अजूनकाही
‘पीएम नरेंद्र मोदी’मध्ये दिसणारी हिंदुत्ववादी विचारधारा ही चित्रपटाचा विचार करता सर्वाधिक नगण्य म्हणावीशी बाब आहे. म्हणजे तिचं चित्रपटात केलेलं चित्रण हा चर्चेचा मुद्दा ठरू शकत असला तरी मुळात सदर चित्रपटाला सुमार आणि हास्यास्पद ठरवणाऱ्या इतर गोष्टी या विचारधारेच्या विरोधाभासी चित्रणापेक्षा अधिक ठळकपणे दिसून येतात. या गोष्टी चित्रपटाला एखाद्या बी-ग्रेड चित्रपटाप्रमाणे किंवा भारतीय डेली सोप्सप्रमाणे भासवतात. ही डेली सोपदेखील धार्मिक साहित्याचं अडाप्टेशन असलेली आहे. ज्यात नरेंद्र मोदी या व्यक्तीला एखाद्या अवताराप्रमाणे उभं केलं जातं.
चित्रपटकर्ते सुरुवातीलाच ऐतिहासिकदृष्ट्या (भरपूर) चुकीचं असलेलं चित्रण केल्याचं आणि सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याचं मान्य करत असल्याने कल्पनेच्या भराऱ्या स्वैरपणे घेतल्या जातात. मोदी आणि त्यांच्या बाजूने असणारे काही लोक सोडता इतर सगळे लोक देशाचे शत्रू असतात. हे लोक मोदींच्या धर्मनिरपेक्ष कारभारात अडथळे निर्माण करतात, या दैवी अवताराचे राक्षसी शत्रू बनून समोर येतात. तर्क, सत्य या गोष्टी चित्रपटाच्या गावी उरत नाहीत आणि मोदी ही व्यक्ती मागे पडून दोन तासांत एका मिथकाची निर्मिती केली जाते. अर्थात चित्रपट राजकीयदृष्ट्या प्रेरित असण्याच्या काळात हे घडणं वावगं नसलं तरी ‘ठाकरे’सारखे मोजके चित्रपट किमान चित्रपट म्हणून चांगले ठरतात. ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ मात्र चित्रपट म्हणूनही लेखन, अभिनय, इत्यादी पातळ्यांवर परिणामकारक किंवा किमान मनोरंजकदेखील ठरत नाही.
‘पीएम नरेंद्र मोदी’मध्ये नरेंद्र मोदींचं (विवेक ओबेरॉय) बालपण ते २०१४ लोकसभा निवडणुकीतील विजय यादरम्यानचा विस्तृत कालावधी उभा केला जातो. १९५९ मध्ये मोदी नऊ वर्षांचे असताना ते चहा विकताना दिसतात. आई-वडिलांच्या दृष्टीने आदर्श बालक असलेला ‘नरू’ लहानपणापासूनच देशप्रेमी असतो. इतरांच्या घरी धुणी-भांडी करणाऱ्या आईचे कष्ट वाचवण्यासाठी तो घरात भांडी तर घासतोच, पण सोबतच शाळेत जाताना रस्त्यात दिसणाऱ्या राष्ट्रध्वजाला वंदन करणे, १९६२ मधील भारत-चीन युद्धाची घोषणा झाल्यावर रणभूमीवर जायला निघालेल्या सैनिकांना मोफत चहा देणं, इत्यादी गोष्टीही करतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade
.............................................................................................................................................
सत्य घटना सांगतो : एक सैनिक बाल नरेंद्रसमोर सत्तेत असलेले लोक कसे अकार्यक्षम आहेत याची तक्रार करतो. सोबत एक दिवस असा येईल की, भारताला कार्यक्षम आणि सत्तेच्या लायक असलेला पंतप्रधान लाभेल असंही म्हणतो. अगदीच नम्र असलेला नरू फक्त मिश्किलपणे हसतो. He sells Chai, and he knows things.
चित्रपटात असे बरेचसे प्रसंग आहेत, ज्यात मोदींना भविष्यात ते करणाऱ्या पराक्रमांची माहिती खूप आधीपासून असल्याचं दिसतं. उदाहरणार्थ, चित्रपटात दहा-बारा वर्षांचा बाल नरेंद्र ‘चाय पे चर्चा याने शिक्षा बिना खर्चा’ असं आपल्याला वडिलांना सांगतो. पुढे जाऊन २०१४ मधील निवडणुकांच्या पूर्वतयारीदरम्यान दिसणाऱ्या ‘चाय पे चर्चा’ची मुळं इथं आढळतात.
१९६२ मधील नरू १९६५ मध्ये तीनच वर्षांत अचानक पंचविशीतील विवेक ओबेरॉय बनतो. विजय आनंदच्या ‘गाइड’मुळे प्रेरित होऊन मोदी संन्यास घेण्याचा निर्णय घेतात. पुढे दोन वर्षांची तपश्चर्या केल्यानंतर आपली तपश्चर्या पुढे सुरू ठेवत काही चमत्कार करण्याऐवजी ते देशसेवा करत देशाच्या आर्थिक-सामाजिक-राजकीय परिस्थितीत खरेखुरे चमत्कार करण्याचा निर्णय घेऊन गुजरातमध्ये परततात. चित्रपटाच्या सुरुवातीला दिसणारी डिस्क्लेमर व्यतीत होणाऱ्या प्रत्येक क्षणानंतर अधिकाधिक खरी ठरत जाते आणि सत्यापासून फारकत घेतली जाते.
हे बनावटीकरण मोदींच्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’तील (आरएसएस) प्रवेशानंतर अधिकाधिक वाढत जातं. मोदींनी सहभाग न घेतलेल्या चळवळीतील त्यांच्या सहभागासारख्या इतरही बऱ्याच गोष्टी दिसून येतात. चित्रपटानुसार मोदींचं राजकीय महत्त्व १९७० पासूनच इतकं वाढत जातं की, इंदिरा गांधी आणि इतर काँग्रेसी नेत्यांना त्यांची केवळ दखलच घ्यावी लागत नाही, तर त्यांच्याविरुद्ध कट रचावे लागतात. म्हणजे चित्रपपटानुसार आणीबाणी लादली जाते ती मोदींचं वादळ सत्तरच्या दशकातील वादळ रोखण्यासाठी, तर आणीबाणी मिटते तीही मोदींमुळे. नंतरही वेळोवेळी सगळे भारतीय, पाकिस्तानी आणि अमेरिकी नेते-पदाधिकारी मोदींविरुद्ध कट रचत राहतात. चित्रपटाचा उत्तरार्ध तर मोदींविरुद्ध रचल्या जाणाऱ्या कटांची संख्या पाहता एखाद्या थ्रिलर चित्रपटाप्रमाणे भासतो. पण मोदींना कुणीही थांबवू शकत नाही, आणि (स्पॉयलर अलर्ट) शेवटी २०१४ मध्ये ते त्यांच्याविरुद्ध उभ्या ठाकलेल्या सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शक्तींचा सामना करत पंतप्रधान बनतात.
‘पीएम नरेंद्र मोदी’बाबत समस्या अशी की, तो नको तितकं स्वातंत्र्य आणि सत्यापासून फारकत घेत एखाद्या दैवी अवताराचं चित्रण केल्याच्या थाटात कल्पनांचे मनोरे रचत जातो. लहानपणी ऐकलेल्या कृष्ण-बलराम जोडीने कंसाने पाठवलेल्या प्रत्येक दैत्याचा सामना केल्याच्या कथांच्या थाटात इथे मोदी काँग्रेसचे नेते, कुठलासा काँग्रेस-धार्जिणा अनाम व्यावसायिक (प्रशांत नारायण) आणि माध्यमांशी लढताना दिसतात. बरं, चित्रपटात असणारी ही खलभूमिकेतील पात्रंही इतकी बाळबोध आहेत की, पंतप्रधान मनमोहनसिंग शब्दशः मुके आहेत, ते एकही शब्द बोलत नाहीत. अगदी अनुपम खेरने ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये (२०१८) जे काही केलं, तितकंही नाही.
एव्हाना वाचकांच्या लक्षात आलं असेलच की, संदीप सिंगच्या कथेबाबत बोलण्यासारखं फारसं काही नाही. शिवाय, ओमंग कुमारचं दिग्दर्शन, विवेक ओबेरॉयचा अभिनय या बाबीही प्रभावी नाहीत. मनोज जोशी, आदिल हुसैनसारख्या लोकांनाही या अपरिपक्व वन मॅन शोमध्ये फारसा वाव मिळत नाही. जोशी तर ज्या अमित शहांचं पात्र साकारतो, त्या शहांचं नावदेखील चित्रपटात म्यूट करण्यात आलेलं असल्याचं दिसतं. बाकी चित्रपटातील वेशभूषा, छायाचित्रण, संकलन, इत्यादी तांत्रिक बाबींबाबत बोलण्यासारखं फारसं काहीच नाही. त्याही अप्रभावी आणि सुमार आहेत.
‘पीएम नरेंद्र मोदी’ सो बॅड इट्स गुड म्हणूनही रंजक नाही. त्याच्याकडून सत्याची अपेक्षा नव्हतीच, पण किमान समोर जे काही उभं केलं जातं, ते इतकं बाळबोधही नसायला हवं होतं. इतकं की, सदर चित्रपट चरित्रपटापेक्षा एखाद्या दंतकथेप्रमाणे भासतो. अर्थात प्रेक्षक चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी सत्य आहेत असं मानत असतील तर सदर चित्रपटाचा उद्देश सफल होईल, नसता इतरांसाठी तो दर आठवड्यात येणाऱ्या सुमार बी-ग्रेड चित्रपटांहून फारसा निराळा नाही.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment