१०० कोटीच्या ‘सैराट’साठी पॉपकॉर्न भाजताना...
सदर - मागोवा २०१६चा
महेशकुमार मुंजाळे
  • ‘सैराट’चं एक पोस्टर
  • Sat , 24 December 2016
  • मागोवा २०१६चा सैराट Sairat १०० कोटी 100 million नागराज मंजुळे Nagraj Manjule फँड्री Fandry कट्यार काळजात घुसली Katyar Kaljat Ghusali नटसम्राट Natsamrat

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने ‘तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं’ असं सारं वातावरण निर्माण केलंय. दणदणीत गाणी, दणदणीत चित्रपट, दणदणीत १०० कोटींचा गल्ला! एवढे दणके एकाच वेळी देऊन ‘सैराट’ अजूनही परतीच्या प्रवासाला निघालेला नाही, असं वाटतं. कारण आता कोटी कोटीच्या उड्डाणांची स्वप्नं पाहणाऱ्या नव्या दिग्दर्शक-निर्मात्यांच्या मनात आपापले ‘सैराट’ बनताना दिसत आहेत.

आजच्या लेखाचं निमित्त आहे 'ADbhoot' (अद्भुत की अॅड-भूत?) या लोकप्रिय मराठी वेब चॅनेलवरचा 'पॉपकॉर्न पे चर्चा' हा वेब शो. यावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडचं नाव आहे, 'पॉपकॉर्न पे महाचर्चा'. नेहमी रिलीज होणाऱ्या हिंदी-मराठी चित्रपटांचं अमोल परचुरेद्वारे खुसखुशीत परीक्षण कम प्रमोशन इथं होताना दिसतं; पण या एपिसोडमध्ये 'मराठी फिल्म इंडस्ट्री'मधल्या पाच 'महा'न लोकांना, म्हणजे महेश मांजरेकर, नितीन वैद्य, सई ताम्हनकर, जितेंद्र जोशी आणि नागराज मंजुळे यांना सोबत घेऊन केलेली चर्चा... म्हणून ‘पॉपकॉर्न पे महाचर्चा’.

 ‘२०१६मधले मराठी चित्रपट’ असा एकंदर चर्चेचा विषय चालू झाला आणि साधारण सर्व चर्चा ‘सैराट’भोवती फिरायला लागली. कारण ‘सैराट’ने खरोखर तो मैलाचा दगड रोवलाय. पूर्ण चर्चा काय आणि कशी झाली, ते आपण थेट यूट्युबवर पाहू शकालच, पण यात निर्माते नितीन वैद्य यांनी मांडलेली आकडेवारी ऐकली आणि हा आजचा लेख सुचला. त्या आकडेवारीमधून जाणवलं की, २००५ ते २०१५ या काळात तब्बल ९८५ चित्रपट सेन्सॉर झाले. त्यातले ५६१ रिलीज झाले, आणि या दहा वर्षांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच चित्रपट 'किमान' नफ्यात राहिले. चित्रीकरण होताना किती बंद पडले, यांची तर गणतीच नाही. २०१६मध्ये ‘सैराट’ आला आणि शतकी खेळी करून गेला, पण त्यानंतर व्हायरल झालेल्या १०० कोटीच्या स्वप्नाचं करायचं काय?

‘एक श्टोरी, एक क्यामेरा, घरातलाच हिरो किंवा हिरॉईन, जमिनीचा तुकडा इकून झालेला प्रोड्युसर कम फायनान्सर कम सावकार आन डीजेवर वाजतील आशी गाणी आसली की पिच्चरचे १०० कोटी फिक्सेत!’ असं समजणाऱ्या तथाकथित फील्ममेकर्सचं करायचं काय! हा संवाद खेडवळ असला, तरी अशीच काहीशी परिस्थिती शहरांमध्येसुद्धा जाणवते. उभं आयुष्य चित्रपट आणि नाटकांसाठी वाहून घेतलेल्या प्राध्यापक समर नखातेंचं एखादं जरी लेक्चर ऐकलं, तरी खाडकन कानाखाली बसते. ‘आपल्याला अजून नीट चित्रपट पाहता येत नाहीत, बनवण्याचं कुठं घेऊन बसलात!’, अशी उपरती होते. एक उत्कृष्ट चित्रपट बनवताना काय काय आणि किती किती विचार करावा लागतो, याचं अंशतः ज्ञान नखातेंकडून घेतलं, तरी खूप महत्त्वाचं ठरेल.

कुणी म्हणतं ‘सैराट अजय-अतुलच्या गाण्यांमुळे चालला’, कुणी म्हणतं ‘झी मराठीच्या जाहिरातींमुळे चालला’, कुणी म्हणतं ‘आर्ची-परश्या या गावाकडच्या पात्रांमुळे चालला’, तर कुणी ‘ ‘लक’ म्हणून चालला’, असंही म्हणून मोकळं होतं! खरं तर सैराट ‘लक’ सोडता वरच्या प्रत्येक गोष्टीच्या प्रमाणबद्ध मिश्रणाच्या रेसिपीने चालला, पण माझ्या मते त्याची सर्वांत जास्त महत्त्वाची भक्कम बाजू होती पटकथा! पडद्यावर नेमकं काय दिसणार, हे आधीच लिहून ठेवणं म्हणजे पटकथा. सद्यःस्थितीमध्ये सर्वांत जास्त दुर्लक्षित बाब असते पटकथा. म्हणूनच चित्रपटांना खोली नसते, असं म्हटलं जातं. नागराज उत्कृष्ट दिग्दर्शक नंतर आहे, त्याआधी तो उत्कृष्ट पटकथा-लेखक आहे. त्याच्या चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये किंबहुना शॉटमध्ये काही ना काही लॉजिक असतं.

‘फॅन्ड्री’ संपताना त्याने दगड मारला तो थेट समाजाला! ‘सैराट’ सुरू होताना काळ्या पडद्यावर क्रिकेटच्या कॉमेंट्रीचा नागराजचा फक्त आवाज यायला लागतो. ज्यात तो म्हणतो, 'येथे उपस्थित क्रिकेट रसिकांचं, नेत्यांचं, बंडरूंचं आणि भुरट्या चोरांचं बिटरगाव प्रीमिअर लीगमध्ये हार्दिक स्वागत'. यातही प्रेक्षागृहात बसलेल्या समाजाला सरळ सरळ बंडरू आणि भुरट्या चोरांची उपमा देऊन तो संपूर्ण चित्रपट दाखवायला मोकळा होतो! ‘चित्रपट नेमका कशावर आहे?’, असं विचारलं, तर कुणी म्हणेल ‘प्रेम’, कुणी म्हणेल ‘आंतरजातीय विवाह’, तर कुणी म्हणेल ‘ऑनर किलिंग’. अर्थात, या सर्वच विषयांवर ‘सैराट’ भाष्य करण्यात यशस्वी झालाय, पण माझ्या मते ‘सैराट’ची निर्मिती 'अधिसत्ता, सत्तेचं गणित, प्रभुसत्ता' या विचारांना घेऊन झाली. शक्ती, सामर्थ्य, हुद्दा यांच्या जोरावर इतर व्यक्ती किंवा समाजावर हुकूमत गाजवणं म्हणजे अधिसत्ता. केवळ पाच स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण ‘सैराट’ समजून घेऊ शकतो.

आपल्या झोपण्याच्या पद्धतीवरून आपलं उच्च-नीचतेमधलं नेमकं स्थान सिद्ध होतं, हे दाखवण्याचा नागराजचा प्रयत्न पाहूया :

१. आर्चीच्या स्वप्नात रमलेला परश्या त्याच्या घरातल्या जमिनीवर बिछाना अंथरून झोपलेला आहे. कारण त्याची जातीनिहाय सामाजिक उंची (खोली) जमिनीवर आहे.

२. 'आता गं बया का बावरलं' गाण्यात हुंदडणारी आर्ची स्वतःचा भला थोरला फोटो असणाऱ्या बेडरूममध्ये येते, तेव्हा तिचा बेड दिसतो. म्हणजेच पलंगाच्या 'वर' झोपणारी, सामाजिक उंची असणाऱ्या जातीची आर्ची तिथं अधोरेखित होते.

३. पळून येऊन हैद्राबादला सुमन अक्काने दिलेल्या खोलीत राहताना बापाच्या सामाजिक उंचीला तोडत तळातल्या परश्यासाठी आलेली आर्ची त्याच्यासोबत जमिनीवर झोपते.

४. संसाराची घडी बसते, तेव्हा दोघंही स्वतःची भूतकाळातली सामाजिक उंची बाजूला ठेवून कौटुंबिक उंचीमध्ये प्रवेश करतात. मग खालच्या जातीचा परश्या तिथं नवऱ्याच्या भूमिकेत शिरतो आणि पाटलाची आर्ची बायको होते. मग नवरा आणि बायको यांच्यातली अधिसत्ता दिसते. जिथं खाटेवर झोपलेला संशयी स्वभावाचा नवरा परश्या आणि जमिनीवर बिछाना अंथरून झोपलेली अबला बायको म्हणजे आर्ची दिसते.

५. ज्या पाटलाच्या सामाजिक अधिसत्तेला हादरा देऊन हे दोघं आलेले असतात, त्या पाटलाची माणसं यांना यांची 'जागा' दाखवून देतात आणि गळे चिरून जमिनीवर टाकून देतात. वास्तविक ही माणसं त्यांना फाशी देऊन लटकावू शकली असती, कापून खाटेवर टाकू शकली असती; पण तसं न करता ती त्यांना जमिनीवर टाकतात आणि स्वतःची सत्ता पुन्हा एकदा अधोरेखित करतात.

हे सर्व आपसूक घडून येत नाही, शूटिंग करताना पाहू असं म्हणून घडत नाही. त्यासाठी आधीच कागदावर संपूर्ण चित्रपट तयार असावा लागतो. हे झालं ‘सैराट’बद्दल, पण मराठीमध्ये  या वर्षात गाजलेल्या 'कट्यार काळजात घुसली' आणि 'नटसम्राट' या चित्रपटांबाबतसुद्धा असाच बारकाईने विचार केलेला दिसून येतो. पहिल्याच स्पर्धेत खानसाहेबांवर मात करून पंडितजी पुरस्कार म्हणून कट्यार स्वीकारतात, तेव्हा पाठीमागे मोठ्याने सूचना दिली जाते – ‘रावण-दहनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी दसरा मैदानावर यावं!’ त्यानंतर दसरा मैदानावर भला मोठा रावणाचा पुतळा आणि अहंकार दुखावल्याने अंगाची लाहीलाही झालेले खानसाहेब सतत दाखवले जातात. यामागे नक्कीच काही तरी अर्थ सूचित करायचा असतो. रावण रामापेक्षा श्रेष्ठ वीर होता असं म्हटलं जातं, पण रावणाचा नाश अहंकाराने झाला. सन्मानाची कट्यार मिळावी म्हणून खानसाहेब क्रोधाग्नीमध्ये भडकून कसे कसे वागतात, हे आपण पाहिलं. मुद्दा एवढाच की, रात्रीच्या शूटिंगसाठी लायटिंगचा खर्च, जनरेटर, एवढं मोठं मनुष्यबळ, एवढा मोठा रावण उभारण्याचा खर्च हे उगाच कुणी का करेल! त्यामागे अर्थ असतो.

‘नटसम्राट’मध्ये नाना पाटेकर टेबलावरच्या संपत्तीच्या कागदपत्रांवर ठेवलेली हत्तीची मूर्ती उचलून बाजूला ठेवतात आणि स्वतःशीच हसून ‘मी हत्ती उचलला’ असं म्हणतात. माणसाने हत्ती उचलायला जाणं हे जितकं आत्मघातकी आहे, तितकंच स्वतःच्या हयातीत संपूर्ण संपत्ती मुलांच्यात वाटून देणं हेदेखील आत्मघातकी ठरू शकतं, हेच तर सुचवायचं नसेल त्यातून?

या अशा अर्थ लावण्याला अनेक जण हसतात! तुम्ही स्वतःची अक्कल पाजळत आहात, पण खरोखर लेखक-दिग्दर्शकाने एवढा विचार त्या वेळी केला असेल का, असा सवाल करतात. यावर उत्तर म्हणजे - कदाचित नसेल. असाच विचार त्या लेखक-दिग्दर्शकाने केला असेलच असा दावा नाही, पण त्यांनी या गोष्टी काही ना काही विचार करून पेरल्या आहेत, हे नक्की. चित्रपट पाहताना ‘हे असंच का केलं असेल? ते तसंच का ठेवलं नसेल?’ असं स्वतःलाच विचारून पाहिलं, तर आपल्याला आपली उत्तरं आपोआप सापडतात; भले ती केवळ आपल्यापुरतीच मर्यादित असोत.

‘पडद्याची चौकट’ हेच चित्रपटाचं सत्य असतं. त्यामुळे त्यामध्ये कोण कुठे काय करतं आहे, याला कारण असावंच लागतं. त्या चौकटीमध्ये मांडलेल्या वस्तू, माणसांच्या हालचाली, प्रकाशयोजना, ध्वनियोजना, कॅमेऱ्याचा अँगल या सर्वच गोष्टींना काही नाही अर्थ असतोच असतो. पटकथेपासून संकलनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येणारी प्रत्येक बारीकसारीक गोष्ट चित्रपट-निर्मितीसाठी खूप मोलाची ठरते, आणि तो चित्रपट लोकांसमोर येण्यासाठी तेवढ्याच प्रमाणात जाहिरातबाजीसुद्धा महत्त्वाची असते. या जाहिरातबाजीच्या बदलत्या पाऊलखुणा ओळखूनच ‘ADbhoot’सारखं वेब चॅनेल नवनवे पर्याय देऊ पाहत आहे.

‘तुम्हाला अर्धवट शिकलेला किंवा कंपाऊंडर राहून हाताखाली शिकलेला डॉक्टर इलाजासाठी चालेल का? मग तुम्ही स्वतः अर्धवट ज्ञान घेऊन फिल्ममेकर कसे बनता? आणि असं करून आपल्याकडे खूप गिऱ्हाईक येईल, अशी अपेक्षा का ठेवता?’, असं प्रा. नखाते म्हणतात. पुस्तकी ज्ञान घेऊनच किंवा पदव्या घेऊनच चांगला फिल्ममेकर बनतो असं नाही, पण इतरांची कामं पाहून, सल्ले घेऊन, सराव करून संपूर्ण ज्ञानाकडे किमान वाटचाल तरी करणं आपल्या हातात आहे. नाहीतर प्रदर्शित होऊन आपटलेल्या सिनेमांच्या रांगेत नव्हे, तर चित्रीकरण सुरू असतानाच गुंडाळलेल्या चित्रपटांचा इतिहास आपल्या खात्यावर जमा होईल... आणि स्वप्नातल्या १०० कोटीच्या सिनेमाचे पॉपकॉर्न कच्चेच राहतील.

लेखक मराठी चित्रपट व लघुपटांसाठी पटकथा लेखन करतात.

maheshmunjale@gmail.com

Post Comment

ADITYA KORDE

Sun , 25 December 2016

चांगला सिनेमा कोणता ? मनोरंजन हाच एक निकष मानला तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात . पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. सिनेमा चांगला कॉमेडी असेल तर नंतर बराच वेळ त्यातल्या गोष्टी आठवून मनातल्यामनात हसू फुटलं पाहिजे. किंवा मर्डर मिस्टरी असेल तर नंतर आपण गुन्ह्याचे धागे दोरे जुळवत बसलो पाहिजे उदाहरणार्थ गुलझारचा अंगूर हा (संजीव कुमार, देवेन वर्मा ने काम केलेला) किंवा "अंदाज अपना अपना"(आमिर खान, सलमान खान चा) हे असे चांगले कॉमेडी सिनेमे होते . तसाच नुकताच येउन गेलेला "दृश्यम " हा असाच उत्तम मर्डर मिस्टरी होता. सैराट सारखा सिनेमा काढल्याबद्दल नागू तात्यांच लई म्हणजे लैच अभिनंदण!' बाकीचे मराठीतले मैलाचे दगड म्हणजे मैलाचे खडे वाटावेत असा एकच धोंडा तुम्ही मारलायत , मराठी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंत.खरच, मनःपूर्वक अभिनंदन. आता एक अस्सल पुणेकर असल्याने स्वतः सोडून इतर कोणाचंहि यापेक्षा जास्त कौतुक करणे मला अलाउड नाही. म्हणून कौतुक सोडून मुख्य मुद्दा धारावाहिक मालिका ( TV), चित्रपट, नाटक हे काही प्रबोधनाचं किंवा विचार/ मत प्रसाराचं प्रभावी साधन असू शकत नाही. नाहीतर 'एकच प्याला' पाहून लोकांनी दारू पिणं सोडलं असतं किंवा 'आव्हान' हि सिरीअल पाहून महाराष्ट्र मध्ये तरी हुंडाबळी अगदी बंद नाही तर कमी तरी झाले असते. एक मात्र खरं की सर्वसाधारणपणे चित्रपट, नाटकात( वास्तववादी म्हटल्याजाणाऱ्या) तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते असे आपण म्हणू शकतो. हे प्रतिबिंब सैराट मध्ये अतिशय स्वच्छ पडलेले आहे. नागराज मंजुळे यांना यातला व्यक्तिगत अनुभव आहेच पण त्यांची निरीक्षणशक्ती आणि घटनांवर व्यंग करण्याची हातोटी अफलातून आहे. गावामधले सत्तेचे राजकारण, धनदांडग्या मराठ्यांची गुंडगिरी, सर्व स्तरात रुजलेली आणि हल्ली जरा जास्त उफाळून आलेली जातीयता ते भेदक पणे टिपतात. या सगळ्या मध्ये प्रकर्षाने जाणवते ती ब्राह्मणवर्गाची अनुपस्थिती … खरच का ब्राह्मण वर्ग गावातून हद्दपार झाला आहे किंवा इतका अदखलपात्र झाला आहे? मला माहित नाही पण इतर गोष्टी बारकाईने टिपणाऱ्या आणि निर्भीडपणे मांडणाऱ्या मंजुळेकडून यात चूक होईल असे वाटत नाही. FANDRI मध्ये ब्राह्मणांचे नाममात्र दर्शन तरी झाले होते. त्यातला जब्याने मारलेल्या दगडातला एक दगड ब्राह्मणांवर हि आल्याचं मला भासलं होतं . (हे ब्लोग वर मराठी लिहिताना अर्धचंद्र कसा काढायचा कोणी सांगेल का? ) एकंदरीत प्रेम किंवा प्रथम दर्शनी प्रेम या गोष्टीच्या गंभीरतेबद्दल माझ्या मनात शंका आहे ( माझा स्वतःचा (आणि अर्थात माझ्या बायकोचादेखील) प्रेम विवाह आहे तरीसुद्धा किंवा म्हणूनच… ). प्रेम करणं सोपं , विरोध झाला म्हणून विद्रोह करणं, मारामाऱ्या करणं, पळून वगैरे जाणं एकदम थ्रिलिंग , पण पुढे निभावून नेणं आणि एकमेकांना ओळखून , ADJUST करून संसार करणं अत्यंत अवघड. त्या दोघांचा हा प्रवास हि अत्यंत उत्तम दाखवला आहे. एक लहानशी गोष्ट जी मला खटकली ती म्हणजे आर्ची हि फारच AGGRESSIVE आणि OPEN दाखवली आहे. पुरुषी मानसिकतेच्या , मध्ययुगीन सरंजामी मनोवृत्तीच्या कुटुंबात ते सुद्धा खेडेगावात एका मुलीला असं वागू दिलं जातं हे काही आपल्याला पटलं नाही बुवा. असो चित्रपटाचा शेवट नागराजच्या आधीच्या चित्रपटाप्रमाणेच अपेक्षित,वास्तववादी अन तरीही सुन्न करणारा. थेटरातून बाहेर पडताना डोक्यात विचारांचा कल्लोळ घेऊनच आपण बाहेर पडतो. या चित्रपटातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आर्चीने (रिंकू राजगुरूने) केलेला अप्रतिम अभिनय. तिचा अभिनय विशेषतः हैदराबादला पळून आल्यानंतर घरच्यांची य़ेणारी आठवण, परिस्थितीशी जुळवून घेताना होणारा त्रास, किंवा मूल झाल्यानंतर आईशी फोनवर बोलताना स्वतःची खुशाली कळवताना आणि घरच्यांची खुशाली विचारताना होणारी मनातली कालवाकालव , ती स्वरातली नाजूक कंपनं आणि चेहऱ्यावर दिसणारी अगतिकता ती ज्या पद्धतीने दाखवते ते पाहून अंगावर सर्रकन काटा आला. सीमा या पिक्चर मध्ये नूतनने असाच अभिनय केला होता त्याची आठवण झाली पण तो नूतनचा काही पहिला चित्रपट नव्हता.हि पोरगी फारच सशक्त अभिनय करणारी निघाली बुवा. आजकालच्या मराठीतल्या आघाडीच्या सोनाली कुलकर्णी(अप्सरा फेम) किंवा स्पृहा जोशी, अगदी सई ताम्हणकर वगैरे तिच्यापुढे टीनपाट वाटू लागतात (त्या आहेत हि तशा टीनपाटच) त्या दोघांचा खून होणार याचा अंदाज आला होता पण तो ज्या पद्धतीने दाखवला ते पाहून, त्या लहान पोराचा चेहरा पाहून भडभडून आलं, आई वडलांच्या रक्ताने माखलेले पाय घेऊन ते पोर बाहेर जातं आणि रस्त्यावर त्याच्या रक्ताळलेल्या पाऊलखुणा आपल्या डोळ्यांवर / डोक्यावर फेकून चित्रपट संपतो . हा म्हणजे नागराज त्याच्या कलेतून आपल्या वर काय परिणाम साधतो त्याचा कळसाध्याय आहे. असो आपल्याला हा चित्रपट जाम आवडला. या आधी रेगे हा पिक्चर पाहून असाच अस्वस्थ झालो होतो. पण असा अस्वस्थपणा यायलाच पाहिजे नाहीका ?… ---आदित्य


Bhagyashree Bhagwat

Sat , 24 December 2016

चित्रपटांकडे नवीन आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लावणारा नेमका लेख! आवर्जून वाचावा असा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......