ग्रॅहॅम स्टेन्स : दोन मुलांसह जिवंत जाळला गेलेला ख्रिस्ती मिशनरी
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • ग्रॅहॅम स्टेन्स, ग्लॅडिस, एस्तेर, फिलिप आणि तीमथी
  • Wed , 05 June 2019
  • पडघम सांस्कृतिक ग्रॅहॅम स्टेन्स Graham Staines ग्लॅडिस Gladys एस्तेर Esther फिलिप Philip तीमथी Timothy

‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ या कामिल पारखे यांच्या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश. (पुस्तकाचे वितरक : सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती २०१७)

.............................................................................................................................................

ग्रॅहॅम स्टुअर्ट स्टेन्स हे नाव ऐकलं तर कदाचित अनेकांना ते परिचित वाटणार नाही. मात्र आपल्या दोन मुलांसह जिवंत जाळला गेलेला ख्रिस्ती मिशनरी हे त्यांचं वर्णन केलं तर त्यांची ओळख पटकन पटेल. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जगत असताना ओरिसातील मनोहरपूर येथे झालेल्या घटनेने सर्वांच्याच अंगावर शहारे आले होते. ग्रॅहॅम आणि त्यांच्या मुलांच्या हत्येआधी आणि त्यानंतरही भारतात अनेक ख्रिस्ती मिशनरींच्या हत्या झालेल्या आहेत. मात्र ओरिसातील कुष्ठरोग्यांची ३४ वर्षे सेवा करणाऱ्या स्टेन्स यांना आणि त्यांच्या दहा आणि सहा वर्षांच्या कोवळ्या मुलांना ते जीपमध्ये झोपलेले असताना जाळून मारण्यात आले, तेव्हा भारतात आणि इतरत्रही या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली. स्टेन्स हे ख्रिस्ती मिशनरी होते, हाच त्यांचा अपराध होता आणि त्याबद्दल त्यांना त्यांच्या मुलांसह मृत्युदंड देण्यात आला.

या मृत्युदंडानंतर ग्रॅहॅम, त्यांची पत्नी ग्लॅडिस आणि त्यांच्या तीन मुलांची नावे आणि ते करत असलेल्या कार्याला जगभर प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याआधी कितीतरी वर्षे स्टेन्स दाम्पत्य प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून ओरिसातील दुर्गम भागात कुष्ठरोग्यांची सेवा करत होते.

ग्रॅहॅम यांचा जन्म १८ जानेवारी १९४१ रोजी ऑस्ट्रेलियातील पाम्सवूड गावी झाला. त्यांच्या आई-वडिलांचे ते तिसरे अपत्य. बॅप्टिस्ट चर्चमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. ओरिसात कुष्ठरोग्यांची सेवा करणारा बेरा स्टीव्हन्स हा ऑस्ट्रेलियन मिशनरी रजेवर आपल्या मायदेशी आला, तेव्हा ग्रॅहॅम या युवकाशी त्याची भेट झाली. स्टीव्हन्स यांच्या कार्याने प्रभावित होऊन स्टेन्स यांनीही या मिशनकार्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.

१९६५ च्या जानेवारीत २४ वर्षे वयाच्या ग्रॅहॅम यांनी भारतात सर्वप्रथम पाऊल ठेवले. त्यानंतर ओरिसातील बारीपाडा येथील कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी स्थापन झालेल्या आश्रमात ते काम करू लागले. याच आश्रमात त्यांनी आपल्या आयुष्याची ३४ वर्षे घालवली. या कार्यात पुढे त्यांच्या पत्नी ग्लॅडिस यांचाही हातभार लागला.

स्टेन्स यांना डायरी लिहिण्याची सवय होती. भारतात आल्यानंतर या देशातील त्यांच्या पहिल्या अनुभवांचे चित्रण त्यांनी आपल्या डायरीत केले आहे. आधुनिक जगातील बऱ्याचशा सुखसोयींचा पूर्णत: अभाव असलेल्या ओरिसातील ग्रामीण भागात ते काम करत होते. त्यासाठी ते स्थानिक उडिया भाषाही शिकले.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4902/anartha

...............................................................................................................................................................

ग्रॅहॅम यांचा ग्लॅडिस यांच्याशी १९८३ साली विवाह झाला. या दोघांचे बालपण ऑस्ट्रेलियातील शेजारी असलेल्या जिल्ह्यांत गेले, तरी त्यांची प्रथम भेट भारतातच झाली. ग्लॅडिस यांनी ऑस्ट्रेलियात नर्सचे प्रशिक्षण घेतले. सिंगापूर, मलेशिया आणि युरोपमध्ये त्यांनी काही काळ काम केले. ओरिसातील मयूरभंज येथे ग्रॅहॅम आणि त्यांची भेट झाली. त्यानंतर दोन वर्षांतच त्या दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर बारीपाडा येथील कुष्ठरुग्णांच्या आश्रमात त्या पतीबरोबर काम करू लागल्या. बारीपाडा येथे स्टेन्स दाम्पत्य कुष्ठरुग्णांसाठी औषधोपचाराचे केंद्र आणि पुनर्वसनाचे केंद्र चालवत असत. त्यांच्या आश्रमात जवळजवळ ८० कुष्ठरुग्ण राहात.

स्टेन्स यांच्या तीन अपत्यांपैकी एस्तेर जॉय हिचा ७ नोव्हेंबर १९८५ ला जन्म झाला. फिलिपचा जन्म ३१ मार्च १९८८ ला तर लहानग्या तीमथीचा जन्म ४ मे १९९२ ला झाला. यापैकी फिलिप आणि तीमथी यांनी आपल्या वडिलांबरोबर २३ जानेवारी १९९९ च्या त्या काळरात्री आगीत जळून या जगाचा निरोप घेतला.

स्टेन्स दाम्पत्य कुष्ठरुग्णांची सेवा धर्मांतराचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून करत होते, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. ख्रिस्ती मिशनरींतर्फे भारतात अनेक शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक केंद्रे व इतर अनेक संस्था चालवल्या जातात. या संस्थांचा वापर करून सक्तीने किंवा कधी आर्थिक आमिषे दाखवून लोकांना ख्रिस्ती धर्माकडे ओढण्याचा प्रयत्न केला जातो हा आरोप नवा नाही. भारतरत्न मदर तेरेसा यांच्यावरही हा आरोप केला गेला होता. स्टेन्स यांनी मात्र आपल्या मिशनरी वृत्तीस जागून कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे कार्य आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत चालवले.

बाबा आमटे आणि मदर तेरेसा यांच्यासारख्या समाजसेवकांनी केलेल्या कार्यामुळे, लोकशिक्षणामुळे आणि वैद्यकीय प्रगतीमुळे समाजाची कुष्ठरोगाविषयीची भावना बदलली आहे. तरीसुद्धा हातापायाची बोटे झडलेल्या, चेहरा विद्रूप झालेल्या कुष्ठरोग्यांना स्पर्श करण्याची किंवा त्यांच्याबरोबर बसमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी बसण्याची मानसिक तयारी आपली झालेली नसते. समाजाने वाळीत टाकलेल्या अशा रुग्णांच्या जखमा पुसण्याचे, त्यांना इतर औषधोपचार पुरवण्याचे आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्टेन्स यांनी केले. बारीपाडा येथील कुष्ठरोगी आणि इतर आदिवासी लोक ग्रॅहॅम स्टेन्स यांना आदराने ‘सायबो’ असे संबोधत.

ओरिसातील ग्रामीण भागात आदिवासींमध्ये सामाजिक कार्य करणारे स्टेन्स दाम्पत्य पहिलेच ख्रिस्ती मिशनरी नव्हते. त्यांच्यापूर्वी अनेक वर्षे आधी म्हणजे १९८५ साली मयूरभंज येथे लेप्रसी होमची स्थापना करण्यात आली होती. केट अ‍ॅलनबी या मिशनरी महिलेने आपल्या वयाच्या २४व्या वर्षी या कुष्ठरुग्ण आश्रमाची स्थापना केली. ग्रॅहॅम स्टेन्स यांनी भारतात पाऊल ठेवण्याआधी अनेक मिशनरींनी तेथे कुष्ठरुग्णांची सेवा केली. या मिशनरींचाच थोर आदर्श स्टेन्स दाम्पत्य पुढे चालवत होते. ग्रॅहॅम स्टेन्स यांच्या निर्घृण हत्येमुळे अनेक ख्रिस्ती मिशनरी देशाच्या विविध दुर्गम्य प्रदेशांत विविध अडीअडचणींना तोंड देत आजही उपेक्षितांची सेवा करत आहेत, हे पुन्हा एकदा जगाच्या नजरेस आले.

ग्रॅहॅम स्टेन्स कुष्ठरोग्यांमध्ये करत असलेल्या कार्याबद्दल कुणाचीही तक्रार नव्हती. त्यांनी आदिवासी लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला, या त्यांच्या अपराधामुळे त्यांना त्यांच्या मुलांसह जाळून मारण्यात आले, असे म्हटले जाते. असे विधान करणाऱ्या व्यक्ती या मृत्युदंडाचे समर्थन करत नसल्या तरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून स्टेन्स यांनी एका विशिष्ट गटास दुखवले आणि त्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली, असे त्यांचे म्हणणे असते.

स्टेन्स यांना त्यांच्या धर्मप्रसाराच्या कार्यामुळे शिक्षा मिळाली असे म्हणणारे भारतीय घटनेत धर्मांतरास परवानगी आहे, हे सोयीस्करपणे विसरतात. कुठल्याही व्यक्तीस आपल्याला आवडेल तो धर्म स्वीकारण्याची मुभा असणे, हा लोकशाहीचा आत्माच आहे. एखाद्या व्यक्तीने धर्मविरहित जीवन जगण्याचे ठरवले, तर त्याने आपल्या धर्माचे पालन केलेच पाहिजे, अशी सक्ती करता येणार नाही.

या हत्याकांडाविषयी ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांनी ‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकात लिहिले आहे – “ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहॅम स्टुअर्ट स्टेन्स यांना फिलिप आणि तीमथी या दोन मुलांसमवेत जाळून मारण्यात आले. ते धर्मांतराच्या कार्यात गुंतले होते की नाही हे मला ठावूक नाही, परंतु एक गोष्ट त्यांनी निश्चितपणे केली आहे. ती म्हणजे त्यांनी कुष्ठरोग्यांचे परिवर्तन माणसांमध्ये केले. या कुष्ठरोग्यांना त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली वागणूक ही जनावरांनाही देणाऱ्या वागणुकीपेक्षाही भयंकर होती. स्टेन्स, त्यांची पत्नी व त्यांच्या मुलांनी कुष्ठरोग्यांना माणसात आणून माणसासारखे जगण्यास मदत केली.”

स्टेन्स आणि त्यांच्या मुलांना जिवंत जाळले गेल्यानंतर तेव्हाचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी ताबडतोब पत्रक काढून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. राष्ट्रपती भवनातून एखादी फार मोठी दखल घेण्याजोगी घटना घडल्याशिवाय पत्रक प्रसिद्ध केले जात नाही. मात्र मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे, असे समजून राष्ट्रपतींनी या घटनेचा तीव्र निषेध केला. “ज्याने कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात अनेक वर्षे घालवली त्याचे आभार मानण्याऐवजी, त्याने आपणापुढे ठेवलेल्या आदर्शांची प्रशंसा करण्याऐवजी, या प्रकारे त्यांची हत्या करण्यात यावी, ही घटना सहिष्णू आणि मानवतावादी परंपरेसाठी ख्यातनाम असलेला भारत नीतिभ्रष्ट झाला असल्याचे ठळक निदर्शक आहे. जगातील काळ्या कृत्यांच्या मालिकेत ज्याची गणना व्हावी, असा हा गुन्हा आहे,” असे राष्ट्रपतींनी आपल्या पत्रकात म्हटले.

आपल्या पतीला आणि दोन कोवळ्या मुलांना जाळून ठार करण्यात आले, हे ऐकून ग्लॅडिस स्टेन्स यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करवत नाही. आपल्या मायदेशातून मिशन कार्यासाठी बाहेर पडलेल्या, स्टेन्स यांच्याशी विवाह करून भारतातच स्थायिक झालेल्या ग्लॅडिस यांचे या घटनेमुळे सर्वस्वच हिरावून घेतले. त्या स्वतः आणि त्यांची तेरा वर्षांची मुलगी एस्तेर या दिवशी मनोहरपुरात नव्हत्या म्हणूनच त्या दोघी वाचल्या.

‘या घटनेने मला खूप दुःख होते आहे हे खरेच आहे, पण मला त्या लोकांचा तिरस्कार वाटत नाही. मी त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करते की, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांनाच समजत नाही,’ असे ग्लॅडिस यांनी त्यावेळेस म्हटले.

.............................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 07 June 2019

लक्ष्मणानंद सरस्वती याचीही अशीच सेवा करतांना हत्या झाली आहे. त्याची आठवण झाली. स्टेन्स यांच्या मारेकऱ्यांना पकडून शिक्षा झाल्या. मात्र लक्ष्मणानंद सरस्वती यांचे मारेकरी आजूनही सापडले नाहीत. काही लोकं अधिक समान असतात. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......