नाटक ‘जिवंत कला’ असल्यामुळे त्याचे समाजात स्थान राहणार!
पडघम - साहित्यिक
गिरीश कार्नाड
  • गिरीश कार्नाड
  • Mon , 10 June 2019
  • पडघम साहित्यिक गिरीश कार्नाड Girish Karnad

हा गिरीश कार्नाड यांचा लेख त्यांच्या ‘आगोम्मे ईगोम्मे’ या मूळ कन्नडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातील एका लेखाचा अनुवाद आहे. नाट्यकलेच्या उगमाविषयी माहिती देणाऱ्या या लेखाचा मराठी अनुवाद प्रशांत कुलकर्णी यांनी केला आहे. (युनेस्कोच्या तर्फे २७ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय नाटक दिन’ म्हणून साजरा केला जातो. २००२ मध्ये साजऱ्या झालेल्या या दिनानिमित्त गिरीश कार्नाड यांना आमंत्रित केले गेले होते. त्या निमित्त त्यांनी केलेलं हे भाषण आहे.)

.............................................................................................................................................

भरताच्या नाट्यशास्त्राच्या पहिल्या अध्यायात नाट्यकलेच्या जन्मासंबंधी अशी कथा येते :

पूर्वीच्या काळी - कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाल्यानंतर - समाज चंगळवादी होऊ लागला. ईर्ष्या, क्रोध कामवासना वाढीस लागली. आणि एकूणच अराजक पसरू लागले. त्यामुळे सुखातदेखील लोक दु:खी राहू लागले.

हे लक्षात आल्यावर देव-देवता इंद्राला हाताशी धरून ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांना परिस्थिती समजावून अशी विनंती केली की, ह्या समस्येवर उतारा म्हणून समाजाला एक मनोरंजनाचे साधन द्यावे. हे साधन दृश्य आणि श्राव्य स्वरूपात असावे, तसेच समाजातील सर्व थरातील लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल, असा पाचवा वेद निर्माण करावा. त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाने चारही वेदांमधून काही विशिष्ट भाग संकलित करून त्यांना हवा होता तसा पाचवा वेद निर्माण केला.

ब्रह्मदेवाने इंद्राला देवतांना हा नाट्यवेद सोपव असे सांगितल्यावर, त्याने देवतांची योग्यता नसल्याचे सांगून फक्त ऋषि-मुनी (मनुष्य) हे घेऊन त्याचा उपयोग करू शकतील, अशी खोटी घातली. त्याप्रमाणे हा नाट्यवेद पृथ्वीवर भरत मुनीकडे सोपवला गेला. भरत मुनीने त्याच्या शंभर पुत्रांना हा वेद शिकवला, त्याचे तंत्र शिकवले. नाट्यशास्त्रातील लास्य प्रकटीत करण्यास स्त्री हवी असल्याने ब्रह्मदेवाने अप्सरा निर्माण करून दिल्या. नारद हे पहिलेवहिले संगीतकार म्हणून भरत मुनीपाशी आले. विविध देवतांनीसुद्धा आपापले आशीर्वाद त्यांना दिले. अशा प्रकारे त्या सगळ्यांनी मिळून इंद्राच्या विजयोत्सवाच्या निमित्ताने एका नाटक बसवले. त्याचा विषय इंद्राच्या नेतृत्वाखाली असुरांवर सुरांनी मिळवलेला विजय असा होता. हे नाटक गडबड-गोंधळ-अंगांग-विच्छेद यांनी पुरेपूर भरलेले होते. हे सर्व पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाले. त्यांनी देवता-गण, भरत मुनी आणि त्यांच्या चमूला आशीर्वाद दिले.

मात्र प्रेक्षकांत बसलेले दैत्य-गण देवतांनी असुरावर मात केल्याचे दृश्य पाहून क्षुब्ध झाले. त्यांनी हे असले नाटक थांबवले पाहिजे असा निश्चय केला. नाटकाच्या संवादफेकीमध्ये, एकूणच प्रयोगात त्यांनी आपल्या मायावी शक्तीने अडथळे आणून ते थांबवले. असुरांचे हे वर्तन पाहून इंद्र क्रोधीत झाला. त्याने असुरांवर त्याच्या ध्वजदंडाच्या साह्याने प्रहार करून त्यांना जर्जर केले आणि परत प्रयोग सुरू झाला. पण हे असे परत परत होऊ लागले. प्रयोगात विघ्न येत राहिले. हे सर्व पाहून ब्रह्मदेवाने विश्वाकर्म्याला सांगून एक नाट्यगृह बांधून घेतले. पण त्याचाही विशेष उपयोग झाला नाही.

शेवटी ब्रह्मदेवाने असुरांची भेट घेतली. त्यांना नाट्य-कर्माचे निजस्वरूप समजावून सांगितले : ‘तुम्ही कोपित होण्याची अथवा दु:खी होण्याची आवश्यकता नाही. नाटकात तुमच्यात आणि देवतांमध्ये भेदाभेद नाही. त्यात त्रिलोकात असलेल्या सर्व अवस्थांचे, भावभावनांचे चित्रण आहे, काही ठिकाणी धर्म, क्रीडा, अर्थ, शांती; तर काही ठिकाणी युद्ध, काम, संहार, असे सर्व काही नाटकाच्या सामग्रीचा भाग आहे. नाटकातून आदर्श गुणांचे-जसे इंद्रियनिग्रह, धैर्य, उत्साह, यांचे दर्शन होते.’

या ठिकाणी हा अध्याय संपतो. नाटकाचे पुढचे प्रयोग यशस्वी झाले की नाही, हे ‘नाट्यशास्त्र’ सांगत नाही.

नाट्यशास्त्राचे अभ्यासकांच्या मते, ह्या अध्यायात दैत्य-गणाचे वर्तन चुकले आहे असे गृहीत धरले आहे. त्यांना नाटकाचे स्वरूपच कळाले नाही. त्यामुळे त्यांनी नाटकात वारंवार विघ्न आणली, असा ते मुद्दा मांडतात. असाच अर्थ असेल तर नाटकाच्या प्रयोजानाचे सार ब्रह्मदेवाचे विचार सांगून जातात असे म्हणावे लागेल.

माझ्या मते ह्या अभ्यासकांना कथेचे आकलन नीटसे झाले आहे असे दिसत नाही.

मला आकलन झालेला काही अंश असा आहे की, दैत्य-गण, इंद्राप्रमाणे, दैहिक हिंसाचार करत नसून त्यांनी केवळ नटांचे संवाद, हालचाल, तसेच त्यांच्या स्मृतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. असे जर असेल तर माझ्या मते दैत्यांना अभिनय कलेचे सूक्ष्मतम ज्ञान झाले होते.

त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब अशी की, ‘नाट्यशास्त्र’ हा आदिग्रंथ आहे. नाट्यकलेच्या विविध अंगांचा परिचय व्हावा ह्या दृष्टीने ते रचले गेले. त्यात रंगवलेले नाटक, हे मानवाच्या इतिहासातील पहिले नाटक आणि त्याचा पहिला प्रयोग आहे. त्यात ब्रह्मदेव, इंद्र, इतर देवता-गण, भरतमुनी, त्यांचे नाट्य-कलाकार, अप्सरा, थोर संगीतकार-नारद, या सर्वांचा सहभाग होता. असे होते तर, त्या प्रयोगास ‘न भूतो न भविष्यति’ असे यश मिळावयास हवे होते. पण तसे न होता प्रयोग अर्ध्यावरच थांबला. आणि ही गोष्ट ‘नाट्यशास्त्र’ प्रामाणिकपणे मान्य करते.

असा ह्या गोष्टीचा मतितार्थ रंगभूमीचा अनुभव नसलेल्या, तसेच नाटकाशी फक्त पुस्तकरूपातच संपर्क असलेल्या अभ्यासकांना उमजलेला दिसत नाही. अथवा असा अर्थ समजलेला असूनही, तो मान्य करण्यास संकोच वाटत असावा. कारण संस्कृत काव्यमीमांसेच्या उत्तर-काळात लोकप्रिय असलेला अभिनवगुप्तसारखा पंडितही तो स्पष्टपणे सांगत नाही.

ब्रह्मदेवालासुद्धा ह्या कथेचे फक्त बाह्यरूप दर्शवत असलेला अर्थ मान्य झाला नसता.

ह्या कथेचा मला समजलेला अर्थ असा आहे :

एखाद्या नाट्य-प्रयोगासाठी कितीही श्रम घेतली, कितीही श्रद्धापूर्वक तयारी केली, तरीही तो प्रयोग यशस्वी होईलच असे सांगणे अशक्य आहे. प्रयोगाच्या प्रत्येक क्षणी तो अयशस्वी होण्याची शक्यता असते. हेच नाट्य-क्रियेचे मर्म आहे.

एखादा नाट्य-प्रयोग रंगभूमीवर कमीत कमी एक व्यक्ती (नट) असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीने दुसऱ्या कुठल्यातरी व्यक्तीचे पात्र रंगवायला हवे आहे. हे जे सर्व घडते आहे, ते पाहण्यास तिसरी व्यक्ती (प्रेक्षक) तेथे असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टीच अनिश्चिततेने भरलेल्या आहेत. त्यामुळे नाट्य-गृह असूनसुद्धा देवतांना नाटकात येणारे विघ्न टाळता आले नाही. विघ्न उत्पन्न होते ते दैत्यामध्ये, नट-प्रेक्षक संबंधांमध्ये. असे विघ्न येताच, सहोदरही दैत्य बनतो.

आज जगात आपल्याला आढळणाऱ्या वेगवेगळ्या नाट्य-क्रिया, आपल्या इतिहासात पुढे-मागे नव्हत्या. रेडिओ, फिल्म, टेलीव्हिजन, ध्वनिमुद्रण, व्हिडिओ, तसेच प्रत्येक दिवशी येणारे नवीन माध्यम, यामुळे आपल्या आजूबाजूला सगळीकडे नाट्यक्रिया आज दिसत आहे. ही सर्व माध्यमे, आज आपले मनोरंजन नक्कीच करत असतील, पण यातील कोठल्याही प्रकारातील प्रेक्षक नाट्य-क्रियेवर प्रभाव पाडू शकत नाही, त्यात बदल घडवू शकत नाही. प्रेक्षकांनी कितीही आवाज केला, कोलाहल केला, तरीसुद्धा त्या माध्यमातील नाट्य हे प्रेक्षकांना टाळून पुढे जात राहते. नाटकात तसे होत नाही. त्यात प्रेक्षकाचा सहभाग अत्यावश्यक असतो. नाट्य-उत्पतीसंबंधी ही कथा हेच सत्य सांगते.

नाटक सुरू असताना नाटककार, दिग्दर्शक, नट आणि प्रेक्षक या सर्वांत एक प्रकारची हुरहूर निर्माण होते. कारण त्यातील अस्थिरता-प्रत्येक क्षणाला बदलत जाणारी परिस्थिती ही त्याप्रेक्षा स्फोटक असू शकते.

या मुळेच, कितीही काळजी घेतली, तरी रंगभूमी आपली अनिश्चितता दाखवून देते. तसेच आपण कितीही नाटकाच्या भविष्याबद्दल बोललो तरी, ती एक जिवंत कला असल्यामुळे, तिचे समाजात स्थान हे राहणार आहे, हे मात्र निर्विवाद आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रशांत कुलकर्णी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. 

ppkya@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......