‘दंगल’ : आहे मनोहर तरी…
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
यश एनएस
  • ‘दंगल’चं एक पोस्टर
  • Sat , 24 December 2016
  • हिंदी सिनेमा बॉलिवुड Bollywood दंगल Dangal आमीर खान Aamir Khan साक्षी तन्वर Sakshi Tanwar फातिमा सना शेख Fatima Sana Shaikh सन्या मल्होत्रा Sanya Malhotra

‘दंगल’बद्दल चर्चा सुरू झाल्यापासून त्याच्यावरच्या अपेक्षांचं ओझं वाढत गेलं. हे ओझं वाढवण्यात आमीर खानच्या प्रतिमेचा मोठा वाटा आहे. बाकीच्या हिंदी अभिनेत्यांच्या तुलनेत त्याचा वर्षातून एखादाच चित्रपट येतो आणि तो चांगला असतो, असं म्हटलं जातं. ‘धूम 3’ आणि ‘गजनी’सारखे अपवाद सोडले तर, आमीर खान चांगले चित्रपट निवडून त्यात चांगलं काम करतो हे तसं खरंही आहे. हेही खरं आहे की, त्याचे चित्रपट हे बॉलिवूडच्या आवाक्यातले असतात आणि त्या आवाक्याच्या मर्यादा लक्षात ठेवून त्यांना चांगलं म्हणणं योग्य आहे. जर तुम्ही आधीच सोशल मीडियावर वाचलं नसेल तर सगळ्यात आधी हे जाहीर करून टाकतो की, ‘दंगल’ हा एक चांगला चित्रपट आहे. आणि तो नक्की सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखा आहे.

‘दंगल’चं कथानक आणि तो ज्यांच्यावर आधारीत आहे त्या फोगाट कुटुंबाबद्दल आधीच बहुतांश लोकांना माहिती आहे. गीता आणि बबिता फोगाट यांनी मिळवलेल्या यशाबद्दल देशभरात खूप चर्चा झाली आणि त्यांचं नाव हे स्त्री-शक्ती, विजयी होण्यासाठी लागणारे परिश्रम, देशप्रेम आणि आशावाद यांच्याशी जोडलं गेलं. त्याचबरोबर त्यांचे वडील, महावीर फोगाट, यांनी कुस्तीसारख्या, पारंपरिकरीत्या पुरुषांसाठी राखीव खेळात त्यांच्या मुलींना प्रशिक्षण दिलं याबद्दल त्यांना खूप मानलं जातं.

ज्ञात कथानकाला मनोरंजक, रोमांचक आणि प्रभावी पद्धतीनं मांडणं हे एक खूप मोठं आव्हान ‘दंगल’सारख्या चित्रपटापुढे असतं. बरेच चित्रपट हे काम नीट न निभावू शकल्यामुळे ते रटाळ वाटू लागतात. ‘दंगल’च्या बाबतीत असं अजिबात होत नाही. हा दोन तास चाळीस मिनिटांचा चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. चित्रपटाच्या शेवटी गीता फोगाट सुवर्ण पदक जिंकणार हे माहीत असूनही शेवटच्या मिनिटापर्यंत प्रेक्षक उत्सुक आणि आतुर राहतात, हे या चित्रपटाचं मोठं यश आहे.

चांगली पटकथा एखाद्या चित्रपटाचं ५० टक्के काम सोपं करते. पटकथा तो चित्रपट कसा बनवावा याची 'ब्लू प्रिंट' असते. बऱ्याच वेळा पटकथा म्हणजे संवाद असं समजलं जातं, पण ते फक्त त्याचा एक भाग असतात. तो चित्रपट दिसणार कसा, त्या कथेतलं व्यक्तिचित्रण, गोष्टीचा 'फ्लो' आणि अजून बरेच तपशील त्यात असतात. ‘दंगल’ बघितल्यावर जाणवतं की, त्याची पटकथा या सगळ्या बाबतीत बांधीव आहे. त्याची विचारपूर्वक मांडणी केली गेली आहे. काही भागात गोष्ट उलगडण्यात हॉलिवुडमधील पटकथांचा प्रभाव दिसतो. (इथं प्रभाव या शब्दाचा अर्थ ‘नक्कल’ असा अभिप्रेत नाही.) खासकरून पहिल्या भागात कथेचा वेग उत्कृष्ट आहे. या भागात लहान वयातील गीता आणि बबिताचा संघर्ष अनुभवताना प्रेक्षकांना नक्कीच त्यांच्या बाबतीत सहानुभूती वाटेल. दुसऱ्या भागात काही प्रसंग हे कृत्रिम आणि जास्त संवेदनशील वाटतात. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये परदेशी पात्रांना उपहासात्मक दाखवतात. ‘दंगल’मध्ये असं नसलं तरी शेवटच्या भागातल्या ऑस्ट्रेलियन कुस्तीपटूला उगाच अती दुष्ट आणि उद्धट दाखवलं गेलं आहे. त्याचबरोबर शेवटच्या एका दृश्यातला राष्ट्रगीताचा वापर थोडा ‘chauvinistic’ वाटतो. या ठिकाणी, एवढा वेळ भावनात्मकतेचा तोल सांभाळत आलेला चित्रपट एकदम भावनांचा स्फोट करतो. चांगल्या पटकथेमुळे प्रेक्षकांच्या भावना आपोआप उफाळून येतात आणि तेव्हा त्यांना अशा दृश्यांची गरज नसते.   

‘दंगल’मधील सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. आमीर खानने या भूमिकेसाठी केलेल्या शारीरिक बदलाबद्दल खूप चर्चा झाली आहे. त्याच्या मेहनतीचा परिणाम चित्रपटात दिसतो. त्याचं कथेबरोबर बदलत जाणारं शरीर त्याच्या अभिनयाचा एक खूप मोठा भाग बनतं. जिथं दिसण्याला इतकं महत्त्व आहे, अशा बॉलिवुडमधील इतर कुठला स्टार असा पराक्रम करायचं धाडस करेल असं वाटत नाही. काही भागात आमीरच्या अभिनयातील नेहमीची तीव्रता दिसली तरी या चित्रपटातील त्याचा अभिनय त्याच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांमध्ये सर्वोत्तम असावा. विशेषत:, एका दृश्यात जेव्हा गीता आणि महावीर कुस्ती खेळतात, तेव्हा आमीरने खूप सुंदर अभिनय कला आहे. फातिमा शैख आणि सान्या मल्होत्रा यांचा अभिनय बघून असं अजिबात नाही वाटणार की, हा त्यांचा पहिलाच चित्रपटात आहे. दोघींपैकी फातिमाचं पात्र मुख्य असलं तरी सान्याचा अभिनय जास्त सहज वाटतो. हरयाणवी भाषेवरची पकड आणि कुस्तीपटूसारखं शरीर/वावर हे 'या चित्रपटामधील कलाकारांसाठी गरजेच होतं. ही गरज सगळ्यात यशस्वीपणे लहान गीताचं पात्र निभावणाऱ्या झाऐरा वसिमने पूर्ण केली आहे. साक्षी तन्वरने तिच्या आईची भूमिका खूप सहज आणि योग्य केली आहे. या चित्रपटातलं गिरीश कुलकर्णीचं काम बघून त्याच्या ‘अग्ली’मधील उत्कृष्ट कामाची आठवण होत नाही. त्याच्या पात्राचं लेखन अपूर्ण वाटतं. तो खूप चांगल्या दर्जाचा कलाकार असूनही त्याला या चित्रपटात अभिनयाला फार वाव नाही. ‘फेरारी की सवारी’मध्ये पहिल्यांदा दिसलेल्या रित्विक सहोरेने या चित्रपटात सुंदर अभिनय केला आहे.

‘दंगल’ प्रभावी होण्यामागे त्यातील तांत्रिक कौशल्याचाही मोठा वाटा आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘पानसिंग तोमर’ या चित्रपटातलं शर्यतीचं दृश्य त्यातील जोम पूर्णपणे दर्शवू शकलं नव्हतं. पण ‘दंगल’मध्ये कुस्तीतील रोमांचकारकता त्यातील सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंगमुळे प्रेक्षकांपर्यंत सहज पोचते. स्लो-मोशन आणि कॅमेरा अ‍ॅंगल्सच्या योग्य वापरामुळे कुस्तीबद्दल फार माहीत नसलेल्या प्रेक्षकांनाही काय चाललं आहे हे सहज समजू शकतं. या चित्रपटाचा 'अ‍ॅस्पेक्ट रेशिओ' (म्हणजे पडद्यावरचं प्रोजेक्शन किती रूंद आहे हे मोजण्याचं प्रमाण) रूंद असल्यामुळे तो कुस्तीसारख्या खेळासाठी (ज्याच्यात दोन शरीर आडवे लढत असतात) उत्तम आहे. त्याने चित्रपट अजून रोमांचक वाटतो. नितेश तिवारीचं दिग्दर्शन चांगलं आहे, पण काही विनोदी दृश्यं बघून राजकुमार हिराणी आठवतो.

आता शेवटी थोडं बॉलिवुडच्या आवाक्यापासून झूम आउट होऊन ‘दंगल’कडे फक्त एक चित्रपट म्हणून बघूयात. झूम आउट केलं, स्टार्सची चमक थोडी पुसली, अनिवार्य देशप्रेमाचे संदर्भ थोडा वेळ बाजूला ठेवले आणि या चित्रपटाकडे फक्त एक मानवी कथा म्हणून बघितलं तर अजून काही गोष्टी लक्षात येतात. भारतातील आणि विशेष करून हरयाणातील स्त्रियांच्या दैनंदिन जीवनात येणारे असंख्य अडथळे आहेत. ‘दंगल’मधील गीता आणि बबिताला ज्या अडथळ्यांमधून जाताना दाखवलं आहे, त्याच्या तुलनेत खऱ्या आयुष्यातल्या गीता आणि बबिताचा संघर्ष त्यापेक्षा जास्त कठीण असेल का? आणि जर असेल तर त्याची खरी तीव्रता या चित्रपटात का दिसत नाही? समाजाच्या हितासाठीचा संदेश देताना तो अती सुलभ केल्यामुळे गुंतागुंत उणावली का? ‘सत्यमेव जयते’मधील त्यांच्या मुलाखतीत गीता आणि बबिता सांगतात की, त्यांचे वडील त्यांना खूप मारायचे. या तपशीलाचा चित्रपटात समावेश का केला गेला नसावा? आपण प्रेक्षक म्हणून एखाद्या प्रमुख पात्राची वाईट बाजू पचवू शकत नाही का? खऱ्या यशावर आधारित गोष्ट जेव्हा अर्धवट सांगितली जाते, तेव्हा त्यातून खरंच उपयुक्त संदेश पोचतो का? जर आपण एखाद्या खऱ्या कथेतील कुरूप भाग बघायला तयार नसू तर आपण बायकांची खरी परिस्थिती बघू शकणार आहोत का?

‘दंगल’ बरेच महत्त्वाचे प्रश्न उभे करतो. पण त्यातील काही प्रश्नांच्या बाबतीत उत्तरं देण्याची घाईही करतो. कधी कधी वाटतं की, आपण एक खूप छान बनवलेली, अडीच तासांची जाहिरात बघत आहोत. पण हेही लक्षात येत राहतं की, बाकीच्या बॉलिवुड चित्रपटांच्या तुलनेत हा खूप चांगला चित्रपट आहे.

जेव्हा थेट चित्रपटात राष्ट्रगीत वाजतं आणि सगळे प्रेक्षक भावनिक होऊन चित्रपट चालू असताना उभे राहतात, तेव्हा ‘दंगल’ने भारतीय नागरिकांच्या हृदयाच्या तारांना उत्तम प्रकारे स्पर्श केला आहे. चित्रपट प्रभावी आहे, सगळंच छान आहे... पण तरी काही तरी राहून गेलं असं वाटतं. 

 

लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.

yashsk@gmail.com      

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Sat , 24 December 2016

आवर्जून वाचावं असं परीक्षण!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख