अजूनकाही
प्रिय ‘प्रधानमंत्री’ नरेंद्र मोदीजी,
सध्या देशात निवडणुकीचा माहौल सुरू आहे. विविध राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. काल-परवा तुम्ही राजीव गांधींवर केलेली टीका ऐकली आणि एक-दोन मिनिटांसाठी सुन्न झालो, पण धक्का बसला नाही. कारण तुम्ही गेल्या चार-पाच वर्षांत सातत्यानं पं. नेहरूंना प्रत्येक गोष्टीसाठी कारणीभूत ठरवत आहात. पं. नेहरूंनंतर इंदिरा गांधींचा नंबर लागायला हवा होता. पण तुम्ही त्यांना सोडून राजीव गांधींवर घसरलात.
मोदीजी, तुम्ही राजीव गांधींवर केलेली टीका अत्यंत हीन, संवेदनाहीन आणि द्वेषानं भरलेली होती. भारतासारख्या देशाच्या एका पंतप्रधानानं एका माजी पंतप्रधानाबद्द्ल असे उदगार काढावेत? माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीचं संसदेतील एक भाषण आहे. ‘विरोधी पक्ष- भारताची जडणघडण’ यावर ते बोलले आहेत त्यात. त्यावरून तुम्हाला समजू शकेल की, भारताची लोकशाही नक्की काय आहे.
तुमच्या त्या टीकेनं जितकं दुःख मला झालं, तितकंच दुःख प्रत्येक नवोदय विद्यालयाच्या मुलाला झालं असेल. किंबहुना माझ्यापेक्षा जास्तच झालं असेल. तुमच्या टीकेचा मला राग आला म्हणून हे पत्र तुम्हाला लिहायचं ठरवलं.
मी एका अत्यंत गरीब घरातून आलेलो आहे. इयत्ता पाचवीनंतर नवोदय विद्यालयाची परीक्षा पास होऊन सहावी ते बारावीपर्यंतचं माझं ‘संपूर्ण मोफत शिक्षण’ नवोदय विद्यालयामधून झालं. नवोदय विद्यालयामध्ये जाणं माझ्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरला!
साधारण १९८०च्या दशकात एकदा राजीव गांधी दक्षिण भारतात गेले होते. तिकडे त्यांना एक मुलगी भेटली. तिनं त्यांना विचारलं की, आम्हाला दिल्ली पब्लिक स्कुल, डून स्कुलसारखं शिक्षण मिळू शकेल का? त्या दौऱ्यावरून परत आल्यावर लगेच राजीव गांधींनी ‘जवाहर नवोदय विद्यालया’ची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवत महाराष्ट्रातील अमरावती इथं पहिलं नवोदय विद्यालय सुरू केलं. त्यानंतर देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय उभं राहिलं.
आजमितीला देशात ५९८ नवोदय विद्यालयं आहेत. एका नवोदय विद्यालयात सरासरी ५०० विद्यार्थी असतात. दरवर्षी ८० विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो एका नवोदय विद्यालयात. त्यात आरक्षणसुद्धा लागू असतंच. बहुतांश मेरिट जवळपास सर्वांचं समान असतं. या विद्यालयामुळे ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतं!
दुसरा मुद्दा आहे आर्थिक प्रभावाचा. एक नवोदय विद्यालय चालवायला प्राचार्य ते शिक्षक असा एकूण ५० जणांचा स्टाफ लागतो. मेसमध्ये काम करणारे, विद्यालयातील शिपाई, सुरक्षा प्रतिनिधी असा सगळा मिळून एका नवोदयाच्या माध्यमातून ८० ते ११० लोकांना रोजगार मिळतो. त्यात व्हाइट कॉलर आणि ब्लू कॉलर जॉब दोन्ही आहेत. याशिवाय नवोदय विद्यालयाला भाजीपाला लागतो, दूध लागते, किराणा माल, विविध स्टेशनरी, मुलांचे कपडे, इस्त्रीवाले, केस कापणारे यांची संख्या पकडली तर रोजगाराची संख्या ८००पर्यंत जाते. देशातल्या प्रत्येक नवोदय विद्यालयाची हीच स्थिती आहे.
दरवर्षी नवोदय विद्यालयाचा निकाल बघितला तर लक्षात येतं की, दहावी-बारावीमध्ये नवोदय विद्यालयाचा टक्का बराच वर असतो. त्यातल्या आयआयटीला प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतला या विद्यार्थ्यांचा टक्काही जास्त आहे. त्यातला कुणालाही विचारलं तर तो सांगेल की, हे सगळं घडलं आहे ते ‘नवोदय’मुळे!
नवोदय विद्यालयामध्ये आजपर्यंत जातीवरून अत्याचार झालेला नाही की, कुणी कुणाला जाती किंवा धर्मावरून काही बोललेलं नाही.
या सगळ्याचं श्रेय निःसंशयपणे जातं ते राजीव गांधींना!
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar
.............................................................................................................................................
तुम्ही एकदा ‘मन की बात’ करत होता. तुम्हाला आसामच्या मुलीनं विचारलं होतं की, दरवर्षी गर्मी का वाढत आहे? तर तुम्ही तिला एकदम कॉमेडी उत्तर दिलं होतं.
अजून एकदा एका विद्यार्थिनीनं डायलेक्सियाबद्दल विचारलं होतं. तर तुम्ही राहुल गांधींवर टीका करत त्या प्रश्नाची गंभीरता घालवली!
जर तुमच्यात थोडी संवेदना असती तर गर्मी वाढत आहे वा ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करण्यासाठी एखादी संस्था उभी केली असती किंवा एखादी शिष्यवृत्ती सुरू केली असती. तीच बाब डायलेक्सियाबाबत. त्या आजाराच्या पेशंटसाठी एखादी स्वतंत्र संस्था उभी करून किंवा अस्तित्वात असलेल्या संस्थेचा विस्तार प्रत्येक जिल्ह्यात केला असता. पण तसं काहीच झालेलं नाही.
मी फक्त ‘नवोदय विद्यालया’बद्दलच बोलतो आहे. राजीव गांधींनी जी आयटीची क्रांती केली किंवा बांधणी केली त्याचं फळ आज मिळत आहे, हे तुम्ही पाहत असालच. आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. आपला देश सेवा क्षेत्रात अग्रेसर आहे. त्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. कारण त्याचे सगळे अहवाल समोर आहेत.
मोदीजी, तुम्ही आता ४० वर्षं राजकारणात आहात. तुम्हाला माहीतच आहे, कोणतंही कंत्राट वशिला किंवा बिना भ्रष्टाचार मिळत नाही, दिलं जात नाही.
राजीव गांधींचं नाव बोफोर्समध्ये आलं असेल, पण तुमचंही नाव राफेलमध्ये आलंच की!
राहुल गांधींना ‘तुझा बाप भ्रष्टाचारी नंबर एक होऊन मेला’ असं म्हणणं कितपत योग्य आहे? भले राजीव गांधींच्या काळात बोफार्स झालं असेल, पण भारतीयांच्या जीवनात त्यांच्यामुळे बदलही घडलाय. त्याबद्दल मात्र तुम्ही काहीच बोलला नाहीत. तुमच्या सत्ताकाळात देशात जेवढा द्वेष पसरवला जातोय, तो राजीव गांधींच्या काळात नव्हता. एवढी मोठी शीख दंगल झाली, पण तरीही असा द्वेष नव्हता. तुमच्या काळात मात्र विरोधक, पत्रकार किंवा अल्पसंख्याक यांच्याविषयी जाणीवपूर्वक द्वेष, तिरस्काराची भावना पसरवली गेली आहे.
राजीव गांधींच्या ‘नवोदय विद्यालया’सारखी एखादी पायाभूत संस्था तुम्ही पाच वर्षांत उभी करू शकलेला नाही, पण आधीच्या नामांकित संस्थांचा मात्र बट्ट्याबोळ कसा होईल, याकडे मात्र जातीनं लक्ष दिलंत.
एक ‘नवोदयन’ म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की, राजीव गांधींवर टीका जरूर करा, पण त्यांनी जे संस्थात्मक काम उभं केलं आहे, त्याच्यासारखं काहीतरी करून दाखवा.
किसी पे किचड उछालना आसान हैं! लेकिन खुद के गिरेबान में झांककर देखोगे तो समझ आता है!
सध्या नवोदय विद्यालयाच्या ९ ते १२वीच्या विद्यार्थ्यांची फी वाढवली आहे. ती कमी करून दाखवा. खूप होईल.
मग लिहीन मीही तुमच्यावर एखादा लेख लिहीन!
कळावे!
एक नवोदयन
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 11 May 2019
आयशप्पत हे काय! आयायटी/आयायेम बनवले म्हणून नेहरूंच्या चुकांची चिकित्साच करायची नाही? अण्णा हजारे, बाबा आमटे इत्यादी सज्जनांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला म्हणून फोर्ड फाउंडेशन वर टीकाच करू नये? त्यांनीच केजरीवालसारख्या बदमाशांनाही हाच पुरस्कार दिला ना? मग राजीव गांधींवर टीका केली तर इतकी का झोंबावी? शेवटी नवोदय शाळांत मेकॉलेछाप शिक्षणच मिळालेलं दिसतंय. काय करणार ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे पदरी चारण, भाट वगैरे स्तुतीपाठक बाळगायचे. हा नवोदयन लेखक असाच काहीसा दिसतोय. -गामा पैलवान