काँग्रेसची बम्बम्!
पडघम - देशकारण
कुमार केतकर
  • सीताराम केसरी, नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा आणि आय. के. गुजराल
  • Thu , 30 May 2019
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress इंदिरा गांधी Indira Gandhi राजीव गांधी Rajiv Gandhi नेहरू Nehru भाजप ‌BJP एच.डी. देवेगौडा H. D. Deve Gowda सीताराम केसरी Sitaram Kesri

१९९७ मध्ये तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी संयुक्त आघाडीचे पंतप्रधान देवेगौडा यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. देवेगौडा काँग्रेस पक्ष व अध्यक्षाशी सल्लामसलत करत नाहीत, असं कारण त्यांनी पुढे केलं होतं. पण खरी गोष्ट अशी होती की, त्यांनाच पंतप्रधान व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षातील कुणालाच विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन टाकला. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी सुरू झाली. नरसिंहर राव, शरद पवार यांचे गट सीताराम केसरींविरोधात होते. त्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहचला होता. त्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल १९९७ रोजी हा लेख केतकरांनी लिहिला होता. पण १०-१२ दिवसांनंतरही केसरींना कुणीच फारसा पाठिंबा दिला नाही. काँग्रेस पक्षातही नाही आणि संयुक्त आघाडीच्या पक्षांपैकीही कुणी नाही. तेव्हा त्यांनी ‘देवेगौडा नको, इतर कुणी चालेल’, असा पवित्रा घेतला. त्यामुळे गुजराल पंतप्रधान झाले. पण ही पुढची गोष्ट. सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असतानाच्या काळात काँग्रेसची कशी ‘बम्बम्’ झाली होती, याचे चित्र या लेखातून स्पष्ट होते.

.............................................................................................................................................

काँग्रेस गतप्राण झाली आहे की, अखेरची घरघर चालू आहे, इतकाच आता मतभेदाचा मुद्दा शिल्लक आहे. काँग्रेसविरोधाचे व्रत घेऊन गेली ५० वर्षे राजकारण करणाऱ्या पक्षांना जे जमले नाही, ते सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने एका फटक्यात साध्य केले आहे. परंतु हे पाप फक्त केसरींचे आहे, अशी ओरड करणारे खासदार व बाकी पुढारी अस्सल आपमतलबी आहेत. मार्चच्या ३० तारखेपासून ते एप्रिलच्या ११ तारखेपर्यंत या शूर काँग्रेस खासदारांना केसरींच्या या निर्णयाला आव्हान देणे शक्य होते. आता ए. आर. अंतुले सात्त्विक संतापाचा आव आणून म्हणत आहेत की, ‘पक्षादेशाने हात बांधलेले असल्यामुळे आपण सदसदविवेकबुद्धीने मतदान करू शकलो नाही.’ पक्षादेश १० एप्रिल रोजी निघाला, तोपर्यंत सर्व काँग्रेस खासदार लोचटपणे केसरींच्या बाजूने हात वर करत होते. ‘आपला खाजगीत विरोध होता, पण आपण पक्षशिस्त पाळली,’ हा बचाव ढोंगीपणाचा आहे.

ज्या महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींचा वारसा ही मंडळी सांगतात, त्या काँग्रेस नेत्यांनी जेव्हा जेव्हा ‘पक्षशिस्त की सदसदविवेकबुद्धी?’ असा पेच उभा राहिला, तेव्हा तेव्हा सदसदविवेकबुद्धीने निर्णय घेतला आहे. संजीव रेड्डी यांनाच राष्ट्रपतीपदासाठी मते द्या, असा पक्षादेश होता, इंदिरा गांधींनी सदसदविवेकबुद्धीला आवाहन करून रेड्डींना पाडण्याचे व व्ही. व्ही. गिरींना निवडून देण्याचे आवाहन केले.

महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस निवडून आल्यानंतरही आपली भूमिका सोडली नाही. सुभाषचंद्रांनी राजीनामा दिला आणि पुढे दोघेही आपापल्या सदसदविवेकबुद्धीच्या मार्गदर्शनानुसार गेले.

अंतुलेंनी स्वत: १९८५ साली या सदसदविवेकबुद्धीची साक्ष देऊन राजीव गांधींविरुद्ध बंड पुकारले होते. परंतु ते आत्मिक बळ त्यांना केसरींविरुद्ध बंड करण्यासाठी कामी आले नाही. शरद पवारांनी नेहमीप्रमाणे आपली सदसदविवेकबुद्धी विभागून ठेवली आहे. त्यामुळे ते एका बाजूला जाहीरपणे, ‘केसरींच्या नेतृत्वामागे खंबीरपणे उभे राहा’ असे सांगतात आणि दुसरीकडे केसरीविरोधी भावना संघटित करून समांतर नेतृत्वाची तयारी करतात. पवार यांची सदसदविवेकबुद्धी इतकी शेळपट कधी झाली? वसंतदादा पाटील यांना ‘अंधारात’ ठेवून त्यांच्या आसनाचे पाय कापणाऱ्या आणि इंदिरा गांधींच्या विरोधातही स्वातंत्र्याचा झेंडा फडकावणाऱ्या शूर शरद पवारांचे अवसान ३१ मार्चला का गळाले?

जे काँग्रेसचे खासदार आता केसरींवर गिधाडाप्रमाणे तुटून पडत आहेत, त्यांच्यापैकी एकानेही ‘एकटे पडलो तरी हरकत नाही, पण जे आपल्या मनाला पटत नाही, ते करणार नाही,’ अशी भूमिका घेतली नाही. केसरींचा तथाकथित ‘डाव’ यशस्वी झाला असता आणि संयुक्त आघाडीने पंतप्रधान बदलून काँग्रेसला मंत्रिमंडळात सामील करून घेण्याची तयारी दर्शवली असती, तर हेच सर्व काँग्रेसचे खासदार केसरींच्या व नव्या पंतप्रधानांच्या दाराबाहेर मंत्रीपदासाठी हांजी हांजी करत आशाळभूतासारखे उभे राहिले असते. किंबहुना त्यांना केसरींचा डाव यशस्वी होईल असे वाटले म्हणून अशी ‘अभेद्य’ एकजूट त्यांनी ३० मार्च ते १० एप्रिल दाखवली. म्हणजे त्यात पक्षशिस्तीचा भाग नव्हता, तर स्वार्थ होता. केसरींबरोबर जाऊन तो स्वार्थ साधता आला असता, तर तसे पाहायचे नाहीतर केसरींना खड्ड्यात ढकलून पुन्हा त्या स्वार्थाचा मार्ग चोखाळायचा, असा हा स्वार्थबुद्धीचा मार्ग होता.

सदसदविवेकबुद्धीचा संदर्भही देण्याची एकाही काँग्रेस खासदाराची लायकी नाही. या सर्व काँग्रेस पुढाऱ्यांचा जनजीवनाशी संबंध इतका तुटला आहे की, लोकांमध्ये कोणत्या प्रकारचा भावना खदखदत आहेत, त्यांच्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत, इतर पक्षांबद्दल त्यांना काय वाटते, हे काहीही त्यांच्या मन:पटलावर उमटत नाही. त्यांच्यापैकी बहुतेकजण स्वत:च्याच मस्तीत, सत्तेमुळे संपादन केलेल्या संपत्तीत मश्गूल आहेत की, देशातील प्रत्येक राज्यात, समाजाच्या प्रत्येक थरात काँग्रेसबद्दल किती घृणा आहे, याचा अंदाजही त्यांना आलेला नाही. काँग्रेस पुढाऱ्यांना साधी ही गोष्ट उमगलेली नाही की, लोक इतर पक्षांकडे वळत होते, ते काँग्रेसला विटून.

सध्या प्रादेशिक पक्षांच्या ‘नवसामर्थ्या’विषयी बरेच बोलले जात आहे. प्रादेशिकतेची भावना नवी नाही. याआधी १९६७, १९७७मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. पण या सर्व प्रसंगांत काँग्रेस चुकांमधून शिकली, प्रादेशिक भावनांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न तिने केला आणि पुन्हा नव्या उमेदीने पक्ष उभा राहिला. या सर्व काळात जुन्या, वयोवृद्ध नेतृत्वाला, कधी बंडाने तर कधी मानाने दूर केले गेले आणि नवीन नेते पुढे आले. राजीव गांधींनी तसा शेवटचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या हत्येनंतर सर्व दिग्गज मंडळी खुर्च्या घट्ट धरून आहेत किंवा खुर्च्यांच्या मागे लागली आहेत. या खुर्चीबुद्धीने काँग्रेस मरणप्राय झाली आहे- १४२ लोकसभा खासदारांपैकी एकाने जरी सदसदविवेकबुद्धीचे निशाण फडकावले असते, तरी पक्षाची अब्रू थोडीफार वाचली असती. आता केसरींविरुद्ध बंड केले, तरी ‘जो बूंदसे गयी है, वो हौदसे नाहीं आ सकती!’

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

एकजूट सत्तेपुरतीच

संयुक्त आघाडीने आपला डोलारा ते ११ दिवस मोठ्या हिमतीने टिकवला. आघाडीच्या त्या बुरुजाला १० एप्रिलपर्यंत लहानसे खिंडार जरी पडले असते, तरी केसरींचा विजय झाला असता आणि पर्यायाने आजची बंडाळीची परिस्थिती काँग्रेसमध्ये आली नसती. आघाडीच्या नेत्यांनी त्या ११ दिवसांत आणि नंतर लोकसभेतील चर्चेत जी मुत्सद्देगिरी व एकजूट दाखवली, त्यामुळे काँग्रेसचा पाया उखडला गेला आहे.

या घटनेमुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचे भरते आले आहे. या पक्षातील मुत्सद्दी गेली काही वर्षे अशी मांडणी करत आहेत की, काँग्रेस जसजशी लयाला जाईल, तसतशी ती जागा भाजप घेईल. हिंदुत्वाची घोषणा घेतलेला; परंतु हिंदुत्वाच्या संस्कृतीबद्दल व सहिष्णुतेबद्दल बेफिकीर असलेला भाजप जर काँग्रेसचीच प्रतिकृती होऊ पाहत असेल, तर आताच त्यांनी काँग्रेसची अशी अवस्था का झाली आहे, याकडे लक्ष द्यावे. काँग्रेसला या अवस्थेपर्यंत यायला १११ वर्षे लागली आहेत. भाजपला गुजरात आणि राजस्थानमध्ये आत्ताच ‘काँग्रेसी’ झटके बसले आहेत.

संयुक्त आघाडीतील पक्षांनीही काँग्रेसच्या या अवस्थेबद्दल स्वत:ला हर्षवायू होऊ देऊ नये. त्यांच्यातील एकजुटीला तत्त्वाचा, ध्येयांचा वा उद्दिष्टांचा आधार नाही. काँग्रेसविरोधाच्या व्यावहारिक राजकारणाला आणि नेहरू कुटुंबाच्या द्वेषाला त्यापैकी बहुतेकांनी उदातत्तेचा मुलामा चढवला आहे. जयप्रकाश नारायण जिवंत असतानाही त्यांना तो उदातत्तेचा मुलामा टिकवता आला नाही.

त्यानंतर जेपींची काही वस्त्रे व्हीपींनी परिधान केली. आज ते या १४ पक्षीय संयुक्त आघाडीचे मार्गदर्शक आणि तत्त्वचिंतक आहेत. हे पक्ष १९६७ ते १९९७ या काळात काही शिकले आहेत, असे मानायला थोडीफार जागा आहे. तरीही या संयुक्त आघाडीने आपण एकजीव असलेली राष्ट्रव्यापी संघटना आहोत, असा आव आणू नये. काँग्रेसच संपली की काँग्रेसविरोधाच्या तत्त्वज्ञानाला बूडच उरत नाही. मग या आघाडीतील पक्ष ‘फ्रीस्टाईल’ करू लागतील आणि भारतीय जनतेवर पुन्हा एकदा भ्रमनिरासाचा प्रसंग येईल.

काँग्रेसबरोबर तडजोडीचे पर्याय शोधणे शक्य व्हावे म्हणून देवेगौडा यांनी संयुक्त आघाडीचे नेतृत्व सोडावे, अशी मागणी आघाडीतील द्रमुक, तेलुगु देसम, तामिळ मानिला काँग्रेस आणि आसाम गण परिषद या पक्षांच्या ‘फेडरल फ्रंट’ने केल्याचे वृत्त रविवारीच आले आहे. शिवाय देवेगौडांना पर्याय म्हणून कोणाला निवडावे, यावर कुरबूर आहेच.

थोडक्यात काँग्रेसविरोधाच्या व्यावहारिक राजकारणावर आघाडीचे तारू तरून जाऊ शकणार नाही. पडद्याआड वेगळेच काही चालले असले, तरी आघाडीने परत देवेगौडा यांचेच नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले आहे. त्यांना काँग्रेसकडून आता पाठिंबा मिळायला हवा असेल, तर केसरींना राजीनामा द्यावा लागेल आणि पक्ष फुटावा लागेल. आता पक्ष फुटला तरी त्याला फुटीचे तेज प्राप्त होणे कठीण आहे; कारण काँग्रेसवाल्यांचा संधिसाधूपणाचा त्यातून दिसेल.

केसरी आणि देवेगौडा या दोघांनाही बाजूला करून नवे सरकार बनवले गेले, तरी दोघांच्याही तत्त्वनिष्ठेचा बुरखा उतरणारच. निवडणुका मनातून कोणत्याच पक्षाला वा खासदाराला नको असल्यामुळे तीव्र अंतर्विरोधावर मात करून कदाचित असे सरकार येईलही, पण आपापला नेता बदलून. पण काँग्रेसच्या मदतीने मंत्रिमंडळ बनले, तर केसरी म्हणतील, ‘माझा बळी गेला पण गड तर जिंकला!’

नरसिंह राव स्थितप्रज्ञ होते. त्यांनी डोळ्यासमोर काँग्रेसचा ऱ्हास होऊ दिला. केसरी बेपर्वा आहेत. त्यांनी आपल्या हाताने काँग्रेसवर आघात केला. केसरींना ३१ मार्च रोजी काही खासदारांनी विचारले होते, ‘परिस्थिती कशी आहे?’ केसरींनी उत्तर दिले होते ‘सब बम्बम् है!’ अखेरीस काँग्रेसची ‘बम्बम्’ करण्याचे पाप व श्रेय (!) सीताराम केसरी या हंगामी अध्यक्षाकडे आले, ज्याची निवड काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी झाली होती!

(हा लेख केतकरांच्या ‘मोनालिसाचे स्मित’ (सप्टेंबर २००३) या मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे.)

.............................................................................................................................................

लेखक कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत.

ketkarkumar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

??:???? ????

Thu , 30 May 2019

1997चा लेख आता छापायचे प्रयोजन काय?? सध्याच्या स्थितीवर काय म्हणणे आहे कुमारचे ते छापयचे ना ? अहो मोदिजींच्या चमकदार विजयाने बोलती बंद झाली की काय कुम्मारची ?? की खांग्रेसच्या दारूण पराभवामुळे माध्यमांसमोर तोंड दाखवायची लाज वाटते 'चाटूगिरी एक्सपर्ट 'कुम्मारला ?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......