डॉ. झोया हसन : “काँग्रेसची ‘विचारप्रणाली’ केवळ सत्ताकारणाची!”
पडघम - देशकारण
राम जगताप
  • झोया हसन, ‘काँग्रेस ऑफ्टर इंदिरा’चं मुखपृष्ठ, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राजीव गांधी आणि मनमोहनसिंग
  • Thu , 30 May 2019
  • पडघम देशकारण झोया हसन Zoya Hasan काँग्रेस ऑफ्टर इंदिरा Congress After Indira काँग्रेस Congress इंदिरा गांधी Indira Gandhi राजीव गांधी Rajiv Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi मनमोहनसिंग Manmohan Singh

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. झोया हसन यांचं ‘काँग्रेस आफ्टर इंदिरा’ हे १९८४ ते २००९ या काळात काँग्रेस पक्षाची वाटचाल कशी झाली, याची चिकित्सा करणारं पुस्तक २०१२मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या वतीनं प्रकाशित झालं. इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्षाचं केंद्रीकरण करण्यात आलं, तर राजीव गांधी यांच्या काळात धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करण्यात आली. त्यानंतरच्या काळात सत्तेसाठी सर्व काही असं काँग्रेसचं धोरण राहिलेलं दिसतं, अशी मांडणी हसन यांनी केली आहे. थोडक्यात, काँग्रेसच्या १९८४ ते २००९ या काळात बदलत गेलेल्या राजकारणाची अतिशय गंभीरपणे चर्चा करणारं हे पुस्तक आहे.                    त्यानिमित्तानं डॉ. झोया हसन यांच्याशी यांनी मारलेल्या गप्पा…

.............................................................................................................................................

राम जगताप - आपल्या ‘काँग्रेस आफ्टर इंदिरा’ या पुस्तकामध्ये राजीव गांधी यांच्यावर तुलनेनं जरा जास्त भर दिला गेला आहे, असं वाटतं...

डॉ. झोया हसन – इंदिरा गांधी यांच्या निधनानंतरच्या काँग्रेसच्या २५ वर्षांच्या राजकारणाचा आलेख मी या पुस्तकामध्ये मांडला आहे. आणि म्हणून मी त्याचं नाव ‘काँग्रेस आफ्टर इंदिरा’ असं ठेवलं आहे. आपल्याला दिवंगत राजीव गांधी यांच्या कारकिर्दीतील घटनांचा मागोवा घेतल्याशिवाय त्यांच्यानंतरचा कालखंड समजू शकणार नाही.

राम जगताप - काँग्रेस आता ‘वन फॅमिली पार्टी’ झाली आहे, यासाठी मुख्यत: तुम्ही कुणाला जबाबदार ठरवाल? इंदिरा गांधी, राजीव गांधी की काँग्रेसचे नेते? आणि याचे भारतीय राजकारणावर काय इष्ट -अनिष्ट परिणाम झाले आहेत?  

डॉ. झोया हसन – या घराणेशाहीच्या राजकारणासाठी काँग्रेसचे नेतेच जबाबदार आहेत. पण त्याचबरोबर यामागील कारण लक्षात घेणं गरजेचं आहे. नेहरू-गांधी घराणं पक्षाला एकसंध राखण्यात आणि देशभरात आपली लोकप्रियता टिकवण्यात यशस्वी झालं आहे. आणि त्यामुळेच पक्ष आणि पक्षाचे नेते यांचा पाठिंबा त्यांना टिकवता आला आहे. सध्या मात्र केवळ एकाच घराण्याची सत्ता नसून बहुतांश नेते आपापली घराणी पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत.

राम जगताप - १९८९च्या निवडणुकीत पहिल्यांदा काँग्रेसची मोनोपॉली उद्ध्वस्त झाली. त्यानंतर पूर्ण बहुमताचं सरकार सत्तेवर येऊ शकलं नाही. इंदिरा गांधींनंतरच्या राजकारणातली ही सर्वांत मोठी घटना आहे. यामुळे भारतीय राजकारणाचा पोतच बदलला. पण त्यावर आपण या पुस्तकामध्ये फारसा भर दिलेला नाही. तुम्हाला ही बाब विशेष महत्त्वाची वाटत नाही का? 

डॉ. झोया हसन – १९८९च्या केंद्रीय निवडणुका महत्त्वाच्या होत्याच! पुस्तकामधील दोन प्रकरणांत मी त्यांचा उल्लेखही केला आहे. मात्र निवडणुकांचं राजकारण हा या पुस्तकाचा विषय नसल्यानं मी त्याच्या फार तपशीलांत शिरले नाही. अर्थात, पक्षीय धोरणं आणि राजकारणाच्या निवडणुकांवर झालेल्या परिणामांचा ऊहापोह मात्र केला आहे.

राम जगताप - ९०नंतरच्या काँग्रेसविषयी तुम्ही ‘congress has no ideology, only strategy’ आणि ‘world’s largest democracy’s is managed is an internally undemocratic party’ अशी दोन विधानं केली आहेत. पण ९० नंतर ‘विकास’ हीच काँग्रेसची आयडियॉलॉजी झाली असं त्यांच्या ध्येयधोरणावरून वाटत नाही का?

डॉ. झोया हसन – काँग्रेस पक्षात असलीच तर केवळ सत्ताकारणाची ‘विचारप्रणाली’ आहे आणि हे सातत्यानं दिसून आलं आहे, असा दावा ‘काँग्रेस आफ्टर इंदिरा’मध्ये केला आहे. आर्थिक उदारीकरणामुळे या प्रथेस चालना मिळाली आणि व्यक्तिगत हितसंबंध जोपासण्याची भावना खुलेआम दिसू लागली. स्वाभाविकच राजकारणाला बाजारपेठा दिशा देऊ लागल्या. जागतिक स्तरावर राजकीय पक्षांच्या विकासप्रक्रियेत या स्थित्यंतराचा प्रभाव दिसू लागला. अमेरिकेतील दोन्हीही पक्ष, इंग्लंडमधील मजूर पक्ष तसेच जगभरातील काही डावे पक्ष अशा सर्वांनीच मुक्त व्यापारी धोरणांचा स्वीकार केला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर हे याबाबतीत आघाडीवर होते. या प्रवाहास विरोध करण्याची काँग्रेसची क्षमता नव्हती. अर्थात माझा हा दावा तौलनिक पातळीवर आहे. कारण जागतिक अर्थकारणाने प्रभावित असूनही राष्ट्रीय राजकारणावर प्राबल्य कायम राखणं आणि अमेरिकेच्या इच्छेविरुद्ध जात रोजगार हक्क विधेयक आणि समाजातील वंचितांना शिक्षणाचा हक्क देणारं विधेयक मंजूर करण्याचं काँग्रेसनं दाखवलेलं धाडस त्यांचं वेगळेपण अधोरेखित करतं. लोकशाहीच्या अनिवार्यता आणि प्रामुख्याने गरीब असणाऱ्या देशाचा विकास करणं तसंच बाजारपेठेच्या इच्छा सांभाळणं अशी तारेवरची कसरत काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारला करावी लागली. 

राम जगताप - पण काँग्रेसची मोनोपॉली संपल्यामुळेच भाजपसारख्या जातीय ध्रुवीकरण करणाऱ्या पक्षांचा फायदा झाला असं तुम्ही म्हटलं आहे, ते तितकंसं बरोबर वाटत नाही. कारण एकतर लोकशाही देशात कुठल्याही एकाच पक्षाची मोनोपॉली तयार होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे, असं मानलं जातं. कारण त्यातून तो पक्ष वा त्या पक्षाचा नेता हा एकाधिकारशाहीकडे वळू शकतो. इंदिरा गांधी यांचंच उदाहरण यासाठी घेता येईल. आपल्या पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांना त्यांनी ज्या पद्धतीनं संपवण्याच्या प्रयत्न केला, त्यातून हे स्पष्ट होतं...

डॉ. झोया हसन – भाजपसह अन्य पक्षांच्या तऱ्हेतऱ्हेच्या ‘अस्मितां’च्या राजकारणास काँग्रेसच्या घसरणीमुळे प्रारंभ झाला, असा माझा दावा आहे आणि हे वस्तुस्थितीदर्शक विधान आहे. राजकारणामध्ये कोणत्याही एकाच पक्षाचं प्राबल्य (मोनोपॉली) असणं चांगलं नाहीच. मात्र त्याच वेळी, एकाच पक्षाचं प्राबल्य असणं जितकं धोकादायक असतं, तितकंच अस्मितेच्या राजकारणामुळे पक्षीय फाटाफूट होणंसुद्धा धोकादायक असतं. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

राम जगताप - काँग्रेसला देशभर अजूनही मोठा आधार आहे. शिवाय काँग्रेस जातीय द्वेषापासून आणि जातीय ध्रुवीकरणापासून बऱ्यापैकी लांब असल्यामुळे लोकांची काँग्रेसला अधिक पसंती आहे असं वाटतं. म्हणूनच भाजपसारख्या पक्षांना फार मोठं यश निवडणुकीत मिळत नाही. थोडक्यात काँग्रेसला सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय मिळत नसल्यामुळे लोकांना काँग्रेसलाच निवडून द्यावं लागतं. हे भारतीय राजकारणाचं मोठं वैगुण्य वा शोकांतिका वाटते?

डॉ. झोया हसन – भाजपव्यतिरिक्त काँग्रेसला अन्य पर्याय नाहीत असं मला तरी वाटत नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल की, तिसरी आघाडी हा पर्याय उभा राहतो आहे. पण, मतदारांचा मात्र त्यांच्यावर फारसा विश्वास असल्याचं दिसत नाही. तिसरी आघाडी म्हणजे संधीसाधूंचाच एक गट असल्याची मतदारांची भावना होऊ लागली आहे.

राम जगताप - लोकशाहीमध्ये कार्यक्षम सरकारपेक्षा कार्यक्षम विरोधी पक्ष अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पण भाजप ती भूमिका योग्य रीतीनं बजावताना दिसत नाही. केवळ विरोधासाठी विरोध हेच भाजपचं धोरण दिसतं.

डॉ. झोया हसन – गेल्या काही वर्षांत संसदीय लोकशाही आपल्या आत्म्यापासून दुरावली आहे. संसदीय लोकशाहीप्रणाली ठप्प करण्याची सर्वच पक्षांमध्ये जणू अहमहमिका लागली आहे. एक जबाबदार शासन आणि प्रभावी विरोधी पक्ष यांची गरजच यातून अधोरेखित होत आहे. किरकोळ बाजारपेठेत थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्यास भाजपकडून होणारा विरोध हा ना तात्त्विक स्वरूपाचा आहे, ना त्याला विचारप्रणालीचं पाठबळ आहे. भारतातील सर्वांत प्रमुख विरोधी पक्षाची धारणाच अशी झाली आहे की, संसदीय कामकाज होऊ न देणं हाच शासनावर अंकुश ठेवण्याचा प्रभावी मार्ग आहे. सातत्यानं वाया जाणारी संसदेची अधिवेशनं, संसदेचं वारंवार रोखलं जाणारं कामकाज, लोकपाल विधेयकाची सद्य:स्थिती यावरून हेच स्पष्ट होतं. आजही संसदीय कार्यपद्धतीमध्ये अविश्वासाच्या ठरावाचं अस्त्र उपलब्ध आहे. मात्र संसदेच्या सभागृहांत तिचा प्रभावी वापर करण्याएवढं संख्याबळ विरोधी पक्षांकडे नाही, हे सत्य आहे.

राम जगताप - तृणमूल काँग्रेस, करुणानिधी वा डावे हे सरकारमध्ये सामील होणारे आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पोहचलेले पक्ष… पण राष्ट्रीय पातळीवर पोहचल्यावरही आपल्या प्रादेशिक मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत असं त्यांच्या एकंदर वर्तनावरून दिसतं. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोधी पक्षापेक्षा हे सरकारचे घटक पक्षच जास्त प्रखर विरोध करताना दिसतात. त्यामुळे सरकारची निष्क्रियता वाढते आहे?

डॉ. झोया हसन – सध्या केंद्रीय तसंच राज्य पातळीवर राजकारणाला समान महत्त्व आलं आहे. किंबहुना, अनेक बाबतीत राज्यातील राजकारणाचा आवाका हा केंद्रापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण ठरू लागला आहे. प्रादेशिक तसंच राज्य पातळीवरील पक्ष आपापलं राज्यातील स्थान टिकेल अशा प्रश्नांकडे प्राधान्यानं लक्ष देत आहेत. आपल्या राजकीय हेतूंची पोळी भाजून घेण्यासाठी द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला जणू वेठीस धरलं आहे. 

राम जगताप - प्रादेशिक पक्षांच्या या हटवादी आणि संकुचितपणामुळे, म्हणजे एकंदर देशाचा व्यापक पातळीवरून विचार न करता आपल्या राज्यात केंद्र सरकारच्या धोरणामुळे/निर्णयामुळे आपल्याला काही तोटा होणार नाही ना, याकडेच त्यांचं लक्ष लागलेलं दिसतं. त्यामुळे एकंदर राष्ट्रीय राजकारणाचा आणि भारतीय लोकशाही राजकारणाचा मार्ग प्रशस्त होण्याऐवजी आक्रसतो आहे, असं वाटतं?

डॉ. झोया हसन – प्रादेशिक राजकारणाच्या उदयामुळे भारतीय लोकशाही दुबळी होते आहे, असं मला तरी वाटत नाही. आघाडीच्या राजकारणामुळे राष्ट्र आणि प्रदेश यांच्या संकल्पनाच बदलू लागल्या आहेत. राज्यांच्या आणि प्रदेशांच्या वैविध्यपूर्ण हितसंबंधांचा व्यापक आविष्कार म्हणजेच राष्ट्र असं सध्या म्हणता येईल आणि या अर्थानं तर उलट प्रादेशिक राजकारणानं लोकशाहीला बळकटीच आणली असं म्हणता येईल.   

राम जगताप - यूपीए-१ आणि यूपीए-२च्या काळात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबरोबरीनं किंवा त्यांच्या वरचढ असं काँग्रेस पक्षाध्याक्ष म्हणून सोनिया गांधी यांचं सत्ताबाह्य सत्ताकेंद्र निर्माण झालं आहे, असं बोललं जातं…

डॉ. झोया हसन – संयुक्त पुरोगामी आघाडी – १ (यूपीए-१) मधील दोन सत्ताकेंद्रं असलेलं प्रारूप यशस्वी होण्याची दोन कारणं आहेत, असा दावा मी पुस्तकात केला आहे. सोनिया गांधी यांच्या नावाभोवती असलेलं वलय आणि दुसरं म्हणजे, डाव्यांचा बाहेरून मिळालेला पाठिंबा तसंच सत्ताबाह्य सत्ताकेंद्र यामुळे यूपीए सरकारला बळकटीच मिळाली होती. यूपीए सरकारची कामगिरी आणि ‘आम आदमी’चा कैवार घेणारा पक्ष अशी प्रतिमा उभी करणारी, काँग्रेसची वचनपूर्ती करण्याची भूमिका याचाही मोलाचा वाटा होता. अंतिमत: असं म्हणता येईल की, उच्चस्तरावरील परस्परांना स्वीकारण्याच्या वृत्तीमुळे सरकार आणि काँग्रेस पक्ष एकत्र राहू शकले. या दोघांच्या (सरकार आणि काँग्रेस पक्ष) कोणत्याही दोन नेत्यांमध्ये कधीही विसंवाद असल्याचं आढळलं नाही. किंबहुना पक्षाच्या अध्यक्षा आणि पंतप्रधान यांच्यात अत्यंत सुंदर समन्वय होता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ डाव्या नेत्यानं व्यक्त केली आहे. अर्थात दूरगामी विचार करता पक्ष संघटना आणि राजकीय सत्ता यांच्यातील विसंवाद परवडण्याजोगा नाहीच. विद्यमान भारतीय राजकारणातील ‘धुळवडी’चा विचार करता, यूपीए-१ आणि यूपीए-२ यांची तुलना निश्चितच उपयुक्त ठरेल, विशेषत: काँग्रेस आणि त्या पक्षाचं भवितव्य जाणण्यासाठी तरी नक्कीच. त्यामुळे मला या पुस्तकाचा पुढील भागही लिहावा लागेल.

राम जगताप - भारतीय समाजाला स्वच्छ चारित्र्य, सात्त्विक नेतृत्व आणि प्रामाणिकपणा यांचं जरा जास्त आकर्षण आहे. याला आपली संतपरंपरा आणि अध्यात्म परंपरा कारणीभूत आहे. या गुणांमुळेच मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाबाबत ‘अपयशी पंतप्रधान’ अशी टीका होत असली तरी ती बरीचशी मोजूनमापून होते. स्वच्छ चारित्र्याच्या माणसांचा राजकारणात असा ‘कात्रजचा घाट’ होतो? या भारतीय राजकारणातील सात्त्विक नेतृत्वाच्या मर्यादा मानायच्या का? 

डॉ. झोया हसन – बहुतांश भारतीय नेते हे प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले नाहीत. किंबहुना, राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीबद्दल जनतेच्या मनात असलेल्या असंतोषाचं प्रतीक म्हणजे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनं आणि देशभरात उमटलेले निषेधाचे सूर, असं म्हणता येईल. उच्च स्तरावर उघड झालेले भ्रष्टाचार आणि घोटाळे हे राजकारणी आणि व्यावसायिक यांच्यातील ‘संबंध’ उघड करतात. हे संबंधच भारतातील राजकीय उदासीनतेस जबाबदार आहेत आणि हीच राजकीय नेतृत्वाची मर्यादा आहे.

(पूर्वप्रसिद्धी - दै. लोकसत्ता, ९ डिसेंबर २०१२)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......