महर्षि शिंदे यांच्या ‘बहुजनवादा’चा स्वीकार आपल्या राजकीय पक्षांनी केवळ मतांच्या राजकारणापुरताच केला!
ग्रंथनामा - झलक
सुहास कुलकर्णी
  • ‘विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना’चे मुखपृष्ठ
  • Fri , 31 May 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना Vitthal Ramji Shinde Samjun Ghetana सुहास कुलकर्णी Suhas Kulkarni

पत्रकार, राजकीय अभ्यासक सुहास कुलकर्णी यांच्या ‘विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना’ या पुस्तकाची नुकतीच दुसरी आवृत्ती समकालीन प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झाली आहे. अस्पृश्यता निर्मूलन, बहुजन विचार, राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि उदार धर्म यांची ऐतिहासिक गुंफण करणारे आद्य सुधारक म. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या योगदानाची चर्चा करणारे हे पुस्तक आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

भारताच्या इतिहासात सांस्कृतिक क्रांती घडवून आणणारे महात्मा फुले व राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे महात्मा गांधी यांचे ऐक्य शिंद्यांच्या व्यक्तिमत्त्वात व विचारांत घडलेले दिसते. त्यांच्या विचार व कार्यावरून एक ओझरती नजर टाकली, तरी या दोन महामानवांच्या भूमिकांचे संश्‍लेषण शिंद्यांच्या व्यक्तिमत्त्वात घडलेले दिसते. त्यामुळेच ‘धर्मउच्छेद न करणारे फुलेवादी’ व ‘जातिप्रश्‍न हाताळणारे गांधीवादी’ अशा दोन भूमिकांचं ऐक्य शिंद्यांनी स्वत:मध्ये घडवलं होतं. (कुलकर्णी सुहास १९९८, पान २६८). शिंद्यांनी फुल्यांकडून अस्पृश्यांचा-बहुजनांचा-स्त्रियांचा-शेतकर्‍यांचा प्रश्‍न लावून धरण्याचा कार्यक्रम स्वीकारलेला दिसतो, तर गांधींकडून राष्ट्रीय स्वातंत्र्याची निकड स्वीकारलेली दिसते.

शिंदे ज्या काळात कार्यरत होते, त्या काळात बहुजन वर्गाचे हितसंबंध हे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीशी सुसंगत नाहीत, असे मानले जात असे. मात्र, शिंद्यांनी महात्मा फुले व महात्मा गांधी यांच्या विचारांचे ऐक्य घडवून ‘बहुजन-शेतकर्‍यांसाठी राष्ट्रीय स्वातंत्र्य’ ही बाब पुढे आणली. त्यातूनच स्वातंत्र्यपूर्व काळात या वंचित वर्गाची काँग्रेसशी व स्वातंत्र्योत्तर काळात या वर्गाची भारतीय लोकशाहीशी नाळ जोडली गेली. शिंद्यांच्या या योगदानाकडे आजवर सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

बहुजन विचार

एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतीय इतिहास ज्या पद्धतीने मांडला जात होता, त्यापेक्षा निराळ्या पद्धतीने त्याकडे महात्मा फुल्यांनी पाहिले. आक्रमक आर्य आणि मूळचे आर्यपूर्व वंश यांच्यातील संघर्ष, या संघर्षातून निर्माण झालेली चातुर्वर्ण्य व्यवस्था, चातुर्वर्ण्यातून उत्पन्न झालेली गुलामगिरी आणि तिच्या मुळाशी कार्यान्वित होत असलेले वर्गीय हितसंबंध यांची स्थूलमानाने का होईना मांडणी महात्मा फुले यांनी केली.

आर्यवंश हा श्रेष्ठ वंश आणि भारतीय इतिहासात मानवाच्या संस्कृतीचा उगम आर्यांच्या विकासातून झाला, अशी मांडणी फुल्यांपूर्वी होत असे. फुल्यांनी ही मांडणी उलटवली व आर्यांच्या विकासातच आर्यपूर्व वंशांचे शोषण दडले आहे, असे त्यांनी मांडले. या मांडणीला ‘अब्राह्मणी दृष्टिकोनातून इतिहासाचे केलेले विश्‍लेषण’ असे मानले, तर डॉ. आंबेडकरांनी ही मांडणी अधिक नेटकेपणाने, टोकदारपणे आणि इतिहासातील दाखले देऊन पुढे नेली, असे म्हणता येईल. विठ्ठल रामजी शिंदे यांनी एवढ्या टोकदारपणे मांडणी केलेली नसली तरी त्यांच्या मांडणीची दिशा तीच होती.

भारताचा इतिहास वेदांपासून व आर्यांपासून सुरू होतो हे शिंद्यांनी मानले नाही, उलट आर्यपूर्व समाजव्यवस्था व त्या समाजव्यवस्थेचे भारतीय इतिहासातील योगदान त्यांनी मांडले. भारतीय इतिहासाकडे साधारणत: संस्कृत भाषेच्या माध्यमातून व संस्कृत ग्रंथांतील दाखल्यांमधून बघितले जाते. मात्र, शिंद्यांनी संस्कृतप्रमाणेच बौद्ध धर्माने विकसित केलेल्या पाली ग्रंथाचा पुराव्यांसाठी उपयोग केला. शिंद्यांनी भगवद्गीतेसंदर्भात जी मांडणी केली, ती रूढार्थाने अब्राह्मणी-अवैदिक परंपरेतील मानली जात नाही; कारण ती फुले-आंबेडकरांच्या मांडणीपेक्षा वेगळी होती. मात्र, गीतेसंदर्भात त्यांचा स्वतःचा एक विचारव्यूह होता व तो वैशिष्ट्यपूर्ण होता. मूळ गीता हा ग्रंथ स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या विरोधी नसून भक्तिप्रधान व वेदप्रामाण्य नाकारणारा आद्य ग्रंथ होता व त्याचा कर्ता श्रीकृष्ण हा उदारधर्मी भागवत धर्माचा आद्य संस्थापक होता, अशी मांडणी त्यांनी केली होती. कृष्णापासून सुरू होणारी वेदप्रामाण्यविरोधी परंपरा बुद्ध-महावीर-वारकरी संत व प्रार्थना समाज पुढे नेत आहेत, असा त्यांचा दृष्टिकोन होता. वारकरी संत हेही वैदिक नसून अवैदिक होते व त्यामुळेच ते रामदासस्वामींच्या महाराष्ट्रधर्मापेक्षा निराळी मूल्ये रुजवत होते, असे त्यांचे म्हणणे होते.

शिंद्यांच्या वैचारिक विकासाचा विचार करता ते आयुष्यभर न्यायदायी-बहुजनप्रधान - समताधिष्ठित - अवैदिक - अब्राह्मणी - आर्यपूर्व संस्कृतीशी नाळ जोडणारी व माणसामाणसांतील संबंध प्रतिष्ठेचे नि बंधुत्वाचे असावेत अशी धर्मपरंपरा शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळेच त्यांनी अशा उदार धर्मपरंपरेची मांडणी करण्याचा प्रयत्न केला, ज्यात वरील अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. त्या परंपरेची मांडणी करत असताना त्यांनी भारतीय इतिहासातील वैचारिक संघर्ष हा ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारांमध्ये होता, ही बाब अधोरेखित केली. या अर्थाने त्यांनी फुल्यांचा अब्राह्मणी विचारांचा व मांडणीचा वारसा पुढे चालवला. अस्पृश्यतेबद्दल, जातिव्यवस्थेबद्दल व अस्पृश्यता निर्मूलनाबद्दल अन्य हिंदुधर्मीय सुधारकांपेक्षा ते अधिक खोल व मूलभूत विचार का करू शकले, याचे कारण त्यांच्या ठायी हा अब्राह्मणी दृष्टिकोन होता, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. (कुलकर्णी सुहास, १९९८, पान २७१).

भारतीय समाजाच्या दुखण्याचे मूळ जातिव्यवस्थेत आहे, हे जसे शिंद्यांना स्पष्ट होते, त्याचप्रमाणे जात आणि वर्ग यांच्यातील संबंधांचे भानही त्यांना होते. वसाहतकाळामध्ये जाती वर्गग्रस्त व वर्ग जातिग्रस्त होत असल्याची प्रक्रिया त्यांना जाणवली होती आणि म्हणूनच जाती विमोचन आणि वर्गीय संघर्षास ते सारखेच महत्त्व देत होते. (यशवंत सुमंत व दत्तात्रय पुंडे, १९८८, पान १८) महात्मा फुल्यांनी तत्कालीन भारतीय समाजाची ‘शेटजीभटजी’ व ‘शूद्रातिशूद्र’ अशी हितसंबंधांनुसार जी विभागणी केली होती, त्यात शिंद्यांनी काळानुरूप भर घातली. ब्राह्मण-पुरोहित आणि जमीनदार-सावकार या शोषक वर्गास इंग्रजी साम्राज्यशाही व भांडवलदार वर्गाची साथ आहे, असे विवेचन त्यांनी केले. अस्पृश्यादी बहुजन समाजाला या चार शोषकांविरुद्ध लढावे लागेल हे त्यांच्या ध्यानात आले होते व त्यामुळेच ते खेड्यापाड्यांतील अस्पृश्य व शेतकरी आणि शहरातील कामगार यांची जूट करू पाहत होते. शेतकरी व कामगार या उत्पादक शक्ती एकत्र आल्या, तर त्या या चार शोषकांना वठणीवर आणू शकतात, असे त्यांनी स्पष्टपणे मांडले होते.

‘शेतकरी-कामगार यांची एकजूट’ करण्याचा विचार हा त्या काळातील क्रांतिकारक विचार म्हटला पाहिजे. शिंदे ज्या समाजघटकांची एकजूट करू पाहत होते, ते सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या वंचित वर्ग होते. या वर्गांना जातिबद्ध समाजाचा जाचही होता. त्यामुळे जातिबद्ध समाजाचे अन्याय्य स्वरूप पालटवायचे असेल, तर त्याच्या पायाशी असलेले आर्थिक हितसंबंध बदलावे लागतील, याचे भान शिंद्यांना होते. अस्पृश्य-कुणबी-मराठा जातींना ते त्यासाठीच आर्थिक आधारावरील कार्यक्रम सुचवू पाहत होते. कुणबी-मराठा समाजाने ‘जातीय’ हितसंबंधांपायी एकत्र येण्याऐवजी शेतकरी-कामगार या ‘वर्गीय’ स्वरूपातील हितसंबंधांसाठी एक व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता. (कुलकर्णी सुहास, १९९८, पान २७३)

मराठा पुढार्‍यांनी ‘ब्राह्मणेतर अस्मिते’चे राजकारण करण्याऐवजी ‘बहुजन जुटी’चा कार्यक्रम स्वीकारायला हवा, असाही त्यांचा आग्रह होता. ‘ब्राह्मणेतर’ या शब्दास व संकल्पनेस त्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता, कारण ‘ब्राह्मणेतर’ हा शब्द जातिवाचक व संकुचित आहे, असे त्यांचे म्हणणे होते. नाईलाज आणि बलहीनता ही मागासलेल्या वर्गांची मुख्य लक्षणे ‘ब्राह्मणेतर’ या जातीविशिष्ट शब्दात काटेकोर रीतीने सार्थ होत नाहीत, म्हणून ‘बहुजन’ हा निर्विकल्प शब्द आपण पुढे आणला, असे त्यांचे म्हणणे होते. आपल्या या भूमिकेमुळे त्यांनी ‘विद्याबळ-द्रव्यबळ किंवा अधिकारबळाने पुढारलेला एक वर्ग’ व ‘यातील कोणतेच बळ अंगी नसल्याने नाईलाजाने मागासलेला बहुजन समाज हा दुसरा वर्ग’ असे दोन वर्ग कल्पिले. समाजाचे जातीय नव्हे तर वर्गीय हितसंबंध स्पष्ट व्हावेत, व्यक्त व्हावेत व लढवले जावेत असा त्यांचा प्रयत्न होता. आपल्या ‘बहुजन पक्षा’च्या पायाखाली केवळ (जातीच्या) पोकळ भावना नसून भरीव (आर्थिक) हितसंबंध आहेत असे ते म्हणत, ते त्यामुळेच. आपल्या पक्षामार्फत शिंदे ज्यांचे हितसंबंध राखू पाहत होते, ते सर्व घटक निम्नजातीय व निम्नवर्गीय होते, ही बाब येथे विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखी आहे.

‘बहुजन’ कोण आहेत, याचीही नेमकी मांडणी त्यांनी केली होती. स्वत: शेती कसणारा व जमीनदार नसणारा शेतकरी, हातावर शिर घेऊन लढणारा शिपाई वर्ग, शास्त्री-पुरोहित वगैरे ऐतखाऊ नसणारा व वाङ्मयाचे नि उद्यमाचे शिक्षण देणारा शिक्षक, सुतार-सोनार-शिंपी-तेली-तांबोळी-गवळी इत्यादी लहान धंदे करणारा उदमी, व्याज देऊन दुसर्‍याचे भांडवल वळवून आणून गबर होणारे पेढीवाले नसलेला दुकानदारवर्ग, अंगमेहनत करणारा मजूरवर्ग, अस्पृश्यवर्ग आणि स्त्रीवर्ग असे आठ वर्ग शिंद्यांनी आपल्या ‘बहुजन वर्गा’त गृहीत धरले होते. आजच्या भाषेत बोलायचे तर दलित, अन्य मागासवर्गीय आणि स्त्रिया यांची आघाडी शिंद्यांनी आपल्या ‘बहुजन’ संकल्पनेत घडवली होती.

शिंद्यांनी १९२० मध्ये जी ‘बहुजन’ संकल्पना मांडली, ती पुढे महाराष्ट्राच्या व नंतर देशाच्याही राजकारणात स्वीकारली गेली. मात्र, शिंद्यांनी ज्या भूमिकेतून बहुजन संकल्पना साकारली होती, त्यातील गांभीर्य आजच्या राजकारणात दिसत नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या राजकारणावरून नजर फिरवली असता असे दिसते की, स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने, त्यातून फुटून बाहेर पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाने व ऐंशीच्या दशकात पुढे आलेल्या बहुजन समाज पक्षाने बहुजनकेंद्री राजकारण केले. या राजकारणाला बहुजन जनतेचा पाठिंबा मिळत असलेला पाहून मंडल आयोगानंतरच्या काळात जनता परिवारातील पक्षांसह भारतीय जनता पक्ष आणि देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी स्वतःचे बहुजनीकरण करण्याचा सपाटा लावला. या प्रक्रियेमुळे आपल्याकडील पक्षांच्या संरचनेमध्ये बदल झाले व बहुजन समाजाला पक्षांमध्ये अधिक वाटा मिळू लागला. मात्र ज्या पक्षांनी स्वतःला ‘बहुजन समाजाचे हित सांभाळणारे’ व ‘सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते’ असल्याचे म्हणवून घेतले, त्यांनी ही प्रक्रिया प्रामुख्याने राजकीय पाठिंबा वाढवण्यापुरतीच स्वीकारली. या प्रक्रियेमुळे सर्व राजकीय पक्षांचा सामाजिक पाया कमी-अधिक प्रमाणात विस्तारला व एकूण राजकीय व्यवस्थेवर बहुजन समाजाचा दाबही निर्माण झाला. मात्र, आपल्या पक्षांनी बहुजनवादाचा स्वीकार केवळ मतांच्या राजकारणापुरताच केल्यामुळे शिंद्यांना अपेक्षित असलेले व्यापक परिमाण त्यास लाभू शकले नाही.

यशवंतराव चव्हाण हे शिंद्यांच्या विचार व कार्यामुळे प्रभावित झालेले महत्त्वाचे नेते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यांनी काँग्रेसचे स्वरूप प्रामुख्याने बहुजनप्रभुत्वाचे ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘काँग्रेसचे राज्य म्हणजे बहुजनांचे राज्य’ अशी प्रतिमा त्यातून तयार झाली. शिवाय विविध जातिसमूहांचे बेरजेचे राजकारण करून त्यांनी महाराष्ट्रातील जातीय तेढही कमी केली. परंतु पुढे बेरजेच्या राजकारणाला सत्तेच्या समीकरणाचे स्वरूप आले आणि लोकसंख्येच्या दृष्टीने छोट्या व उपेक्षित जातिघटकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होऊ लागले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही घोषणाही पुढे विरत गेली. दुसरीकडे, शेतकरी, कामगार व बहुजन समाजाला काँग्रेस न्याय देऊ शकत नाही, या भूमिकेतून (शिंद्यांचे एके काळी अनुयायी असलेल्या) केशवराव जेधे यांनी अनेक सहकार्‍यांसह शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. शिंद्यांचा बहुजन विचार हा पक्ष पुढे नेण्याची शक्यता होती; परंतु ज्या वर्गांसाठी हा पक्ष स्थापन झाला होता, त्यांच्या आकांक्षा हा पक्ष पूर्ण करू शकला नाही. परिणामी, एके काळी काँग्रेसला पर्याय ठरू पाहणार्‍या या पक्षाचा जनाधार झपाट्याने संकोचत गेला. तिसरीकडे, दलित-बहुजनांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून स्थापन झालेल्या बहुजन समाज पक्षाने डॉ. आंबेडकरांची विचारदृष्टी समोर ठेवल्याने शिंद्यांची भूमिका राजकारणात रेटण्याचा प्रश्‍नच नव्हता. या पक्षाने ‘सत्तेतून परिवर्तन’ हा डॉ. आंबेडकरांचा संदेश स्वीकारला व दलित आणि अन्य मागास घटकांची आघाडी उभारण्याचा मोठा प्रयत्न केला. परंतु बहुजनांना सत्तास्थानी बसवण्याची भूमिका हाच पक्षाचा मुख्य कार्यक्रम बनल्याने त्यासाठी हव्या तशा तडजोडी करण्याचा सपाटा लावला गेला. या व्यूहनीतीमुळे बहुजन राजकारणाचा खरा हेतू पराभूत होत गेला.

महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकीय पटलावरील ही घडामोड पाहता शिंद्यांना बहुजनवादात जी मूल्ये अभिप्रेत होती, त्यांचे प्रतिबिंब आजच्या तथाकथित बहुजनवादात असल्याचे दिसत नाही. एवढेच काय, शिंद्यांनी जो ब्राह्मणेतरवाद नाकारला होता, त्याच्याशीच नंतरच्या बहुजनवादी राजकारणाची नाळ जोडलेली दिसली. मंडलोत्तर बहुजनवादाने ‘नवब्राह्मणेतरवादा’चे (पळशीकर सुहास, १९९१) चे रूप धारण केले. या नवब्राह्मणेतरवादाचा शिंद्यांच्या ‘बहुजन’ विचाराशी काहीही संबंध नाही.

गेल्या दोन-तीन दशकांमध्ये घडून आलेल्या या बहुजनकेंद्री राजकारणामुळे बहुजन जातींच्या मतांना महत्त्व प्राप्त झालेले असले, तरी त्यातून ‘बहुजन अस्मिता’ तयार होऊ शकलेली नाही, ती शिंद्यांचा विचार स्वीकारण्यात आपण कमी पडलो त्यामुळेच. दुसरीकडे, आजचे राजकारण एकेका जातीच्या अस्मितेभोवती गुंफलेले असल्यामुळे बहुजनवादी राजकारणाला शिंद्यांना अपेक्षित असलेला वर्गीय आधारही उरलेला नाही. शिंद्यांनी हा धोका तेव्हाच ओळखून तत्कालीन जातिबद्ध समाजाला वर्गीय कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला होता. बहुजन जातींचे त्यांच्या सामूहिक-आर्थिक हितसंबंधांनुसार संघटन झाले तरच जातीय अस्मितेचे राजकारण मागे पडू शकते. मात्र तसे झाले नाही तर ‘बहुजनवादा’ला ‘ब्राह्मणेतरवादा’चे स्वरूप प्राप्त होते, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच बहुजन जातींतील ‘ब्राह्मणेतर हितसंबंध’ मागे पडत नाहीत, व ‘बहुजन हितसंबंध’ उठावदार बनत नाहीत, तोवर शिंद्यांना अपेक्षित असलेल्या बहुजनवादाचे राजकारण घडू शकणार नाही.

ही प्रक्रिया शिंद्यांच्या काळात घडू शकली नाही, शिवाय शिंद्यांच्या हयातीनंतरही ही प्रक्रिया घडावी असा प्रयत्न कुणी गंभीरपणे केला नाही. परिणामी गेल्या साठ-सत्तर वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारण वेगाने पोकळ होत गेले. हे घडले याला महाराष्ट्राने विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत आहे काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

.............................................................................................................................................

पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4890/Vitthal-Ramji-Shinde-Samjun-Ghetana

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......