राहुल गांधी यांना पर्याय कोण? ...पर्याय राहुल गांधीच!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी
  • Sat , 01 June 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भाजप BJP संघ RSS काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त तसंच भाजप समर्थकांच्या पचनी पडणार नाही आणि काँग्रेसजनांना रुचणार नाही, तरी स्पष्टपणे सांगायलाच हवं. २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीचा पराभव वगळता राहुल गांधी यांची कामगिरी चांगलीच राहिली आहे, असं माझं ठाम मत आहे. काँग्रेसच्या लोकसभेतील जागा ४४वरून ५२वर पोहोचल्या म्हणजे कॉर्पोरेट भाषेत ‘राहुल गांधी यांचा केआरए (key result area) दर १८ टक्के आहे आणि तो पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा जास्त आहे.’ म्हणजे ‘xx पास हो गया’ अशी राहुल गांधी यांची जी हेटाळणी भक्तांकडून समाजमाध्यमांवर केली जात आहे, ती असुसंस्कृत आणि ती तशी करणाऱ्यांची पातळी दर्शवून देणारी आहे.

मुळात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हा सामनाच विषम होता. एक तेल लावलेला जोशात असणारा जय्यत तयारीचा मल्ल, तर दुसरा राजकारणाच्या आखाड्यात गेल्या पाच वर्षांत जेमतेम तयार झालेला. एक सत्ताधारी तर समोरचा विरोधी पक्षात. एकाकडे विपुल साधनसामग्री आणि विजयाचा मोठ्ठा विश्वास, तर दुसरीकडे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयानं गाफीलपणा ठासून भरलेला. काही नवख्यांची आणि मोठ्या प्रमाणात बाजारबुणग्यांची फौज घेऊन राहुल गांधी एकटे लढत होते, तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शहा, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, राजनाथ सिंह अशी किमान ५०च्यावर नेत्यांची आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. 

भाजपचे मुख्यमंत्री त्यांच्या राज्याचा प्रचार आटोपून अन्य राज्यांत धाव घेत होते. (उदाहरणार्थ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सभा; खरं तर मराठी भाषकांच्या बैठका घेतल्या आणि भाजपचा प्रचार केला.) तर काँग्रेसचे नेते/मुख्यमंत्री मात्र त्यांच्या आप्तस्वकीयांच्या प्रचारात मग्न होते. वानगीदाखल उदाहरण द्यायचं तर मतदान आटोपल्यावर दोन तासांतच अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज असे भाजपचे ४०च्यावर नेते अन्य राज्यांत प्रचारसभा घेताना दिसले. इकडे राजीव सातव, अविनाश पांडे, ज्योतीरादित्य शिंदे, सचिन पायलट, रणदीप सुरजेवाला, रजनीताई पाटील, प्रियंका गांधी-वड्रा अशा मोजक्या आणि तुलनेन नवख्यांना हाताशी धरून आणि अज्ञात समर्थकांच्या भरवशावर राहुल गांधी धावाधाव करत होते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar

.............................................................................................................................................

भाजपचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या राज्यात काम करत होते आणि त्यांचं अत्यंत सूक्ष्म नियोजन होतं. अमेठीतून राहुल गांधी पराभवाला सामोरे जाणार आहेत, याचा अंदाजच काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील कोअर टीमला नव्हता. काँग्रेसच्या नियोजनात तारतम्याचा अभाव कसा होता, तो बघा. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांना दिवसभरत जेवढे लोक भेटतात, जेमतेम तेवढे लोक ज्यांच्या सभेला जमतात अशा जनाधार नसलेले, पण सुशिक्षित, बुद्धिवंतांमध्ये चांगली प्रतिमा असणार्‍या पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर यांच्या सारख्यांना काँग्रेसनं त्या वर्गात बैठका घेण्याची जबाबदारी टाकायची सोडून ग्रामीण भागात सभा दिल्या. केतकर यांनी फक्त ज्या गावांची नावं ऐकली असतील अशा उदगीर, शिरुर ताजबंद, उमरगा अशा गावात जाहीर सभा काँग्रेसनं लावल्या, असं हे गलथान नियोजन.

तरी २०१४च्या निवडणुकीतला नवखेपणा आणि पक्षाच्या बुजुर्ग नेत्यांची साथ नसताना ‘वेडात दौडले वीर सात’च्या चालीवर राहुल गांधी देशभर प्रचारासाठी फिरत राहिले. या काळात त्यांनी १४५ जाहीर सभा घेतल्या आणि किमान २० रोड शो केले. अहमद पटेल, दिग्विजय सिंह, कमलनाथ, चिदंबरम, मोतीलाल व्होरा, अशोक गहलोत, शीला दीक्षित, कपिल सिब्बल,  मणीशंकर अय्यर, सलमान खुर्शिद, सुशीलकुमार शिंदे, असे काँग्रेसचे एकापेक्षा एक दिग्गज (?)  नेते कुठे होते? त्यांनी किती व कुठे प्रचार केला? हा एक संशोधनाचा विषय आहे.

पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाचा एकमेव अपवाद वगळता गांधी घराण्यातल्या अगदी कुणीही सत्ता मिळवून द्यावी आणि ती सुखनैव उपभोगावी ही बांडगुळी मानसिकता म्हणजे काँग्रेस, असं समीकरण गेल्या सुमारे चार दशकांत झालेलं आहे. अशा आणि बहुसंख्य मतलबी आणि खूषमस्कर्‍यांचा कळप म्हणजे काँग्रेस पक्षाचं विद्यमान स्वरूप असून या मतलब्यांनी काँग्रेसच्या विचारावर श्रद्धा असणारा कार्यकर्ता पक्षातून कधीच हद्दपार केला आहे.

तर दुसरीकडे देशातील जनमनावर काँग्रेस आणि गांधी घराण्याची असणारी मोहिनी असे वास्तव आहे. आज अडचणीत असला तरी काँग्रेस पक्ष कधीच संपणार नाही, हे चांगलं ओळखून असलेल्या या मतलबी काँग्रेसजनांना म्हणूनच राहुल गांधी हे नेता म्हणून हवे आहेत. अशी ही एकंदरीत काँग्रेस नावाची विद्यमान गुंतागुंत आहे. म्हणूनच पक्षाध्यक्षपद/लोकसभेतील गटनेते आणि पर्यायानं लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी असो वा नसो, या पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एक ‘गांधी’ हवा आहे आणि ती काँग्रेसची अपरिहार्य अगतिकताच आहे. म्हणूनच राहुल गांधी यांना पर्याय कोण, या प्रश्नाचं उत्तर ‘राहुल गांधी’, हेच आहे!

राहुल गांधी यांची कामगिरी तुलनेनं चांगली राहिली, हे म्हणण्याचं आणखी कारण म्हणजे विरोधी पक्षांच्या महाआघाडीतील नेते आणि त्यांच्या पक्षाची पार निराशाजनक कामगिरी. ही विरोधी आघाडी सक्रियपणे अस्तित्वात आली नाही, कारण त्या आघाडीचे कथित सूत्रधार, ‘कन्या विजयी झाली नाही तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल’ फेम शरद पवार महाराष्ट्रात (त्यातही बारामती आणि मावळ मतदार संघात) अडकून पडले तरी त्यांची लोकसभेची एक जागा कमीच झाली. ‘थयथयाट’फेम ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालात तब्बल १८ जागा भाजपनं जिंकल्या, उत्तर प्रदेशात मायावती यांचा हत्ती पराभवाच्या चिखलात फसला, तर अखिलेश यादव यांची सायकल पंक्चर झाली, विदूषकी चाळे करणारे ‘चारा घोटाळा’ फेम लालूप्रसाद यादव यांचा बिहारमधे धुव्वा उडाला, कर्नाटकात जनता दल युनायटेड या एका राज्यापुरत्या मर्यादित असलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं, ‘मतदान यंत्र कांगावा फेम’ चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशात साफ उताणे पडले, गवगवा झालेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीला विजयाचा किरणही दिसला नाही आणि कम्युनिस्टांचा पार पालापाचोळा झाला...

या सर्व थोर आणि अखिलेश वगळता पंतप्रधानपदाचं (ती नावं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी जाहीर केलेली असल्यानं शंकेला वावच नाही!) दिवास्वप्न पाहणार्‍या नेत्यांच्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी एका राज्यापुरते  मर्यादित राहिले नाहीत. देशातील विरोधी पक्षात मीच एकमेव राष्ट्रीय नेता आहे, ही प्रतिमा या निवडणुकीत निर्माण करण्यात राहुल गांधी यांना यश आलं. त्यांची कामगिरी किमान का होईना, देशभर चढती राहिली. बोलण्यात काही चुका झाल्या तरी एकमेव राहुल गांधी हेच नरेंद्र मोदी यांच्यासमोर जोशात उभे राहिले आणि यापुढेही उभे राहू शकतात हेच समोर आलेलं आहे. अपेक्षित विजय मिळाला नाही तरी लोकशाहीचा संकोच/अवमान होईल, असं कोणतंही वक्तव्य न करता त्यांनी पराभव उमदेपणानं स्वीकारला.

राजकारणात निवडणुकांतील जय-पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, हे कोणी समजावून सांगण्याइतके राहुल गांधी आता कच्चे खिलाडी नाहीत. पराभवाची चाहूल त्यांना लागलेली नव्हती, असंही म्हणता येणार नाहीच (पाचव्या फेरीच्या काळातच भाजपचा विजय असल्याचा ठाम संदेश फलोदी, आग्रा आणि सूरत सट्टा बाजारानं दिलेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंदाज भाजप २९८, मित्र पक्ष ४८, एकूण ३४६ असा असल्याचं संघातील एका सूत्रानं १२ मे रोजी पाठवलेल्या मेलमध्ये नमूद केलेलं होतं! हे आकडे अमेरिकेतील रवींद्र मराठे तसंच पत्रकार संजीव कुळकर्णी, श्रीकांत उमरीकर आणि डॉ. मिलिंद देशपांडे आशा काही मोजक्या मित्रांशी मी शेअर केले होते.)   

काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी कामाला लागण्याचे मनसुबे राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर ३३३ जागा मिळवण्याच्या दृष्टीकोनातून (संदर्भ ‘हिंदुस्तान टाईम्स’ या दैनिकाच्या २९ मे २०१९च्या अंकातील बातमी) भाजपनं आखणी सुरू केलेली असताना राहुल आणि काँग्रेस यांच्यासमोरील आव्हानं मोठी आहेत. राहुल गांधी यांच्या सभांना देशभर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. राजकीय सभांना गर्दी ‘जमवावी’ लागते, असा सरसकट युक्तीवाद कोणत्याही पक्षाच्या कुणाही नेत्याच्या बाबतीत खरा नसतो, असा गेल्या एक पत्रकार म्हणून चार दशकांचा माझा अनुभव आहे. ‘जमवलेली’ गर्दी जास्तीत जास्त ३० ते ४० टक्के असू शकते. राज ठाकरे यांच्या सभेला तर १५/२० टक्केही लोक ‘आणलेले’ नसतात, असं एका अत्यंत ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांनं सांगितलं होतं. प्रतिसाद पाठिंब्यात बदलवण्यात राज ठाकरे अयशवी ठरले. देशभर मिळालेला प्रतिसाद पाठिंब्यात परावर्तीत करण्यासाठी राहुल गांधी यांनाही निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. देशभरात काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील किमान १५०-२०० तरी तरुण गेले असावेत आणि पक्षानं दिलेल्या विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. अशा काहींच्या संपर्कात मी होतो. देशात नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल राहुल गांधी यांची क्रेझ आहे, हे या तरुणांनीही सांगितलं. त्या पार्श्वभूमीवर हा ‘प्रतिसाद ते पाठिंबा’ हा मुद्दा कळीचा आहे.

काँग्रेस पक्ष मागासवर्गीय आणि मुस्लिमांचे लांगूनचालन करतो, असे आरोप/दावे सातत्यानं करण्यात आलेले आहेत. परिणामी हिंदू मोठ्या प्रमाणात काँग्रेसपासून दूर गेले (आणि अखेर भाजपकडे वळले). इकडे प्रत्यक्षात आमच्यासाठी काँग्रेसनं केलं काय, असा सवाल उपस्थित करत हे समाजही म्हणजे मतदार काँग्रेसपासून दूर गेले. म्हणजे एकूण तीन जनाधार काँग्रेसपासून दुरावले. ते तिन्ही जनाधार पुन्हा काँग्रेससोबत जोडून घेणं, हेही राहुल गांधी यांच्या समोरचं एक आव्हान आहे. 

संघटनेची पुनर्बांधणी करणं आणि त्यासाठी खुर्च्या अडवून बसलेल्या मतलबी, खूषमस्कर्‍यांना कठोरपणे दूर करावं लागणार आहे. त्यासाठी ‘कामराज योजने’ची पुनरावृत्ती करायची वेळ आलेली आहे. राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडीयमवर उपाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताना कार्यकर्त्याला पुन्हा मानसन्मान, महत्त्व देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यासाठी एक योजनाही जाहीर केली होती, पण त्या योजनेला वर्षानुवर्षं सत्तेच्या खुर्च्या बळकावलेल्यांनी याच मतलबी आणि खूषमस्कर्‍यांनी  विरोध केला होता. अशा सर्वांना नारळ दिल्याशिवाय कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळणार नाही आणि संघटनेची पाळंमुळं गाव-वाडी-तांड्यापर्यंत घट्ट होणार नाहीत.

चांगले सल्लागार निवडून मोजकं, पण नेमकं बोलण्याचं भान राहुल गांधी यांना बाळगावं लागणार आहे. निवडणूक आणि आधीच्या काळात राहुल गांधी यांची जीभ अनेकदा घसरली हे समोर आलं. एकीकडे द्वेष न बाळगता प्रेमाची भाषा करायची आणि दुसरीकडे न्यायालयानं न दिलेल्या निर्णयाचे हट्टीपणे हवाले देणं, पंतप्रधानांना ‘चोर’ म्हणणं, नरेंद्र मोदी आणि भाजप फेकत असलेल्या आरोपांच्या जाळ्यात अलगद सापडणं... हा विरोधाभास आहे. त्यामुळे समोरच्याला हल्ला करण्याची संधी आपोआप मिळते.

गेल्या पाच वर्षांत राहुल गांधी हे आश्वासक नेते म्हणून समोर आलेले आहेत. काँग्रेसचं निवडणुकीच्या खडकावर आपटून भरकटलेलं काँग्रेसचं जहाज राजकारणाच्या सागरात पुन्हा आपणच डौलानं हाकू शकतो, अशी खात्री राहुल गांधी यांनी दिलेली आहे, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी संसदीय लोकशाहीत प्रभावी आणि प्रबळ विरोधी पक्ष हवाच असतो. काँग्रेसला तसा प्रभावी, प्रबळ पक्ष म्हणून उभा करण्यासाठी राहुल गांधी यांना शुभेच्छा!     

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 08 June 2019

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर. तुम्ही कितीही म्हंटलंत तरीही पप्पू बावळट आहे तो आहेच. हिंदू मतदार दुरावला म्हणून २०१४ साली काँग्रेसचा पराभव झाला हे चौकशीत अँथनी समितीने शोधून काढलं. बरोबर? मग राहुल गांधी 'हिंदू दहशतवादाची भलामण केली ती चूक होती' असं स्पष्टपणे का बोलले नाहीत? सरळ चूक कबूल केली असती तर बराच फरक पडला असता ना? याउलट राहुल गांधी हिंदू मंदिरांना भेटीगाठी देत बसले. लोकांना स्वत:सारखे बावळट समजतात का ते? म्हणून मी म्हणतो की पप्पू बावळट आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......