अजूनकाही
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मराठा-कुणबी मूक क्रांती महामोर्चाच्या निमित्ताने राज्य सरकारला इशारा देताना शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री, आताचे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ‘मराठा समाजाचे मोर्चे जरी मूक असले, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा ते कोणतंही रूप धारण करु शकतात’, असं वक्तव्य केलं. आता शेवटच्या टप्प्यात मराठा क्रांती मोर्चा कोणतं रूप घेणार आहे आणि ते रूप नेमकं कोणाविरोधात धारण करणार आहे, हे राणे यांनी स्पष्ट केलेलं नाही. असं असतानाही मराठा समाजाची, विशेषत: मराठा समाजातल्या तरुणांची पावलं भविष्यात कोणत्या दिशेने पडू शकतात, याचं एक ढळढळीत उदाहरण सातारा जिल्ह्यातल्या चिंचणेर वंदन गावात दिसून येतंय. दुर्दैवाने सत्ताधार्यांसह विरोधकांनी, तसंच दलितांच्या तथाकथित पुढार्यांनीही डोळ्यांवर मतांच्या आणि सत्तेच्या राजकारणाचे काळे चष्मे चढवल्याने त्यांना ‘पंचशीलनगर’ या दलित वस्तीत मराठा तरुणांनी पेटवलेल्या अग्निज्वाळा दिसत नाहीएत.
मंगळवारी, सहा डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईतल्या चैत्यभूमीवर देशभरातले लाखो दलित त्यांच्या महानायकाला अभिवादन करत असतानाच रात्री १०.३०च्या सुमारास चिंचणेर वंदन गावठाणाला लागून असलेल्या पंचशीलनगर या दलित वस्तीवर मराठा तरुणांनी लाकडी दांडकी, काठ्या, दगड, रॉकेलचे कॅन्स घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात वस्तीतल्या सुमारे ४६ घरांच्या खिडक्यांच्या काचा-दरवाजांची मोडतोड झाली. इतकंच नव्हे, तर तीन चारचाकी गाड्या, नऊ दुचाकी पेटवण्यात आल्यामुळे या गाड्या जळून अक्षरशः खाक झाल्या. हे कमी म्हणून की काय, काही घरांमध्ये घुसून या तरुणांनी टीव्ही, कम्प्युटर्सची मोडतोड केली; वस्तीतल्या समाजमंदिरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचीही नासधूस केली.
पंचशीलनगर ही एक दलित वस्ती असून तिथे ४० बौद्ध, पाच-सहा मातंग आणि दोन चर्मकार कुटुंबांची घरं आहेत. या वस्तीतल्या सिद्धार्थ दणाणे या बौद्ध तरुणाचं आणि अरुणा बर्गे-मोहिते या मराठा समाजातल्या तरुणीचं प्रेमप्रकरण होतं. एका वादामुळे ३० नोव्हेंबर रोजी सिद्धार्थने अरुणाचा खून केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ५ डिसेंबरला अटक केली असता, हा खून त्यानेच केल्याचं त्याने कबूल केलं. दोन्ही समाजांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी गाव आणि वस्तीच्या प्रवेशद्वारांसमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. असं असतानाही ६ डिसेंबरच्या रात्री गावातल्या मराठा तरुणांनी मागच्या ओढ्याच्या बाजूने वस्तीवर हल्ला केला आणि ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा देत, तसंच दलितांना जातिवाचक शिवीगाळ करत जाळपोळ केली.
या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत सात डिसेंबरची पहाट उजाडण्याआधीच ३१ जणांना अटक केली. या सर्वांची न्यायालयीन सुनावणी झाली असून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. असं असलं, तरी दोन्ही समाजांमधला तणाव न निवळल्यामुळे पोलिसांनीच पुढाकार घेऊन रविवार १८ डिसेंबर रोजी ‘सलोखा बैठक’ आयोजित केली.
६ डिसेंबरच्या रात्री घडलेल्या घटनेनंतर तब्बल बाराव्या दिवशी या बैठकीच्या निमित्ताने गावाच्या सरपंचबाईंचे यजमान आणि पोलीस पाटील घटनास्थळी म्हणजे वस्तीत आले. त्या वेळी मी स्वत: तिथे हजर होतो. या बैठकीचं प्रास्ताविक करताना पोलीस फौजदार राजेंद्र यादव म्हणाले, "हल्ला झाला त्या रात्री गावात एक मयत झालं होतं. त्यामुळे गावातली वडीलधारी मंडळी नदीजवळच्या स्मशानभूमीत गेली होती. ‘सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी’ हा हल्ला वडिलधार्यांना अंधारात ठेवूनच केला. तरुणांनी आपल्या ‘सळसळत्या रक्ताचा वापर’ देशसेवेसाठी करायला हवा."
मोहन दणाणे यांच्या घराबाहेरच्या जागेतली त्यांची दुचाकी जळून खाक झाली. आता फक्त त्या दुचाकीची नंबरप्लेट शिल्लक आहे.
या प्रास्ताविकानंतर दोन्ही बाजूच्या निवडक लोकांनी त्यांची मतं मांडली. त्यातून मराठा ग्रामस्थांची गुळगुळीत उत्तरं, तर दलितांच्या मनातली खरी भावना व्यक्त करू न दिल्याची नाराजी लपून राहिली नाही. तरीही एकंदर सर्वांचीच भूमिका सामंजस्याची होती. पोलीस फौजदार यादवांप्रमाणे गावातल्या मराठा प्रतिनिधींनीही मराठा तरुणांच्या सळसळत्या रक्ताचा उल्लेख केला. अशी ‘सळसळती’ चर्चा सुरू असताना तिथे एका बाजूला दलित तरुणही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वस्तीवर झालेल्या या हल्ल्यामुळे भविष्यात त्यांचं रक्त सळसळलं, तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची ? का तेव्हाही पोलीस अधिकारी मराठ्यांच्या गावात जाऊन ‘सळसळत्या रक्ताच्या दलित तरुणांनी हे कृत्य केलंय, मात्र वस्तीतली वडीलधारी माणसं समजूतदार आहेत’, असं बोलतील?
या सलोखा बैठकीचा समारोप करताना सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे म्हणाले, “पोलीस दलातल्या माझ्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एखाद्या गावाने माझा विश्वासघात केला. त्या रात्री अरुणाच्या शवाचे सोपस्कार झाल्यानंतर गावातल्या सर्वांनी, म्हणजे मराठ्यांनी सर्वकाही शांत असल्याचं मला आश्वासन दिलं होतं. तरीही रात्री वस्तीवर हल्ला झालाच. हल्ला झाल्याचं कळताच मी तत्काळ १०-१५ मिनिटांत वस्तीवर आलो. मी स्वत: एका हल्लेखोराला पकडलं आणि गाडीत घातलं. त्याच्याकडूनच मी इतर आरोपींची नावं मिळवली आणि सर्वांना अटक केली.”
आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो की, गावातल्या मराठा लोकांनी पोलिसांना दिलेला शब्द का पाळला नाही? नाळे यांच्या म्हणण्याप्रमाणे, पोलिसांनी हल्लेखोरांना बघितलं होतं, त्यातल्या काहींना तिथेच अटक केली होती आणि बाकीच्या हल्लेखोरांची नावंही मिळवली होती. म्हणजे जी काही कारवाई केली गेली, तिच्यात पोलिसांचा सक्रिय सहभाग होता. मग असं असतानाही सर्वच्या सर्व आरोपींना सहजपणे जामीन कसा काय मिळाला? आरोपींना जामीन मिळू नये, म्हणून पोलिसांनी काय विशेष प्रयत्न केले? न्यायालयासमोर आरोपींविरोधातले पुरावे सादर करण्यात पोलीस तत्परता दाखवताहेत का? आज ना उद्या पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.
छाया दणाणे यांच्या घराचा दरवाजा तोडून हल्लेखोर आत घुसले. त्यांनी... युटर फोडून टाकले. घरातल्या पलंगांवरील गाद्याही जाळून टाकल्या
दरम्यानच्या काळात सातार्यात काही इतरही महत्त्वाच्या घटना घडल्या. दुर्दैवाने त्या घटनांनाही फारसं कुणी गांभीर्याने घेतल्याचं आढळत नाही. गावातल्या ३०-३२ मराठा तरुणांना आरोपी म्हणून जेव्हा पहिल्यांदा न्यायालयात आणण्यात आलं, तेव्हा त्यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी सातारा बार असोसिएशनचे सर्वच्या सर्व वकील रस्त्यावर उतरले. स्थानिक दैनिकांमध्ये ‘गावातील तरुणांच्या बाजूने वकिलांची फौज’ अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘ ‘आपल्या’ मराठा तरुणांना अॅट्रॉसिटीच्या खोट्या केसेसमध्ये गोवण्यात येतंय. त्याविरोधात ‘आपले’ मराठे वकील लढताहेत’, या आशयाचे संदेशही व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून फिरले. मुळात वकिलांच्या संघटनेने सामूहिकरित्या एका विशिष्ट जातीची बाजू घेण्यासाठी अशी भूमिका घेणं योग्य आहे का? प्रकरण जर दलित अत्याचार-विरोधी कायद्याशी, म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्याशी संबंधित आहे, तर अशा संवेदनशील प्रकरणाच्या वेळीही सातार्यातल्या या वकिलांना स्वतःची मराठा जातच कशी काय आठवते? त्यांच्यामध्ये ही स्वजातीय भावना निर्माण होण्यासाठी मराठा मूक मोर्चा कारणीभूत आहे का? दुर्दैवाने याबाबत एकाही प्रसारमाध्यमाने त्यांना प्रश्न विचारला नाही. किमान आपली न्यायव्यवस्था तरी याबाबत या वकिलांना काही प्रश्न विचारणार आहे की नाही?
ज्या मराठा तरुणांनी दलित वस्तीवर हल्ला केला, त्यांच्या मोबाईलमधून दलितांविषयी अपमानास्पद, तर मराठ्यांच्या जाज्वल्य अभिमानाविषयी गौरवास्पद उल्लेख करणार्या संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. त्यातले अनेक संदेश जसे वस्तीतल्या दलित तरुणांकडे आहेत, तसे ते पोलिसांकडेही आहेत. या संदेशांमध्ये ‘ ‘आपण’ त्यांची (दलितांची) वाट लावली’, ‘त्यांना (दलितांना) धडा शिकवला’ असे उल्लेख आहेत. महार-बौद्धांविषयी जातिवाचक शिवीगाळ आहे. या तरुणांना अटक करण्यात आली, तेव्हाच त्यांचे मोबाईल्स पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. मोबाईल्समधल्या या पुराव्यांचाही पोलिसांनी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करायला हवा. अत्यंत अस्वस्थ करणारी बाब म्हणजे, मराठा तरुणांनी व्हॉट्स अॅपवर दलितांना उद्देशून शिव्याच दिलेल्या नाहीत, तर त्यांनी जी तोडफोड केली, जाळपोळ केली त्याचे फोटो काढून त्यांनी ते मित्रांसोबत शेअरही केले आहेत!
६ डिसेंबरला हा हल्ला झाल्यानंतर पाचव्या दिवशी, म्हणजे ११ डिसेंबरला वस्तीतल्याच अरुण दणाणे नावाच्या व्यक्तीचा मृतदेह गाव आणि वस्ती यांमधून जाणार्या ओढ्यात आढळला. ‘अरुण दणाणे हे आदल्या मध्यरात्रीपर्यंत वस्तीत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना चहा देत होते’, अशी आठवण पोलीस निरीक्षक नाळे यांनीच सलोखा बैठकीत सांगितली. याचा अर्थ ते पूर्णपणे तंदुरुस्त होते. अशी व्यक्ती अचानक दुसर्या दिवशी मृत आढळते, हे निश्चितच संशयास्पद आहे. अशा स्थितीत तणावाचं वातावरण असतानाही दलित वस्तीने अरुण दणाणेंच्या मृत्यूचं राजकारण, मीडियाकारण करण्याचा उथळपणा केला नाही.
पंचशीलनगरातल्या सर्व दलित महिला समाजमंदिरात एकत्र आल्या, पण एससीएसटी आयोगाच्या थूल साहेबांना त्यांच्याशी सविस्तर बोलावंसं वाटलं नाही
अहमदनगरमधल्या कोपर्डी घटनेनंतर संतापलेला मराठा समाज रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहतो आहोत. कोपर्डीतल्या आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि मराठ्यांना आरक्षण या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. कोपर्डी असो वा चिंचणेर, गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, याबाबत कुणाचंच दुमत नाही. त्यांच्या सर्व किंवा काही मागण्या पूर्ण करणं वा न करणं सत्ताधा-यांच्या हातात आहे. मात्र, वैयक्तिक पातळीवरचे प्रेमसंबंध-खून-बलात्कार अशा प्रकरणांनी संतापून जाऊन मराठा समाज आक्रमक होणार असेल, आरोपीला गुन्हेगार म्हणून न बघता त्याच्या समाजाच्या वस्तीलाच पेटवून देणार असेल, तर आजवर मराठा समाजातल्या ज्या गुन्हेगारी वृत्ती-प्रवृत्तीच्या लोकांनी दलित समाजातल्या व्यक्तींचे खून पाडले असतील किंवा महिलांवर बलात्कार केले असतील, त्यांचं काय करायचं! अशा घटनांच्या प्रसंगी संतापलेल्या दलितांनी, विशेषत: बौद्धांनी नाही हल्ले केले कुणाच्या गावावर! त्यांनी स्वतःचा निषेध केवळ घटनात्मक, सनदशीर मार्गांनीच नोंदवला. म्हणूनच त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याची गरज भासते. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याला साक्षी आहे. त्या समर्थनार्थ हवी तितकी आकडेवारी देता येणं शक्य आहे.
आणि हो, मराठा असो की बौद्ध, किंवा आणखी कुणी, रक्त सर्वांमध्येच असतं, आणि ते कधीही सळसळू शकतं. त्या सळसळणार्या रक्ताची ऊर्जा कोणत्या कामासाठी, कार्यासाठी वापरायची हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. त्यासाठी फक्त ‘भान’ असावं लागतं.
लेखक नवता बुक वर्ल्डचे संचालक आहेत.
shinde.kirtikumar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sat , 24 December 2016
शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात( कर्वे, आगरकर, रानडे हे ब्राह्मण असल्याने दखलपात्र पुरोगामी सुधारक नव्हते) दलितांवर इतक्या अत्याचाराच्या घटना घडल्या आणि बऱ्याचदात्यात त्यांना न्याय मिळाला नाही त्यांना आपण बिच्चारे म्हणू शकतो हवेतर पण तसे म्हटल्याने त्यांच्यावरच्या अत्याचाराचे परिमार्जन होते का? आमचा विरोध ब्राह्मणी प्रवृत्तीला आहे , ब्राह्मण्याला आहे ब्राह्मणाला नाही असे म्हटल्याने गोंधळ उलट वाढतो,आणि शेवटी त्याचा अर्थ ब्राह्मण असाच घेतला जातो. खालच्या(?) जातीच्या मुलावर प्रेम करून लग्न करायचे ठरवले म्हणून प्रत्यक्ष बाप मुलीच्या डोक्यात पहार घालून तिचा खून करतो(आशा शिंदे प्रकरण, सातारा) हि त्याची ब्राह्मणी प्रवृत्ती काय? तसेच ब्राह्मणांवर कितीही आगपाखड केली तरी त्यांच्यावर अत्याचार होताना दिसत नाहीत हे माझे निरीक्षण आहे... ते जर चूक नसेल तर त्याचा अन्वयार्थ काय होतो मग ?..ब्राह्मण द्वेष फक्त तोंडी आहे ह्यांचे खरे लक्ष्य दलितच आहेत...
Pravin Khunte
Fri , 23 December 2016
स्पष्ट भूमीका घेतलेला लेख... मोर्चे जरी मुक असले तरी आतुन जातीय द्वेषाची आग भयंकर खदखदत आहे. नाशीक जिल्ह्यातील त्र्यंब्यकेश्वर जवळील तळेगाव नंतर सातारा जिल्ह्यातील चिंचनेर गावातील पंचशीलनगर हे दुसरे उदाहरण.