प्रचार नव्हे, उन्माद आणि आकांडतांडवही!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि शरद पवार
  • Sat , 11 May 2019
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi शरद पवार Sharad Pawar काँग्रेस Congress भाजप BJP चौकीदार चोर है Chowkidar Chor Hai

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानं गाठलेली पातळी बघताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले नेते आणखी खाली उतरणार याबद्दल व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे. आपल्या देशात आजवर झालेल्या सर्वच निवडणुकातली ‘उन्मादी आरोप-प्रत्यारोपाची, असभ्य व लाज आणणारी’ पातळी गाठणारी, अशी २०१९च्या लोकसभा निवडणुकीची नोंद होणार, याबद्दल आता कोणतीही शंका विवेकी जनांच्या मनात उरलेली नाही.

निवडणुका म्हटलं की, आक्षेप घेतले जाणार, विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप होणार आणि सत्ताधारी त्या आरोपांचं खंडन करणार, हे ओघानं आलंच. पण या निवडणुकीत जे काही प्रचाराच्या नावानं घडत आहे, ते अपप्रचाराच्याही सीमा ओलांडणारं आहे. आपल्या राजकीय नेत्यांत शिष्टाचाराची किमान चाड व सुसंस्कृतपणा नावालाही शिल्लक उरलेला नाही, याची खात्री पटवून देणारं सध्याचं चित्र आहे.

प्रचाराची खालची जी पातळी विरोधकांनी गाठली, त्यापेक्षा दहा पट खालच्या पातळीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते उतरले आहेत. आणि म्हणे हा साधन-सुचिता जपणारा पक्ष आहे! दोन्ही बाजूंच्या समर्थक/भक्तांकडून त्यांच्या नेते आणि पक्षाच्या या प्रचाराचं अत्यंत चुकीचे दाखले देत हिरिरीनं केलं जाणारं समर्थन, तसंच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना प्रतिस्पर्ध्याऐवजी एकमेकाचे हाडवैरी समजताहेत, हे काही आपली लोकशाही दिवसेदिवस सुदृढ होत असल्याचं लक्षण मुळीच नाही.

अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते हे खरं असलं तरी, जेव्हा अध:पतन व्यक्तीगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं, तेव्हा कुणीही विवेकी आणि संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो, पण यापेक्षाही जास्त गंभीर असतं ते येणार्‍या/नवीन पिढीच्या मनात त्याविषयी निर्माण होणारी घृणा. मतदानाच्या न वाढणार्‍या टक्केवारीला हेही एक कारण असावं, असं किमान माझं तरी मत आहे.

निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदांनापासून जर दूर राहिला तर त्यांना दोष देणार तरी कसा? याच मानसिकतेतून जर ‘नोटा’ (None of the above)ची चळवळ जोर पकडत असेल तर ती उभारणार्‍यांवर टीका करता येणार नाही.     

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4808/Surely-Your-Joking-Mr-Feynman

.............................................................................................................................................

खुनी, तू चोर-तुझा बाप चोर, दरवडेखोर, जल्लाद, मांड्या-चड्ड्या, महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग, अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पोलिसांचा आणि जवानांच्या हुतात्म्यांची खिल्ली व अक्षम्य अवमान, झालेला अतिरेकी हल्ला सरकारनेच घडवून आणल्याचे दावे... अशी किती उदाहरणं द्यायची? सत्ताधार्‍यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला असा दावा करणार्‍या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळले आहेत?

नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीला कुणबी व कोष्टी विरुद्ध ब्राह्मण, शिरुर मतदार संघात मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे आणि त्याआधारे मत मागणारे ‘सेक्युलर’ कसे? यज्ञ आणि आणि धार्मिक विधी जाहीरपणे करणारे ‘वाचाळेश्वर’ दिग्विजयसिंह यांच्यामुळे अब्रू गेली ती काँग्रेसची!

भाजपनं साध्वीला उमेदवारी दिली म्हणून टीका करणार्‍या काँग्रेसनं रत्नागिरीत ‘सनातन’च्या समर्थकाला उभं करण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला ‘पप्पू’ म्हणणं जितकं अशोभनीय व अवमानकारक आहे, त्यापेक्षा जास्त अशोभनीय व अवमानकारक देशाच्या पंतप्रधानांना ‘फेकू’ आणि ‘चोर’ म्हणणं आहे. कमरेचं गुंडाळून ठेवून ही अशी पातळी गाठल्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची लायकी जगाला नक्कीच समजली असेल आणि त्यांची नव्हे तर आपल्या देशाची जगभर नाचक्की झाली असणार!

केवळ आमची टीका योग्य आणि विरोधक उठवळ हा समज तर निर्भेसळ ढोंगीपणा आणि आत्मप्रतारणा करणारा आहे. त्यांनी बोफोर्स काढलं म्हणून यांनी राफेलचे ढोल बडवायचे आणि न्यायालयानं ‘चौकीदार चोर आहे’ या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा करून मग न्यायालयाची माफी मागायची, तसंच त्याच्या माजी पंतप्रधान पित्यानं हवापालटासाठी कुठे आणि ‘कशी’ सहल केली होती, याची उजळणी करणं, हे दोन्ही प्रकार केवळ निंदनीयच नाही तर हिडीसही आहेत!

या संदर्भात निवृत्त व्हाइस अॅडमिरल विनोद पसरिचा आणि निवृत्त नौदल प्रमुख रामदास यांनी दिलेली माहिती वाचल्यावर नरेंद्र मोदी किती खुजे आहेत, हे वेगळं सांगायची गरज राहत नाही. म्हणूनच त्यांचा उल्लेख ‘इंडियाज डिव्हायडर-इन-चीफ’ (भारतात दुफळी निर्माण करणारा नेता) असा उल्लेख जागतिक किर्तीच्या ‘टाईम’ या नियतकालिकानं ताज्या अंकात  केला असावा!  

अनेक नामवंत विधिज्ञांची फौज दिमतीला असतानाही न्यायालयानं ‘चौकीदारा’ला ‘चोर’ म्हटलेलं नाहीये, हे कुणालाच समजू नये, हे जसं बौद्धिक दारिद्रय आहे, तसंच काही काँग्रेस पक्षाचेच नेतेच राहुल गांधी यांना अडचणीत आणू इच्छितात का, हे शोधण्याची गरज निर्माण करणारं आहे. त्यामुळे तोंडघशी पडले ते राहुल गांधी आणि कोलित मिळालं भाजपच्या हाती. दिलगिरी की क्षमा की बिनशर्त क्षमा, हा घातला गेलेला घोळ मुळीच भूषणावह नव्हता. या प्रकरणात आततायीपणा आणि बुद्धी कुशाग्रतेचा अहं भोवला. आधीच न्यायालयाची क्षमायाचना केली गेली असती तर राहुल गांधी यांचं नेतृत्व उजळून निघालं असतं.

याचा अर्थ न्यायालयानं (सुमारे पंचवीस वर्षांनी) बोफोर्स प्रकरणात मुक्त केल्यावरही राजीव गांधी यांना ‘चोर’ म्हणण्यात सभ्य आणि सुसंस्कृतपणाचा किंचितही अंश नाही. तो एक बुद्धिभ्रम आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. असं म्हणणारे नेते देशाची मान उंचावूच शकत नाहीत. राहुल गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाबाबतची बकवासही उन्मादाचंच प्रतीक आहे. अशा याचिका एक तर प्रसिद्धीसाठी केल्या जातात किंवा त्या ‘करायला’ कशा लावल्या जातात हे उघड गुपित आहे. अशा याचिका करणाऱ्यांना न्यायालयानं जबर दंड ठोठवायला हवाच, शिवाय जाहीर फटक्यांची शिक्षा करायला हवी. त्याशिवाय अशा थिल्लर प्रकारांना आळा बसणार नाही. (हे कडवटपणे लिहिलंय, फटके मारण्याची शिक्षा देण्याची तरतूद आपल्याकडे नाही, हे प्रस्तुत पत्रकारला माहिती आहे, तरी...)         

मतदान यंत्रे मॅनेज केली जाऊ शकतात या दाव्यातील राजकीय स्वार्थ एव्हाना पुरेसा स्पष्ट झालेला आहे. विजय मिळाला तर तो लोकशाहीचा, आपल्या पक्ष आणि नेत्याच्या लोकप्रियतेचा आणि पराजय  झाला तर तो मतदान यंत्रे मॅनेज केल्यामुळे, ही सर्वपक्षीय राजकीय चिखलफेक आणि आकाडतांडव करणारे काही ‘व्रती’ राजकारणी गेल्या काही निवडणुकांपासून वाढले आहेत. २०१४ पूर्वी त्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता; आता काँग्रेस, राष्ट्रवादी, तेलगू देसम, नॅशनल कॉन्फरन्स आदी वीसपेक्षा जास्त पक्षांचे नेतेही त्या व्रतात सहभागी झालेले आहेत.

२००४च्या निवडणुकीत पराभव झाल्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले बनवारीलाल पुरोहित यांनी (तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती!) मतदान यंत्रे मॅनेज होत असल्याचा आरोप करून केलेली आदळआपट आणि केलेली न्यायालयीन लढाई किमान पत्रकार तरी विसरलेले नाहीत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला बंपर विजय मिळाल्यावर ते सर्व दावे सोयीस्करपणे विसरून तेच बनवारीलाल पुरोहित राज्यपालपदाच्या खुर्चीत विराजमान झाले आणि मतदान यंत्र मॅनेज होत असल्याचा आरोप त्यांनी रेशीम बागेतल्या बासनात गुंडाळून ठेवला, हे या राजकीय आकाडतांडवाचं वर्तमान आहे, हे विसरता येणार नाही.    

या मालिकेतले ‘नवे व्रतधारी’ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि तेलगू देशमचे चंद्राबाबू नायडू यांना तर मतदान यंत्रं मॅनेज होतात, याची दिवसाढवळ्या स्वप्नं पडू लागली असल्यासारखी स्थिती आहे. मोगलांच्या सेनेला पाण्यात तसंच स्वप्नातसुद्धा संताजी आणि धनाजी दिसत, असं जे म्हटलं जातं, तसं सध्या शरद पवार यांचं मतदान यंत्राच्या बाबतीत झालेलं आहे.

ज्येष्ठतम नेते शरद पवार हे जसे बहुपेडी अतुलनीय कुशल आणि दूरदृष्टीचे नेते व प्रशासक आहेत तसंच ते राजकरणी म्हणून ‘शहनशाह-ए-संभ्रम’ आहेतच म्हणा! कविवर्य ग्रेस आणि शरद पवार यांच्यात या बाबतीत साम्य आहे. कविता लिहून ग्रेस मोकळे होत. त्या कवितेच्या अर्थ तसंच प्रतिमांबाबत वाचक, समीक्षक काथ्याकूट करत (अजूनही करतात!), त्यांच्यात घनघोर चर्चा, वाद-प्रतिवाद रंगत आणि इकडे कवीवर्य ग्रेस मात्र मौन पाळत तो सर्व गलबला मस्त एन्जॉय कसे करत असत, याचा प्रस्तुत पत्रकार साक्षीदार आहे. अगदी तसंच ज्येष्ठतम नेते शरद पवार यांचं आहे. शरद पवार सोडून त्यांच्या राजकीय वक्तव्याच्या अर्थ व पडसादांची पतंगबाजी कायमच त्यांच्या भक्तात आणि विशेषत: माध्यमांत सुरू असते!

राष्ट्रवादीचे नांदेड येथील तत्कालिन नेते डॉ. माधव किन्हाळकर यांनी या संदर्भात दिल्लीपर्यन्त जाऊन जो न्यायालयीन लढा उभारला, तेव्हा त्यांना बळ पुरवण्याची किमानही तसदी शरद पवार यांनी घेतली नाही, उलट डॉ. किन्हाळकर यांची इतकी उपेक्षा केली की, शेवटी ते पक्ष सोडून गेले. ही यंत्रे मॅनेज करून दाखवावीत हे देशाच्या निवडणूक आयोगानं दिलेलं आव्हानही शरद पवार यांनी स्वीकारून निवडणूक आयोगाला तोंडघशी पाडणं टाळलं. आता मतदान यंत्रं मॅनेज होत असल्याची जाग शरद पवार यांना येण्यामागे कोणत्या भीतीचं सावट दाटून आलेलं आहे, हे उभा आणि आडवाही महाराष्ट्र चांगला जाणून आहे! 

निवडणूक म्हटल्यावर कुणाचा तरी जय आणि कुणाचा तरी पराजय होणारच. २०१९ची लोकसभा निवडणूक मात्र जय-पराजयापेक्षा घसरलेल्या उन्मादी प्रचारासाठी आणि नेत्यांच्या उन्माद, असुसंस्कृतपणा आणि वाचाळपणासाठी लक्षात राहील...   

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......