एक होता वामन!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • वामन तावडे. (निधन - ७ मे २०१९) रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 09 May 2019
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar वामन तावडे Vaman Tawade

“हां, हे टायटल मस्तय. एकदम सरळ साधं. तीन शब्दांत सगळं येतंय.”

किंवा मग

“नाय रे फारच सपक, नेहमीचं झालं. असं ‘एक होता’ म्हंजे काय? टायटल मध्येच संपतो विषय. आणि तुझ्याकडून एवढं साधं, सरळ अपेक्षित नाय. हे कुणीही म्हणजे कुणीही लिहू शकतो.”

या दोनपैकी एक किंवा यापेक्षा वेगळं, ज्यात मालवणी शिव्या अचूक जोर देत, पेरत, नंतर हसत वामन बोलत राहिला असता. आवाजासोबत चष्म्याआडचे डोळे, गोल चष्मा, टक्कल, मिशी व जाडसर ओठ व कान यामुळे तो गांधीच वाटायचा. तर आवाजासोबत तो सचित्र किंवा सदेह म्हणू दिसे. वामन. वामन तावडे.

‘कन्स्ट्रक्शन’, ‘पिदी’, ‘मी घोडा हुसेनच्या चित्रातला’, ‘रायाची रापी’ अशा अनेक एकांकिकांसह ‘छिन्न’, ‘इमला’, ‘रज्जू’, ‘चौकोन’ अशी नाटकं वामन तावडेच्या नावावर आहेत. पण आळेकर जसे ‘महानिर्वाण’नं चर्चेत आले व मैलाचे ठरले, तीच गोष्ट ‘छिन्न’ व वामन तावडे याबाबत म्हणता येईल. पण दुर्दैवानं तितकं ते म्हटलं गेलं नाही, अधोरेखित केलं गेलं नाही.

वामन तावडे माझ्यापेक्षा वयानं मोठा, पण आम्ही एकमेकांना ‘अरे-तुरे’चं करत आलो. अशोक राणे, महेंद्र तेरेदेसाई आणि वामन तावडे या त्रिकोणाचा चौकोन करण्याची संधी मला गेली काही वर्षं लाभली. दहा वर्षांच्या आतलाच काळ असेल. पण या १० वर्षांत खूप बोललो, गॉसिप केलं, वाचलं, ऐकलं, पाहिलं, चिडलो, पण पुन्हा पुन्हा भेटत राहिलो.

वामन तावडे हा लेखक माझ्या आयुष्यात आला, तो आमच्या जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अॅप्लाईड आर्टसच्या आंतरवर्गीय एकांकिका स्पर्धेत. आमच्यापेक्षा दोन वर्षं ज्युनिअरच्या मुलांनी ‘कन्स्ट्रक्शन’ ही एकांकिका बसवली होती. (ज्यात काम केलेली स्वाती, पुढे स्वाती सुब्रम्हण्यम म्हणून रंगभूमीवर ख्यातनाम झाली.)

या ग्रुपमध्ये वसंत यादव नावाचा मुलगा होता. तो परळच्या बेस्ट कॉलनीत राहायचा. बेस्ट कला क्रीडा मंडळ तेव्हा फॉर्मात होतं. अरुण शेलार, प्रमोद कोरगावकर, रमेश रणदिवे (पुढे ‘वस्त्रहरण’ मधून यातले अनेक ख्यातकीर्त झाले.) अशी माणसं तिथं होती. त्यांच्या संपर्क किंवा सहवासातून वसंतने ती एकांकिका आणली असावी. शिवाय ती इतरत्र बक्षीस विजेती असल्यानं ती डिट्टो बसवलीही असावी. बांधकाम मजूर, मुकादम, मजुराची बायको असा तो विषय. त्या काळात हे मजूर बरेच तेलुगू, कामाठी असत. (यांचा प्रभाव वामनच्या अनेक नाटक, एकांकिकेत दिसतो.) तेव्हा वसंतने वामन तावडे ‘सॉलिड लेखक’ आहे असं सांगितलं होतं. ही एकांकिका व लेखक कायमस्वरूपी लक्षात राहिले. अशीच दुसरी दोन नावं होती चं. प्र. देशपांडे (त्यांची ‘इतिहास’ ही एकांकिका) आणि विनायक पडवळ!

मी नुकताच लिहू लागलो होतो. सिनिअर्समध्ये रघुवीर कुल, पुरुषोत्तम बेर्डे हे आयडॉल होते. एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं इतर कॉलेजची एकांकिका बघणं हा उत्सूकता कमी व असूयेचा भाग जास्त असे. एकांकिका स्पर्धेत त्या काळी(ही) रुईयाचा माज असायचा. (रुईयाचे ४० तेव्हापासूनचेच!) त्यात स्वयंभू, माजखोर विनय आपटे प्रत्यक्ष रंगमंचावर! सोबत स्वाती टिपणीस (आताची चिटणीस) तेव्हाच ‘इतिहास’ बघितली. पुढे ‘उदध्वस्त धर्मशाळा’ पाहिलं, ‘जुलुस’ही. राजकीय, सामाजिक जाण सोडा, संवेदनाही फारशी नव्हती, तरीही ‘कन्स्ट्रक्शन’, ‘इतिहास’सारख्या एकांकिका सादरीकरणाच्या बडेजावाशिवाय उभ्या राहत. त्या विषयासकट आवडत गेल्या. तोच रस्ता नंतर मीही पकडला.

पण वामन तावडे आणि प्रदीप राणे, रमेश पवार अशी नावं जेव्हा ही एकांकिकांची युद्धं गाजवत वा जिंकत होती, त्या काळात कधीच या लोकांशी साधी ओळखही झाली नाही. रमेश पवारांना लांबूनच पाहिलं. प्रदीपला भेटलो. काम करण्याचा योग येता येता बारगळला. पण तेव्हा प्रदीप या एकांकिका रिंगणाच्या बाहेर होता.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal

.............................................................................................................................................

अशोक राणे, महेंद्र तेरेदेसाई यांच्यामुळे वामन तावडे सदेह आयुष्यात आला, तो थेट एकविसाव्या शतकात! विक्रोळीत राहणारा, स्टँडर्ड अल्कली नामक कंपनीत व्हाईट कॉलर जॉब करणारा… पुढे तो निवृत्त झाला (की निवृत्ती घेतली) आणि ठाण्याला घोडबंदर रोडवर राहायला आला.

त्यावेळी घोडबंदर रोड कॅडबरी जंक्शनपासून पुढे अविकसित पट्टा होता. २००० साली रिक्षावाले वागळे इस्टेटला जायला हाफ रिटर्न दिवसाही मागायचे, तेही तयार झाले तर! वामन ज्या विजय पार्कमध्ये राहायला आला, ते आहे कासारवडवलीत. तेव्ही टीएमटी किंवा एसटी किंवा त्या त्या सोसायटीच्या बसेस असत. गावाला जायचाच प्रकार होता. पण प्रसंगी वैतागत प्रसंगी एन्जॉय करत वामन ते सहन करत असे. आता ६७व्या वर्षी तो गेला, पण आजही तो बस, एसटीनं प्रवास करे. स्वत:च्या मोटारीचा प्रयोग त्यानं करून पाहिला. पण पुढे त्यानं ते सोडून दिलं.

सांगायचा मुद्दा हा की, वामन मला भेटला तेव्हा ‘वामन तावडे नावाचं वादळ’ शांत झालं होतं. मध्ये खूप काळ गेला होता. ‘छिन्न’नंतर वामनचं नाटक खूप काळ आलंच नाही. हा सगळा मधला काळ एकांकिका आणि ‘छिन्न’चं यश वामननं नामदेव ढसाळ टाईप आयुष्य उधळून जगून काढला. दारूच्या अतिसेवनानं वामननं सर्व संकेत तुडवले होते. ना घरात लक्ष, ना कामात, ना कशात. नीचतम पातळी गाठली. ते स्वत: वामनच तुकड्या तुकड्यात सांगायचा. तो पूर्वायुष्य असं तुकड्यातच सांगायचा. मग डोक्यावर हात फिरवत शांत बसायचा. मग स्वत:च हसून शांतता भंग करायचा. तो उघडपणे सांगायचा- “ ‘छिन्न’चं यश माझ्या इतकं डोक्यात गेलं की, यश आणि दारू अशा डबल नशेत २४ तास राहायचो.” त्याच्याच शब्दांत सांगायचं तर ‘‘चेंबूरच्या झोपडपट्टीतून मी थेट अभिजनांच्या पंक्तीत गेलो! स्मिता पाटील, सदाशिव अमरापूरकर, विजय तेंडुलकर अशांच्या सोबतीनं वावरताना बेभान झालो. ते यश मला पचवता नाही आलं, कारण मी जिथून आलो होतो, ते जगच वेगळं होतं. मला झेपलं नाही.”

हा त्याचा दोष, न्यूनगंड म्हणायचा की प्रामाणिकपणा? पण आपल्या मुळाशी जाऊन, आपल्या आयुष्याच्या उधळलेल्या काळाकडे अलिप्तपणे बघून चुकांची कबुली देणं, दारू सोडणं, त्यासाठी उपचार घेणं, मध्ये पुन्हा पिणं आणि नंतर व्यसनमुक्त होत व्यसनमुक्तीसाठी यथाशक्ती काम करणं, एवढ्या सामग्रीवर वामन एखाद्या बेस्टसेलर आत्मकथनाचा धनी झाला असता! त्याला व्यसनमुक्तीवर स्वरचित पोवाडेही गाता आले असते. पण यातलं त्यानं काहीच केलं नाही. त्याला माणसं आपली गरिबी, जातवास्तव, आडवे-तिडवे अनुभव यांचं भांडवल करून, ते विकून पुन्हा तिथंच घुटमळत बसली की, त्याचा संताप होत असे. मग आवाज चढवून “हो, रे कळलं तुझं आयुष्य. आलास ना वर, मग आता पुढे जा. पुन्हा पुन्हा मागे काय येतोस?” असं विचारून शेवटी ‘मायची चूत’ अशी खास मालवणी व मच्छिंद्र कांबळी (फक्त) ज्या वजनानं शिवी द्यायचे, तशी शिवी द्यायचा. अनेकदा आजूबाजूला कोण हे न बघता. मालवणी शिव्यांचं वजन, आरोह-अवरोह, जोर मी मच्छिंद्र कांबळींनंतर वामनकडूनच ऐकले.

वामन इतरांना ‘तिथून बाहेर पडा’ असं सांगत असला तरी स्वत: मात्र फिरून चेंबूर ते ठाणे व्हाया विक्रोळी ही स्टेशनं पुन्हा पुन्हा पालथी घालून यायचा. प्रचंड यश, मग नापिकीचा काळ, नंतरचं उतरतं वय, बदललेलं सांस्कृतिक पर्यावरण यावर वामनच्या प्रतिक्रिया प्रसंगोपात तीव्र, मध्यम अथवा ‘जाऊ दे रे. मरोत ते!’ अशा असत. पण लिखाण या गोष्टीवर त्याचं मनापासून प्रेम होतं. ते एकच काम तो सर्व हरपून करायचा. तो आधीच्या पिढीचा असून संगणक साक्षर होत आजच्या सोशल मीडियातही अॅक्टिव्ह होता. कळफलक दाबताना त्याला लिहिण्याचाच आनंद मिळत असावा.

प्रदीर्घ कालावधीनंतर त्याचं ‘रज्जू’ हे नाटक मंचस्थ झालं. (निर्माते शांताराम शिंदे, दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई) ‘छिन्न’ची पुण्याई घेऊन आलेल्या या नाटकाचं स्वागत फारसं झालं नाही. नंतर ‘चौकोन’ (दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई)ही मंचस्थ झालं. बारबालाच्या जीवनावरचं हे नाटक. नंतर त्याची प्रयोगसंख्या रोडावत गेली. या दोन्ही नाटकांत वामन जुन्याच वाटा नव्यानं तपासताना दिसला. ‘रज्जू’चा आवाका मोठा होता, पण तो त्यालाच तेवढ्या ताकदीनं पेलवला नाही. ‘चौकट’ विषयासकट त्याचं होम पिच होतं. त्याचं शेवटचं नाटक ‘तुम्ही-आम्ही’ हे त्याच्या नेहमीच्या पठडीबाहेरचं होतं. पण ते इतकं शब्दबंबाळ झालं की, सांगायचा मुद्दा त्यात हरवून गेला (निर्माता विलास देशपांडे, दिग्दर्शक अनिल गवस) याशिवाय वामननं आयन रँडच्या कादंबरीवर एक नाटक लिहिलंय, राजन गवसांच्या कथेवर एक, अशी अनेक नाटकं त्यानं गेल्या काही वर्षांत लिहिली, ती महाराष्ट्रभर काही हौशी संस्थांनी केली. काहींची त्यानं ठिकठिकाणी वाचनं केली.

गेल्या सात-आठ वर्षांतला वामन मला एखाद्या बेटावरचा एकांडा कोळी (Oldman and Sea) वाटायचा. आजूबाजूला काय घडतंय यावर त्याची नजर होती, तो व्यक्तही व्हायचा, पण लिहायचा पूर्णत: वेगळंच. अलीकडच्या त्याच्या लेखनात संदर्भ फार असत. जे कृष्णमूर्ती, ओशो, बुद्ध, आंबेडकर, गांधी, सिमॉन द बुव्हा असे अनेक. त्याबद्दल त्याला टोकलं की, किंचित चिडून म्हणायचा ‘अरे मा…द तू-मी वाचलंय रे, पण हे पोहचलंय कुठे? हे पोहचलं पाहिजे.’

वामन हा एखाद्या तुळतुळीत गोट्यासारखा होता. तो ना डावा होता, ना उजवा, ना आस्तिक, ना नास्तिक. तो सगळं होता आणि काहीच नव्हता. म्हणजे एरव्ही तो जातव्यवस्था, भावकी वगैरेवर बोलायचा, पण मुलीचा आंतरजातीय विवाह ठरला, तेव्हा त्यानं भावकीही नीट सांभाळली. वधूपिता म्हणून सर्व गोष्टी केल्या. नातीचा पहिला वाढदिवसही ‘अरे, ते आता करायला पाहिजे ना यार’ म्हणत तो अशा गोष्टी त्या त्या दायऱ्यात करी.

प्रेमानंद गज्वींच्या ‘बोधी’ उपक्रमात तो पहिल्यापासून सक्रिय. बोधीच्या पाच-सहा कार्यशाळांनंतर प्रस्थापित समीक्षकांनी ‘इथं काय फुले-शाहू-आंबेडकर-बुद्ध याच्यापलीकडे काही लिहिलंच जात नाही’ अशी टीका केली. तेव्हा वामननं थेट तिथल्या तिथं, ‘मग काय लिहिणार ही मुलं? मराठी नाटकात देव, आदर्श नाहीत? त्यावर का मग भाष्य नाही?’ असा खडा सवाल केला होता. हे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे मुख्यमंत्री झाले, तेव्हा चेंबूरचा रस्त्यावरचा व एक मराठा मुख्यमंत्री झाला म्हणून हा भल्या सकाळी अभिनंदन करायला वर्षावर! पण तेवढंच. नंतर ओळखीचे फायदे वगैरे काही नाही.

अलीकडचं त्याचं सारं लिखाण, बोलणं पाहिलं तर त्याला सतत काहीतरी सांगायचं होतं. गांधी, बुद्ध, आंबेडकर सांगायचा होता, पण तो रूढार्थानं नव्हे. त्याबद्दल तो ठाम असे. आपण ‘ग्रेट’ ही जाणीव त्याला झालीच नाही, पण काही बाबतीत तो कमालीचा व्रतस्थ व नैतिक होता. बुद्धावरच्या एका नाटकाच्या निमित्तानं त्याच्याशी चर्चा करत होतो. मी म्हटलं, ‘बुद्धाचे संवाद कुठल्या भाषेत, कशा शब्दांत लिहावे?’ वामन म्हणाला, ‘अरे, ते आपण कसे लिहिणार? लिहूच शकत नाही! तू बुद्धाला संवादच देऊ नकोस. ते कसं करायचं ते तू बघ. साला बुद्धाचे संवाद आपण कोण लिहिणार?’ म्हटलं तर हे बालिश, अतार्किक वाटेल, पण यामागची नैतिकता अमूर्त आहे. अशा अमूर्ततेत तो अलीकडे फार गुंतत चालला होता. त्यामुळे वरकरणी शब्दबंबाळ, भरकटलेली संहिता आतून कळवळून काही सांगू पहात होती. तीच गोष्ट प्रत्यक्ष संवादाची.

अलीकडे त्याचा संवाद महेंद्र तेरेदेसाईशी(च) होई. दोघांचं जणू अद्वैत झालेलं. महेंद्र हा एकमेव भक्कम पाठीराखा होता त्याचा सध्या. अशोक राणे त्यामुळे कधी कधी वैतागायचा. ‘ते दोघे बाद झालेत’ म्हणायचा.

वामन संहितेसह प्रत्यक्ष संवादही अपूर्ण ठेवून निघून गेलाय. त्याला आठवताना ‘एक होता वामन’ अशा दंतकथेच्या सुरुवातीसारखीच सुरुवात करावी लागेल शेवटपर्यंत.

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......