एक कुल्ला बाहेर काढून गाडी जशी चालवता येते, तसा अर्ध्या भुकेवर घराचा गाडा ओढता येतो!
ग्रंथनामा - झलक
महेंद्र कदम
  • ‘तणस’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 June 2019
  • ग्रंथनामा झलक तणस Tanas महेंद्र कदम Mahendra Kadam

प्रा. महेंद्र कदम यांची ‘तणस’ ही दुसरी कादंबरी नुकतीच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाली आहे. ही कादंबरी गाव-शहराच्या अभावाचा आणि बकालपणाचा कोलाज चित्रित करताना देव, धर्म, जात, लिंगभेद, प्रदेशासह मानवी जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करते. ‘तणस’ म्हणजे ‘धान्य पाखडून झाल्यावर उरलेला भुसा’. जो धान्याचे पोषण करतो, त्याचाच अंती कचरा होतो. माणसांच्या कहाण्या सांगणाऱ्या अशा या कादंबरीतल्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश... 

.............................................................................................................................................

वाहनतळ हा शहराचा मस्त नमुना आहे. शहरासारखाच हा वाहनतळ पहाटं-पहाटंच सुरू होतो. सिद्धेश्वर आणि मेल एक्सप्रेसनं शहराची झोपमोड करण्याच्या अगोदरच वाहनतळ गजबजतो. सगळ्या गाड्या कशा स्वच्छ, चकाचक, हार, दिवाबत्ती करून आलेल्या असतात. पहिला स्टार्टर मारताना ड्रायव्हर जसा स्टेअरिंगच्या पाया पडतो; तसं पहिली गाडी आली की, वाहनतळ त्या गाडीला नमस्कार करतो. साधारण अर्ध्या-पाऊण एकराचा हा तळ. स्टँडच्या जवळ. पूर्वी तिथं डुकरांची, जनावरांची, वेड्या बाभळींची गर्दी असायची. जसजशी वाहनं वाढत गेली, तसतसा वाहनतळ स्वच्छ होत गेला. आता त्याच्या अंगावर तेलाचं, पिचकाऱ्यांचं डाग पडत असलं तरी डबक्यांपेक्षा ते बरं. एकूण तो सध्या खूश आहे. छान अंमळ झोप झाल्यावर एखाद्या वाहनाच्या आवाजानं तो जागा होतो. पहिलं वाहन तळावर आलं की, रात्रीचा त्याचा कंटाळा कुठल्या कुठं पळून जातो. टायरच्या घर्षणानं त्याच्या पेशींपेशीत चैतन्य पसरत जातं. जिवंतपणा येतो. पहिल्या वाहनाच्या आगमनानं त्याचा दिवस सुरू होतो. पहिलं वाहन कोणाचं आलं हे त्याला कळून येतं. प्रत्येकाच्या ड्रायव्हिंगचा त्याला पक्का परिचय आहे. त्यामुळं एखादा ड्रायव्हर नव्यानं आला की, तो धास्तावतो. दचकतो. कान टवकारतो. सावध बनतो. पहाटेच्या वेळी जर असं कोणी आलं तर तो पुरता भांबावून जातो. ते वाहन निघून जाईपर्यंत त्याला चैन नसते. २६/११ च्या घटनेपासून त्याच्या प्रत्येक वाहनाची काळजी घेतोय. नव्या वाहनांवर बारीक लक्ष ठेवतो. इतकंच कशाला, परिचित वाहन अपरिचित ड्रायव्हर घेऊन आला तरी, त्याच्या लक्षात येतं. कधीकधी घरून वैतागून आलेला, झोप न झालेला ड्रायव्हर त्याच्या लक्षात येतो. तो खिन्न असला की, एखाद्या झाडाला त्याला टेकून बसायला लावतो. त्यानं पाय पसरल्यावर पायांवर साय पांघरतो. माती उकरणाऱ्या पायात बळ पुरवतो. पाठ टेकलेल्या बुंध्यामार्फत मुळ्यांकडून त्याला चैतन्य पुरवत राहतो.

एकेक करीत हळूहळू सगळी वाहनं येतात. वाहनकऱ्यांमधला एकजण दरवेळी तळाची पूजा करतो. या पूजेसाठी तळ आतूर असतो. आपल्याला कोणीतरी गृहीत धरतोय याचा त्याला आनंद असतो. वाहनकऱ्यांनी दरवेळी कुणा एकाला तोशीस पडू नये, म्हणून नंबर लावलेत. नंबरवाहनकरी दररोज एक उदबत्ती आणि आठ-दहा फुलांचा हार घालून पूजा करतो. सुगंधित वातावरणानं वाहनतळाचा दिवस सुरू होतो. सकाळच्या चैतन्यदायी वातावरणात वाहनांबरोबर तो रमून जातो. दुपारी दमला की, विश्रांती घेतो. रात्री बारानंतर मात्र त्याला खूप एकटं वाटतं. कुणीही चिटपाखरू नसतं सोबतीला. एकाकी पडतो तो. अचानक मग गाढव, कुत्रा किंवा डुकराची जोडी तळावर येऊन धिंगाणा घालू लागली की, त्याची झोप चाळवते. जागा होतो. त्याच्या अंगावरच त्यांची जुगण्याची क्रिडा सुरू होते. तसं ह्याच्या मातीच्या कणाकणात पाझर फुटू लागतात. त्याच्या आलिंगनासाठी सूर्य केव्हाचाच दूर गेलेला असतो. मग नुसतं उसासे टाकण्याशिवाय पर्याय नसतो. अर्धवट झोपेमुळं अंग ठणकू लागतं. झोपही येत नाही मग. अशा वेळी सकाळ होऊच नये असं वाटतं. तोवर रेल्वेचं अनाउन्स सुरू होतं. शहर जागं होतं. मग आवरता–आवरता त्याची धावपळ सुरू होते.

शहराबरोबर तो जागा होतो. पुढे येईल ते निमूटपणानं स्वीकारीत, आला दिवस पुढं ढकलीत राहतो. त्याला एक प्रकारचं समाधान आहे, किमान मध्यरात्री त्याला मोकळा श्वास घेता येतो. शहराला तेही नाही. हल्ली पाऊसपाण्याअभावी त्याचीही धूप होवू लागलीय. त्वचा जळतेय. सगळी हाडं दिसायला लागलीत. कुणी तरी येऊन झाडं लावावीत, असं वाटतंय. पण कोण लक्ष देत नाही. ज्यानं त्यानं आपली गती पकडलीय. गतीच्या आणि रेषेच्या बाहेर गेला की, अपघात निश्चित. म्हणून वाहनांबरोबर वाहनतळानंही आपली गती पकडून ठेवलीय. तो म्हातारा झाला की, कुणाच्याच कामाचा राहणार नाही, या दडपणातून गतिमान झालाय. पूर्वीसारखा आता भावूक वगैरे राहिला नाही. कोरडेपणा त्याच्या कणाकणात भरून राहिलाय. तरीही एखादा विमनस्क तरुण झाडाखाली बसला की, तो त्याच्यावर ढग होऊन बरसत राहतो. त्याच्या चेतनाशक्ती जाग्या करतो. तेही तितकंच. त्याच्या वयाच्या प्रौढपणाला साजेसं. जेवढ्यास तेवढं. तितकंच. जशास तसं. तरुण उठून गेला की, पुन्हा मख्ख. शहरासारखा. कसलीही प्रतिक्रिया नाही.

वाहनतळाला एक वरदान लाभलं आहे. रोज त्याच्याभोवती नवनवीन अनुभवांचा खजिना जन्म घेतो. दिवसभर पॅसेंजर, ड्रायव्हर लोक ज्या गप्पा मारतात, त्यातून त्याला शहर इतकं कळत आलंय की, त्याच्याइतकं कुणाला कळणार नाही, असा त्याला गर्व आहे. दर क्षणाला, दर तासाला शहराच्या घडामोडी तळावर पोहचतात. जोरजोरात ज्या चर्चा होतात, त्या त्याच्या कानावर पडतात. त्यामुळं भूतकाळात रमण्यासारखा विकार त्याला जडला नाही. सतत अपडेट होतो आणि दर क्षणी वर्तमानात राहतो. जगातलं, कानाकोपऱ्यातलं सगळे संदर्भ त्याला कळत जातात. एखादा माणूस कोणाशीच बोलत नसला, तरी स्वत:शी जे बोलतो, ते वाहनतळाला कळतं. बॅगा‌‌-पिशव्यांपासून गरीब-श्रीमंतीचे संदर्भ त्याला कळतात. प्रत्येक चालक-वाहन मालकाची रोज एक कहाणी जन्म घेते. त्या त्याला अपडेट रहायला मदत करतात. रोज इतकं कानावर पडतं की, आपोआपच मागचा कचरा डिलीट होवून जातो. नवनव्या कहाण्यांमुळं स्वत:कडं पहायला, दु:ख करीत बसायला त्याला वेळ मिळत नाही. अद्याप त्याला कसला रोग नाही. विकार नाही. वाहनचक्रांच्या गतीत तो पुरता गुरफटून गेलाय. या वरदानाचा त्याला त्रासही होतो. इतकं काही आदळत जातं त्याच्या मेंदूवर की, निवडायला वेळ मिळत नाही. मग मेंदू गरगरायला लागतो. बधीर होतो. वर्तमानाची जटिलता वेढून राहते. आनंद क्षणकाळही टिकत नाही. स्मरणरंजनाला वेळ मिळत नसला तरी कानावर आपटणाऱ्या कहाण्या त्याची चैन, सुख संपवून टाकतात. एक प्रकारची भिती, दडपण, दहशतीची छाया कायम सोबत आहे. त्यातच कधी-कधी नगरपालिकेच्या मोजण्या येतात. दगड रोवलं जातात. इमारती उभारण्याच्या गप्पा मारल्या जातात. पांढरं पट्टं ओढलं जातात. तशी त्याच्या धास्तीत भर पडत जाते. दमछाक होते. श्वास कोंडतो. अशा वेळी उठून येणारं एकाकीपण त्याला वेढून घेतं. आणि कित्येक रात्रींची झोप खाऊन टाकतं.  

हे मालक सकाळ-सकाळ नटवून-थटवून आम्हाला उभं करतात. या चढा आमच्यावर. आम्ही तयार आहोत. त्याचीच वाट पहातोय. आम्ही कोरं करकरीत असू, नाहीतर पाळी गेलेलं असू. सगळींचा रेट सारखाच. आमचा बाजार मांडून बसलेत, हे सारे मालक भडवे. दररोज रंगवतात. आधी स्वत: चढतात. मग इतरांना सांगतात. स्वत: फुकटात. इतरांना मात्र पैसे मागतात. सगळेच नीट नसतात. कधी लाथाबुक्क्यांनी बुकलून काढतात. कधी झिंज्या उपसतात. रोज हजारो प्रकार. पैसे मात्र भडवा घेणार. त्या बदल्यात आम्हाला काय? पोटापुरता इंधन चारा. कुटून-कुटून अंगाला आलेला दर्प जाणवू नये म्हणून उदबत्तीचा अर्क. दरवेळी ही उदबत्ती जांघेत खुपसली जाते. वेदना आम्हाला, वास तुम्हाला. राख आम्हाला, उजेड तुम्हाला. साऱ्या लाथा आम्हाला, पैसे तुम्हाला. तरीही आम्ही सोशिक आहोत. ते तुमच्यावर चढणारांची गर्दी होऊ नये म्हणून. घरचे, दारचे, बॅंकेचे, पोलिसांचे, नगरपालिकेचे, संघटनेचे, पाहुणे-रावळे कितीतरी आहेत, तुमच्यावर चढणारे. तुमचं हे दु:ख, आम्ही वेदना सहन करून, हलकं करतोय. दुसरं काय? तुम्ही आम्हाला गुलाम करून टाकलंय. वरून तुम्हीच म्हणता की, आम्ही वस्तूचे गुलाम झालो. चोरांच्या उलट्या बोंबा साऱ्या. मान्य केलं वादासाठी वाद म्हणून की बुवा, तुम्ही वस्तू झालात. पण आमचं काय? आम्ही माणूस तर होत नाही. आधीच आम्ही वस्तू. त्यात तुम्ही प्रायव्हेटचं पब्लिक करून टाकलं. भोगदासी बनवून बसलात. त्याचं काय करायचं? आम्हाला कसलीच विश्रांती नाही. तुमच्या गतीच्याही पुढं पळावं लागतंय. फार कंटाळा आला म्हणून पंक्चर होवून पडावं म्हणलं; तर बघितल्या-बघितल्या तुमच्या लाथा सुरू होतात. कधी चालूच नाही व्हायचं ठरवलं तर; तुम्ही आमचा असा काही उद्धार करता की, लाज वाटते बंड केल्याची. म्हणून मग कळ दाबली की, आम्ही लुगडं वर करतो. पायांना चाकं बांधून डांबराच्या निनादात गती पकडतो. निमूटपणे. रस्ता धरतो.

वस्तुत: वाहन म्हणजे प्रत्येक मालकाची पालखी आहे. प्रत्येक जण तिचा वारकरी आहे. हे शहर विठ्ठल बनून सर्वांच्या टाळूवर बसलंय. रोज वारी करायला लावतंय. त्याच्या हातात प्रत्येकाच्या बाहुल्या आहेत. तो हल्ली फार हुशार झालाय. वारीला येणाऱ्या प्रत्येकाकडनं हप्ता आणि टॅक्स वसूल करतोय. किमान तेवढ्यासाठी तरी वारी करावी लागते. कधी चाराठ दिवस वारी चुकली की, हप्त्याचा आकडा फुगतो. मग तो फेडता फेडता त्यांच्या नाकी नऊ येतं. तेव्हा रोजची वारी करण्याशिवाय कुणापुढं कसलाच पर्याय नसतो. नुसतं वारी करून नमस्कार पोहचला म्हणजे वारी पूर्ण झाली असं नव्हे. शिधा, प्रसाद आणावा लागतो. पुजाऱ्याला दक्षिणा द्यावी लागते. तेव्हाच वारी घडते. नाहीतर आल्या पावली वारी परत फिरवावी लागते. त्याशिवाय पदरी पुण्य पडत नाही.

वाहनतळावरच्या प्रत्येकाला आपला एक कुल्ला बाहेर काढून अख्खी गाडी जशी बॅलन्समध्ये चालवता येते, तसा अर्ध्या भुकेवर घराचा गाडा ओढता येतो. कुणाचा बाप मेलेला, कुणाचा भाऊ शिकतोय. कुणाला आई नाही, कुणाच्या बापाची नोकरी गेलीय. कुणाचा बाप व्यसनी, कुणाची बहीण लग्नाचीय. कुणाची खर्चाळ, कजाग बायको, तर कुणाची बायको पळून गेलेली. कुणाचं लग्न होत नाही. कुणाला रहायला घर नाही. कोण झोपडपट्टीत राहतोय. कुणाच्या पोरी लग्नाला आल्यात. सगळ्या जाती-धर्माचं एक कडबोळं म्हणजे हा वाहनतळ. एखादा या तळावर येऊन एकदा का तो अडकला की, त्याची सहजासहजी सुटका होत नाही. त्यांचंही गणित शहरासारखं झालंय. गाडी भरेपर्यंतच गप्पा. गाडी भरली की, बंद गप्पा. वेळ आली की, स्टार्टर मारायचा. नाही मारला तर मागच्याला घाई. पॅसेंजर्सना पोहचण्याची घाई. घाईची गती प्रत्येकाला लगडून राह्यलीय. या गतीला विराम देण्यासाठी ही पोरं चंगळवादी बनतात. कारण ही पोरं रोज एक तरी अपघात बघतात. ओरडून ओरडून जीव सोडताना अनेकांना ती पाहतात. त्यामुळं मरणाची गोम आणि गेम त्यांना नीट कळली आहे. ते रोजच मरणाला सोबतीला घेवून घराबाहेर पडतात. त्यामुळं एक प्रकारची तुच्छता आणि कोरडेपणाची झाक त्यांच्या चेहऱ्यावर कायम असते. न झेपणारं एक अवाजवी ओझं घेऊन ती चालली आहेत.

दिनकर देसाई असाच वाहनतळावर आला. रमला. अनेक उचापत्या करीत गेला. घरात न रमण्याचा त्याचा स्वभाव वाहनतळावर कामाला आला. त्याच्या उपयोगी पडण्याच्या उचापत्यांमुळे तो मालक-चालक-वाहतूक संघटनेचा सचिवही झाला. म्हणजे अध्यक्षाच्या मदतीला पडताना त्याचा हा बहुपयोगी स्वभाव लक्षात आल्यानं, त्यानंच त्याच्या गळ्यात मारलेलं. त्यामुळं दिनू अडल्या-नडल्याची आडलेली प्रकरणं बघ. पतसंस्थेचं कर्ज मिळवायला मदत कर. आडल्या-नडल्याला मदत कर. पतसंस्थेत त्यासाठी खेटं घाल. गाडी आडवली की, अध्यक्षाच्या मदतीनं ती सोडवायचा प्रयत्न कर. कुणाच्या घरच्या कार्यक्रमात, लग्नात उत्साहानं सहभागी हो. घरात मात्र नेमकं याच्या उलट असायचं. घरात आलं की, त्याच्या चेहर्‍यावर आठ्यांचं जाळं. तोंडाला कुलूप. कामापुरतं हो, ना. बापाशी फारसं बोलणं व्हायचं नाही. जे काही चाललेलं असायचं ते आईसोबतच असायचं. तिथंही फार उत्साह नसायचा. बाहेर हा इतक्या उचापती कसा करतो हेच त्यांना कोडं पडलेलं असायचं.

सुरुवातीला दिनूनं कमांडरची काळजी घेतली. रोज धुवून-पुसून, तिला दिवाबत्ती केल्याशिवाय तो गाडीत बसायचा नाही. गाडीचा जरा कसला आवाज यायला लागला की, गाडी गॅरेज गाठायची. एकदम टकाटक ठेवायचा गाडी. गाडीला पाठ टेकवून कुणाला उभा राहू द्यायचा नाही. दुपारी एकदा जेवण झालं की, नंबरची वाट पाहत गाडीला फडकं मारायचा. संध्याकाळी गाडी पार्क करताना पुन्हा एकदा झटकायचा. कमांडर दणकट असल्यामुळं बाजार दिवशी मात्र माणसं बॉनेटवरही बसायची. त्याला वाईट वाटायचं. पण तेवढाच दिवस असतो आठवड्यातला डबल कमाईचा. जितकं जास्त पळावं, तितकं मग कुठंतरी हप्त्याचा आणि चार पैसे मागं पडायचा मेळ लागायचा. त्यासाठी बाजारादिवशी गाडीची फिकीर करायची नाही. गाडी कशीही रेमटायची. दहा तिथं वीस- वीस माणसं बसवायची. त्यामुळं कुठं व्हील बॅलन्स हाल, अलायनमेंट हाल, सिटाची नटं पड, बॉनेटचा पत्रा वाक, कुणीतरी अडकित्त्यानं कुशन फाड, टपावर ब्लेड मार. असलं उद्योग होत रहायचं. अशा वेळी मग पैशांची चणचण जाणवायला लागली की, गाडीकडं दुर्लक्ष करायला लागायचं. असंच एकदा व्हील बॅलन्सकडं दुर्लक्ष करण्याच्या नादात दोन टायर इतकं चाटले की, बस्स! शेवटच्या खेपंला तर अक्षरश: धूर निघाला टायरातनं. दोन-चारशेचं काम दोन-तीन हजारावर जाऊन बसलं. अशा सगळ्या भानगडीत गाडीचा मेंटेनन्स खर्च सुरू झाला. वेळच्या वेळी सर्व्हिसिंग नसल्यामुळं अ‍ॅवरेज मार खाऊ लागलं. टायर रिमोट करून वापरावं लागू लागलं. तसा दिनूचा खिसा रिकामा होत गेला. सबंध गाडीच हळूहळू खिळखिळा होत गेली.

गाडीचा खर्च दिनूच्या खिशाला परवडेनासा झाला. त्यातच त्याला मावा-गुटख्याचा नाद लागला. रोज पंचवीसेक रुपये त्यासाठी खर्च व्हायला लागलं. तोंडात काही नसलं की, त्याला गाडी चालवताना अस्वस्थ, बेचैन व्हायला व्हायचं. अंगाला सूक्ष्म कंप सुटायचा. स्टेअरिंगवर बसतानाच कॉन्फिडन्स संपून जायचा. तरी बरं चालू गाडीत थुंकताना दोन-तीन वेळा धडकता-धडकता तो वाचला आहे. पण ही सवय काही जायला तयार नव्हती. किमान खर्च तरी कमी करता यावा, म्हणून त्यानं तंबाखू सुरू करून बघितली, पण तिची किक काही बसत नव्हती. या सगळ्यात खर्चाचं आकडं फुगत गेलं. आमदनीचं आटंत. धंदा नाही झाला तरी तो मजेत रहात होता. पार्ट्या करीत, आला दिवस ढकलीत होता. त्याच्याकडून काही झालं तरी त्याला घरात कुणी बोलत नव्हतं. त्यामुळं एककल्लीपणा वाढला होता. गाडी घेतल्यापासून घरातली आवक कमी झाली. त्याला पैसे कमी पडू लागलं. त्याची चिडचीड वाढली. अनेकदा पॅसेंजरशी भांडणं काढली. तोंडाच्या वासामुळं नेहमीचं गिऱ्हाईक त्याच्या गाडीत बसायचं नाही. तरी त्यानं फिकीर केली नाही. तो स्वत:च्याच तंद्रीत. यावरून एकदा त्याला चिंतामणनं हटकलं. तर तो म्हणाला होता,

गाडीला जपायची हल्ली इच्छाच होत नाही. काय करावं? मनातनं तसं काही वाटतच नाही, की बुवा आपण गाडीची काळजी घ्यावी. तुमी म्हणताय ते बरोबराय, गाडी आणकी नील व्हायचीय. हप्तं जाईनात. पण माझा तिच्यावरचा जीवच उडालाय. ही धोंड कवा एकदा गळ्यातून जातीय असं झालंय. घरची नाहीत काय मनीत. पण घरात गेलो की, सुतक पडतं. कुणाचं काय चुकतंय कायच कळत नाय. बानं तर बोलणं टाकलंय. जेवताना होईल तेवडंच आईबी बोलतीय. बाकी सारा मुक्याचा खेळय.

.............................................................................................................................................

'तणस' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4906/Tanas

.............................................................................................................................................

लेखक महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Mahendra Kadam

Fri , 07 June 2019

आभारी आहोत


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......