अजूनकाही
भारतीय मतदारांनी जगाला एक नवा शब्द दिलाय! ‘कम्युनिस्ट’, ‘मार्क्सिस्ट’ यांच्या जोडीला त्यांनी ‘मोदीस्ट’ असे स्वत:ला ठरवून दिलेय. म्हणजे नेता, पक्ष, तत्त्वज्ञान आणि देश सारे एकाच शब्दात मतदारांनी कोंबलेय. पूर्वी चीन कम्युनिस्ट असे, अमेरिका कॅपिटालिस्ट आहे, काही कार्यकर्ते मार्क्सिस्ट होते. आता हा ‘मोदीस्ट’ शब्द भारतीय मतदार अवघ्या देशाला चिटकवू पाहतोय. म्हणून हा देश ‘मोदीस्ट भारत’ झालाय असे म्हणू या!
तसे म्हणायला सबळ कारण हे की, नरेंद्र मोदी स्वत:च स्वत:ला मतदान करण्याची भाषणे करत होते. ना त्यांनी कधी कुणा उमेदवाराचे नाव घेतले, ना भाजपचे, ना एनडीएचे. इतकेच नव्हे तर ‘अब की बार, फिर मोदी सरकार’ अशी या पक्षाची घोषणा होती. विरोधी पक्षांनीही फक्त मोदी यांनाच केंद्रस्थानी ठेवले आणि प्रचार करून मतदारांना काही गोष्टी पटवल्या. अगदी राज ठाकरे यांनीही तेच अन तेवढेच केले. परंतु सारे पाण्यात गेले. (जेवढे शिल्लक असेल तेवढ्या) आणि चक्क तीनशेचा आकडा भाजपने गाठला.
शी जिनपिंग, व्लादिमीर पुतीन, रेसेप एर्दोगान या एकाकी नेत्यांच्या जोडीला आता मोदी जाऊन बसले! म्हणजे व्यक्तिगत आकर्षण, आक्रमक धोरणे आणि नीतीशून्य कारभार यांमधून त्यांनी सत्ता पुन्हा एकवार हातात घेतली. बेगुमान आणि बेदरकार एकहाती सत्तेचे केंद्रीकरण हा या साऱ्या नेत्यांचा गुणविशेष! त्यामुळे ही निवडणूक होती की नेमणूक? हे मतदान होते की सार्वमत? डोके शांत ठेवून केलेला हा निर्णय होता की, भावनांच्या प्रवाहात वाहून केलेली शरणागती?
उपरोल्लेखित एकाही नेत्याच्या देशात आर्थिक व सामाजिक व्यवस्था ठीकठाक नाही. सर्वांनी सत्तास्थान पटकावताच आपल्याला हवे तसे घटनात्मक बदल करवले आणि विरोधकांचे आवाज असे दडपले की, ते पुन्हा उठणारच नाहीत. मोदी तसेच करतील मात्र त्यांचे वेगळेपण एवढेच की आता लोकशाहीतल्या मोकळ्या वातावरणात मतदान तर त्यांनी होऊ दिले. परंतु वास्तव आहे तसेच आहे. म्हणजे मोदी सरकार सर्व क्षेत्रांत कमालीचे फसले, अकार्यक्षम ठरले. तरीदेखील मोदी जिंकले! एक मुद्दा असा सांगता येईल की, त्यांच्या योजना चांगल्या होत्या, पण त्या पूर्ण करायला आणखी पाच वर्षे हवी होती. ती मतदारांनी त्यांना देऊन टाकली. खरी मेख इथेच आहे.
राहुल गांधी, तेजस्वी यादव, मायावती, चंद्राबाबू नायडू, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि स्टालिन आदी नेत्यांनी मोदी सरकारच्या योजना कशा अपयशी ठरल्या याचाच प्रचार केला. तरीही लोकांनी मोदी कसे स्वीकारले? उज्ज्वला, उदय, जनधन, स्मार्ट सिटी, स्टार्ट अप, जलमुक्त शिवार, डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांचे सार काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेकारीची टक्केवारी स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सर्वाधिक ठरली, महिलांवर अत्याचार प्रचंड वाढले, दलितांवर हल्ले आणि बहिष्कार खुद्द गुजरातमध्येच वाढले, आदिवासींना त्यांचे हक्क मिळेनासे झाले, नोटबंदी आणि जीएसटी यांनी केलेले हाल तर सर्वच मतदार मान्य करत राहिले.
तरीही देश ‘मोदीस्ट’ होऊन बसलाय! निवडणूक आचारसंहितेच्या मोदी-शहा यांनी केलेल्या चिंध्या कोणाला दिसल्या नाहीत. आठ बिलियन डॉलर्स म्हणजे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च निवडणुकीत झाला. त्याकडे सर्वांनी कानाडोळा केला. वैयक्तिक निंदानालस्ती आणि चारित्र्यहनन यांनी तर सारी हद्द ओलांडली. उमेदवार म्हणून अक्षरक्ष: कोठूनतरी कोणीही उभे केले गेले. दारू, नोटा, भेटवस्तू यांची रेलचेल प्रचंड झाली. थेट धर्माची साद घालून मतदारांना भुलवले गेले. घराणेशाहीने पक्षाच्या भिंती पाडून सर्वत्र निर्धास्त संचार केला. तरीही देशाने मोदी का स्वीकारले?
...............................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt
...............................................................................................................................................................
राष्ट्रवाद, दहशतवाद, पाकिस्तान, सुरक्षितता हे मुद्दे पोटापाण्याच्या मुद्द्यांपेक्षा वरचढ ठरले! त्याबद्दल मोदी-शहा यांचे अभिनंदन! त्यांनीच भाजप विजयी ठरला. संघपरिवाराचे विश्लेषक आता असे म्हणू लागलेत की, मतदान व निवडणुका यांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदललाय. व्याकरण बदलले. खरेच आहे ते! भारत मोदींनी मजबूत केलाय. घर में घुसके मार दिया, जगात भारताची प्रतिष्ठा मोदींना वाढवलीय आणि देश लवकरच महासत्ता होणाराय, अशा निर्गुण, निराकार भावनांपुढे साऱ्या भौतिक समस्या नमल्या. मतदारांनी ‘पोटात पाणी गेले नाही तरी चालेल, पण देशाने अंगातले पाणी दाखवत राहिले पाहिजे’ असे ठरवून मोदींना निवडून दिले! आता यावर काय बोलणार? ऐन निवडणुकीच्या काळात अनेक पत्रकारांनाच कामावरून काढून टाकण्यात आले, तिथे उरलेल्या बेकारांची काय गत?
देशी भांडवलशाहीचे एक मुखपत्र आहे. त्याचे नाव ‘इंडिया टुडे’. या साप्ताहिकाने ‘द डिस्ट्रेस्ड’ असे शीर्षक देऊन अख्खा अंक (२० मे २०१९) भारतीय अर्थव्यवस्थेवर कोसळलेल्या संकटावर काढलाय. कोणतेही क्षेत्र धड राहिलेले नाही आणि या दुर्दशेला कारण मोदी सरकारच आहे, असा या अंकाचा निष्कर्ष आहे. त्याचा तपशील ज्याने त्याने तो अंक वाचून जमवावा. पण म्हणजे असे की, भारतीय मतदार खरेच फार सोशिक, समजूतदार, संयमी आणि प्रेमळ, क्षमाशील आहे. कारण एकदा का माणूस ‘मोदीस्ट’ झाला की, त्याच्या अंगात हे सारे गुण सामावतात! त्यामुळे अर्थव्यवस्था गडगडली काय, शेतीत नापिकी झाली काय, तो विषय अंगवणी पडलेलाय.
मोदींनी देश मजबूत करून पाकिस्तानला असा धडा दिलाय की बस्स! त्यामुळेच एवढे मतदान भाजपला झालेय. याचा गर्भित अर्थ असा की, मुसलमान माजले होते, ते आता काबूत आले. अॅट्रॉसिटीतून दलितांनी खूप हैराण केलेले होते, तेही आता नरमलेत. थोडक्यात एक धडाकेबाज, दमदार, आक्रमक, बिनधास्त नेता धडपडत असताना कशाला भूक, बेकारी, आत्महत्या, अत्याचार, वंचना या प्रश्नांची चर्चा करा? हा विचार मतदारांनी केला. काँग्रेसने सदैव मुसलमानांची आळवणी (हिंदूंना वंचित ठेवून) केली आणि दलितांना कायम जवळ केले. त्याची शिक्षा या पक्षाला सवर्ण, मध्यम जाती आणि अन्य दलित यांनी दिलीय.
आता एवढ्यामुळे हाती आलेल्या सत्तेतून ‘इंडिया टुडे’च्या किंवा ‘टाइम’च्या संपादकांना खोटे ठरवता आले पाहिजे. ते शक्य आहे का? ज्याने प्रश्न पैदा केले ते त्यानेच सोडवायला हवेत. पण तरीही ते शक्य होईल का? ते या नव्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल. जी धोरणे बेकारी, अर्धबेकारी यांच्या जन्मास जबाबदार ठरली, तीच पुढे चालू राहिली तर हे सरकार आपल्याच ओझ्याखाली चेपून जाईल. आर्थिक दूरवस्थेने साधारण ३० कोटी भारतीय त्रस्त झाले, अस्थिर झाले. त्यांनी जरी ‘मोदीस्ट’ होऊन नवे सरकार ठरवले तरी त्यांची त्या आर्थिक दूरवस्थेतून सुटका होईल का? सांगता येत नाही. मतदार स्वत:हून वाघाच्या गुहेत शिरलाय!
भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात खूप गाजला. मात्र लाचलुचपत यत्किंचितही कमी झालेली नाही. कोणत्याही सरकारी कार्यालयात पैसा खाणे थांबलेले नाही. कार्यालयीन गतिमानता, नियमांची अमलबजावणी आणि लाभधारकांचे समाधान यांबाबतीत बोंबाबोंब असताना पुन्हा हेच लोक काय फरक पाडू शकणार?
बाकी प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष असा सामना भारतभर चालूच राहणार आहे. अजून भाजपची मतांची टक्केवारी समजलेली नाही. ‘मोदीस्ट भारत’ किती टक्क्यांचा आहे, हे कळले तर ‘निर्मोदीस्ट भारतीयां’च्या बळावर बाकीचे पक्ष टिकतील काय हा प्रश्नच आहे.
आणखी गंभीर मुद्दा म्हणजे ‘मोदीस्टां’पैकी जे जे ‘फॅसिस्ट’ आहेत, ते आता आणखी मस्ती करणार. हेगडे, प्रज्ञा ठाकूर यांच्यामार्फत उघड संविधानविरोधी उदगार बाहेर पडत जाणार आणि आस्ते आस्ते हिंदूराष्ट्राकडे भारताची वाटचाल होणार!
पाकिस्तान, धर्म, दहशतवाद, असुरक्षितता यांचा सदोदित उल्लेख हिंदुत्वाचे मजबुतीकरण करण्यासाठीच होत गेला. त्यामुळे मोदीच फक्त जिंकले असे नाही. मोदी ज्या वृत्ती, पूर्वग्रह आणि आग्रह यांचे प्रकटीकरण करतात, त्या गोष्टी आता देशव्यापी होत राहतील! किंबहुना त्यांना या मतदानाने सर्वमान्यता मिळाली, असा भाजपचा व संघपरिवाराचा समज होईल आणि देशात आणखी एक संघर्ष सुरू होईल.
.............................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 24 May 2019
प्राध्यापक जयदेव डोळे, तुम्ही संविधानविरोधी उद्गार बाहेर पडणार म्हणून चिंता व्यक्त केलीये. पण संविधानास उघडपणे धाब्यावर बसवून हिंसा माजवणाऱ्या नक्षल्यांच्या विरोधात तुम्ही अवाक्षरही काढलेलं नाहीये. शिवाय साध्वी प्रज्ञा यांनी काढलेले उद्गार संविधानाच्या विरोधात कसे ते सांगायचे कष्ट तुम्ही घेतले नाहीत ते वेगळंच. तुम्ही कर सोडून संन्याशाला सुळी चढवायच्या कटात सामील तर नाही ना, असा संशय येतोय. त्याची लवकरात लवकर निवृत्ती करा. आपला नम्र, -गामा पैलवान
Prashant
Fri , 24 May 2019
*This is best ever, superb , excellent analysis of why Modi won the election*!!!! thanks