अजूनकाही
अतिशय चुरशीच्या झालेल्या औरंगाबाद लोकसभेच्या लढतीत अखेर एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. त्यांच्या निमित्ताने औरंगाबादला आता एक मुस्लीम खासदार मिळाला आहे. शिवसेना-भाजप यांच्या युतीने महाराष्ट्रामध्ये वर्चस्व गाजवले असताना औरंगाबादमधून एक मुस्लीम खासदार निवडून येणे, ही मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे संसदेत बहुमत असताना जलील यांच्यासारखे मुस्लीम खासदार तिथे असणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात औरंगबाद शहरामध्ये जलील यांच्या निवडून येण्यावरून गमतीशीर प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
मागची २० वर्षे औरंगाबादची जनता एका हिंदुत्ववादी पक्षाचा खासदार निवडून देऊ शकते, तर यावेळेस एक मुस्लीम खासदार निवडून येण्यात गैर काय? औरंगाबादकरांचा आणि राज्यातल्या अनेकांचा जलील यांच्याबाबत नेमका प्रॉब्लेम काय? ते मुस्लीम आहेत, हा? की, ते एमआयएम या पक्षाशी संबंधित आहेत, हा?
इम्तियाज जलील मुस्लीम आहेत, हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याला तुमची पूर्वग्रहदूषित विचारधारा जबाबदार आहे. मुसलमान म्हटले की, आपल्यात अस्वस्थतेची भावना निर्माण होत असेल तर त्याला आपला मुस्लीमद्वेष जबाबदार आहे. मुस्लीम असल्याने त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणे, ते हिंदूविरोधीच असतील असा विचार करणे, हे आततायीपणाचे लक्षण आहे. ही पूर्वग्रहदूषित नजर बदलणे गरजेचे आहे. वैयक्तिक पूर्वग्रह नेहमी सत्य अस्पष्ट करून टाकतात! (कौस्तुभ नाईक यांचा हा लेख जरूर वाचा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3151)
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man
...............................................................................................................................................................
या पूर्वी जलील महाराष्ट्रात विधानसभेत आमदार होते. त्यांच्या आमदारकीच्या काळात बघता त्यांनी कधी हिंदूविरोधी वक्तव्ये किंवा भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. त्यांनी नेहमी हिंदू-मुस्लीम ऐक्याचीच गोष्ट पुढे ठेवली. आता लोकसभेची निवडणूकसुद्धा त्यांनी इतरांसारखी धार्मिक मुद्द्यावर नव्हे तर विकासाच्याच मुद्द्यावर लढवली. राहिला प्रश्न देशभक्तीचा, तर त्यांच्या ट्विटर हँडलवर जाऊन त्यांनी केलेलं ट्विट किंवा रिट्विट पाहता येईल.
राहता राहिला प्रश्न त्यांच्या पक्ष AIMIMचा. हे नाव ऐकून वा वाचूनच अनेकांच्या मनात शंका उपस्थित होतात. आणि यातून आपला मुस्लिमांबाबतचे पूर्वग्रह, आकस आणि दुजाभाव स्पष्ट होतो. तर ‘AIMIM’ म्हणजे ‘All India Majlis-e-Ittehadul Muslimeen’ याचा अर्थ ‘अखिल भारतीय मुस्लीम ऐक्य संघटना’ असा होतो. या नावात काय गैर आहे? जर एखादा पक्ष मुस्लीम समाजाच्या ऐक्यासाठी त्यांचे नेतृत्व करायला बघत असेल तर त्यात गैर काय?
ज्या पद्धतीने मागील पाच वर्षांत मुस्लीम समाजाला सातत्यानं अगदी ठरवून टार्गेट केलं गेलंय, ते पाहता त्यांचं राजकीय नेतृत्व करणाऱ्या अशा पक्षाची नितांत निकडीची गरज आहे. पण मुख्य अडचण ही अकबरुद्दीन ओवैसी यांच्या काही भाषणांची आहे. ती फारशी कोणालाही पटणारी नाहीत. आणि त्यांचं समर्थन करता येण्यासारखंही नाही. पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की, एमआयएम हा पक्ष संविधान, लोकशाही व धर्मनिरपेक्षता मानणारा आहे, असं त्याचे अध्यक्ष असददुद्दीन ओवैसी नेहमी सांगत आले आहेत. मागील पाच वर्षांतल्या त्यांच्या राजकीय भूमिकांवरून ते दिसूनही येतं. आणि राष्ट्रभक्तीचा प्रश्नाबाबत बोलायचं झाल्यास, आजही जे लोक पाकिस्तानच्या जिंकण्यावर फटाके फोडतात त्याला असददुद्दीन ओवैसींचा जबरदस्त विरोध आहे. तेव्हा जर असा नेता ‘तसल्या’ लोकांचं प्रबोधन करत असेल, तर ती एक चांगलीच बाब आहे ना?
मागील पाच वर्षांत मुस्लीमविरोधी घडलेली मॉब लिंचिंगची प्रकरणं असोत किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये असोत, हे सर्व पाहता मुस्लीम प्रतिनिधित्व लोकसभेत असणं फार गरजेचं आहे. आणि जलील, त्यांचं क्वालिफिकेशन पाहता ते एक चांगला पर्याय नक्कीच ठरतील असं वाटतं.
हे सर्व लिहिण्यामागचा उद्देश एकच आहे की, जलील निवडून आल्यावर औरंगाबादकरांच्या (आणि राज्यातल्या काहींच्या) प्रतिक्रिया बघून मी अस्वस्थ झालो. काही जण शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंची मतं विभागली म्हणून हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडत होते. काही जण शहराचा झेंडा (भगवा) बदलला म्हणून अस्वस्थ होत होते. जलील हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि विकासाच्या मुद्द्यांची चर्चा करत असतील तर त्यांना एक संधी देण्यात काय वाईट? सर्वांत गमतीची गोष्ट म्हणजे एक जण मला म्हणाला, ‘जलील निवडून आल्यामुळे सर्वांचे चेहरे उतरले आहेत!’
म्हणूनच म्हणावंसं वाटतं की, जलील हे एक भारतीय आहेत, हे महत्त्वाचे आहे, आणि त्यांच्याकडे एका भारतीयाच्या नजरेतून पाहायला हवं.
............................................................................................................................................
लेखक जीवन नवगिरे औरंगाबादचे रहिवासी आहेत.
navgirejeevan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ranveer bhalepatil
Mon , 27 May 2019
छान लेख आहे
anand ingale
Sat , 25 May 2019
सुंदर आणि मार्मिक
Nikkhiel paropate
Sat , 25 May 2019
एक मुस्लिम समाजाचा नागरिक इतक्या सांप्रदायिक लाटेत जिंकून आलाच कसा? दुखणं हे ही असू शकतं