‘दे दे प्यार दे’ : सिनेमा लव रंजनचाच, पण कमी स्त्रीद्वेष्टा आणि जरासा उजवा!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘दे दे प्यार दे’चं पोस्टर
  • Sat , 18 May 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie दे दे प्यार दे De De Pyaar De अजय देवगण Ajay Devgn तबू Tabu लव रंजन Luv Ranjan

‘दे दे प्यार दे’चा सहलेखक आणि निर्माता असलेला लव रंजन हा त्याच्या चित्रपटांत पुरुषी अहंकारातून निर्माण झालेला स्त्रीद्वेषातून स्त्रियांचं चुकीच्या पद्धतीनं चित्रण करणं, त्यांना सुखवस्तू म्हणून दर्शवणं अशा बऱ्याच गोष्टींसाठी (कु)प्रसिद्ध आहे. त्याचा पहिला चित्रपट असलेला ‘प्यार का पंचनामा’, त्याचा सीक्वेल ते गेल्या वर्षी आलेला ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या त्याचं लेखन-दिग्दर्शन असलेल्या बहुतेक सर्वच चित्रपटांमध्ये या गोष्टी सहज आढळून येतात. ‘दे दे प्यार दे’ हा अकिव अलीने दिग्दर्शित केलेला असला तरी त्याचं लेखन आणि निर्मिती रंजनची असल्यानं आणि चित्रपटातील इतरही बऱ्याच घटकांमुळे तो नाही म्हटलं तरी रंजनच्या चित्रपटविश्वाचा भाग ठरतो. असं असलं तरी तो त्याच्या स्त्री पात्रांचं रेखाटन आणि तो मांडू पाहत असलेल्या मुद्द्यांमुळे या विश्वातील चित्रपटांहून काही प्रमाणात उजवा ठरतो. रंजनच्या या चित्रपटाचा सूर कमी स्त्रीद्वेष्टा आहे आणि त्यात (अपवाद वगळता) स्त्रियांना सुखवस्तू म्हणून दर्शवण्यात आलेलं नाही हेही नसे थोडके.

आशिष मेहरा (अजय देवगण) हा लंडनस्थित व्यावसायिक आहे. एका मित्राच्या बॅचलर्स पार्टीमध्ये अगदीच अनपेक्षित रूपात त्याची भेट आयेशाशी (राकुल प्रीत सिंग) होते. पार्टी त्याच्याच घरी असल्यानं उत्तररात्री सर्वांना रवाना केल्यावर दारूच्या नशेत असलेली आयेशा तिथेच झोपल्याचं त्याच्या लक्षात येतं. हिंदी चित्रपटांमध्ये घडतं त्याप्रमाणे त्या रात्री दोघांमध्ये काहीच घडत नसलं तरी दुसऱ्या दिवशी मात्र ते एकमकांकडे आकर्षित झालेले असल्याचं दिसू लागतं. वयाची पंचेचाळिशी पार केलेला आशिष पंचविशीत असलेल्या आयेशाशी आणि तिही त्याच्याशी फ्लर्ट करत राहते. अपेक्षित त्या गोष्टी घडतात. सुंदर आणि विनोदी स्वभाव असलेली, नायकाशी फ्लर्ट करत असलेली बिनधास्त नायिका त्याच्या एकाकी आयुष्यात येते आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात.

आशिषचा कौउन्सिलर मित्र समीर (जावेद जाफरी) वगळता त्यांना किंवा त्यांच्या सभोवतालच्या कुणालाही त्यांच्या वयातील अंतराचं काही वाटत नाही. नीट पाहिलं तर हे पात्र रंजनच्या चित्रपटात दिसून येणाऱ्या साधारण मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतं. ‘अमीर बुढ्ढा और जवान हॉट लडकी’ हा मिलाप त्याला साहजिकच स्त्रियांनी पैशांकरिता पुरुषांचं शोषण करण्याचा प्रकार वाटतो. (‘सोनू के टिटू की स्वीटी’मध्ये साधारण केवळ मानसिक छळाकरिता स्त्रियांनी पुरुषांचं शोषण करणं हा मुद्दा केंद्रस्थानी होताच.) स्वतः रंजनच्या चित्रपटातील पात्रांनी स्त्रीद्वेष्टं असताना समीर आणि आशिषमधील संवादात ‘मिसॉजिनिस्ट’ (ढोबळमानानं स्त्रीद्वेष्टा) हा शब्द उल्लेखला जाण्याइतका कमालीचा आत्मविश्वास जरा उपरोधिकच म्हणावा लागेल.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4813/Hindu-Dharmache-shaiv-rahasya

.............................................................................................................................................

चित्रपटाच्या पूर्वार्धात दोघांमधील नात्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. सदर पात्रांमध्ये घडणाऱ्या काही रटाळ बाबी सोडता अगदी ‘चले आना’सारखी गाणीही वयात बरीच तफावत असलेल्या जोडप्यातील नातेसंबंधांचं समजूतदार आणि प्रौढरीत्या चित्रण करतात. रंजनच्या चित्रपटात कधी नव्हे, ते स्त्री पात्राकडे सुखवस्तू म्हणून पाहिलं जात नाही (अर्थात सुरुवातीला येणाऱ्या ‘वड्डी शराबन’ गाण्यासारखे क्लीवेजवर अवलंबून अपवाद इथंही आहेतच), किंवा नात्यात तुटत असल्यास हे केवळ तिच्यामुळे घडत आहे, असा भाव दिसत नाही. दरम्यान आशिष आणि आयेशा यांच्यातील नातं बऱ्याच वेगवेगळ्या टप्प्यांतून जाऊन अखेर ते एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्याला आयेशाची आपल्या कुटुंबाशी, पूर्वाश्रमीच्या पत्नीशी ओळख करून देणं आणि त्यांच्याकडून एक प्रकारची मंजुरी घेणं गरजेचं वाटत असल्यानं चित्रपट भारतात येऊन पोचतो.

आशिषच्या नात्यातून निघून गेल्यानंतर एकल पालकत्वाची जबाबदारी समर्थपणे पेलणारी मंजू (तब्बू) ही सहज चित्रपटातील काही उत्तम पात्रांपैकी एक ठरते. भारतात आल्यानंतर मुलीच्या, इशिकाच्या (कर्कश्श संवादफेक आणि अभिनय करणारी, इनायत सूद) लग्नाची बोलणी सुरू असल्याचं अचानकच कळाल्यानं रागावलेला आणि भांबावलेला आशिष आपल्या कुटुंबाची आयेशाची आपली प्रेयसी म्हणून ओळख करून देण्याऐवजी सेक्रेटरी म्हणून ओळख करून देतो. मंजूच्या हे ध्यानात येऊन तिच्यात आणि आयेशात आशिषला कोण अधिक चांगलं ओळखतं, अशी ईर्ष्येतून निर्माण झालेली सुप्त स्पर्धा सुरू होते. त्यानंतर दोन बायकांमध्ये अडकलेला पुरुष या जुन्याच मार्गावरून वाटचाल करत असलेला चित्रपट उत्तरार्धात अधिकच रटाळ होतो. शिवाय, पूर्वार्धात स्त्रियांना सुखवस्तू म्हणून दर्शवणं, त्यानिमित्तानं टाळ्याखाऊ तथाकथित विनोदी संवाद या गोष्टींची कमी असल्याची कसर उत्तरार्धात भरून काढली जाते. मग तब्बू आणि राकुल या दोघी नवी गाडी आणि जुनी गाडी या भौतिक गोष्टींच्या उपमेच्या नावाखाली आशिषच्या आयुष्यातील स्वतःचं महत्त्व, फायदे इत्यादी गोष्टींची तुलना करतात. त्यामुळे काही काळ ‘क्या कूल हैं हम’ किंवा ‘मस्ती’ या भारतीय सेक्स-कॉमेडी चित्रपट मालिकांची आठवण येते.

‘दे दे प्यार दे’च्या केंद्राशी वयात बरीच तफावत असलेल्या जोडप्यांमधील नातेसंबंध, एकल पालकत्व आणि घटस्फोट, हे भारतीय समाजात एक विस्तृत काळ टॅबू मानले गेलेले तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, समस्या अशी आहे की, त्याचे चित्रपटकर्ते या विषयांना तितक्या समजूतदारपणे हाताळत नाहीत. कारण मुळातच चित्रपटकर्त्यांना त्याच्या केंद्राशी असलेल्या मुद्द्यांपेक्षा विनोद्युत्पत्तीमध्ये अधिक रस आहे. ज्या विनोदांमधून कमी प्रमाणात का होईना, पण चित्रपटकर्त्यांचा स्त्रीद्वेष्टा दृष्टिकोन यात वेळोवेळी दिसून येत राहतो. ज्यामुळे एखाद्या पंचलाईनच्या अट्टाहासापोटी पात्रं त्यांच्या एरवीच्या स्वभावविशेषाहून टोकाची कृती करताना दिसून येतात. ज्यामुळे ती विरोधाभासी गोष्टी करतात आणि (लिखाणाच्या स्तरावर) दोषपूर्ण बनतात. पात्रांमध्ये भावनिक, सामाजिक पातळीवर एक समजूदारपणा दिसून येतो. ती नात्यांकडे समाजातील तथाकथित नियमांना फाट्यावर मारण्याची धडपड करताना दिसतात. पण शेवटी पुन्हा दिलेल्या गंभीर विषयाला साजेशा मांडणीची उणीव इथं भासत राहते. नाही म्हणायला चित्रपट रंजनच्या एकूण लिखाणापेक्षा जरा अधिक प्रौढ भासत असला, त्यातील सेल्फ-अवेअर विनोदांमुळे रंजक ठरत असला तरी एकूण चित्रपट या माध्यमाचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा तितका प्रभावी ठरत नाही.

इतक्या वर्षांतील रंजनच्या करिअरमध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, तो स्वगतं चांगली हाताळतो. इथंही देवगण-राकुलच्या पात्रांमधील वयाच्या अंतराच्या निमित्तानं बोंबाबोंब करणाऱ्या सगळ्या कुटुंबाला गप्प करत तब्बू जेव्हा त्यांच्या संकुचित वृत्तीवर ताशेरे ओढते, तेव्हा ती अधिकच प्रभावी वाटते. आपल्याला ते पात्र नेहमीच्या रटाळ गोष्टी टाळल्या असत्या तर किती प्रभावी होऊ शकलं असतं याची झलक दिसते. फक्त चित्रपटकर्त्यांनी क्षुल्लक मनोरंजनापेक्षा चित्रपटातील पात्रांच्या अशाच संवेदनशील, समजूतदार विचारांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवं होतं. कारण ‘लव रंजनच्या पूर्वीच्या चित्रपटांहून कमी स्त्रीद्वेष्टा आणि फार नाही, पण जरासा उजवा’ हे बिरुद चित्रपटाला मिळणार असेल तर तो अगदीच चांगला असेल असं नसतं.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख