डॉ. नरेंद्र दाभोलकर २० ऑगस्ट २०१३ रोजी हुतात्मा झाले. त्यानंतरच्या चार-साडेचार वर्षांत अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी विविध वर्तमानपत्रे, मासिके व नियतकालिके यांत केलेल्या लिखाणाचे ‘विवेकाच्या वाटेवर - उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट’ हे पुस्तक राजहंसकडून नुकतेच प्रकाशित झाले आहे.
या पुस्तकात चार मुख्य विभाग आहेत -
१) बाबांना आठवताना... (५ लेख)
२) अंनिसच्या आघाडीवर (२२ लेख)
३) मारेकऱ्यांच्या शोधात (८ लेख)
४) साधना आणि परिवर्तन (२ लेख)
हे पुस्तक अंनिस व कार्यकर्त्यांच्या कामाचे तसेच भूमिकेचे ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन आहे. अंनिसबद्दल असलेले काही गैरसमज खोडून काढणारे काही लेख यात आहेत. यापुढील महाराष्ट्र अंनिसचे काम कोणत्या दिशेने असेल याचे काही संकेतसुद्धा या पुस्तकातून मिळतात.
पुढील उतारे याच पुस्तकातून घेतले आहेत.
...........................................................................................................................................
कुछ बनो!
या समाजात विज्ञाननिष्ठा वाढावी, शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांचा बिमोड व्हावा, धर्मामधील चुकीच्या गोष्टींची विधायक चिकित्सा व्हावी, समाजात जाती धर्मविरहित मानवतावादाची जोपासना व्हावी, यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर काम करत होते. स्वाभाविकच आहे; ज्यांना या समाजामध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती नको आहे, अंधश्रद्धांचा अंधार टाकण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, धर्माला मानवतावादी रूप येण्याऐवजी त्याचे कट्टरीकरण करणे हवे आहे; अशाच प्रवृत्ती डॉ. दाभोलकरांच्या खुनामागे असण्याची सगळ्यात मोठी शक्यता आहे, नाही का?
‘गप्प बसा’ संस्कृतीत बुवाबाजीचे पीक
लोकांच्या बाबाबुवांच्या मागे लागण्याचा सर्व कारणांच्या मुळाशी जर आपण सुरुवात केली, तर आपल्या समाजातील ‘गप्प बसा’ संस्कृती हे अगदी मूलभूत कारण दिसून येते. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणे, हे आपल्या समाजात उद्धटपणाचे लक्षण समजले जाते. ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ हे आदर्श विद्यार्थ्यांचे मापदंड असलेल्या समाजात चिकित्सेशिवाय गोष्टी स्वीकारणारी प्रजा निपजणे यामध्ये काहीही नवल नाही. ही चिकित्सा जर देव आणि धर्म या संकल्पनांची असेल, तर हे पेच जीवघेणे होऊ शकतात. बाबाबुवांनी केलेल्या कोणत्याही दाव्यांची तपासणी करायची नाही, असा सामाजिक समज निर्माण होण्यास हे अगदी पूरक वातावरण पुरवतात. समाजातील लाखो सुशिक्षित लोक जर इतकी साधी चिकित्सा करायला अपयशी ठरत असतील; तर ते केवळ त्या व्यक्तीचे नव्हे तर आपल्या शिक्षणपद्धतीचे अपयश ठरते.
काळाराम मंदिर ते शनिशिंगणापूर व्हाया पंढरपूर सत्याग्रह
आपण शनिशिंगणापूर सारखी आंदोलने करून आधीच धर्मचिकित्सेला अनुकूल नसलेल्या समाजातील धर्मभोळेपणा तर वाढवत नाही ना -त्याचीदेखील चर्चा करणे अस्थानी ठरू नये. बाबासाहेब आंबेडकरांचे काळाराम मंदिरात दलितांना प्रवेशाविषयीचे आंदोलन, साने गुरुजींचे पंढरपूरमधील आंदोलन, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेत्तृत्वाखाली झालेले शनिशिंगणापूरचे आंदोलन या सर्व आंदोलनांवर हा आक्षेप घेण्यात आला होता, म्हणून त्याचे उत्तर समजून घ्यायला पाहिजे. त्याचे उत्तर हे भारतीय संविधानाने देव आणि धर्म यांच्याविषयी घेतलेल्या आणि महाराष्ट्र अंनिसने अंगिकारलेल्या भूमिकेमध्ये आहे. ही भूमिका एका बाजूला व्यक्तीला धर्म आणि देव मानण्याचे स्वातंत्र्य देते आणि दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करून जर कोणी शोषण करत असेल तर त्याला नकार देते अथवा व्यक्तीव्यक्तीमध्ये असमानता करत असेल, तर त्याला नकार देते. उपासनास्वातंत्र्याचा स्वीकार आणि भेदभावाला नकार - अशी ही भूमिका आहे आणि आपण इतिहासात डोकावून बघितले, तर वेळ लागला असला तरी विजय याच भूमिकेचा झालेला दिसतो. जरी मोठ्या प्रमाणात महिलांना प्रवेश नाकारणारी मंदिरे आपल्याला दिसतात, तरी दलितांना प्रवेश नाकारला जाणाऱ्या मंदिरांची संख्या खूपच कमी झाली आहे. शनिशिंगणापूरच्या प्रथेच्या विरोधात पंधरा वर्षांपूर्वी केवळ महाराष्ट्र अंनिस लढाई देत होती. आज अनेक स्त्री संघटना त्याविषयी भूमिका घेतात. या गोष्टी आपल्याला हा विश्वास देत राहतात की, आपण योग्य विचार समाजात पेरले आणि त्याची निगराणी करत राहिलो; तर वेळ लागतो, पण बदल घडून येतो.
विवेकाची वारी
महाराष्ट्र अंनिसविषयी हे देव आणि धर्म बुडवायला निघालेले लोक आहेत, असा अपप्रचार सुरुवातीपासूनच अत्यंत सातत्याने केला गेला. खरे तर अंनिसची भूमिका ही देव आणि धर्म यांच्याविषयी भारतीय संविधानाला अनुसरून तटस्थतेची आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचा देव आणि धर्म मानण्याचे तसेच न मानण्याचे देखील स्वातंत्र्य भारतीय संविधान देते. अंनिस या गोष्टीचा आदर करते. देवाच्या आणि धर्माच्या नावावर जेथे शोषण केले जाते, त्या ठिकाणी मात्र अंनिस चिकित्सेचा आग्रह धरते. ही चिकित्सा विधायक, कृतिशील आणि देवाच्या, धर्माच्या अर्थाला कालसुसंगतता देणारी असावी, अशी मांडणी अंनिस करते. गणेश उत्सव कालसुसंगत व्हावा, म्हणून अंनिस ने केलेली ‘पर्यावरणपूरक गणपती’ ही मोहीम, ‘फटाकेमुक्त दिवाळी’, होळीनिमित्त सुरु केलेला ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ हा उपक्रम, बकरी ईदला मुस्लीम सत्यशोधक मंडळाबरोबर घेतलेला रक्तदानाचा कार्यक्रम, या सर्व मोहीमा अंनिसच्या वरील भूमिकेला अनुसरूनच राहिलेल्या आहेत. यामध्ये कोठेही ‘देव आणि धर्म सोडा आणि मगच हे काम करू’ असा आमचा आग्रह नाही. आपल्या श्रद्धा आणि धारणा तपासून पाहाव्यात आणि काळाच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर त्या टिकत नसतील, तर बदलण्याचा प्रयत्न करावा, अशी ही भूमिका आहे. समाजात बदल करायचा असेल; तर समाजाबरोबर चालत चालत, सहृदय पद्धतीने संवाद करताच बदल केला जाऊ शकतो, ही अंनिसची सुरुवातीपासूनची धारणा राहिली.
जातपंचायतीला मूठमातीतून जातिअंताकडे जात येईल का?
केवळ कायद्याने सगळे होईल, या भ्रमामध्ये आपण राहणे योग्य नाही. कायदा आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी हातामध्ये हात घालून गेल्या, तरच टिकाऊ बदल होऊ शकतो, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. केवळ प्रबोधनाच्या जोरावर गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र अंनिसने अकरा जातपंचायती बरखास्त करण्यात यश मिळवले, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. असे असले, तरी अजूनही महाराष्ट्रात शेकडो जातपंचायती आणि गावक्या अजून अस्तित्त्वात आहेत. या कायद्याच्या निमित्ताने त्यांच्याविषयी सविस्तर चर्चा होऊन ठोस कृती केली; तर असंख्य पीडितांना न्याय तर मिळेलच...
धर्माच्या नावावर...
या समाजातील बहुतांशी माणसे धार्मिक असली; तरी सहिष्णू आणि चिकित्सा स्वीकारणारी आहेत, हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. या देशामधील धार्मिक कडवेपणाला रोखण्याचे काम याच समूहाने आजवर प्रामुख्याने केले आहे, हे आपण विसरता काम नये. म्हणून वारकरी पंथाचे कट्टरीकरणाचे प्रयत्न, त्यांचे असहिष्णू वागणे हे जास्त गांभीर्याने घ्यायला पाहिजे असे वाटते. धार्मिक विद्वेष जाणीवपूर्वक वाढावा, असे प्रयत्न ज्या कालखंडात मोठ्या प्रमाणात केले जात आहेत; त्या कालखंडात परधर्म सहिष्णुताही फार मोलाची आहे. परधर्माचा प्रति विद्वेषाची भावना निर्माण करून आपल्या मतपेट्या बांधण्याचे काम या देशातील बहुतांश सर्व पक्ष गेली अनेक वर्षे इमानइतबारे करत आले आहेत आणि त्याला इथली जनता बळी पडत आली आहे. आपल्या धार्मिक आचरणाचा गैरफायदा घेऊन आपल्याला मानवकेंद्री धार्मिक मूल्यांपासून दूर तर नेले जात नाही ना? हा प्रश्न आपण सर्वांनी परधर्मविद्वेषाच्या विचारांना बळी पडण्याआधी स्वतःला विचारायला हवा. धर्माचे कट्टरीकरण जर टाळायचे असेल तर धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा ही खूप महत्त्वाची आहे.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाला बळ द्यायला हवे
एका धर्मातील धर्मांधता ही दुसऱ्या धर्मातील धर्मांधतेला बळ देते, असा आपल्याकडे सार्वत्रिक अनुभव आहे. हिंदुत्त्वाची राजकारण करणारे पक्ष आणि मुस्लीम धर्माचे राजकारण करणारे पक्ष हे बाहेरून एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत असले; तरी प्रत्यक्षात हे पक्ष हे दोन्ही धर्मातील विचार करू इच्छिणाऱ्या, कट्टरीकरणाला विरोध करणाऱ्या आणि धर्माच्या नावावर सहिष्णुतेला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आपले पाठबळ हे दुसऱ्या कट्टर शक्तींच्या अस्तित्त्वाने वाढत असते, याची दोन्ही धर्मातील धर्मांध शक्तींना नीट जाणीव असते. संविधानाच्या चौकटीत राहून धर्माची चिकित्सा करू इच्छिणाऱ्या शक्ती मात्र एकमेकांशी संवाद करण्यात कायमच कमी पडताना दिसतात. धर्माधर्मांतील तेढ जाणीवपूर्वक वाढवावी, त्यातून निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमध्ये आपली पोळी भाजून घ्यावी, असा प्रचलित राजकारणाचा कल आहे. या पार्श्वभूमीवर प्रबोधनाच्या इतर सर्व संस्था, संघटना आणि चळवळींनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा नरेंद्र दाभोलकर यांचा विचार आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा हमीद दलवाई यांचा विचार पुढे नेणारी एक दलवाई-दाभोलकर विचार परंपरा घडवण्याचे आव्हान परिस्थितीने आपल्यापुढे ठेवले आहे. त्याला सामोरे जाण्याचा निर्धार आपण केला पाहिजे.
यज्ञाचे कर्म कि माणुसकीचा धर्म?
स्वतःच्या अतृप्त इच्छापूर्तीसाठी यज्ञयाग करणे, ही पूर्णतः अवैज्ञानिक कृती आहे. त्यामध्ये कोणताही कार्यकारण भाव स्पष्ट करता येत नाही., म्हणूनच महाराष्ट्र अंनिस सातत्याने यज्ञयागाला विरोध करीत आलेली आहे. यज्ञ आयोजन करणाऱ्यांचा हेतू खरेच विश्वशांती करणे आहे, असे जरी आपण मानले; तरी सीरियातील युद्ध, नायजेरियातील बोको हरमच्या हिंसक कारवाया. इसिसचे दहशतवादी राज्य, अमेरिकेतील वंशद्वेषी हलले हे कमी करून शांतता प्रस्थापित करणे हे तर खूप दूरची गोष्ट आहे; पण आपल्या देशातील वाढते द्वेषमूलक वातावरण कमी करणे आणि यज्ञ यांचा काहीही संबंध बुद्धीला जोडता येऊ शकत नाही. फार तर विश्वशांतीसाठी आपण प्रयत्न केले, याचे समाधान यज्ञ करणाऱ्या लोकांना मिळू शकेल; पण ती भावना वास्तवाला धरून नसेल. वास्तवाला धरून नसलेली भावना ही तात्पुरती शांतता देत असली, तरी दीर्घकालीन प्रवासात अशांतताच निर्माण करते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
आपली मुले हिंसक होत आहेत का?
टोकाची हिंसा करणारी मुले समाजात अचानक निर्माण होत नाहीत. कुटुंबात, शालेय आणि महाविद्यालयीन व्यवस्थेमध्ये ते आपल्या वेगळ्या वागण्याची झलक आधी दाखवत असतात. शाळेतील विविध नियम मोडण्याकडे त्यांचा कल असतो. व्यसन, पोर्नोग्राफी अशा गोष्टी त्यांच्याबाबतीत उघडकीस येऊ शकतात. दुसऱ्याला त्रास देताना त्यांना फारसे वाईट वाटत नाही. त्यांच्या पालकांकडे त्यांना द्यायला वेळ नसतो किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याचे समर्थन हे पालक करताना दिसतात. अशी मुले वेळीच ओळखणे आणि त्यांना समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे यासाठीची यंत्रणक समाज म्हणून आपण तयार केली पाहिजे. आपल्याला या मुलांचा द्वेष करायचा नसून त्यांच्यामध्ये होणाऱ्या हिंसक प्रवृत्तीचा नाश करायचा आहे, हे आपण नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. याच्याच सोबतीला शिक्षणात केवळ अभ्यासामध्ये यशस्वी होण्याला दिले जाणारे अतिरिक्त महत्त्व कमी केले पाहिजे. ताण सहन करण्याची क्षमता वाढवणे, अपयश पचवणे, नकार पचवणे अशी महत्त्वाची जीवन कौशल्येदेखील अभ्यासक्रमात यायला हवीत. यशस्वी करियर व्यतिरिक्त एखादा खेळ खेळता येणे, एखादा छंद असणे हेदेखील महत्त्वाचे आहे, हे आपण मुलांना सांगितले पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात अर्थपूर्णता वाटू लागली, तर दुसऱ्याला हिंसेने त्रास देण्याची गरज मुलांना वाटणार नाही.
गोळीने विचार मारता येतात का?
अंनिसच्या स्थापनेला दोन वर्षांनी तीन दशके पूर्ण होतील. कुठल्याही सामाजिक चळवळीचे प्राथमिक मूल्यमापन करण्यासाठी हा कालावधी पुरेसा ठरावा. या सगळ्या कालखंडात अंनिस एक सामाजिक चळवळ म्हणूनच काम करत राहिली. रूढ अर्थाने ज्याला राजकारण म्हटले जाते, त्यामध्ये अंनिसने कधीही थेट सहभाग घेतला नाही. पण अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे व्यापक अर्थाने राजकारणच आहे, अशी भूमिका समितीने सातत्याने मांडली... हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्तासंबंधांची पुनर्मांडणी करण्याचे काम करत राहणे, या अर्थाने समजून घ्यावे. राज्यघटनेला अपेक्षित असलेली मूल्ये दैनंदिन आयुष्यात वास्तवात यावीत, यासाठीची ही लढाई असणे अपेक्षित आहे. पण अशा स्वरूपाचे विवेककारण करण्यासाठी काही कठोर पूर्वअटी आहेत. त्यातील पहिली अट म्हणजे त्या संघटनेतील कार्यकर्त्यांनी स्वतः विवेकी राहण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे. दुसरी अट म्हणजे केवळ विचार मांडण्यापर्यंत न थांबता शक्य त्या ठिकाणी कृतिशील हस्तक्षेप करणे. तिसरी अट अशी की या स्वरूपाची कृती करू इच्छिणाऱ्या लोकांचे संघटन बांधणे. चौथी आत ही कि, अशा प्रकारच्या संघटनेचे अर्थकारण हे कोणत्याही हस्तक्षेपाच्या पलीकडे ठेवणे. पाचवी अट अशी की, केवळ प्रतिक्रियावादी न बनता सातत्याने आपली भूमिका विवेकी विचारणा अनुसरून ठेवण्याचा प्रयत्न करणे. शेवटची आणि महत्त्वाची अट अशी, की समाजातील व्यापक हितसंबंधांची पुनर्मांडणी करणारा कुठलाही सामाजिक लढा हा व्यापक अर्थाने राजकीयच असतो, याचे भान न गमावणे. उन्नत राजकारण निर्माण होण्यासाठी उन्नत समाजकारण करू इच्छिणारे विवेककारां म्हणूनच आवश्यक ठरते, असे वाटते. समाजकारण आणि राजकारण यांच्या बदलत्या संबंधातून निर्माण होणारे प्रश्न हे लोकशाही प्रजासत्ताकाची अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतात. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांचे आपण स्वागत केले पाहिजे.
पण ही लढाई केवळ राजकीय पातळीवरदेखील लढून पुरे पडणार नाही. राजकारणाच्या पलीकडे सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर लढणाऱ्या संस्था-संघटनांनी जराही मागे न हटता आणि एकमेकांच्या हातात घालून आपले लढे अधिक तीव्र आणि अधिक व्यापक केला पाहिजेत. आणखी एक गोष्ट आपल्याला करावी लागेल. आर्थिक विकासाने सर्व प्रश्न आपोआप सुटतील असे वाटणारा जो मोठा वर्ग या समाजात तयार झाला आहे; त्याला केवळ झोडपत बसण्यापेक्षा आपण त्या वर्गाला आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक न्याय लोकशाहीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, हे सांगणे सुरू केले पाहिजे. धार्मिक कट्टरवाद आणि हिंसा या आर्थिक विकासासाठी मारक आहेत हे त्या वर्गाला पटवून दिले पाहिजे. खास करून या वर्गामधील जे तरुण-तरुणी अपुऱ्या आकलनामुळे सामाजिक न्यायाच्या प्रश्नाशी स्वतःला जोडून घेत नाहीत, त्यांच्यावर आपण पहिले लक्ष केंद्रित केले पाहिजे.
...........................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar
...........................................................................................................................................
लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.
creativityindian@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 08 June 2019
दाभोलकरांनी केलेले फ्रॉड वाचायला मिळतील का पुस्तकात? साधना व परिवर्तन या दाभोलकरनच्या न्यासांचे हिशोब कित्येक वर्षं धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केले नव्हते. परिवर्तन न्यासास स्विस एड या स्वित्झर्लंडस्थित संस्थेकडून मदत येत असे. ती मदत मिळावी म्हणून दाभोलकर सेंद्रीय शेती करतात असं दाखवलं होतं. दाभोलकर अशी कुठली थोर शेती करीत होते की स्वित्झर्लंड मधून पैसा आणण्याची गरज पडावी? ज्या कामासाठी पैसा आलाय त्या कामासाठीच तो वापरावा असा कायदा आहे. मग अनिस सेंद्रीय शेती करणार का? नसेल तर हा कायदाभंग नव्हे का? दाभोलकरांनी हिशोब सदर केले नसल्याने नेमका किती पैसा त्यांना मिळाला हे कोणालाही माहित नाही. कशावरनं हा पैसा नक्षल्यांच्या हातात पडला नसेल? कशावरनं दाभोलकरांनी हा पैसा उधळल्याने नक्षल्यांनी त्यांची हत्या केली नसेल? हत्येच्या वेळेस दाभोलकर पुण्यात आहेत हे त्यांच्या जवळच्या ( म्हणजे साधना व परिवर्तन न्यासाच्या ) लोकांनाच माहित असणार. कारण त्यांची ही भेट अकल्पित होती. मग हिंदुत्ववादी संस्थांवर संशयाची सुई कशासाठी? एक घोटाळेबाज माणूस घोटाळे केल्याने माफियांच्या हाती मारला जातो. आणि त्याची पावती मात्र हिंदुत्वावर फाडली जाते. खासा न्याय आहे. -गामा पैलवान
SUDHIR PATIL
Mon , 03 June 2019
खूप छान लेख....