दलित असण्यातल्या अडचणी वास्तविक आणि स्पष्ट आहेत. तिरस्कार तर सर्वसाधारण गोष्ट आहे. अनेक आयुष्य संपून जातात. आपल्यापैकी अनेक जण त्याबाबतीत अपरिचित आणि संवेदनाहीन असतात. उघड्या मनानं आणि डोळ्यांनी माहिती मिळाली तर कळेल की परिस्थिती किती वाईट आहे. डॉ. पायल तडवीची आत्महत्या हे त्याचं एक उदाहरण आहे. म्हणून जातीयतेच्या उच्च-नीचतेमुळे होणाऱ्या भेदभावाचं स्वरूप स्पष्ट करणारा हा विशेष लेख...
.............................................................................................................................................
आपण हे कमीच ऐकतो की सवर्ण हिंदूंना बदलण्यासाठी देखील काही तरी करण्याची गरज आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“प्रशांत खरं सांगतो जर मी अभ्यासात हुशार नसतो तर आतापर्यंत आत्महत्या करून चुकलो असतो”. त्याच्या बोलण्यानं माझ्या अंगावर शहरा आला. अनेक वर्षांपासून त्याला ओळखून असल्यामुळे तो अतिशयोक्ती किंवा नाटक करत नाही आहे, हे मी जाणून होतो. तो गंभीर होता. या धक्क्यातून सावरण्याचा मी प्रयत्न करत असताना मला आणखी दोन गोष्टी लक्षात आल्या- एकतर मी स्वतः एक सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी होतो आणि दुसरं त्याच्या या परिस्थितीला कुठेतरी मीही जबाबदार होतो. मला आणखी माहिती मिळवून घेण्याची गरज होती.
तन्मय आणि मी दुपारच्या जेवणाच्या वेळी बोलत बसलो होतो. संवाद प्रवाही होता. मी त्याची पार्श्वभूमी विचारली. त्यानं संतुलन राखत, पण भावनिक होत सर्व काही सांगितलं. तो ज्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करत होता, ते समजून घेण्याची माझी मानसिकता एखादा चित्रपट बघून किंवा पुस्तक वाचून किंवा भाषण ऐकून कधीच तयार झाली नसती. दुरून बघणाऱ्या एखाद्याला वाटू शकत होतं की, हे दोन प्रवासी भारतीय गप्पा मारत बसले आहेत. मात्र नैतिक किंवा संख्यायकी दृष्टीतून विचार करून आमच्या गप्पांच्या विषयाचा अंदाज बांधणं कठीण होतं. आमच्या पार्श्वभूमीत गहन, विस्तृत आणि द्वेषजनक भेद होता. शेवटी मी एक सवर्ण हिंदू होतो आणि तन्मय दलित. आम्हा दोन मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांची भेट कशी झाली, ही तन्मयच्या अभावग्रस्ततेची आणि त्याविरुद्ध जबरदस्त संघर्षाची तर माझ्या सुविधांनी परिपूर्ण सामान्य क्षमता असणाऱ्याची गोष्ट आहे- जी जातीव्यवस्थेनं केलेल्या संसाधन आणि संधींच्या असमान वाटपाची देखील गोष्ट आहे.
तन्मयमध्ये माझी रुची कशी काय जागृत झाली हाही एक शैक्षणिक अनुभव आहे. आत्ता मी ज्या देशात राहतो आहे, तिथे सध्या जो चर्चेचा विषय आहे, त्याला समानांतर व्यवस्था भारतात बघितल्याचं मला आठवतंय. श्वेतांच्या विशेषाधिकारांना समजून घेताना, आपल्याला मिळणाऱ्या सुविधांच्या व्यवस्थेचा स्वीकार केल्याशिवाय वांशिक न्यायाच्या गप्पा मारणं कठीण होऊन बसलं होतं.
ज्या संपन्नतेत मी वाढलो आणि ज्यामुळं मी आज आहे तो आहे, ती संपन्नता त्याच व्यवस्थेची देण आहे जीनं तन्मयच्या मार्गात ठायी ठायी अडचणी निर्माण केल्या होत्या आणि आज तो जिथं आहे तिथं पोचण्यापासून त्याला रोखण्याचं काम केलं होतं. जातीव्यवस्थेबद्दल आपण हे ऐकून आहोत, जी जन्माच्या आणि व्यवसायाच्या आधारावर विषमता निर्माण करणारी व्यवस्था आहे आणि जी सहस्रावधी वर्षांपासून हिंदू किंवा भारतीय समाजाच्या संरचनेचा पाया आहे.
एक खाजगी प्रवास
मी नशीबवान होतो की मी अशा घरात जन्मलो होतो की, ज्या घरातल्या प्रत्येकानं विद्यापीठातून शिक्षाण प्राप्त केलेलं होतं. पारंपरिक लिंगभेदाचे विचार कायम असल्यामुळं आमच्या कुटुंबातील पुरुषांनी चांगल्या नोकऱ्या मिळवल्या होत्या, ज्यामुळे आम्ही मध्यमवर्गीय सुविधांचा लाभ घेऊ शकत होतो. एका अशा देशात जिथं आधी इंग्रजांचं राज्य होतं आणि जो देश अजूनही असमानतेमुळं ओळखला जात होता, तिथं ही उपलब्धीदेखील मोठी आणि महत्त्वाची होती. खरं तर माझ्या पूर्वजांचा व्यवसाय व्यापार हा होता, पण माझे आई आणि वडिलांकडले आजोबा शिक्षणाच्या माध्यमातून नुकत्याच मुक्त झालेल्या विकसनशील देशाला आपल्या परीनं योगदान देत होते. जोवर माझी पिढी मोठी होत होती, तोवर माझ्या कुटुंबाच्या मूलभूत भौतिक गरजा पूर्ण होत होत्या आणि माझं बालपण आणि तारुण्य सहज सोपं, आनंदित होतं.
तन्मय असा नशीबवान नव्हता. एखाद्या शापासारखा तो जातीव्यवस्था झेलत होता. शिक्षण आणि सुविधा त्याचे जन्मसिद्ध अधिकार नव्हते, मात्र त्याच्या हिश्श्यात अनेक अडचणी होत्या. ज्यावेळी माझ्या घरातली वडीलधारी माणसं व्यावसायिक कामात गुंतली होती, त्यावेळी त्याच्याकडची मृत जनावरांचे चामडे काढत होती. हजारो वर्षांपासून त्याचे पूर्वज हे धोकादायक काम करत होते, ज्याला म्हटलं जायचं की, ‘देवानं त्यांच्यासाठीच ठरवून ठेवले आहे’. जे कुणी पिढ्यानपिढ्यांच्या या कामाला सोडू पाहत होते, त्यांना कठोरपण वठणीवर आणलं जात होतं. देश स्वतंत्र झाला तेव्हा १९४७मध्ये त्याचे दोन्हींकडचे आजोबा गावाकडे मृत जनावराचं चामडं काढत होते. ते त्या जनसमूहाचा भाग होते ज्यांना दलित म्हटलं जातं आणि आज ज्यांची लोकसंख्या २० कोटी आहे.
दलित समाजाला उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि त्यासोबत जुळून असलेली गरिबी हा काही योगायोग नाही, पण समजून उमजून त्यांच्यावर लादलेल्या परिस्थितीचा परिणाम आहे. याच मानवनिर्मित व्यवस्थेला हिंदू धर्माचा अभिन्न भाग म्हटलं गेलं आहे.
मला सर्वप्रथम माझ्या जातीबद्दल तेव्हा कळलं, जेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं की, आम्ही बनिया आहोत. माझी तेव्हा समज फार मर्यादित होती, पण पौराणिक कथांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली होती की, आम्ही वैश्य या जातीची उपजात आहोत आणि आमचा पारंपरिक व्यवसाय व्यापार आहे. मला इतर उच्च जातींबद्दल, ब्राह्मण आणि क्षत्रिय, बद्दलही माहिती मिळाली. समूह स्वरूपात यांना सवर्ण म्हटलं जातं.
मला बालपणी जातींबद्दल फार विचार करावा लागला नाही, कारण मी एका विविधांगी शहरी वातावरणात मोठा होत होतो, जिथं विचार करण्याची पद्धत आधुनिक होती. मी मोठा झालो तेव्हा मला चांगलं आठवतं की, मी मानत होतो की मी तर सर्व ‘इझम्स’पासून मुक्त असा वैश्विक दृष्टिकोन असलेला आहे. आता जाणवतं की, मी किती चूक होतो. मला कोणताच मित्र किंवा पारिवारिक मित्र असा नाही की, जो दलित असेल. आम्ही विभागलेल्या जगात राहत होतो आणि मानत होतो की आम्ही वैश्विक आहोत. आम्ही आमच्याच आधुनिकतेत आत्ममग्न होतो.
आदर्शांच्या भाबडेपणात आम्ही मानत होतो की, जातीप्रथा इतिहासात असेल भलेही, पण आज ती क्षीण झाली आहे. हे ठीकच होतं की लग्न जातीतच होत होते, आंतरजातीय लग्नांना विरोध होत होता, पण जातीच्या नावावर क्रूर भेदभाव केला जात नव्हता. कुटुंबापासूनच सुरुवात करायची तर माझे वडील आता व्यापारी नव्हते, पण एका सरकारी संस्थानात वैज्ञानिक होते आणि शोधकार्यात लागलेले होते. भारत आधुनिकतेकडे अग्रेसर एक प्रगतिशील संविधान असलेला देश होता, जिथं नागरिकत्वाचे अधिकार व्यवस्थित पारिभाषित होते. त्यामुळे जातीप्रथेचे अवशेष शिल्लक असले तरी त्यामुळे फार काही धोका नव्हता. अस्पृश्यता होती, पण अपवादात्मक. आश्चर्य म्हणजे अनेक सवर्णांचे स्वतःच्या समाजाबद्दल माझ्यासारखेच विचार होते. असं मानलं जात होतं की, जे होतं ते होतं, आता वर्तमान आणि भविष्य प्रकाशमान आहेत.
तन्मयच्या बालपणीचा अनुभव यापेक्षा अगदी वेगळा आहे. त्याच्या स्वतःच्या जातीच्या स्थितीनं - सवर्ण नसून दलित असल्यानं- त्याच्यावर सुरुवातीपासूनच आघात केले. पहिला आघात हा होता की, त्याच्या आसपासच्या लोकांना ते करत असलेल्या कामाची साहजिकच घृणा वाटत होती. दुसरं, त्याच्यासोबत अशा काही घटना घडल्या की, ज्यात त्याच्या जातीमुळं त्याला अपमान सहन करावे लागले. जेव्हा तन्मय आठ वर्षांचा होता तेव्हा त्याला त्याच्या एका शिक्षकानं संपूर्ण वर्गासमोर सुनावलं की तो शिकवण्यालायक तर सोडा स्पर्श करण्यालायक सुद्धा नाही.
जी व्यवस्था मी संपल्यात जमा झाल्याचं मानत होतो ती शाप बनून तन्मयच्या प्रगतीच्या मार्गात काटे पसरवून सर्व सकारात्मक बदलांच्या शक्यतांचा गळा घोटत होत्या. माझ्यासाठी जी काल्पनिक आणि भूतकाळातली गोष्ट होती तीच तन्मयसाठी वर्तमानातली वास्तविकता होती -ज्यापासून त्याची कोणतीच सुटका नव्हती. जसं मला माझ्या वयाच्या बऱ्याच वर्षांनी हे माहीत झालं की, ७५ टक्के दलित विद्यार्थी आर्थिक कारणांसाठी किंवा शिक्षकांनी, सोबतच्या विध्यार्थ्यांनी किंवा अन्य प्रतिष्ठित व्यक्तींनी केलेला अपमान झेलू न शकल्यामुळे शाळा सोडण्यास बाध्य होतात. हे बालपण माझ्या बालपणाहून वेगळं होतं की, ज्यात समाजात प्रगती करता यावी म्हणून माझे शिक्षक आणि सहयोगींकडून मला प्रोत्साहन मिळत होतं. या व्यतिरिक्त सोशल नेटवर्किंग, जो आज एवढा फोफावलेला व्यवसाय आहे, तर तिथेही माझं यश आधीपासून लिहिलेलं होतंच.
तन्मयसाठी मात्र वंचना आणि अपमानाचा चक्रव्ह्यूव कायम राहिला. त्याचे नातेवाईकच नाही तर आसपासच्या सर्वांच्या नशिबानं त्यांच्या श्रमिक कामाचं स्वरूप असं होतं की, जे हलकं समजलं जात होतं. ते अर्थव्यवस्था रुपी अन्नाच्या भांड्यातली खालची उरलीसुरली खरवड खाऊन जगत होते. शिवाय अस्पृश्यतेचा अमानवीय व्यवहारसुद्धा झेलत होते. यात नालीत घुसून सफाई करणारे, जनावरांसोबत काम करणारे तसेच मृत जनावरांची शरीरं साफ करणारेही होते. या कामांची सामाजिक प्रतिष्ठा जोखायची झाली तर यावरून जोखता येईल की ही कामं करणाऱ्यांसाठी जी नावं आहेत ती नावं समाजात शिवीसारखी वापरली जातात. हा अपमान तर तन्मयला झेलावा लागत होताच, पण त्याला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधनं नव्हती आणि सोबतच सवर्णांच्या अरेरावीलाही झेलावं लागत होतं. तो निराधार, तिरस्कृत आणि निराश मुलाच्या रूपात मोठा झाला.
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt
...............................................................................................................................................................
पुस्तकी ज्ञान आणि वास्तविकता
असं नव्हतं की, मी मोठा होत असताना अस्पृश्यता मला माहीत नव्हती, मला असं वाटत होतं की ती पूर्वी असायची. आम्हाला हे माहीत होतं की, तन्मयच्या पूर्वजांसाठी काही सार्वजनिक ठिकाणं प्रतिबंधित होती. काही ठिकाणी ते अस्पृश्यच फक्त नव्हते, लोक त्यांना बघणंदेखील पसंत करत नव्हते. जर त्यांनी धार्मिक ग्रंथ वाचून स्वतःची सामाजिक स्थिती सुधरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कानात विताळलेलं शिसं घातलं जाऊ शकत होतं. त्यांच्या आर्थिक सुधारणांचे सर्व मार्ग बंद होते. दलितांवर कठोर अन्याय तेवढ्याच कठोर पूर्वानुमानांनुसार होत होते. जीवन मातीमोल करणाऱ्या प्रथांना सवर्णांद्वारा संस्कृती म्हणून स्वीकारलं गेलं होतं.
जातीव्यवस्थेविरुद्ध आवाज उठत होते, जरी गुलाम भारतानं २० व्या शतकात प्रवेश केला तरी अस्पृश्यतेची प्रथा जिवंत आणि व्यापक रूपात अस्तित्वात होती. हा तर स्वतंत्रता आंदोलनाचा परिणाम होता आणि तन्मयचे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे स्वतंत्र भारताच्या संविधानाचे मुख्य निर्माते झाले. त्यांच्यामुळे दलितांना नागरिकत्वाचे अधिकार मिळाले आणि जगातल्या सर्वांत मोठ्या वंचित वर्गाला प्रोत्साहन देणारी आरक्षण व्यवस्था मिळाली. पण जे नेहमीच होत असतं, की कायदेशीररीत्या मिळालेल्या या अधिकाराचा वास्तवात फार काही उपयोग नसतो, तसंच याही बाबतीत झालं. माझ्या सारखा सवर्ण जो आपल्या शैक्षणिक आणि पारिवारिक जबाबदाऱ्या पार पाडायला लागलो होतो, दलितांच्या बाबतीतली कल्पना आणि वास्तविकता यातलं अंतर समजू शकलो नव्हतो. माझ्यासाठी दलित अमूर्त-अदृश्य होते पण भारताच्या प्रगतीची ओळख होते. माझा अस्पृश्यतेशी संबंध परीक्षेतील पाच गुणांच्या प्रश्नापुरता होता किंवा त्या कष्टकऱ्यांपुरता होता ज्यांच्या भरवशावर माझं आयुष्य चाललं होतं आणि ज्यांचं काम झालं की माझ्यासारखे सवर्ण त्यांना अदृश्य करून टाकत होते.
विद्यापीठ
उच्च शिक्षणाच्या विशेष परिस्थिती सवर्ण आणि दलितांमध्ये नवीन भेद निर्माण करतात. मीदेखील काही दुष्प्रचारांचा बळी होतो, मात्र त्याचं कारण दलितांच्या बाबतीत उपेक्षा किंवा धार्मिक कट्टरपणाची भावना नव्हतं. भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आणि दबंग वर्ग आणि जातींनी एकसारखा दूष्प्रचार करून आरक्षण व्यवस्थेविरुद्ध द्वेष आणि गैरसमज वाढवण्यास हातभार लावला होता. असंच चित्र अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्येसुद्धा बघायला मिळतं, पण भारतात जो द्वेष आहे, अमेरिकेच्या तुलनेत काहीच नाही.
भारतातल्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अति स्पर्धात्मक आहे. आरक्षणामुळं दलित विध्यार्थ्यांचा प्रवेश कमी गुणांमध्ये होऊन जातो. आरक्षणामागे हीच भूमिका होती की दलित विद्यार्थ्यांना ज्या अडथळ्यांना पार करत इथपर्यंत पोहचावं लागलं ते बघता त्यांना निवड प्रक्रियेत थोडी ढील दिली जावी. इतकं असूनही शिक्षणाच्या स्तरावर त्यांचं प्रतिनिधित्व अल्प आहे ज्यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की कमकुवत आर्थिक स्थिती, निरंतर तिरस्कार झेलावं लागल्यामुळं आणि सामाजिक अडचणी त्यांचा मार्गात किती अडचणी निर्माण करतात. काही मोजके दलितच यातून मार्ग काढू शकतात.
माझ्यासारख्या काही मेहनती विद्यार्थ्यांना, ज्यांना फक्त पुस्तकी समज होती त्यांना वाटत होतं की आरक्षणाची व्यवस्था समानतेच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. जर आपल्याला समानता हवी आहे तर सर्वांसाठी सारखे परिमाण/ठोकताळे असावेत की नाही? हाच रूढीवादी विचार मला तार्किक आणि न्यायोचित वाटत होता. हे तर फक्त सुविधासंपन्न लोकच करू शकतात की, त्यांचं हित साधलं गेल्यावर ते न्याय आणि बरोबरीची गोष्ट करतात आणि सामाजिक न्याय आणि समानतेच्या त्या तमाम संघर्षांकडे डोळेझाक करतात, जेव्हा ते संघर्ष दुसऱ्या कुणाच्या हितासाठी असतील.
अन्यायाची ही धारणा घेऊन आणि सामाजिक पूर्वग्रहासाहित आम्ही मोठे होऊन जेव्हा विद्यापीठात पोहचलो, तेव्हा सवर्ण आणि अवर्णांच्या मध्ये स्पष्टपणे एक भिंत उभी होती. मला स्पष्ट आठवतं की आम्ही दलित मुलांना शिव्या द्यायचो कारण आम्हाला वाटत होतं की, यांच्यामुळं आमच्या त्या मित्रांना प्रवेश मिळाला नाही ज्यांना या दलितांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. काही संपन्न दलितसुद्धा आरक्षणाचा फायदा घेतात, पण कोणत्याही मोठ्या व्यवस्थेचा काही थोडाफार दुरुपयोग तर होतंच असतो. सवर्ण, संपन्न आणि प्रभावशाली लोक सामाजिक आणि सरकारी व्यवस्थेच्या साट्यालोट्याचा दुरुपयोग करतच असतात, पण जेव्हा आपण बघतो की दुसरं कुणी ते करतंय आपण उत्तेजित होऊन नैतिकतेच्या गोष्टी करायला सुरुवात करतो. व्यवस्थेला खालचं वर करून आपण स्वतःलाच पीडित म्हणायला सुरुवात करतो.
दलितांबद्दलचा पूर्वाग्रह आणि तिरस्कार फक्त विद्यार्थ्यांमध्येच होता असं नाही, तर प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा याच मानसिकतेचे होते आणि तेही भेदभाव करत होते. यांनी दलितांबद्दल असा भ्रम पसरवला होता की, त्यांना अनुचित लाभ मिळालेला असतो आणि म्हणून तेही दलित विद्यार्थ्यांशी भेदभाव, अपमान, छळ, अवहेलना आणि अन्यायपूर्ण मूल्यांकन करत. दलित विद्यार्थी ज्यांना चांगलं जीवन जगण्याची संधी मिळावी म्हणून शिक्षण मिळवायचं असतं आणि त्यासाठी हा संघर्ष करावा लागतो अखेर कोलमडून जातात आणि काही तर आत्महत्या करतात. माध्यमांतून असं सांगितलं जातं की, अभ्यासाचा दबाव न झेलता आल्यामुळे आणि त्यांची बौद्धिक क्षमता कमी पडल्यामुळे असं झालं. मात्र या गोष्टीचा भरपूर पुरावा उपलब्ध आहे की, त्यांच्या आत्महत्येला कारण त्यांना मिळालेली भेदभावपूर्ण आणि त्रासदायक वागणूक होती. या प्रक्रियेला ‘हुशारीची हत्या’ किंवा ‘death of merit’ म्हटलं जातं. जी उत्कृष्ट प्रतिभा असलेली मुलं असतात आणि ज्यांनी काहीतरी मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं असतं, विशेषकरून त्यांच्यासाठी भेदभाव आणि निरंतर दबाव झेलणं कठीण होऊन जातं आणि ते आत्महत्या करतात.
अस्पृश्य आणि इतरांच्या बाबतीत अंतर कायम राखण्यासाठी काही तार्किक कारणं दिली जातात. उदाहरण म्हणून सांगितलं जायचं की, दलितांची मुलं घाण असतात म्हणून त्यांच्यासोबत खेळायचं नाही. कारण ते लोक घाण कामं करतात जसे की मानवी विष्ठा साफ करणं, मेलेल्या जनावरांचा निपटारा करणं प्रेताच्या अंत्यविधीशी संबंधित काम करणं. धार्मिक दृष्ट्या जे काम अपवित्र मानलं गेलं तेच आधुनिकदृष्ट्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं प्रतिकूल सांगितलं गेलं. संपन्न समाजानं स्वच्छता आणि सफाई करणाऱ्यांसाठी काही ठाकठीक व्यवस्था केलेली नाही कारण त्यांची प्राथमिकता काही वेगळी होती हे वेगळं सांगायला नको.
दुःखदायक वास्तविकतेनं माझ्या पुस्तकी ज्ञानाला आणि कल्पनांना खोटं ठरवलं. ही माझ्या डोळ्यावरची संपन्नतेची झापड होती की जी मला दलितांच्या वास्तविकतेबाबत आंधळं बनवत होती. अगदी तशीच जशी अमेरिकेतील वांशिक भेदभावाच्या शिकार लोकांचा वास्तविक अनुभव हा वंशवादाच्या सैद्धांतिक आकलनाहून अगदी वेगळा असतो.
व्यक्तिगत भेदभावासोबतच दलितांच्या बाबतीत संस्थागत भेदभाव सुद्धा होतच असतो. दलितांच्या बौद्धिक क्षमता, सत्यनिष्ठा आणि मानवीय संवेदनांवर तर प्रश्नचिन्ह उभं केलं जातंच त्यांच्यासाठी सामाजिक आणि आर्थिक रचनात्मक बाधा सुद्धा उभ्या केल्या जातात ज्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासाठी अडचणी बनून उभ्या राहतात.
मला हे काहीच माहीत नव्हतं. तन्मयला खाली दाखवण्यापासून तर अत्याचार झेलण्यापासून सर्वच करावं लागलं. त्यानं संघर्ष करून त्यातून मार्ग काढला हा त्याच्या सशक्त व्यक्तिमत्त्वाचा पुरावा आहे.
तन्मय
माझ्या दृष्टीकोनात बदल झाल्यामुळेच मी हे समजू शकलो की, तन्मय आत्महत्येचा विचार का करत होता असेल. तो जो एक कठीण मार्ग पार करून मायक्रोसॉफ्टपर्यंत पोचला, एक नावाजलेला इंजिनीअर म्हणून काम करतो आहे, ही त्याची खूप मोठी उपलब्धी अपवादस्वरूप आहे. याचं श्रेय तो त्याच्या आईला देतो जिने स्वतःला आणि आणि मुलांना शिकवण्याचा दृढसंकल्प केला होता. त्याला त्याच्या आईनं आणि त्याच्या प्रतिभावान असण्याच्या जाणीवेनं ताकद दिली. आरक्षणामुळं त्याला हा भरवसा मिळाला की, तो जर अभ्यास नीट करेल तर चांगल्या उच्च शिक्षण संस्थेत त्याचा दाखला होईल.
यशस्वी होऊनही त्याचा त्रास काही कमी झाला नाही. पदवीधर झाल्यावरही त्याच्याशी भेदभाव होत राहिला. एका भल्या माणसाच्या विशाल हृदयामुळे आपला पुढचा अभ्यासक्रम पूर्ण करून आणि अपमानाचं हलाहल पचवूनही त्याला आत्मिक बळ मिळत राहिलं.
शेवटी मग त्याला अमेरिकेत येण्याचीही संधी मिळाली आणि अमेरिकेतील नावाजलेल्या कंपनीत नोकरी पण मिळाली. इतर अनेकांसाठी ही संधी आणखी श्रीमंत होण्याची असू शकते, पण तन्मय साठी तर हा एक मुक्तीचा मार्ग होता.
निष्कर्ष
यात काही शंका नाही की आज मी जिथं आहे तिथं पोहचायला मला बऱ्यापैकी कष्ट घ्यावे लागले, अडचणी पार कराव्या लागल्या, मात्र माझ्याकडे सुविधाही होत्या. तन्मयशी बोलूनच मला हे लक्षात आलं आणि हे ही कळलं की इतर अनेकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीसुद्धा खूप संघर्ष करावा लागतो. सवर्णांना यशस्वी होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो हे मान्य, पण दलितांसाठी या अडचणी कितीतरी पटीनं अधिक असतात आणि त्यांचा सामना करणं तितकंच आव्हानात्मक असतं.
आज अमेरिकेत वंशवाद खुलेआम चालू आहे. मी वंशवादाची तुलना जातीयवादाशी करू शकतो. मला माझ्या विशेष स्थिती आणि सुविधांची जाणीव तेव्हा झाली, जेव्हा मला श्वेतांच्या खास स्थितीबद्दल कळलं.
शेवटी दलित असण्यातल्या अडचणी वास्तविक आणि स्पष्ट आहेत. तिरस्कार तर सर्वसाधारण गोष्ट आहे. अनेक आयुष्य संपून जातात. आपल्यापैकी अनेक जण त्याबाबतीत अपरिचित आणि संवेदनाहीन असतात. उघड्या मनानं आणि डोळ्यांनी माहिती मिळाली तर कळेल की परिस्थिती किती वाईट आहे. म्हणजे अनभिज्ञ असणंदेखील एक सुविधापूर्ण स्थितीच आहे.
तन्मयनं मला माझ्याबद्दल आणि मला ज्यांच्याबद्दल असं वाटत होतं की, मला माहीत आहे, त्यांच्याबद्दल जाणीव करून दिली. आशा आहे की माझी ही कथा वाचून अन्य काही प्रशांत आणि तन्मय एक दुसऱ्याला भेटतील आणि एक दुसऱ्याची गोष्ट सहनुभूतीनं ऐकत अशा समाजाकडे वाटचाल करतील जिथं जातीच्या नावावर छळ एक ऐतिहासिक गोष्ट बनलेली असेल. मला आशा आहे की, ऐकून घेतल्यानं वास्तविकतेचा स्वीकार होईल आणि समाधान काढण्यासाठी सहकार्यातून मार्ग निघेल.
(हा लेख ‘साधना’ साप्ताहिकाच्या २४ मार्च २०१८च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)
.............................................................................................................................................
लेखक प्रशांत नेमा अमेरिकेतील सिएटल इथं इंजिनिअर म्हणून काम करतात. (हा लेख लिहिण्यासाठी रोमी महाजन आणि लोर्नेट टर्नबुल यांनी मदत केली.)
pkn3lvl4@gmail.com
मूळ इंग्रजी लेखाची मराठी अनुवाद - प्रज्वला तट्टे
prajwalat2@rediffmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment