अजूनकाही
२३ मे २०१९ रोजी भाजपच्या विक्रमी विजयानं देशाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला! त्यामुळे येत्या ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेचा मुकूट मस्तकी चढवतील. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर मोदींनाच एवढं घवघवीत यश मिळालं आहे. भाजपच्या नेत्यांनादेखील ३५२ जागा मिळण्याची आशा नव्हती. अनेकांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असं भाकीत केलं होतं. मागील पाच वर्षांतली पंतप्रधान मोदींची कारकीर्द समाधानकारक नव्हती. भाजपमधील अनेक नेते पक्षात मोदींना पर्याय शोधत होते. मात्र निकालानंतर सर्व शंका, आशंका खोट्या ठरवत, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार हे निश्चित झालं!
१७वी लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी विचार करायला लावणारी ठरली. नेत्यांच्या विषारी भाषणांनी समाजातील शांतता घालवली. सत्य आणि असत्यामध्ये संभ्रम निर्माण केला. भारतीय राजकारणाची सर्वांत हीन पातळी या निवडणुकीत पाहायला मिळाली.
मागील पाच वर्षांत नोटबंदी, जीएसटी, बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव, दहशतवाद, भ्रष्टाचार, शिक्षण-आरोग्य सुविधा, शेतकरी आत्महत्या इ. मुद्द्यांवर मोदी सरकार अपयशी ठरलं. त्यामुळे निवडणुकीत जनतेच्या मनात हे विषय राहतील अशी अपेक्षा होती. मात्र भाजपनं प्रचारात सोयीस्करपणे पाकिस्तान, भारतीय जवान, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याचा वापर केला. भाजपच्या प्रचारात प्रत्येक टप्प्यासाठी वेगळा भावनिक मुद्दा होता. भाजपप्रमाणे काँग्रेस आणि राहुल गांधींना प्रचार करणं जमलं नाही.
निवडणुकीच्या अगोदर मोदींना काही परदेशी पुरस्कार मिळाले. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी जागतिक नायकत्वाची भावना निर्माण झाली. मोदींवर टीका करणारे ‘पाकिस्तानधार्जिणे’ आहेत किंवा विरोधक द्वेषामुळे मोदींवर टीका करत आहेत, असं जनतेच्या मनात ठसवण्यात भाजपला यश आलं. ‘मोदी नाहीतर कोण?’ असं लोक विचारत. बालाकोट आणि पुलवामा हल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक उजळली. प्रचारसभांमधून मोदींनी पाकिस्तानला खुलेआम धमक्या दिल्या. पाकिस्तानला अशी धमकी देणारा पंतप्रधान मतदार पहिल्यांदा बघत होते.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar
.............................................................................................................................................
आपल्या समाजात संन्यासी, फकीर लोकांविषयी आदर असतो. फकीर माणूस कोणासाठी धनसंपदा गोळा करेल असा लोकांचा विचार असतो. मोदींनी स्वत:ला ‘फकीर’ म्हणून घेतलं. दुसरं म्हणजे या निवडणुकीत भाजपची नजर तरुण मतदारांवर होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपनं या वर्गावर प्रभाव पाडला. तेथील माहितीला खरं मानणारा हा वर्ग आहे. भाजपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांचं चारित्र्यहनन केलं. त्यामुळे काँग्रेसविषयी लोकांना विश्वास वाटला नाही. निवडणूक आयोगाची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखी होती, मोदींनी कितीही चुका केल्यातरी क्लिन चिट!
राफेल घोटाळ्यावरून काँग्रेसनं ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा लोकप्रिय केली. परंतु सत्ता परिवर्तन होण्यासाठी ती बाब पुरेशी नव्हती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी वगळता इतर नेते प्रचारात विश्वसनीय वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतःला एकाच मतदारसंघापुरतं मर्यादित केलं होतं. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे जनतेपर्यत पोहचले नाहीत. राहुल गांधींनी न्याययोजनेचा वारंवार भाषणात उल्लेख केला. परंतु फुकट पैसे खात्यात जमा होतील, यावर लोकांचा विश्वास बसला नाही. पंधरा लाखाचा जुमला लोकांनी अनुभवला होता. त्यामुळे काँग्रेसच्या न्याययोजनेचा जनतेवर प्रभाव पडला नाही.
प्रियंका गांधींना संघटन नसलेल्या उत्तर प्रदेशच्या प्रचाराची जबाबदारी देणं काँग्रेसला महागात पडलं. त्यांनी देशभरात प्रचार केला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. महाराष्ट्र काँग्रेसनं लढण्याआधीच हार मानली होती. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा जनमानसावर प्रभाव नाही. त्यांनी नवीन पिढी तयार होऊन दिली नाही. अशा अनेक गोष्टींची फळं काँग्रेस भोगत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-वंचित आघाडीच्या नेत्यांचा अहंकारही भाजप-सेनेला महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ देणारा ठरला!
परिणामी मोदींच्या नेतृत्वावर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास ठेवणं पसंत केलं. त्यांच्या पक्षाला संसदेत पूर्ण बहुमतानं निवडून दिलं. विरोधकांनी आता ईव्हीएम घोटाळ्याचे ढोल वाजवण्याची आवश्यकता नाही. भाजपला सत्तेतून घालवण्याची संधी मायावती, ममता बॅनर्जी, मुलायम सिंग, चंद्रबाबू नायडू, अरविंद केजरीवाल यांच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे आणि काँग्रेसच्या दरबारी नेत्यांच्या अहंकारामुळे गेली. निवडणूक जाहीर होण्या आधी विरोधी पक्षांच्या महागठबंधनाची चिन्हं होती. परंतु तारखा जाहीर झाल्यानंतर सगळे काचेच्या तुकड्याप्रमाणे वेगवेगळे झाले.
या निवडणुकीत सर्वाधिक अस्वस्थ करणारा निकाल प्रज्ञा सिंग-ठाकूरचा आहे. भाजपनं प्रज्ञा सिंग-ठाकूरला उमेदवारी देणं फारसं धक्कादायक नाही, कारण ती त्यांची विचारधारा आहे. पण मध्य प्रदेशमधील मतदार विवेक ठेवतील, ही अपेक्षा फोल ठरली!
या निवडणुकीनं समाजात विषारी वातावरण तयार केलं आहे. मागील पाच वर्षांत दलित, मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याक समाजानं जे भोगलं त्याची पुनरावृत्ती या पाच वर्षात होणार नाही; लेखक-पत्रकारांचं स्वातंत्र्य, स्वायत्त संस्थावरील हल्ले, संविधानाची पायमल्ली होणार नाही; एवढीच माफक अपेक्षा आता मोदींकडून आहे.
.............................................................................................................................................
लेखक प्रशांत शिंदे पत्रकारितेचं शिक्षण घेत आहेत.
shindeprashant798@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 27 May 2019
प्रशांत शिंदे, लेख बाळबोध आहे. मोदी शासनाची कामगिरी समाधान्करण नव्हती हा दावा नेमक्या कशाच्या आधारे केलाय? भाजपचा २०१४ चा जाहीरनामा विरोधकांनी हाती घेऊन त्यानुसार मोदींचे वाभाडे का काढले नाहीत? खरी गोष्ट अशीये की विरोधक पडत्या बाजूचे आहेत. जाहीरनामा घेऊन आरोप केले तर मोदी त्यास खणखणीत प्रत्युत्तर देतील याची खात्री आहे. अशा रीतीने लेखाचा पायाच कच्चा असल्याने उरलेला लेख वाचला नाही. आपला नम्र, -गामा पैलवान