अजूनकाही
आज ‘अक्षरनामा’ सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. जसे पाहिले तर हा काळ खूपच छोटा आहे. पण या दोन महिन्यात लेखक आणि वाचकांनी आमच्यावर जे प्रेम केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
राजकारणापासून समाजकारणापर्यंत, साहित्यापासून संस्कृतीपर्यंत, नाटकांपासून सिनेमांपर्यंत, पुस्तकांपासून ई-बुकपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत, अर्थकारणापासून अनर्थकारणापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लोकलपासून ग्लोबलपर्यंत, फटाक्यांपासून धमाक्यांपर्यंत, फॅशनपासून पॅशनपर्यंत… प्रत्येक विषयाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर मांडणी करण्याची भूमिका घेऊन २३ ऑक्टोबर रोजी आम्ही ‘अक्षरनामा’ हे मराठीतलं पहिलंवहिलं डेली फीचर्स पोर्टल व अप सुरू केलं.
प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या शब्दांचा आधार घेत असे म्हणता येईल की, मतभेदांवर आमचा प्रामाणिक विश्वास आहे. अनेक माणसे नाइलाज म्हणून मतभेद सहन करतात, आमचे तसे नाही. आमच्यापेक्षा भिन्न भूमिकांविषयीही आम्हाला आस्था आहे. कारण वेगवेगळ्या बाजू मिळूनच कोणताही विचार पूर्णत्वाला जात असतो, ही आमची श्रद्धा आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वांना विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले असले, तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आणि विचार म्हणजे व्यभिचार नव्हे! मतभेदांचे आम्हाला अगत्य राहील, फक्त त्यामागे सद्हेतू असावा; व्यक्ती, संस्था, पक्ष, वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा व्यापक समाजहित असावे. आधुनिक जगात सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांवर भारतीय राज्यघटना उभी आहे. या मूल्यांचे आपल्या परीने रक्षण करणे हे ‘अक्षरनामा’चेही धोरण असेल, असेही आम्ही आमच्या पहिल्या संपादकियामध्येच स्पष्ट केले होते.
खरे सांगायचे तर ‘अक्षरनामा’ सुरू करताना आम्ही काहीसे साशंक होतो की, ऑनलाईन माध्यमात काहीशा गंभीर लेखनाला कसा प्रतिसाद मिळेल? काही मित्रांनी आम्हाला सुचवले होते की, तुम्ही १००० शब्दांच्या पुढचे लेख छापू नका. कारण एवढा मोठा मजकूर ऑनलाइन वाचण्याएवढा वेळ कुणाकडे नसतो. २३ ऑक्टोबरला ‘अक्षरनामा’ सुरू झाले तेव्हा आम्ही त्यावर तब्बल ५० लेख टाकले होते. त्यातील मराठा समाजाच्या मोर्चाविषयीचा लेख दोन हजार शब्दांपेक्षा मोठा होता, तर शरद पवारांच्या आत्मचरित्रावरील तीन भागातले परीक्षण तब्बल दहा हजार शब्दांचे होते. मात्र हे सर्व लेख वाचले गेले. दिवाळी अंकातील तर जवळपास सर्वच लेख दोन हजार शब्दांपेक्षाही मोठे होते. त्यामुळे त्यातील काही दोन भागांमध्ये छापावे लागले.
एकंदर ‘अक्षरनामा’चे उत्स्फूर्त स्वागत झाले. पहिल्याच दिवशी आम्ही वेबसाइट आणि अँड्राइड अॅप दोन्हीही सुरू केले. त्याला महाराष्ट्रभरातून, देशातून आणि देशाबाहेरूनही चांगला प्रतिसाद मिळाला. २५ ऑक्टोबरपासून ‘अक्षरनामा’ दिवाळी अंकाला सुरुवात झाली. १ नोव्हेंबरपर्यंत रोज तीन लेख या प्रमाणे दिवाळी अंकांचे लेख प्रकाशित केले गेले. त्यालाही वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवाळी अंकाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. १ नोव्हेंबरपासून ‘अक्षरनामा’ दैनंदिन स्वरूपात प्रकाशित होऊ लागले.
गेल्या दोन महिन्यात अनेक वाचकांनी फोन, मेसेजस, मेल याद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. काहींनी ‘अक्षरनामा’ची तुलना इंग्रजीतील ‘scroll.in’, ‘firstpost’ यांच्याशीही केली आहे. ही दोन्ही इंग्रजीतील डिजिटल डेली भारतभर लोकप्रिय आहेत. ‘अक्षरनामा’ हेही मराठीतील डिजिटल डेली म्हणूनच आम्ही सुरू केले आहे. अशा प्रकारचे दुसरे पोर्टल मराठीमध्ये नसल्याने तशी तुलना होणे काही प्रमाणात साहजिकही आहे. मात्र इंग्रजीतील दोन्ही पोर्टल्स ही प्राधान्याने बातम्यांची आहेत. ‘अक्षरनामा’ हे मात्र ‘फीचर्स पोर्टल’ आणि तेही मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत. त्यामुळे ‘scroll.in’, ‘firstpost’ यांच्याशी ‘अक्षरनामा’ची तुलना करता येणार नाही.
हे मात्र खरे की, फक्त बातम्या देणाऱ्या अनेक वेबसाइटस, अॅप मराठी आणि इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळे आता खरी गरज ही त्या बातम्यांची घटना, वास्तव आणि सत्य या आधारावर केल्या जाणाऱ्या विश्लेषणाची आहे. ते लक्षात घेऊन आम्ही ‘अक्षरनामा’ सुरू केले. रोज साधारणपणे तीन लेख, शनिवार महिला व कला-संस्कृतीविषयीचे लेख आणि रविवार साहित्य-पुस्तक आणि इतर अशा पद्धतीने लेख द्यायचा प्रयत्न केला. बहुतांश लेखन हे त्या त्या विषयाशी संबंधित पत्रकार, अभ्यासक यांच्याकडून करून घेतले जाते. त्यामुळे हवे असलेले लेखन वेळेत मिळवणे, हे मोठे जिकिरीचे काम होऊन बसते. अनेकदा तातडीने हव्या असलेल्या विषयावर लेखकांना तेवढ्याच तत्परतेने लिहून देणे शक्य होत नाही. मात्र तरीही आमच्या बहुतेक लेखकांनी आम्हाला सर्वतोपरी लेखनसहकार्य केले. त्यांच्यामुळेच गेले दोन महिने थोड्याफार फरकाने आम्ही चांगला मजकूर देण्याचा प्रयत्न केला. आमचे सदरलेखकही चांगले लेखनसहकार्य करत आहेत.
‘अक्षरनामा’ जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी, त्यावरील लेखनाचे अपडेटस देण्यासाठी आम्ही फेसबुक व ट्विटर पेजही सुरू केले. वेबसाइट व अपवर लेख अपलोड केले की, त्याची माहिती फेसबुक व ट्विटर पेजही दिली जाते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक वाचक-लेखक स्वत:हून त्यांना आवडलेले लेख शोअर करतात, रीट्विट करतात. अनेक वाचक व्हॉटसअपवरून त्यांना आवडलेल्या लेखाच्या लिंक इतरांना फॉरवर्ड करतात. वाचकांच्या या स्वयंस्फूर्त प्रेमाबद्दल आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभारी आहोत. त्यांचा हा पाठिंबा, प्रोत्साहन, कौतुक यांमुळे आमचा विश्वास दुणावला आहे. या वाचकांच्या स्वयंस्फूर्त सहकार्यामुळे ‘अक्षरनामा’ची मोठ्या प्रमाणावर ‘माउथ पब्लिसिटी’ झाली.
गेल्या दोन महिन्यात तीस हजार युनिक वाचक, एक लाखांहून अधिक पेज व्हियू आणि हजाराच्या घरात अॅप डाउनलोडिंग अशी एकंदर ‘अक्षरनामा’ची एकंदर वाटचाल आहे. ती उत्साहवर्धक नक्कीच आहे. नवीन वर्षांत काही नवी सदरे, नवे विषय आणि नवे लेखक घेऊन आम्ही अधिक चांगल्या स्वरूपात येऊ. वाचकांना काही तांत्रिक समस्या अजूनही येतात. त्याही लवकरच सोडवल्या जातील.
वाचकांनी गेल्या दोन महिन्यात ‘अक्षरनामा’वर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्यापरीने नक्की करू. तुमच्या सूचना, प्रतिक्रिया आणि मते आम्हाला जरूर कळवा. त्यातून ‘अक्षरनामा’ अधिकाधिक वाचकस्नेही करायला मदत होईल. तसेच यापुढेही ‘अक्षरनामा’चे वाचक आमची ही धडपड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला मदत करतीलच. ‘वर्तमानकाळाविषयी सत्यापेक्षाही तारतम्यपूर्ण विवेक बाळगणं ही आपली जबाबदारी असते,’ असं व्हॉल्टेअर म्हणतो. ती आपल्यापरीने निभावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, यापुढेही करत राहू.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
abhijeet bhagwat
Sat , 24 December 2016
सध्याच्या काळात मराठी मधील दर्जेदार लेखन म्हणजे अक्षरनामा
Nivedita Deo
Fri , 23 December 2016
khoop chan lihilele ahe