अजूनकाही
भेड की हाहाकार के बदले, शेर कि एक दहाड है प्यारे।
हिंदी चित्रपट वास्तवाला धरून नसतात, जे वास्तविक असतात ते गडद असतात, चित्रपटाची लांबी वाढली की ते कंटाळवाणे होतात, भारतात चांगले स्पोर्ट्स चित्रपट, चांगले बायोपिक येत नाहीत, आमीर प्रत्येक भूमिकेमध्ये थोडा का होईना पण डोकावतो अशी अनेक मतं असलेल्या प्रेक्षकांसाठी ‘दंगल’ ही वाघाची डरकाळीच आहे !
२०१६ हे वर्ष हिंदी चित्रपटांसाठी फारसं चांगलं गेलं नाही. तिकीटबारी वर तर सोडाच, पण चित्रपटांच्या गुणवत्तेतसुद्धा, अगदी काहींचाच अपवाद सोडता फार काही खास नव्हतं. सर्व प्रेक्षक, जाणकार एका चांगल्या चित्रपटाची वाट चातकासारखे पाहत होते. आणि वर्षाच्या अखेरीस ‘दंगल’ आला. अर्थात चित्रपटाची हवा होतीच, शिवाय ट्रेलरसुद्धा मस्त होता आणि आमीरसुद्धा दोन वर्षांनी परत येणार होता. चित्रपट चांगला असेल, असे अंदाज सर्वत्र वर्तवले जात होते. पण त्या अंदाजांपेक्षा, अपेक्षांपेक्षा कित्येक पटीने सरस आहे हा ‘दंगल’.
महावीर सिंग फोगट हे हरियाणाचे स्वतः राष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू. बिकट परिस्थितीमुळे त्यांनी कुस्ती सोडली आहे. आपलं आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळण्याचं स्वप्न आपला मुलगा पूर्ण करणार, हे त्यांचं ध्येय. पण नियतीच्या खेळीमुळे त्यांना चारही मुलीच होतात. आणि मग असं काही घडतं की, मग आपल्या मुलीचं आपलं स्वप्न पूर्ण करणार, असं महावीर फोगट ठामपणे ठरवतात.आणि मग सुरू होतो तो गीता, बबिताचा आणि महावीर फोगट यांचा आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवण्याचा अविसमरणीय आणि अतुलनीय प्रवास.
या पटकथेचा आपण ट्रेलर पाहूनसुद्धा अंदाज बांधू शकतो. अशा चित्रपटाचा शेवट काय होणार हे सुद्धा माहीत असतं मग तरीही हा एवढा प्रभावी, उत्कंठावर्धक, खरा आणि सुंदर कसा? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आणि या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्यासाठी दंगल हा चित्रपट पुरेसा आहे.
सर्वांगसुंदर चित्रपट म्हणलं की तो पटकथा, संगीत, बॅकग्राउंड स्कोअर, संवाद, सिनेमॅटोग्राफी, संकलन, अभिनय आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर यशस्वी पाहिजे. आणि हो... ‘दंगल’ तसाच आहे.
फ्लॉलेस पटकथा हा ‘अरोरास’, ‘ज्वेल्ड स्क्विड’सारखा अत्यंत दुर्मिळ प्रकार. तो ‘दंगल’मध्ये बऱ्याच दिवसांनी (का वर्षांनी?) पाहायला मिळतोय आणि हीच चित्रपटाची सर्वात जमेची बाजू. पडद्यावर सुरू असलेलं सारं आपल्या एवढं जवळचं होऊन जातं की हसू येणं, डोळे आनंदाश्रूंनी पाणावणं, एकदमचं गहिवरून येणं, कुस्ती स्पर्धांमधील थरार, डावपेच अनुभवताना रोमांचित होणं, त्या जल्लोषामुळे एक वेगळाच शहारा येणं, हे सारं अनपेक्षितरित्या आणि अनवधानाने होत राहतं.
प्रत्येक पात्राचं लिखाणसुद्धा खोल आणि ताकदीचे आहे. म्हणजे सर्वचं छटा आहेत इथे पात्रांना. ज्या माझ्या निरीक्षणानुसार भारतीय बायोपिकमध्ये कधीच नसतात. आपल्या इथे मुख्य भूमिकेला देव बनवलेलं असतं. तसं इथे अजिबात नाही. हे विशेष.
प्रीतमचं संगीत मधल्या काही काळामध्ये काहीसं सुमार होतं. पण यावर्षी ‘ऐ दिल है मुश्किल’मधून दणक्यात कमबॅक केला आहे. ‘दंगल’, ‘धाकड’, ‘गेहरियां’, ‘नैना’ आणि ‘हानिकारक बापू’ ही सर्वच गाणी छान जमून आली आहेत.आणि अगदी योग्य ठिकाणी ती चित्रपटात पेरली आहेत. आणि त्याला अमिताभ भट्टाचार्याच्या शब्दांची साथ मिळाली आहे.
संवाद जरी कमी असले तरी ते चमकदार आहेत. अवघड आणि लांबलचक संवाद टाळून, दृश्यमाध्यमाचा जास्तीत जास्त केलेला वापरसुद्धा सुखावणारा आहे.
सेतूची सिनेमॅटोग्राफी विलक्षण आहे. वडील-मुलीच्या नात्यांमधील प्रेम, ताणतणाव, आखाडा ते सिंथेटिक मॅटवर रंगणारे कुस्ती सामने हे सारं कमालीचं टिपलं आहे.
‘चिल्लर पार्टी’ आणि ‘भूतनाथ रिटर्न्स’सारखे बरे चित्रपट दिल्यानंतर नितेश तिवारीने दिग्दर्शनामध्ये कमालीची जादू केली आहे. प्रेक्षकांचे अंदाज पावलोपावली खोटे ठरवत, पटकथेत कमालीचे गुंतवून ठेवत, फिल्मीपणाचा लवलेश सुद्धा न आणता, क्लासेस आणि मासेस या दोहोंना तितकाच आवडेल असा अस्सल चित्रपट त्याने तयार केला आहे. काहींना चित्रपटाचा प्री-क्लायमॅक्स जास्त नाट्यमय वाटू शकेल. पण वैयक्तिक मला तरी तसा वाटला नाही. मुळात ती सत्यघटना आहे आणि त्या मधील प्रत्येक गोष्ट खरी आहे असं दस्तुरखुद्द फोगट कुंटुंबाने सांगितली असल्याने आक्षेप घेण्याचं कारण नाही.
आणि या सर्व यशात मोलाचा वाट उचलला आहे तो मुकेश छाब्रिया या कास्टिंग डिरेक्टरने. जेवढ्या चांगल्या व्यक्तिरेखा तेवढेच ताकदीचे कलाकार या चित्रपटाला लाभले आहेत, हे विशेष. गीता-बबिता यांच्या भूमिका साकारणाऱ्या लहान गोड मुली, आईच्या भूमिकेतील साक्षी तन्वर, प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणारा गिरीश कुलकर्णी (जाउंद्या हो...विसरून जावा आधीच्या चुकीला आणि इथं त्याच्या अस्सलपणाचा आस्वाद घ्या). सान्या मल्होत्राने बबिताच्या भूमिकेला पुरता न्याय दिला आहे.
या चित्रपटाचं सर्वात जबर कास्टिंग म्हणजे गीताच्या भूमिकेत असणारी फातिमा शेख. वाह! तिच्या भूमिकेतील व्हेरिएशन तिने कमालीचं साकारलंय. एक कुस्तीपटू असणं, आणि त्याही पलीकडे जाऊन एक मुलगी असणं, वेळेप्रमाणे बदलत जाणारा तिचा स्वभाव, बबिता, वडील आणि आई या प्रत्येकाशी असणारे वेगळे संबंध...कमाल !
आमिर खान... तो खरंच आहे बरं का ‘दंगल’मध्ये. हा... म्हणजे महावीर सिंग फोगट यांची भूमिका त्याने अक्षरश: जगली आहे. त्यामुळे जर चित्रपट पाहून झाल्यावर आमीर कुठे होता, असा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही. शारीरिक मेहनत, परकाया प्रवेश हे सगळं त्याने या वयात केलं आहेचं. पण त्याही पेक्षा त्याचा अभिनय...! महावीर सिंग फोगट साकारताना भूमिकेतील चढउतार, वडील-प्रशिक्षक या दोन भूमिकांमध्ये होणारी घालमेल, गावाकडून मिळणारा सन्मान आणि विरोध, मुलींशी असलेलं नातं, प्रसंगी बॅकफुटवर राहणं, नि:शब्द राहून बरंच काही बोलून जाणं आणि बरंच काही कमालीचं थक्क करणारं आहे. मि. परफेक्शनिस्ट हे बिरुद समथिंग बियाँड परफेक्शन असं झालं तर ते जास्त योग्य ठरेल.
तर असा हा सर्वांगसुंदर ‘दंगल’! असे चित्रपट येणं खूप दुर्मिळ आहे, अथवा येतंच नाहीत असं म्हणलं, तरी वावगं ठरणार नाही. कुस्तीवर आधारित असलेला हा चित्रपट मनोरंजनाच्या व्याख्येच्या बराच पुढचा आहे. जिगर, जुनून, महत्त्वाकांक्षा, चिकाटी, मेहनत याने ओतप्रोत भरलेला आहे. वडील-मुलगी हे नातं नव्याने सांगणारा, सामाजिक वृत्तीच दर्शन घडवणारा, भारतीय क्रीडा अकादमीवर ताशेरे ओढणारा, कुस्ती या खेळाविषयीचं बरंच ज्ञान देणारा आणि आजूबाजूच्या सर्व अंगांना स्पर्शून जाणारा ‘मास्टरपिस’ आहे.
'एक बात हमेसा याद रखना बेटा, अगर सिल्वर जिती, तो आज नही तो कल लोग तंने भूल जावेंगे। गोल्ड जिती, तो मिसाल बन जावेगी! और मिसाले दी वी जाती है बेटा, भुली नही जाती।'
आणि असाच आहे दंगल. गोल्ड मेडलिस्ट!
लेखक एमबीबीएस करत असून चित्रपट आस्वादक आहेत.
ashutosh.jarandikar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Anand Patre
Wed , 28 December 2016
सत्यघटना ? खूप सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे ... हे वाचा http://www.thebetterindia.com/79838/dangal-facts-mahavir-singh-phogat-geeta-phogat/