अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक विनय हर्डीकर यांच्या राजकीय-सामाजिक लेखांचा संग्रह ‘जन ठायीं ठायीं तुंबला’ या नावाने २०१७मध्ये जनशक्ती वाचक चळवळ, औरंगबाद यांनी प्रकाशित केला आहे. या पुस्तकातून प्रस्तुत लेख घेतला आहे. हा मूळ लेख २०१४मध्ये मोदी सरकार निवडून आल्यानंतर जी काँग्रेसच्या ऱ्हासाची चर्चा सुरू झाली होती, त्या पार्श्वभूमीवर लिहिलेला आहे.
.............................................................................................................................................
लोकशाही प्रजासत्ताक भारतामध्ये पहिली लोकसभा निवडणूक १९५२ मध्ये झाली. अपेक्षेप्रमाणे नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले. कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, स्वतंत्र या पक्षांचा क्रम पाठोपाठ लागला असला तरी त्याच्या खासदारांची संख्या दोन आकडी होती आणि काँग्रेसकडे साडेतीनशेच्या आसपास संख्या होती. या काँग्रेसी जथ्थ्यामध्ये अनेक जण अर्धशिक्षित, अल्पशिक्षित होते, याकडे एका राजकीय विश्लेषकाने लक्ष वेधले असता मानवेंद्रनाथ रॉय म्हणाले होते की, जर बहुसंख्य भारतीय जनता अर्धशिक्षित, अल्पशिक्षित, अशिक्षित असेल आणि काँग्रेसकडे बहुमत असेल तर त्या पक्षातही भारतीय समाजाचे प्रतिबिंब उमटणारच- त्या पक्षातही अर्ध/अल्पशिक्षित सदस्य बहुसंख्येने असणारच!
हा उल्लेख अशासाठी केला की, ज्या काँग्रेसच्या जीवनमरणाची चर्चा करणं अपेक्षित आहे, ती काँग्रेस माझ्या मते १९५२ नंतरची आहे. १८८५-१९२० आणि १९२०-४५ या आधीच्या दोन प्रमुख टप्प्यांमधल्या काँग्रेसच्या इतिहासात शिरायची गरज नाही. एकदा त्या पंढरपूरच्या कैकाडीबुवाच्या मठामध्ये आपण शिरलो तर स्वातंत्र्य चळवळीची शेकडो दृश्यं आपल्याला दिसू लागतील आणि त्या नॉस्टॅल्जियामध्ये १९५२ ते २०१४ या टप्प्याची चर्चा वस्तुनिष्ठपणे करता येणार नाही.
देशाची फाळणी झाली तरी चालेल, पण नेहरूंच्या नेतृत्वाचे (काँग्रेस) स्वदेशी सरकार आणायचे हा निर्णय ज्या क्षणी झाला, त्याच क्षणी स्वतंत्र भारतामध्ये सत्ता, सत्ता आणि सत्ता हेच काँग्रेसचे तत्त्वज्ञान, कार्यपद्धती असणार आणि सत्ता टिकवून ठेवणे एवढाच अजेंडा असणार हे स्पष्ट झाले. नेहरूंच्या सुदैवाने गांधींची हत्या झाली, पटेल आजारी पडून गेले, आझाद बहुसंख्य मुस्लिमांचा पाठिंबा गमावून बसले आणि तीन चतुर्थांश का होईना, देशाची सत्ता नेहरू-काँग्रेस यांच्या हातात आली. नेहरू चतुर होतेच; त्यांनी या सत्तालालसेला ‘नियतीशी करार’ वगैरेचा मुलामा चढवला; वास्तवात तो काँग्रसने निर्लज्ज सत्तालालसेशी केलेला करार होता.
संसदेमध्ये एका पक्षाकडे प्रचंड बहुमत आणि तथाकथित विरोधी पक्ष मुडदूस झालेले अशी अवस्था असल्यामुळे अघोषित व्यक्तिपूजा आणि हुकूमशाही यांना आमंत्रणच होते. शिवाय नेहरूंचे वाक्चातुर्य, त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गावगप्पा, जिथे कठोर शास्त्रीय विश्लेषण व्हायला हवे तिथे काव्याची पळवाट शोधायची त्यांची चलाखी यांचाही प्रभाव वाढता होता. खरे म्हणजे भारताने स्वातंत्र्य मिळवले नव्हे, सत्ता काबीज केली नव्हती, तर भारताला स्वातंत्र्य देण्यात आले होते, It was a transfer of power; not capture of power हे कळणारी मंडळी तेव्हाही होती; पण त्यांचा आवाज क्षीण होता आणि नेहरूंना पंतप्रधान व्हायची घाई झाली होती, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची कुवत असली तरी हिंमत नव्हती; काहींच्याकडे तेवढा प्रामाणिकपणाही नव्हता. यातूनच एक नेहरूधार्जिणा भारतीय राष्ट्रवाद जन्माला आला. देश एक ठेवायचा असेल (खरे तर त्याचे दोन देश झालेले होते; नंतर तीन झाले!) तर काँग्रेसकडे सत्ता असली पाहिजे; काँग्रेस एक ठेवायची असेल तर नेहरू (नंतर नेहरू घराणे) कडे नेतृत्व असले पाहिजे. नेहरू हा इंडियाचा जवाहर नव्हता; तर इंडियाच नेहरूंचा आश्रित बनला होता.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar
.............................................................................................................................................
संख्येने अशक्त विरोधी पक्षांपैकी प्रजासमाजवादी नेहरूंच्या गुलाबी समाजवादाच्या प्रेमात होते. कम्युनिस्ट तर काँग्रेसच्या हत्तीवर नेहरूंसारखा डावीकडे झुकणारा माहूत बसला आहे, म्हणून जोपर्यंत काँग्रेस आणि नेहरू घराणे देशाच्या बोडक्यावर आहे, तोपर्यंत देश समाजवादी क्रांतीचा मार्ग सोडणार नाही, अशी आचरट खात्री बाळगून होते. एकट्या स्वतंत्र पक्षाला या सगळ्या राजकीय भूलथापांमधली व्यर्थता कळत होती, पण राजाजींसारखा नेता असूनही त्या पक्षाचा चेहरामोहरा सरंजामशाहीचा असल्यामुळे काँग्रेस, प्रजासमाजवादी आणि कम्युनिस्ट यांना स्वतंत्र पक्षाची हेटाळणी करायला रान मोकळे होते! ज्या स्वातंत्र्योत्तर काँग्रेसची (कदाचित) अंत्ययात्रा आपण पाहतो आहोत, तिच्या जन्माची कहाणी निव्वळ निर्लज्ज सत्तासंपादनाची आहे आणि ती कहाणी खुद्द नेहरूंनीच लिहिली होती. नेहरू-इंदिरा-संजय-राजीव-सोनिया-राहुल अशी घसरण सगळ्यांना दिसत असली तरी देश-काँग्रेस-नेहरू घराणे ही अवस्था रोगापेक्षा इलाज भयंकर अशी आहे, हे कळते पण वळत नाही.
यातून काँग्रेसचा स्वतंत्र शब्दकोशच तयार झाला. काँग्रेसवाला जेव्हा ‘देश संकटात आहे’ म्हणतो, तेव्हा काँग्रेस संकटात असते! तो ‘काँग्रेस संकटात आहे’ म्हणतो, तेव्हा त्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता नसते. ‘निष्ठावंतांना कुणी विचारत नाही’ असे काँग्रेसवाला म्हणाला की, त्याला नेहरू-गांधी घराण्याची हायकमांड धूप घालत नाही हे नाही समजावे. ‘अनुभवी लोकांच्या ज्ञानाचा (!) फायदा देशाला मिळाला पाहिजे’ म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्याला मंत्रिपद मिळणार नसले तर राज्यपालपद, एखादे सरकारी कमिशन हवे असते. ‘महिलांना/युवकांना संधी मिळाली पाहिजे’ म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्याची पत्नी/मुलगी/मुलगा बाशिंग बांधून तयार असतात. ‘कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान ठेवला पाहिजे’ म्हणणारा काँग्रेसी लवकरच स्वतंत्रपणे/ विरोधी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणार हे नाही समजावे. ही भयानक बेशरम डबल टॉक आता इतर पक्षांनीही स्वीकारली आहे. ‘काँग्रेस कल्चर’ नावाचे एक शेंडा बुडखा दोन्ही सत्तालालसेचा असलेले गारूड देशात तयार झाले आहे. भाजपला सध्या जनतेने काँग्रेसचा पर्याय म्हणून स्वीकारले आहे; त्या पक्षातही ही डिक्शनरी रूढ होऊ लागली आहे, घराणेशाहीची लागण त्यांनाही झाली आहे. नरेंद्र मोदी विवाहित असले तरी प्रापंचिक नाहीत, ही जमेची बाजू?
मुळात काँग्रेस म्हणून काही आयडियॉलॉजी, अजेंडा, कार्यक्रम नसल्यामुळे आणि समतेची भाषा बोलत बोलत धर्म-जात-पोटजात- भाषा- प्रांत याच अस्मितांवर सत्ताकारण बेतल्यामुळे काँग्रेसची कितीही शकले झाली तरी जरासंधाच्या धडाच्या तुकड्यांसारखी ती केव्हाही एक येतात. त्याला ‘स्वगृही परतणे’, ‘भटकलेले मेंढरू पुन्हा कळपात येणे’, ‘स्वत:ची खरी जागा सापडणे’, ‘जनतेने नेहरू घराणे स्वीकारले आहे मग मी मागे कसा राहू (यशवंतराव चव्हाण)’ अशी मखलाशी करणे असे आधार शोधता येतात. ‘यजमानाचे पापकृत्यास शास्त्रार्थ काढून देणारे’ भट केवळ लोकहितवादींच्या काळातच होते असे नाही. आताही आहेत. ही मंडळी काँग्रेसी राजकारणाचे समर्थन करताना जातीयवादी शक्तींचा पराभव, मध्यगामी राजकारणाचा विजय, भारतीय जनता प्रगल्भ आहे ती योग्य माणसांनाच निवडून देते आणि सत्ता राबवण्यासाठी लागणारे गुण (!) फक्त काँग्रेस कल्चरमध्ये जन्मणाऱ्या- वाढणाऱ्या गणंगांकडे (वंशपरंपरेने) येतात, असेही आधार काढून देतात!
काँग्रेसजनांचे अजून एक तंत्र आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून एखादा पक्ष उभा राहिला की, ते आपल्या घरातला सगळ्यात नालायक माणूस तिथे पाठवतात. तो तिथे रुळला तर त्या पर्यायी पक्षाचे वाटोळे होते. नाही रुळला तरी आपल्या पक्षातले स्वत:चे स्थान कायम राहते, अशी ही ‘विन-विन’ रणनीती आहे! अशा पर्यायी पक्षाने निवडणूक जिंकायचा अवकाश की, काँग्रेसवाले त्या पक्षात घुसले म्हणून समजावे- जनता पक्षामध्ये आधीच एक चतुर्थांश मंडळी (संघटना) काँग्रेसची होती. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर जगजीवन बाबूंनी ‘लोकशाही (वा!) काँग्रेस’ काढून आपली मंडळीही घुसवली- मग त्या पक्षामधले जयप्रकाश नारायण यांचे स्थान धोक्यात येणारच होते! मोरारजी-चरणसिंग-जगजीवनराम या तिघांनी जयप्रकाश नारायणांचे रक्त आटवले होते, हा अगदी नजीकचा नसला तरी महत्त्वाचा अनुभव मोदींनी लक्षात ठेवला तरच ते तरतील. एरवी विदर्भापासून आधी मुलगा भाजपमध्ये गेला आता बापही जाणार ही सुरुवात झाली आहे. काँग्रेसमधला असंतुष्ट कचरा स्वीकारला की, पर्यायी पक्षाची प्रतिमा डागाळते (नारायण राणे); महत्त्वाकांक्षी माणूस पायघड्या घालून बोलावला (शरद पवार) की मूळ पर्यायी पक्षाचीच वाट लावून तो स्वत: पुन्हा काँग्रेसमध्ये जातो!
‘जनतेची (भलीबुरी) कामे करण्यात काँग्रेसवाले पटाईत असतात’ हा सार्वत्रिक अनुभव आहे. वसंतदादांना राजकीय विजनवास भोगावा लागला होता, ते राजस्थानचे राज्यपाल होते, तेव्हाची गोष्ट आहे. मी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून जयपूरला एका सभेसाठी गेलो होतो. वेळ मोकळा होता म्हणून राजभवनवर फोन करून दादांची अपॉइंटमेंट मागितली; ती लगेच मिळाली. महाराष्ट्रातून कुणी आलं आहे म्हणून दादाही प्रसन्न होते. आगत-स्वागत झाले. नंतरचा प्रश्न ‘जयपूरमध्ये काय काम काढलं?’ मी तसं काहीच नाही म्हटल्यावर दादा म्हणाले, ‘हर्डीकर साहेब संकोच न करता बोला. तुमचं काम होण्यासाठी आपण संपूर्ण मदत करू. इथे आलेला मराठी माणूस रिकाम्या हाताने परत जाणार नाही!’ दोन-तीनदा तेच झालं. त्या तासभरात दादांना महाराष्ट्रातून सात-आठ फोन आले. एक प्राध्यापकांचं शिष्टमंडळ केंद्र सरकारच्या कृपेने परदेश (अभ्यास!) दौऱ्यावर जायचं होतं. त्यात वर्णी लावण्यासाठी. दादांनी सेक्रेटरीला बोलावून ती नावे दिल्लीच्या संबंधित मंत्रालयाकडे ताबडतोब पाठवायची व्यवस्था केली! नंतर पुन्हा माझ्याकडे वळले. मी म्हणालो, ‘दादा, राजस्थानात शेतकरी चळवळ कशी वाढवावी ते सांगा!’ पाच मिनिटांत मला निरोप देताना दादा म्हणाले, ‘इथे दुष्काळामुळे तीन वर्षांत एकदाच पीक येतं आणि म्हणूनच त्याला भावही चांगला मिळतोच! शरदरावांना म्हणावं, तुम्ही इकडे यायची गरज नाही. त्यांना माझा नमस्कार जरूर सांगा!’
पुरवठा कमी मागणी जास्त, संधी मोजक्या याचक जास्त अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य दोन्ही पातळींवर अधिकाधिक काळ सत्तेत असणाऱ्या काँग्रेसवाल्यांकडून लोकांची कामे जास्त झाली (याला आपण वशिलेबाजी म्हणतो!) तर त्यात काही नवल नाही. ती करताना त्यांनी गुणवत्ता आणि नैतिकता (हे शब्द त्यांच्या डिक्शनरीत पुढच्या काळातली उपयुक्तता अशा अर्थाने असतात) यांच्या रूढ अर्थाचे भान ठेवले असते तर देश आज सुमार राज्यकर्ते, भ्रष्ट नोकरशाही आणि ‘तळे राखी तो पाणी चाखी’ ही म्हण तत्त्व म्हणून स्वीकारणारी हताश जनता या दुष्टचक्रात सापडून गोते खाताना दिसला नसता.
काँग्रेसचा काळा कोळसा फार उगाळण्यात मला रस नाही; स्वत:ची लेखणी विटाळण्याची मला हौस नाहीच. पण भारतीय समाजव्यवस्थेचे सर्व दोष केवळ पक्ष-व्यक्ती-कुटुंब-जात यांच्या भल्यासाठी वापरणारा, त्यांना खतपाणी घालणारा आणि १९५० मध्ये देशापुढे ज्या समस्या होत्या, त्यातही एकही निर्णायकपणे न सोडवणारा हा पक्ष जर जबर पक्षाघात होऊन मरणार असेल तर देशाचे कोणते नुकसान होणार आहे? या पक्षाचे सध्याचे तरुण नेतृत्व तर केवळ उडाणटप्पू नाही, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हीच त्याची रणनीती आहे. अन्यथा मनमोहनसिंग, पृथ्वीराज चव्हाण यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती. काँग्रेसची मृत्युघंटा वाजू लागली आहे, तिला उगीच कृत्रिम उपचारांनी- लाइफ सपोर्टिंग सिस्टिम- जिवंत ठेवण्याची काही गरज नाही. महाराष्ट्रात तर शरदराव (तेही काँग्रेसचे पण ‘राष्ट्रवादी’!) काँग्रेसचा अंत्यविधी करायला पळीपंचपात्री तयार ठेवून मुहूर्ताची वाटत पाहत आहेत. इतर राज्यांतही पवारांचे समविचारी आहेतच. काँग्रेस नावाची ब्याद आपोआप जात असेल तर जाऊ द्या!
शेवटचा शब्द. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ज्या अवयवांची गरज राहत नाही, ते आपोआप गळून पडतात. काँग्रेसच्या शेपटाची गरज संपली आहे, ते गळून पडू द्या! भाजपचे हिंदुत्व, समाजवाद्यांची भाबडी क्रांती, कम्युनिस्टांची वर्गाधारित रणनीती या शेपटांचीही तीच अवस्था आहे. तीही गळून पडावीत आणि २१व्या शतकातल्या राजकारणाची काही नवीन प्रतिभावान मांडणी करता यावी. या प्रक्रियेची सुरुवात काँग्रेसपासून झाली तर ती काळ्या ढगाची रुपेरी किनार ठरेल!
.............................................................................................................................................
विनय हर्डीकर यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
.............................................................................................................................................
लेखक विनय हर्डीकर पत्रकार व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.
vinay.freedom@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment