अजूनकाही
‘ ‘फ्रायडे’ला पडलेल्या सिनेमाचं मातम करत नाहीत!’ हा संवाद ‘रंपाट’ या सिनेमातला आहे. तो दुर्दैवानं रवि जाधव दिग्दर्शित याच सिनेमाला लागू होतो!
या सिनेमाची कथा आहे मुन्नी आणि मिथुन यांच्यातील संघर्षाची. मुन्नी कोल्हापूरची तर मिथुन सोलापूरचा. दोघांना सिनेमात काम करायचं असतं. त्यासाठी दोघं मुंबईला ‘ऑडिशन’साठी येतात. तिथं दोघांची भेट होते. त्यांची नायक आणि नायिका यांच्या भूमिकांसाठी निवड झाल्याचं सांगून दोघांकडून पैसे घेतले जातात. मात्र प्रत्यक्षात त्यांची फसवणूक केली जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळत नाही. त्यानंतर त्यांच्यासमोर समस्याचा डोंगर उभा होतो. हा संघर्ष म्हणजे ‘रंपाट’ची कथा.
प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात संघर्ष असतो. तो आयुष्याची वाट चुकलेल्याला नवीन वाट शोधून देतो. तर कधी स्वतःची नव्यानं ओळख करून देतो. पण अनेकदा या लहरी आणि अशाश्वत प्रवाहाच्या वाटेवर किंवा स्वत्वाच्या प्रवाहात तोल जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी दोन्ही तीरावरून पाण्यात पडण्याची शक्यता असते. मग पाण्यात पडलोच आहोत, तर हातपाय हलवून जीव वाचवू, एवढीच आशा शिल्लक असते. सिनेमाचा गाभा म्हणजे ही सर्व गृहीतकं आहेत. मात्र त्याची कथा या दोन्ही बाजूंना सिद्ध करण्याच्या नादात गंडली आहे.
अस्सल विनोदी सिनेमा बनवताना संवाद नाटकी पद्धतीचे नसावेत, हे साधं गणित पटकथा लेखकानं लक्षात घ्यायला हवं होतं. कारण संवादातला उथळपणा ‘रंपाट’ला रंगहीन करतो. त्याचबरोबर कथेला स्पर्श करणाऱ्या आणि कथेची गरज असणाऱ्या बाबींच्या स्पष्टतेकडे दिग्दर्शकाचं दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे कथेचा विषय आणि त्याचा उभा-आडवा विस्तार लक्षात न घेता सिनेमा निर्माण केला तर काय होतं, याचं उदाहरण म्हणून या सिनेमाकडे बोट दाखवता येईल.
कथा सलग जात नाही. त्यामुळे सिनेमात भरभक्कम असं काही नाही. फार तर दिग्दर्शकाची हलगर्जी प्रत्येक दृश्यात दिसून येते. कथेचा विषय महत्त्वाचा आणि तरुण पिढीला काहीतरी सांगू पाहणारा आहे. मात्र दिग्दर्शकाचा ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करतो.
सिनेमा पूर्वार्धात खूपच संथ आहे. त्याचबरोबर ओढूनताणून निर्माण केलेले विनोदी संवादही निरस आहे. उत्तरार्धात तो अनपेक्षितपणे गती पकडतो आणि एका विनोदी (?) सिनेमाचं रूपांतर गंभीरतेत होतं. अतार्किक गोष्टींचा भडीमार प्रत्येक संवादातून करण्यात आलेला आहे. ‘फिल्मी’ दुनियेवर बनवलेला हा सिनेमा कथेला जोराचा ‘ब्रेक’ लावतो. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो.
अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी या जोडीचा अभिनय हा समाधानकारक नाही. भूमिका निभावण्यात दोघंही कमी पडले आहेत. अभिजीत चव्हाण आणि कुशल बद्रीके यांच्या विनोदी अभिनयाचा थोडा रंग सिनेमावर चढलेला आहे. मात्र प्रिया बेर्डे यांचा अभिनय हा ‘ओव्हरडोस’ आहे.
संवाद, अभिनय, कथेची मांडणी, संगीत, पटकथा, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबी अशा सहाही पातळीवर हा सिनेमा प्रभावी ठरत नाही. दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमनं आखलेल्या चक्रव्यूहात सिनेमा पूर्णपणे अडकला आहे. त्यामुळे तो अपेक्षाभंग करतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment