अजूनकाही
१९७०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत देशातील अनेक राज्ये कडक दुष्काळाने पोळून निघाली होती. हरित क्रांतीची फळे तोपर्यंत देशातील जनतेने चाखली नव्हती. सलग दोन वर्षे पुरेसा पाऊस न पडल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांत भयाण परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्या वेळी माध्यमिक शाळेत शिकत होतो. बहुधा १९७२ किंवा १९७३ असावे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने शाळांच्या वार्षिक परीक्षा मार्चआधीच घेण्याचे आदेश दिले होते, हे स्पष्ट आठवते. यावरून दुष्काळाच्या तीव्रतेची कल्पना यावी.
त्यावेळी आम्ही राहायचो त्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात पाण्याची टंचाई नसायची. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणातील पाणी या शहरात कालव्याने आजही पुरवले जाते. त्यामुळे अगदी त्या दुष्काळी काळातही कधी पाण्याची कमतरता जाणवली नाही. कालव्याची वा अशी इतर कुठलीही सुविधा नसलेल्या प्रदेशांतील लोकांची त्या वेळी पाण्याबाबत काय स्थिती होती हे मला सांगता येणार नाही. मात्र या तीव्र दुष्काळात महाराष्ट्रातील किंबहुना देशातील अनेक भागांतील सर्वच लोकांची सर्वांत मोठी एकच समान समस्या होती ती म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा! पिण्याचे पाणी असले तरी दररोज जेवणासाठी लागणारे ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि गव्हासारखे धान्यच त्या वेळी बाजारात पैसे मोजूनही मिळत नव्हते. याचे कारण म्हणजे सलग दोन-तीन वर्षे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात प्रचंड कपात झाली होती. ज्या प्रदेशात मुबलक पाऊस झाला होता, तेथे पिकलेले अन्नधान्य सगळ्या देशातील जनतेची गरज भागवण्याइतके नव्हते.
अन्नधान्याचा तुटवडा असल्याने बहुतांश लोक सरकारतर्फे रेशन दुकानांतून वाटल्या जाणाऱ्या धान्यावर आणि खाण्याच्या तेलावर अवलंबून असणार हे साहजिकच होते. त्या काळच्या दुष्काळाचे नाव काढले की, सर्वप्रथम माझ्या नजरेसमोर येतात त्या रेशन दुकानांसमोर आशाळभूत नजरेने हातात पिशव्या आणि रेशन कार्ड घेऊन उभे असलेल्या लोकांच्या लांबचलांब रांगा! शहराच्या विविध भागांत असलेल्या रेशन दुकानांच्यासमोरच्या या रांगा अगदी सकाळपासून लागलेल्या असायच्या. त्या आदल्या संध्याकाळी त्या दुकानात धान्य आले असल्याची बातमी रात्रीच सगळीकडे पोहोचल्यावर सकाळी ही गर्दी जमलेली असायची. आलेले धान्य संपले आहे, हे दुकानदाराने जाहीर करण्याआधीच आपल्या वाट्याचे धान्य मिळवण्यासाठी लवकर रांगेत उभे राहण्याचा आटापिटा करावा लागत असे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4861/Kon-hote-sindhu-loka
.............................................................................................................................................
त्या काळात रेशनवर सर्वच लोकांना अल्प किमतीत मिळणाऱ्या धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आणि साखरेचा समावेश असे. वर्षांतून तीन-चार वेळेस सणावारांच्या निमित्ताने यांत डाळी आणि गोडे तेलाचा समावेश होत असे. त्या काळात बहुतेक सर्व आम जनता ही कागदोपत्री इबीसी म्हणजे ‘इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास’ असायची आणि सर्वांकडेच एकच प्रकारचे म्हणजे पांढरे रेशन कार्ड असायचे. त्या काळात रेशन कार्ड म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या अस्तित्वाचा एकमेव आणि अत्यंत मूल्यवान पुरावा असायचा. घरपट्टी, पाणीपट्टी, विजेचे बिल आणि लँडलाईन टेलिफोन बिल, बँकेचे पासबुक ही कागदपत्रे त्या काळी सर्वांच्या आवाक्यातली नसायची. मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट यांचे आगमन ही तर फार, फार पुढल्या काळातली गोष्ट होती.
त्या काळात एका एका कुटुंबात आठ-दहा माणसे असायची आणि प्रत्येक कुटुंबाकडे एकाच पत्त्यावरची दोन-तीन रेशनकार्डे हमखास असायची. आमच्या घरांत वडिलांच्या आणि थोरल्या दोन भावांच्या नावांवर रेशन कार्डे होती. आणि हा सर्व खुल्लमखुल्लम मामला होता, त्यात काही वावगे आहे असे कुणालाच वाटत नसे. याचे कारण म्हणजे एका रेशन कार्डावर मिळणारे अन्नधान्य पुरेसे नसायचे आणि प्रत्येक रेशन दुकानदार तुम्हाला तुमच्या वाट्याचे धान्य तुम्हाला देईलच याची शाश्वती नसायची. धान्य आल्यावर रेशन दुकानदार एखादा दिवस व अर्धा दिवस धान्य वाटून लगेच ‘धान्य संपले’ असा बोर्ड लावून मोकळा होई आणि मग ते न वाटलेले धान्य, साखर आणि तेल स्थानिक किराणा दुकानात बाजारभावाने नंतर विकले जाई. हे ‘काळ्या बाजारातील धान्य’ म्हणून ओळखले जाई.
मागच्या आठवड्यात आमच्याकडे घरकाम करणाऱ्या मावशींनी रेशनदुकानात धान्य आले असल्याचे कारण सांगून दोनशे रुपये आगाऊ मागितले. ‘तुमच्या कार्डावरचे धान्य आजच घेतले नाही तर उद्या मिळणार नाही का?’ मी विचारले, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले आणि सांगितले की, उशीर झाला तरी त्यांच्या हक्काचे धान्य त्यांना मिळणारच. रेशन दुकानात होणाऱ्या धान्याच्या काळा बाजारावर काही प्रमाणात का होईना आळा बसला आहे, हे त्यांचे उत्तर ऐकून बरे वाटले.
या दुष्काळाच्या काळात नेहमी मिळणारे अन्नधान्यही दुर्मीळ झाले आणि त्याऐवजी मिलो नावाचे ज्वारीसारखे दिसणारे आणि लाल रंगाचे टरफलयुक्त धान्य रेशन दुकानात मिळू लागले. या दुष्काळात भारतात अन्नधान्याचा तुटवडा असल्याने अमेरिकन सरकारने मिलो हे धान्य पाठवले होते. देशातील कडधान्ये संपत आली तसे नंतर रेशनकार्डावर फक्त मिलो मिळू लागला. मात्र त्यावरही प्रत्येक व्यक्तीस किती किलो मिळेल यावर कमल मर्यादा होतीच.
मला स्पष्ट आठवते माझे वडील सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास आमची नोंद असलेल्या तीनपैकी कुठल्या रेशनदुकानात धान्य सुटले आहे, हे पाहण्यासाठी निघत असत. शाळेला सुट्टीच असल्यामुळे मीही त्यांचबरोबर हातात दोन-तीन पिशव्या जात असे. एखाद्या दुकानात धान्य आले आहे, असे कळाले तर मला तिथल्या रांगेत उभे करून माझे वडील दुसऱ्या रेशन दुकानात जात असत. कधी कधी एकाच वेळी दोन दुकानांत धान्य आल्यास मोठी तारांबळ उडे. कारण कुठले धान्य आणि किती मिळू शकते, हे समजल्यावर कुठले धान्य किती घ्यायचे याचा निर्णय वडीलच घेऊ शकत होते. शिवाय खिशात किती पैसे आहेत याचाही त्यांना विचार करावा लागत असे.
या मिलो धान्याची भाकर लालजर्द रंगाची होत असे. या भाकरीची चव मला वाटते त्या काळात कुणालाच पसंत पडली नसावी. त्याच्यात पोषणमूल्य फारच कमी होते. या मिलोची भाकर खाण्यास मी चक्क नकार देत असे आणि त्याऐवजी दुसरे काही देण्याचा हट्ट धरत असे. खरे पाहिले तर मिलो हे धान्य अमेरिकेत मानवी अन्न म्हणून वापरले जात नसावे, बहुतेक हे धान्य अमेरिकेत जनावरांसाठीच पिकवले जात असावे अशी शंका घेतली जात असे इतके हे धान्य नित्कृष्ट दर्जाचे होते. मात्र जगण्यासाठी मिळेल ते धान्य खावे लागत होते, सामान्य जनतेकडे त्याविवाय दुसरा पर्याय नव्हता. असे म्हणतात की, अमेरिकेतून भारतात मिलो आले, तेव्हा या धान्याबरोबर काँग्रेस किंवा गाजर गवताच्या बियाही आल्या आणि हे गवत सगळीकडे फोफावले. दुष्काळामुळे, अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे लोकांची अशी वाईट अवस्था झाली होती तर गाईगुरांची आणि इतर जनावरांची त्या काळात काय स्थिती झाली असेल याची कल्पनाही करवत नाही.
त्या काळात आमच्या घरची एक पाळीव कुत्री होती. या कुत्रीच्या संदर्भात झालेली एक घटना या दुष्काळाचा विषय निघाला कि मला चटकन आठवते. आमचे कुटुंब मोठे असल्याने घरात भाकरी, पोळ्या आणि इतर जेवण कधीही मोजूनमापून केले जात नसायचे. ‘आमच्या या खटल्याच्या घरात ऐनवेळी कोणी पै-पाहुणा आला तर सहज सभागून जातो, त्याच्यासाठी पुन्हा वेगळा स्वयंपाक करायची गरज नसते,’ असे माझी आई म्हणायची ते खरेच होते. याचे कारण म्हणजे दुपार-रात्री संध्याकाळी सगळ्यांची जेवणे पार पडल्यानंतरही भाकऱ्यांच्या टोपलीत तीन-चार भाकरी असायच्या, पातेल्यात कालवण शिल्लक असायचेच. शिवाय कुठलीतरी चटणी तर असायचीच. दुष्काळाच्या या वर्षी मात्र आमच्या किंबहुना बहुतेक लोकांच्या घरांतील द्रौपदीची ही थाळी अचानक गायब झाली. घरातल्या लोकांसाठीच त्या त्या वेळच्या जेवण्यासाठी भाकरी कमी पडू लागल्या आणि मग भाकरीची टोपली आणि कालवणाचे भगुणे रिकामे राहू लागले.
एका सकाळी साडेनऊच्या दरम्यान स्वयंपाकघरात जाऊन मी भाकरीची टोपली उघडली. त्यात मिलोच्या भाकरीचा चतकोर तुकडा होता, तो मी उचलला आणि घराबाहेर असलेल्या आपली शेपटी हलवत असलेल्या आमच्या कुत्रीला खायला दिला. काही वेळाने माझ्या आईने भाकरीची टोपली उघडली आणि ती रिकामी दिसताच त्या भाकरीचा तुकडा कुठे गेला अशी तिने विचारणा केली. माझे उत्तर ऐकताच, ‘आता काय करावं बाई या मेल्या कार्ट्याचं!’ असे तिचे हताश बोल मला ऐकावे लागले. आई चिडल्यावर मार मिळायचा, मात्र यावेळी आईच्याच डोळ्यात पाणी तराळले होते. त्यानंतर मी कधीही आमच्या कुत्रीला काही खाऊ घातले नाही. नंतर एक दिवस झाडाखाली एक मेलेल्या कुत्र्याचे मांस खाताना मी तिला पाहिले, तेव्हापासून तर मी तिला कधी घरातही येऊ दिले नाही. काही दिवसानंतर त्या बिचाऱ्या कुत्रीचेही प्रेत मला एका झाडाखाली पडलेले दिसले.
या दुष्काळाच्या आपत्तीच्या काळात गरजू लोकांना त्यांचे शेजारीपाजारी यथाशक्ती मदत करत असत. मला आठवते आमच्या चाळीत राहणाऱ्या कुटुंबामध्ये ज्वारीच्या आणि बाजरीच्या पिठांची सर्रासपणे देवाणघेवाण होत असे. शेजारच्या घरातील एखादी व्यक्तीने लोखंडी मापाचा आठवा भरून किंवा पातेलेभर पीठ मागितले तर नकार कधी मिळत नसे. त्या घरात पीठ दळून आले की, ताबडतोब त्याच मापाने पिठाची परतपेढ होत असे.
त्या नंतरच्या पावसाळी हंगामात सुदैवाने वरुणराजा बरसला आणि दुष्काळाचे हे सावट दूर झाले. काही काळानंतर देशात हरित क्रांती सफल झाल्याने भारत अन्नधान्य निर्मितीत स्वयंपूर्ण बनला. त्यामुळे एखाद्या वर्षी एखाद्या प्रदेशांत पुरेसा पाऊस झाला नाही, धान्य पिकले नाही तरी त्याची मोठ्या प्रमाणात आता झळ बसत नाही. दरम्यानच्या काळात इतर अनेक क्षेत्रांत आपण मोठी प्रगती केली असली तरी दुष्काळग्रस्त परिसरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सोडवणे आपल्याला आजही शक्य झालेले नाही!
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment