाकी जे राजकारण निर्माण केले ते केले नसते तर त्यांच्या राजकीय कार्याला अधिकच धार चढली असती. त्या अवांतर राजकारणामुळे त्यांनी निष्कारण शत्रू करून ठेवले आणि जे मित्र जोडले ते अखेर कुचकामाचे ठरले. १९६८मध्ये त्यांची मी ‘शिवशक्ती’त भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांचा काही बाबतीत भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर त्यांनी सार्वजनिक जीवनात जे कमावले त्याविषयी त्यांच्या मनात तृप्तीही आढळून आली. एकंदरीने विचार करता, आचार्य अत्र्यांना आंदोलनाचे राजकारण जमले तरी पक्षीय राजकारण जमले नाही. अगदी अखेरच्या काळात त्यांनी शिवसेनेच्या मूलभूत कार्याला विरोध करून निष्कारण अप्रियता ओढवून घेतली. वास्तविक शिवसेनेच्या मूलभूत मागणीला एरवी अत्र्यांनी जोरदार पाठिंबा दिला असता. आणि त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठीच मी त्यांची भेट घेतली होती. पण अत्र्यांचे ग्रह-पूर्वग्रह, आवड-निवड, शत्रू-मित्र यांची समीकरणे इतक्या आत्यंतिक टोकाला गेलेली असत की, त्याबाबत नि:पक्षपाती भूमिकेवरून तत्त्वविचार करण्याला ते इतरांना सवड देत नसत. शिवसेना म्हटली की अमूक व्यक्ती आणि अमूक व्यक्ती म्हणजे दुनियेतला पाजी इसम असे एकदा मनाने घेतल्यानंतर सारे बोलणेच खुंटते. तथापि एवढी एक बाब वगळली तर आचार्य अत्रे यांचा पिंड अस्सल मराठी होता. या महाराष्ट्रासाठी त्यांनी आपली शक्तिबुद्धी वेचली आणि आपल्या जीवनातले जे जे काही भव्य होते, उत्कट होते, दिव्य होते त्याची मुक्तहस्ताने त्यांनी आपल्या प्रिय महाराष्ट्रावर उधळण केली.
त्यांची मते न पटलेला, त्यांच्या लेखणीचे घाव सहन केलेला असा मी इसम आहे. पण त्यांचा माझ्यावर लोभ होता आणि मला त्यांच्याविषयी आदर होता एवढे मी निश्चयपूर्वक सांगू शकतो. याचे कारणच हे की आचार्य अत्रे हा इसम खुल्या मनाचा व उदार अंत:करणाचा होता. त्यांच्या स्वभावात खुनशीपणा नव्हता. डूख धरून बसणे असे वृत्तीला म्हणतात, तशी त्यांची वृत्ती नव्हती, किंवा त्यांच्या स्वभावाला मुत्सद्देगिरीही जमत नसे. दोन द्यावे, दोन घ्यावे असा अगदी खुला कारभार. उधार-उसनवार काही नाही. अत्रे-फडके वाद, अत्रे-माटे वाद केवढे गाजले! त्यावेळी ते वाद वाचणाराला वाटे की, ही माणसे एकमेकांची तोंड पाहत नसतील. पण काही दिवसांनी बापूसाहेब माट्यांच्या वडीलकीचा मान राखून आचार्य अत्रे त्यांच्यासमोर नतमस्तक झाले आहेत असे दृश्य दिसले की लोकांना मोठे नवल वाटे. काही वर्षांनी अत्र्यांनी फडक्यांना भेटून दिलजमाई केल्याचे वृत्त ऐकल्यानंतर अनेकांना तसेच नवल वाटल्याशिवाय राहिले नसेल. पण हा विरोधाभास एक अत्रेच निर्माण करू शकत. कारण त्यांच्या जीवनात क्रोध, आवेश, संताप असला तरी वैर नव्हते. अहंकेंद्रित असले तरी गर्व नव्हता. विनोद असला तरी क्षुद्र वृत्ती नव्हती. राजकारण असले तरी मुत्सद्देगिरी नव्हती. धो धो पाऊस पडून स्वच्छ सह्याद्रीच्या कातळाप्रमाणे या गृहस्थाचे मन राकट असले तरी मोठे स्वच्छ नि खुले होते आणि म्हणूनच त्यांच्या जीवनात असे नाना प्रकारचे मजेशीर विरोधाभास असत. असे विरोधाभास असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यामुळे अधिकच खुलून दिसत असे. असा हा महाराष्ट्रसारस्वताचा कंठमणि, महाराष्ट्रधर्माचा व राष्ट्रधर्माचा उपासक, कवि, नाटककार, पत्रकार, वक्ता, राजकारणी पुरुष आपल्यातून निघून गेला ही महाराष्ट्राची नि:संशय फार मोठी हानी होय.
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment