‘स्टुडंट ऑफ द इयर २’ : कलाकारांची कामगिरी, गाणी इत्यादी बाबीही अगदीच सुमार दर्जाच्या!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ची पोस्टर्स
  • Sat , 11 May 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie स्टुडंट ऑफ द इयर २ Student of the Year 2 टायगर श्रॉफ Tiger Shroff करण जोहर Karan Johar

तार्किकतेला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटात स्थान नाही. अविश्वासाचा त्याग करत चित्रपटात दाखवलेले महाविद्यालयातील विद्यार्थी पंचविशी-तिशीपार केलेले (वयानं) प्रौढ लोक नाहीत, असं मानून चालायचं. ते शिक्षण घेत असले तरी प्रत्यक्ष पुस्तक आणि वर्गापासून कोसो दूर आहेत, याकडेही कानाडोळा करायचा. चित्रपटात कथेच्या आणि कथेला पुढे नेणाऱ्या दृश्यांच्या नावाखाली नव्या-जुन्या चित्रपटातील गोष्टींचा समावेश करत प्रेक्षकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, हेही विसरायचं. थोडक्यात काय तर सदर चित्रपटकर्त्यांनी सर्वच पातळ्यांवर उभारलेला पोकळ मामला मुळात पोकळ नाहीच अशी समजूत करून घ्यायची.

अर्थात अशा तऱ्हेच्या चित्रपटाला आदिभौतिक बौद्धिकतेवर आधारित असलेले प्रश्न विचारणं चित्रपटापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याच्या दृष्टीनं अपमानकारक ठरणारं आहे. बॉलिवुडच्या मुख्य धारेतील चित्रपट अतर्क्य आणि उथळ असणं एकवेळ चालणारं असलं तरी त्यांनी किमान मनोरंजक असायला हरकत नाही. इथं कलाकारांची कामगिरी, गाणी इत्यादी बाबीही अगदीच सुमार दर्जाच्या असल्यानं चित्रपट धड मनोरंजकही ठरत नाही.

‘स्टुडंट ऑफ द इयर २’ला ढोबळमानानं स्वतःचं असं कथानक आहे असं म्हणणं अति-सौम्य असेल. कारण असलेलं कथानक थोड्याफार फरकानं पहिल्या चित्रपटाच्या, ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या (२०१२) साच्यातून आलेलं आहे. त्यातही मुळातच पहिला चित्रपटच महाविद्यालयीन जीवनाचं चित्रण करणाऱ्या निर्माता करण जोहरचे जुने चित्रपट आणि मन्सूर खानचा ‘जो जीता वही सिकंदर’ (१९९२) यांच्या मिश्रणातून निर्माण झाला होता. त्यामुळे या चित्रपटात कथानकात अस्सलपणाचा अंश न्यूनतम असणं साहजिक आहे. अर्थात चित्रपटाच्या बाजूनं बोलताना ‘प्रत्येक चित्रपटानं कथानकाच्या पातळीवर नवीन काहीतरी देऊ करणं गरजेचं नाही’, असा युक्तिवाद नक्कीच करता येऊ शकतो. पण म्हणून तो रंजकही ठरत नाही, या तथ्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

रोहन (टायगर श्रॉफ) हा पिशोरीलाल चमनदास कॉलेजचा विद्यार्थी. सेंट टेरेसा नामक कॉलेजमध्ये प्रवेश घेणं हे त्याचं स्वप्न असतं. अर्थात हे स्वप्न शैक्षणिक प्रगती किंवा महत्त्वाकांक्षेपेक्षा त्याची तथाकथित प्रेयसी (जी कथानकाच्या हिशोबानं त्याला मुळीच घास टाकत नाही, मात्र संवादांच्या हिशोबानं त्याच्यावर अतोनात प्रेम करते.) मृदुला (तारा सुतारिया) ज्या ठिकाणी शिकते (खिक!) तिथं प्रवेश मिळवणं या इच्छेतून आलेलं. तो कबड्डी खेळत असला तरी ती खेळताना जिम्नॅस्टिक्सच्या कौशल्याचं प्रदर्शन करणाऱ्या रोहनला स्कॉलरशिपमुळे सेंट टेरेसामध्ये प्रवेश मिळतो. पुढचं प्रकरण कुणाच्याही सहज लक्षात येईलसं आहे.

सेंट टेरेसामध्ये शिकणारी (पुनश्च खिक!! कारण इथं शिक्षण सोडून सर्व घडतं!!!) अतिउच्चवर्गातून आलेली भावंडं- श्रेया (अनन्या पांडे) आणि मानव रंधावा (आदित्य सील) अगदीच रटाळ, स्टीरिओटिपिकल पात्रं म्हणून समोर येतात. हे दोघं ‘बडे बाप की बिग़डी औलाद’ या पुरातन हिंदी चित्रपटांतील अनिवार्य असलेल्या शब्दांचं मूर्त स्वरूप म्हणावी लागतील! या दोघांनीही रोहनशी वैर पत्करणं आणि कालांतरानं रोहननं श्रेयाप्रती सहानुभूती दाखवल्यानं तिने त्याच्याकडे आकर्षित होणं अपरिहार्य होतं. नंतरचा आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेच्या नावाखाली कथेत येणारा तथाकथित संघर्षही रोमांचक नक्कीच नाही.

‘स्टुडंट ऑफ द इयर २’ म्हणजे बॉलिवुडी क्लिशेंचं सर्वोच्च शिखर आहे. मध्यवर्ती पात्रांचं पारंपरिक आणि रटाळ मार्गांवरून वाटचाल करणं ही अगदीच न्यूनतम बाब आहे. कारण यातील महाविद्यालयीन चित्रपटांत जणू अनिवार्य असणारं शीख व्यक्तीचं पात्र, लैंगिक पातळीवर कायम उत्तेजित असणाऱ्या स्त्रिया आणि शिक्षिका, मूर्ख प्राचार्य, विनोद्युत्पत्तीपुरती मर्यादित असणारी उथळ समलैंगिक पात्रं, अशी सुमार पात्रांची यादी न संपणारी आहे.

अर्शद सईदचं लेखन आणि पुनीत मल्होत्राचं दिग्दर्शन यांत जणू सर्वाधिक वाईट कोण ठरेल याची स्पर्धाच लागलेली असावी. सईद त्याच्या रटाळ कथेला विनोदाचे क्षीण प्रयत्न करणाऱ्या संवादांची जोड देतो, मात्र तेही त्याला झेपत नाही. श्रॉफच्या ‘अ फ्लाईंग जट’ आणि ‘हिरोपंती’चे संदर्भ देत सेल्फ रेफरन्शियल विनोदाचे सुमार प्रयत्न होत राहतात.

‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या पहिल्या भागत किमान बऱ्यापैकी बरी गाणी त्याच्या रंजनमूल्यात भर घालत होती. इथं मात्र आधीच्या चित्रपटाच्या यशावर आणि जुन्या गाण्यांच्या रिमिक्सवर भर दिला जातो. ‘इश्कवाला लव्ह’ इथं ‘स्कूलवाला लव्ह’ बनतं, श्रॉफ छतावरून उड्या मारत पार्कोर करताना ‘कुक्कड’ पार्श्वभूमीवर वाजू लागतं. वीसेक मिनिटांत किमान चारेक गाणी नक्कीच वाजतात. नंतर किशोर कुमारच्या ‘ये जवानी हैं दीवानी’चं श्राद्ध घातलं जातं. या सगळ्यामुळे चित्रपटाच्या रंजनमूल्यात नसली तरी त्याच्या लांबीत जरूर भर पडते! सलीम-सुलेमानचा स्कोअर कुठल्याच अर्थानं चित्रपटास पूरक नाही.

पाच वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला टायगर (आर्थिक यश मिळत असलं तरी) अजूनही अभिनयाच्या पातळीवर भावनाशून्य चेहऱ्यानं वावरत सुमार दर्जाची कामगिरी करत असल्यानं स्थिरस्थावर झालेला नाही. परिणामी अनन्या पांडे आणि तारा सुतारियासोबत तोही अजून पदार्पण करतोय की काय असंच वाटतं.

चित्रपटातील विस्तृत भागाची निर्मिती आणि मांडणी ही मुख्यत्वे बार्बी डॉल-वजा नायिकांकडे दुर्लक्ष करत श्रॉफच्या सिक्स पॅक्सचा समावेश असलेल्या चकाकणाऱ्या शरीरयष्टीच्या चित्रणासाठी केली गेली आहे. नृत्यादि कलेतील त्याच्या कौशल्याबाबत काहीच आक्षेप नसला तरी त्याला अभिनय जमत नाही, हेही तितकंच खरं!

‘स्टुडंट ऑफ द इयर २’ हा जोहरच्या अतर्क्य आणि चकाकणाऱ्या सिनेमॅटिक विश्वाच्या दृष्टीनं विचार केला तरीही अतिशय सुमार ठरतो. बाकी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ या दोन्हींचा उल्लेख एकाच वाक्यात करणं ‘जो जीता…’च्या प्रति अपमानकारक आहे. लेखाचा समारोप करत असताना ही अक्षम्य चूक लागलीच कबूल करणं न्याय्य ठरेल.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख