अभूतपूर्व, धक्कादायक आणि धोकादायक!
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • नरेंद्र मोदी आणि अमित शहा
  • Fri , 24 May 2019
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah राहुल गांधी Rahul Gandhi प्रियांका गांधी Priyanka Gandhi

परमेश्वर आणि भारतीय जनता यामध्ये साम्य असावं. दोघंही देतात तेव्हा ‘छप्पर फाड के’ देतात असं म्हणायला हरकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून तरी तेच दिसतं. या निकालाने नरेंद्र मोदींना थेट पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. १९५७ ला नेहरूंना, १९७१ ला इंदिरा गांधींना आपल्या दुसऱ्या खेळीत असं अभूतपूर्व यश मिळालं होतं. दुसऱ्या कोणत्याही भारतीय पंतप्रधानाला असं यश मिळालेलं नाही. एका परीने नरेंद्र मोदींनी नवा इतिहास घडवला आहे.

मोदींचं हे यश ऐतिहासिक तर आहेच, पण धक्कादायक आणि धोकादायकसुद्धा आहे. मी हे शब्द अत्यंत काळजीपूर्वक वापरत आहे. स्वत: मोदी आणि अमित शहांना एवढं प्रचंड यश मिळेल याची अपेक्षा नसावी. आम्हा पत्रकारांना तर या निवडणुकीने पार गुंगारा दिला आहे. २०१४ ला मोदींचे लाट होती. भाजपला ३१ टक्के आणि एनडीएला ३८ टक्के मतं मिळाली होती. यावेळी अनेक राज्यात एकट्या भाजपची मतं ५० टक्क्यांवर गेली आहेत. २०१४ ला भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या, यंदा हा आकडा ३०० च्या वर गेला आहे आणि एनडीएने ३५० ती रेखा पार केली आहे. २०१४ चं मोदींचं यश ऐतिहासिक होतं, कारण १९८४ नंतर तीस वर्षांनंतर प्रथमच एका पक्षाला बहुमत मिळालं होतं. त्या वेळी उत्तर भारत, पश्चिम भारतातून भाजपला सर्वाधिक बळ मिळालं होतं, यावेळी त्यात पूर्व भारताची भर पडली आहे. पश्चिम बंगाल, ओरिसामध्येही भाजपने मोठी मजल मारली आहे.

हे एकशे एक टक्के मोदी-शहा या जोडीचं यश आहे. मोदी हे या जोडीतले ‘शहेनशहा’ आहेत आणि अमित शहा ‘सेनापती’. दोघांनीही आपल्या चलाख रणनीतीने हे यश खेचून आणलं आहे. सर्वसाधारणपणे हे ‘प्रो इनकम्बन्सी’ मतदान आहे असं म्हटलं जातंय, पण हा केवळ प्रस्थापित सरकारच्या बाजूने कौल आहे असं मानायला मी तयार नाही. हे नरेंद्र मोदी नावाच्या बलदंड पंतप्रधानावर जनतेने उधळलेलं प्रेम आहे. 

यात मोदी-शहांची कसब हे की, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी सरकारला प्रतिकूल असलेली परिस्थिती स्वत: मैदानात उतरून, प्रचंड मेहनतीने अनुकूल करून घेतली. डिसेंबर महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाला होता. राहुल गांधी उत्साहात आले होते. तिथे उत्तर प्रदेशात मायावती-अखिलेश यांची युती झाली होती. भाजपचं बहुमत जाणार असं गृहित धरून स्वत: अमित शहाही मित्र पक्षांच्या नाकदुऱ्या काढू लागले होते. बेरोजगारी, शेतीसमस्या, नोटबंदी, जीएसटी, ढासळती अर्थव्यवस्था, गोरक्षकांनी केलेल्या हत्या, दलितांची नाराजी, सामाजिक तणाव हे सर्व विषय मोदी सरकारच्या विरोधात जात होते. कुठे आहेत ‘अच्छे दिन’, असा प्रश्न लोक विचारू लागले होते. निवडणुका या मुद्दयांवर झाल्या तर आपलं काही खरं नाही, हे ओळखून मोदींनी निवडणुकीचा अजेंडात बदलायचा चंग बांधला आणि त्यात ते यशस्वी झाले. जबरदस्त प्रचार मोहीम त्यांनी राबवली, पक्षाच्या मदतीने घराघरात पोहोचवली. यात विरोधी पक्ष गारद झाले. एक प्रकारे हा भारतीय राजकारणातल्या गोबेल्सचा विजय म्हटला पाहिजे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

पुलवामा आणि बालाकोट या दोन घटना मोदींच्या मदतीला अगदी धावून आल्या. या देशात राष्ट्रप्रेमासारखी झिंग नाही आणि मोदींनी हीच नशा मतदारांना चढत्या क्रमाने पाजली. पाकिस्तानच्या घरात घुसून मारणारा हा पंतप्रधान मग गावोगाव पोचला. नवमतदारांना या कणखर नेत्याने भुरळ घातली. या निवडणुकीत मोदींनी जितक्या वेळा लष्कराचा वापर केला, तेवढा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने केला नसेल. इंदिरा गांधींनी १९७१ साली बांगला देश युद्ध जिंकलं होतं, पण ते निवडणूक पार पडल्यावर. मोदींच्या या प्रयत्नात त्यांना निवडणूक आयोगानं निष्ठेनं साथ दिली. मोदी आपल्या भाषणात आचारसंहितेचं उघड उल्लंघन करत असताना त्यावर क्लिन चिटचं पांघरूण घालून आयोगानं त्यांना बळ दिलं.

या राष्ट्रप्रेमाला जोड मिळाली मुस्लीमद्वेषाची. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा नेमका उपयोग करून घेतला होता. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य केलं होतं. याही वेळी हे मुद्दे होतेच. राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी जाहीर केली, तेव्हा वर्ध्याच्या सभेत मोदींनी त्यांच्यावर अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचाच आरोप केला. हिंदूंच्या रागाला घाबरून राहुल अल्यसंख्याकांचं बहुमत असलेल्या मतदारसंघात गेले, असं ते थेट म्हणाले होते. द्वेषभावना पेरण्याचं आणि पसरवण्याचं हे काम भाजपच्या इतर नेत्यांनी स्थानिक प्रचारात सर्रास केलं. संघ परिवाराने यासाठी व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला. बहुसंख्य हिंदूच्या मनात दडलेला मुस्लीम द्वेष खरवडण्यात मोदी-शहांना यश मिळालं. यावेळी मुस्लीम वस्त्यांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना २०१४ पेक्षा जास्त होती. ही भीती निवडणूक निकालानंतर अधिक बळावली आहे.

मोदींच्या यशातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विश्लेषकांकडून दुर्लक्षिला गेला आहे. राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्ववादाला मोदी-शहांनी जोड दिली सरकारी कल्याणकारी योजनांची. उज्वला, प्रधानमंत्री आवास, स्वच्छ भारत (टॉयलेट्स) वगैरे योजना तळच्या थरापर्यंत पोहोचतील, याची काळजी त्यांनी घेतली. त्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत पक्ष कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावलं. या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त होती. १९५२ पासून झालेल्या भारतीय निवडणुकीत हे पहिल्यांदाच घडत असल्याचं प्रणव रॉय यांनी आपल्या ‘व्हर्डिक्ट’ या पुस्तकात नमूद केलं आहे. पण या वास्तवाची दखल पक्ष म्हणून फक्त भाजपनेच घेतलेली दिसते. या महिला मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी भाजपच्या महिला शाखेने खास प्रयत्न केले. गॅस आणि टॉयलेट्सचा सर्वाधिक फायदा महिलांनाच होणार, हे मोदींनी नेमकं ओळखलं आणि त्यांच्यावर प्रचार केंद्रीत केला.

मोदी-शहांनी उभारलेल्या भाजप नावाच्या अक्राळविक्राळ निवडणूक यंत्रावर मात करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यात भाजपकडे पैशाचा महापूर आलेला. इलेक्टोरल बाँडची लबाड योजना पक्षाच्या पथ्यावर पडलेली. त्यामुळे कार्यकर्त्यांना कसलीही कमी नव्हती. बहुसंख्य माध्यमं तर २०१३ पासूनच मोदींची भक्त झालेली. याहीवेळी त्यांना सर्वांत जास्त महसूल भाजपकडूनच मिळाला. साहजिकच टीव्ही चॅनल्सनी २०१४ पेक्षा जास्त जागा मोदींना दिली. थोड्याफार फरकाने वृत्तपत्रांची हीच अवस्था होती. २०१४ प्रमाणे २०१९ ची निवडणूकही मोदींनी माध्यमाशी संगनमत करूनच जिंकली. फरक इतकाच की, यावेळी यात सरकारी माध्यमांची भर पडली.

विरोधी पक्षांना या ऐतिहासिक निवडणुकीचं महत्त्व कळलं, पण वळलं नाही. राष्ट्रीय पातळीवर त्यांची महाआघाडी कधी झाली नाही. ते आपल्याच गल्लीबोळात स्वत:चे अहंकार गोंजारत एकएकटे लढत राहिले. तुमच्याकडे मोदींना पर्याय कोण, या भाजपच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं.

काँग्रेस हा सर्वांत मोठा, देशभर पसरलेला पक्ष. पण मोठ्या भावाची भूमिका पार पाडण्याऐवजी हा पक्ष राहुल गांधींच्या प्रतिमा संवर्धनात गुंग होता. राहुल जोमाने तलवार फिरवत होते, पण त्याला पक्ष संघटनेची साथ नव्हती. बालाकोटनंतर तर काँग्रेस पक्षाने निवडणूकच सोडून दिली असं माझं मत आहे. या पक्षाची रणनीती, प्रचार नीती काहीच धड दिसत नव्हती. राज्यातले नेते कामाला लागले नव्हते. पक्षासाठी स्वत:च्या खिशातले पैसे काढायची त्यांची तयारी नव्हती. प्रियांकाला मैदानात उतरवलं खरं, पण त्यामागेही धरसोड वृत्तीच अधिक होती. मतदानाच्या पाचव्या फेरीनंतर राहुल अचानक अंगात आल्यासारखे मुलाखती देऊ लागले. त्यातही त्यांचं लक्ष मतदारांपेक्षा स्वत:कडे अधिक होतं. ज्या राज्यात काँग्रेसची भाजपशी थेट लढत होती तिथे काँग्रेसचा पार धुव्वा उडाला आहे तो यामुळेच. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यातला चार महिन्यापूर्वीचं जनमतही काँग्रेसला टिकवता आलेलं नाही. महाराष्ट्र-गुजरातमध्ये काँग्रेसची पार धुळधाण झाली आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या पायात पाय घालून नऊ जागा पाडल्या हे खरं, पण ज्या आठ राज्यांतून काँग्रेसची एकही जागा निवडून आली नाही, तिथं कुणाला दोष देणार?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

विरोधकांची भिस्त होती उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालवर. तिथल्या गडालाच मोदी-शहांनी सुरुंग लावल्यामुळे विरोधी पक्षांची मोठी दारुण अवस्था झाली आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जींची अरेरावी मतदारांनी नाकारली आहे, उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या गणिताला अमित शहांनी बिगरयादव, बिगरजाटव, बिगरमुस्लीम मतपेढीच्या माध्यमातून शह दिला आहे. हीच मतपेढी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कामी आली होती. इथं मोदींच्या तुफानी लोकप्रियतेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळवंडलेल्या प्रतिमेवरही पांघरूण घातलेलं दिसतं. यावेळी ओरिसातसुद्धा भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे. पण विधानसभेत मात्र जनतेनं नवीन पटनायक यांना पाचव्यांदा कौल दिला आहे.

या मोदीव्याप्त भारतापेक्षा दक्षिण भारताचा कौल वेगळा आहे. कर्नाटक वगळता इथल्या इतर राज्यात मोदींचा प्रभाव नाही. आंध्र प्रदेशने यावेळी भाकरी फिरवून जगन मोहन रेड्डींना मोठं यश दिलं आहे. तामिळनाडूने द्रमुकची कास धरली आहे. तेलंगणाने मात्र राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या चंद्रशेखर राव यांना फटका दिला. केरळने सत्ताधारी डाव्यांना भुईसपाट करून काँग्रेसला यश दिलं आहे. हा एक प्रकारे राहुल गांधींना दिलासा आहे!

असा पाशवी कौल कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला मिळणं लोकशाहीच्या दृष्टीनं धोकादायक असतं. १९७१ च्या कौलानंतर इंदिरा गांधींची वाटचाल आणीबाणीकडे झाली होती. अशा राक्षसी कौलानंतरच रशियात पुतिन आणि तुर्कस्तानात एर्डोगनची राजवट प्रस्थापित झाली होती. आता या एकतर्फी बहुमतानंतर मोदी काय करतात याकडे जगाच्या नजरा आहेत. ही गांधींच्या भारताची मोदींच्या भारताकडे, म्हणजे हिंदूराष्ट्राकडे वाटचाल आहे काय, हा प्रश्न विचारला जात आहे. मोदींची प्रतिमा कठोर राजकारण्याची आहे. नव्या विजयानंतर ते अधिक कठोर होणार की, मन मोठं करणार, याकडे देशाचं लक्ष आहे.

हा विजय विक्रमी असला तरी त्यामुळे मोदींच्या गेल्या पाच वर्षांतल्या गफलती, खोटेपणा, थापा पुसल्या जाऊ शकत नाहीत. प्रज्ञा सिंगसारख्या दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीला त्यांनी संसदेत पाठवलं ही वस्तुस्थितीही या प्रचंड यशामुळे बदलणार नाही. मोदी-शहांनी पसरवलेलं विष इथं खोलवर भिनलं आहे. त्याचं काय होणार, हा प्रश्नही आहेच. राम मंदिर, ३७० कलम हे प्रश्न पुन्हा डोकं वर काढणार का, ही भीती इथल्या अल्पसंख्याकांच्या मनात आहे. लिंचिंग, दलित अत्याचाराचे मुद्दे अजूनही खदखदत आहेत. आपण सूडबुद्धीने वागणार नाही, असं आश्वासन मोदींनी विजयानंतरच्या आपल्या भाषणात दिलं आहे. पण त्याबरोबरच त्यांनी सेक्युलॅरिझमची उडवलेली या भाषणातली खिल्लीही ताजी आहे. भारतीय जनतेनं दाखवलेल्या या विक्रमी कौलाला आपण पात्र आहोत, हे मोदींना पुढच्या पाच वर्षांत सिद्ध करावं लागेल. त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. म्हणूनच त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन करताना एक इशाराही द्यावासा वाटतो-

मोदीजी, तुमच्यासमोर दोन मार्ग आहेत. एक नेहरूंचा आणि दुसरा इंदिरेचा किंवा पुतीनचा! कोणता निवडायचा हा तुमचा प्रश्न आहे. पण भारतीय जनता भावनाशील असली तरी मूर्ख नाही, हे लक्षात असू द्या!

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

लेखातील मते लेखकाची वैयक्तिक असून त्याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Jaydeep -

Sun , 26 May 2019

2004 la Atalji punha pantapradhan honar asa media cha sudha andaj hota....tenva janateni congress la chance dila.....pudhchya 10 varshayt congress ne swataha sathi khadda khanun ghenyashivay kay kela? lagopath ughad honare ghotale...nitimatta naslele nete....ekangi and vishishtha samajache langulchalan......hyach khaddyat tyanna bhartiya janateni gadla tar tyat itka Thaythayat karnya sarkha kay ahe ?


Vivek Date

Sat , 25 May 2019

Your statement about 1971 election is factually wrong. In 1967 elections congress suffered a set back and in 1969 P M Indira Gandhi split the congress throwing out Syndicate of Morarajee Desai, Nijalingappa and K Kamraj. Then she led India to decisive victory in 1971 war that liberated East Pakistan and Bangladesh was created. The elections were due in 1972 and taking advantage of her supreme popularity she dissolved the parliament and announced general elections that she won with massive success.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......