अजूनकाही
२०१९ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी लक्षवेधी, ऐतिहासिक ठरणार आहे. यातला जो राजकीय लढाईचा भाग आहे, तो नेहमीप्रमाणे सत्ताधारी विरुद्ध विरोधी असा आहेच. एकसंध सत्ताधारी पक्ष आणि शतखंडीत विरोधी पक्ष हे चित्र १९५२पासून १९९०पर्यंत कायम होते. १९९०नंतर एकसंध सत्ताधारी हे गणित बिघडत गेलं. म्हणजे प्रामुख्यानं ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसचा पाया ढासळू लागला, तो उत्तरोत्तर ढासळतच गेला. २०१४साली तो जवळपास भुईसपाट झाला.
या दरम्यान जनसंघ, जनता पार्टी व पुढे भाजप म्हणून विकसित झालेला पक्ष भुईसपाट अवस्थेतून १९८४ (२ खासदार) ते २०१४ (२८२+ खासदार) असा कळसाकडे पोहचला. देशाच्या ७० वर्षांच्या राजकारणात कम्युनिस्ट, समाजवादी, डीएमके वगैरे पक्षांना जे जमलं नाही, ते भाजपनं साधलं. त्यांनी पूर्ण बहुमतासह, पूर्ण बिगर काँग्रेसी सरकार स्थापून काँग्रेसला थेट पर्याय उभा केला. काँग्रेसच्या काळात जनसंघाची पणती अपवादानं संसदेत मिणमिणायची. पण १९८४नंतर भाजपच्या कमळानं विचारपूर्वक रणनीती आखून संसदेत कमळ फुलवण्याची प्रक्रिया उत्तरोत्तर वाढवत नेली. काँग्रेसचं पतन आणि भाजपचं पुनरुज्जीवन या प्रवासात कम्युनिस्ट, समाजवादी या मोठ्या विचारधारा पक्षांसह अस्तंगत पावत गेल्या. त्यामुळे उजवीकडून थोडी डावीकडे झुकलेली काँग्रेस, पूर्ण उजवीकडे झुकलेला भाजप, यात जनता पार्टीपासूनच चिरफाळ्या झालेल्या समाजवादी विचारधारेचा अस्तच झाला. नंतर ‘समाजवाद’ हा शब्द पक्षाच्या नावात वापरण्यापुरता शिल्लक राहिला. तर कम्युनिस्ट आउटडेटेड वाटायला लागले. कारण त्यांचा कणा असलेला कामगार वर्ग संपला आणि मध्यमवर्ग उदारीकरणानंतर चंगळवादी, नवश्रीमंत वर्गात समाविष्ट झाला. त्यामुळे कम्युनिझम विद्यापीठापुरता मर्यादित झाला. त्यांना काँग्रेसशी सहकार्य करण्याची वेळही आली.
बाकी डीएमके, एआयडीएमके, टीआरएस, टीडीपी, तृणमूल, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना असे प्रादेशिक पक्ष राज्य व देशपातळीवर आपले अस्तित्व दाखवू लागले. वेगवेगळ्या काळात त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली. आणि या काळातच विचारधारा, पक्षाचे राष्ट्रीय अस्तित्व या गोष्टी गौण ठरून अंकगणिताला महत्त्व आले. आघाडीच्या राजकारणात एक वा दोन खासदारही मौल्यवान ठरू लागले. देशाने १९८९पासून २०१४पर्यंत अशा पद्धतीने सरकारं निवडली. पण याच काळात अर्थसुधारणा (१९९२), अणुकरार (२००४-२००९), अणुचाचणी (वाजपेयी सरकार) अशा अनेक प्रगतीशील गोष्टी घडल्या. पण त्याचवेळी राजकीय अस्थिरता व वारसा, प्रादेशिकवाद डोकेदुखी ठरू लागला. २०१४ला ही अस्थिरता संपली आणि १९९८ साली वाजपेयींची आघाडी कामगिरी पाहिलेल्या मतदारांना वाटलं, आता तेच भाजप पूर्ण बहुमतानं सरकारात आलंय, तर खरंच काही बदल बघायला मिळेल.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4864/Vivekachya-Watewar
.............................................................................................................................................
पण गेल्या पाच वर्षांत भ्रमनिरास झाला. एकतर वाजपेयी-अडवाणींचा भाजप राहिलेला नाही. तो मोदी-शहांचा झाला. वाजपेयी कट्टर स्वयंसेवक होते, तरीही सत्तेवर आल्यावर पक्ष, विचारसरणी, धर्म नाही तर राजधर्म पाळायचा असतो, याचं सांविधानिक भान असलेले नेते होते. आपल्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या ध्येयधोरणात दिसायला हवंच, पण त्याच वेळी ते सर्वसमावेशक हवं याची जाणीव त्यांना होती. शिवाय त्यांच्या आघाडीत असे अनेक पक्ष होते, ज्यांना संघविचार मान्य नव्हता. साहजिकच सरकारची जी प्रमुख म्हणता येईल अशी आर्थिक, संरक्षण, परराष्ट्र, औद्योगिक धोरणं ही पूर्वापार जशी चालत आली, तशीच राहिली. राममंदिर बाजूला राहिलं, समझौता एक्सप्रेस सुरू झाली. संसदेवर हल्ला झाला तरी चर्चा सुरू राहिल्या. ‘कश्मिरियत’नं नवं पर्व सुरू झालं, तर १८० प्रवाशांच्या बदल्यात ५ अतिरेकी सोडल्यावर कुणी त्यांना ‘राष्ट्रद्रोही’ म्हटलं नाही.
या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांतलं मोदी-शहा यांचं सरकार व पक्षातला कारभार पाहिला आणि आता निवडणुकांचा शेवटचा टप्पा येईपर्यंत ज्या पद्धतीनं माध्यमं व निवडणूक आयोगाचा स्पष्ट पक्षपात पाहता व जोडीला सर्वच राजकीय पक्षांनी खाली नेऊन ठेवलेली प्रचाराची पातळी हे सर्व लोकशाहीवादी, विवेकी, सभ्य नागरिकाला सचिंत करणारं आहे. ७० वर्षांत प्रथमच निवडणूक पालिकेची असू दे की लोकसभेची, ती देशप्रेमी विरुद्ध देशद्रोही, अशी करण्यासाठी सत्ताधारी पक्षानं आक्रमक, हिंसक व मनभेद रणनीतीचा चलाख व तांत्रिक वापर केला. सत्य व असत्य यातली सीमारेषा पुसून आम्ही म्हणू तेच सत्य, आम्ही म्हणू तोच राष्ट्रप्रेमी, आम्ही सांगू तोच कायदा, असं वातावरण गेल्या पाच वर्षांत उभं राहिलं.
साधारणत: सत्ताधारी पक्षाविषयीचं प्रेम, जसजसा कार्यकाळ सरत जातो, तसतशी नाराजी वाढत जाते. कारण एका वेगळ्या व अधिक अपेक्षेनं सत्ता बदल केलेल्या जनतेला राज्यकारभारातही रात्रीत बदल व्हावा असं वाटायला लागतं. प्रत्यक्ष सत्ता राबवताना ते सोपं नसतं, त्यामुळे कुठल्याही सत्ताधाऱ्याला सत्ता टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मोदी सरकारनं ही तारच कापून टाकली. त्यांनी टीका, विश्लेषण, वस्तुस्थिती हद्दपार करून टाकल्या. सरकारविरोधात ब्र उच्चारला, लिहिला जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. त्यातूनही कुणी तो नोंदवला तर समाजमाध्यमातून हिंसक झुंडींना प्रोत्साहित करून विरोधकाला सदेह वैकुंठाला पाठवायची व्यवस्था केली. यातून सामाजिक तणाव, भीती व दहशतीचं वातावरण उभं राहिलं. अशा वातावरणाची पहिली झळ कला व सांस्कृतिक जगाला बसते. कारण या दोन्ही क्षेत्रांत विद्रोहाची, नवनिर्माणाची, आक्रोश, असंतोषाची, संवेदनेची बीजं रोवली जातात. कला परंपरावादी असते, पण ती परंपरेला प्रश्न करत, त्यात बदल करत नवी परंपरा तयार करत असते. नवा विचार, नवे शोध, नवी जीवनशैली याचाच परिपाक असतात.
परंपरावादी हे नेहमी संधिसाधू असतात. ते कायम परंपरेचा झेंडा खांद्यावर घेऊन स्थितीवादाचा पुकारा करतात. मात्र सुधारकांनी विचारांच्या, आंदोलनाच्या, कायद्याच्या रेट्यानं बदल घडवून आणला की, सर्वांत आधी त्याचे ‘लाभार्थी’ परंपरावादी असतात!
सतीप्रथा विरोध, बालविवाह बंदी, केशवपन बंदी, स्त्रीशिक्षण अधिकार, अस्पृश्यता निर्मूलन, अस्पृश्यांना मताधिकारासह विशेष संधी म्हणून आरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान बदल, चंद्र-मंगळावर स्वारी, आहार, आचार, विचार पोशाखातील बदल, लग्न-कुटुंब संस्था, लैंगिक अधिकार अशा गोष्टींसाठी कुणी व काय प्रकारचे लढे लढले, कायदे करायला लावले, याचा इतिहास उपलब्ध आहे.
पण परंपरावाद्यांचा निर्लज्जपणा असा की, हे बदल कालसुसंगत म्हणून आम्हीच केले असं सांगत ते मिरवतात आणि पुन्हा सनातन परंपरेचा पुरस्कार करत नवसर्जन, विचाराला विरोध करतात.
आजवरचा कला, साहित्य, संस्कृतीचा प्रवास असं दाखवतो की, तो कायम नवतेचा पुरस्कर्ता राहिला. ज्ञानेश्वर, तुकारामापासून सफदर हाश्मी, गौरी लंकेश असा प्रवास पाहिला तर लक्षात येईल. रुढार्थानं ज्याला डावे म्हणतात, अशा विचारांचा पगडा, पुरस्कार अथवा सहप्रवास साधारणत: कला, साहित्य, संस्कृती करते. याला समांतर उजव्या विचारांच्या कला, साहित्य, संस्कृतीचा प्रवास अखंड असतोच. पण तो स्थितीवादी, परंपरावादी असल्यानं त्याचं आकर्षण वगैरे वाटत नाही. उलट तो रूढींचा भाग होतो. उदा. द्यायचं झालं तर अगदी नव्या जगातला कुणी साहित्यिक ‘श्री’ लिहून लेखन सुरू करतो किंवा व्यवस्थेवर आघात करणाऱ्या समांतर नाटकाचा पडदा उघडण्याआधी नटराज पूजन होऊ शकतं! इथं डाव्यांचा समंजसपणा तर उजव्यांचा संधिसाधूपणा अधोरेखित होतो.
आपल्या स्थितीवादी, परंपरावादी विचारांमुळे आजवर हा उजवा विचार बोलका नव्हता, कारण त्यांना स्वत:लाच आपण परंपरेचे पाईक असल्यानं नव्या काळाशी जुळवून घेणं कठीण आहे, हे कळतं. ते मुळं पकडून बसल्यानं एकाच जागी रुतून बसतात. झाडाचे तीन भाग पडतात. मूळ, खोड व फांद्या. मुळं जमिनीत खोल पसरत जात घट्ट होतात. खोड एका वाढीनंतर थांबतं. मात्र फांद्या विस्तारत जातात. त्यांचा रोख, वावर मुक्तावकाशात असतो. परंपरावादी मूळ व खोडासारखे असतात, तर नवे विचार फांद्यांसारखे मोकळ्या अवकाशात विस्तारत जाणारे.
१९६०नंतर आपल्या साहित्य, कला, सांस्कृतिक जगात जे बदल झाले, ते जागतिक स्तरावर झालेल्या बदलाला समांतर झाले. यातून साठोत्तरी, दलित, ग्रामीण, आदिवासी, भटके, स्त्रीवादी साहित्य, प्रायोगिक नाटक, सिनेमा, कुटुंब, लग्नसंस्थेतले बदल, ते आताच्या स्त्री-पुरुषसह अन्य लिंग अस्तित्वास सहमती, समलिंगी लैंगिकता, सरोगसी ते सिंगल पेरेंटिंग (स्त्री-पुरुष) असा प्रवास झाला.
या प्रवासात असे अनेक लोक होते, जे साहित्य, कला, सांस्कृतिक जगतात कार्यरत होते, आहेत. ज्यांनी हे बदल काळानुरूप किंवा व्यवसाय म्हणून मान्य केले. त्यांनी त्याचा कधीच मनापासून स्वीकार केला नव्हता, पण विविध कारणांनी हातचं राखून तो अमलात आणला. आपल्यावर प्रतिगामी, वैचारिक मागास असा शिक्का बसेल, या सार्वजनिक भीतीपोटी व पोट भरता येतेय ना या अप्पलपोटेपणापायी त्यांनी त्यास जाहीर विरोध न करता तो कुजबूज स्वरूपात अथवा जाणवणार नाही, अशा पद्धतीनं चलाख पंक्तिप्रपंच मांडण्याचा उद्योग सुरू ठेवला. रूढार्थानं डावे मात्र उच्चरवात झेंडा फडकवत हल्ले परतवत राहिले. घाशीराम, सखाराम, गिधाडे, दलित साहित्य, कम्युनिस्ट विचार यासाठी झगडत राहिले.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4813/Hindu-Dharmache-shaiv-rahasya
.............................................................................................................................................
२०१४च्या मोदी-शहा राजवटीत मात्र या पांढरपेशी (सर्वार्थानं) सशाच्या काळजाच्या जागी कोल्ह्या-लांडग्यांच्या काळजाचं रोपण करण्यात आलं आणि अचानक कोल्हेकुई वाढली. हिंस्त्र लांडग्यांच्या फौजी निघाल्या. त्यांचा सनातन सल हा दलित आरक्षण, मुस्लीम (तथाकथित) लांगूलचालन हा होता. त्यावर ते उघड भाष्य करू लागले. पाठोपाठ गांधी-नेहरूंनी पर्यायानं काँग्रेसनं रुजवलेला सर्वधर्मसमभाव, समाजवादी अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय, गंगाजमनी तहजीब हे एक एक करून उदध्वस्त करायच्या मागे लागले. मग याचे प्रतिबिंब आयआयटी, जेएनयू, बीएचयू, एफटीआय, चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कार, पद्म पुरस्कार यांवर पडू लागले.
आणीबाणीत जसं विनोबा भावेंनी तिला ‘अनुशासन पर्व’ असं नाव दिलं, तसं मोदी-शहांच्या या आक्रमक उजव्या विचाराला, एकाधिकारशाहीला, सामदामदंडभेद नीतीला, कृतक राष्ट्रवादाला शिस्त, राष्ट्रप्रेम, बहुसंख्याकांचा आदर, संस्कृतीचं पुनरुज्जीवन, आहारावर बहुसंख्याकांचा वरचष्मा, विचारांवर सनातन्यांचा हातोडा असं घडत गेलं आणि देशाच्या इतिहासात प्रथमच अशा विचारांना विरोध करणाऱ्या तीन-चारशे लोकांच्या विरोधात नऊशेंची फौज उभी करण्यात आली! इतक्या स्पष्ट, थेट व राजकीय निर्णय म्हणून उजव्या विचारांची पाठराखण आजवरच्या निवडणुकांत प्रथमच करण्यात आली.
याबद्दल प्रथम या सर्वांचं अभिनंदन करायला हवं की, आपण हुकूमशाही प्रवृत्तीला, एकधर्मीय आक्रमकतेला, पर्यायानं सांविधानिक एकतानतेला विरोध करतोय हे लक्षात येऊनही ते समर्थन करताहेत. याचा अर्थ त्यांच्या मनात दुविधा, संभ्रम नाही, तर सुस्पष्टता आहे. त्यामुळे आता कुजबूज माजघरातून पदराआडून दिवाणखाण्यात आली हे बरं झालं!
आता थेट मुकाबला करायला मजा येईल. परवा एका ज्येष्ठ कलाकाराची माध्यमात उडालेली त्रेधातिरपीट दृक-श्राव्य पद्धतीनं पाहिली, तशीच प्रख्यात नाटककाराचं वर्तमानपत्री स्वगतही वाचता आलं! म्हणे संवाद करा, चर्चा करा! ते करणारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश वैकुंठास कुणी पाठवले? पुरस्कारवापसीवाल्यांची निंदा केलीत, मग पुन्हा त्यांना पोलीस पहाऱ्यात कैद का केलंय? अर्बन नक्षल म्हणून खटले पुढे का जात नाहीत? भीमा कोरेगाव, एल्गार परिषदवाल्यांनी मोदींच्या हत्येचा कट रचला असं सांगितलंत, पण आता प्रचारात मोदी म्हणतात ‘काँग्रेसवाले माझी हत्या करू इच्छितात!’ नयनतारा सहगल प्रकरण चर्चेचं की संवादाचं माध्यम होतं? या नाटककाराला माहीत नसावं नथुराम नाटकावर राज्यात व केंद्रात असलेल्या भाजप मित्रपक्षांच्या सरकारांनी बंदी घातली होती. आता ती मुस्कटदाबी न म्हणता शिस्तपालन म्हणायचं असेल तर प्रश्नच मिटला!
आता या ९००+ जणांना थेट आव्हान आहे. सांगा कुठे भेटायचं? कुठे लेखाजोखा मांडायचा? राज ठाकरेंच्या व्हिडिओनंतरही उरलीसुरली लाज, खोटारडेपणा, दांभिकपणा उघड करून घ्यायची इच्छा असेल तर जरूर या. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, आम्ही विचार, प्रवृत्तीला विरोध केलाय. तुम्ही थेट व्यक्ती व राजकीय पक्षाचं समर्थन करताहात. सत्तेच्या राजकारणात मुरलेल्या पक्षाची अशी उघड पाठराखण तुमच्याच साहित्य, कला, सांस्कृतिक कलाविष्काराचा गळा घोटू शकते. तेव्हा मग मदतीची याचना करू नका!
...............................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment