(रेवरंड ना. वा.) टिळकांच्या चार पिढ्यांशी जुळलेले मैत्र!
पडघम - साहित्यिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • रेवरंड ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळक, ‘स्मृतिचित्रें’चे मुखपृष्ठ, ना. वा. टिळक, अशोक टिळक आणि मुक्ता टिळक
  • Wed , 08 May 2019
  • पडघम साहित्यिक ना. वा. टिळक Narayan Vaman Tilak लक्ष्मीबाई टिळक Lakshmibai Tilak स्मृतिचित्रें Smritichitre अशोक टिळक Ashok Tilak मुक्ता टिळक Mukta Tilak

‘प्रभु मी उणा, पुष्कळ अजुनी उणा’ स्वतःतील उणिवांची ही जाणीव असणाऱ्या आणि तिची अशी जाहीर कबुली देण्याचे धाडस करणाऱ्या कविवर्य रेवरंड ना. वा. टिळक यांची उद्या, ९ मे २०१९ रोजी शंभरावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही आदरांजली. हा काही टिळकांच्या जीवनाचा किंवा त्यांच्या साहित्याचा अभ्यासपूर्ण मागोवा नाही, कारण ते काम जाणकारांचे आहे. या आहेत, मराठी साहित्यविश्वात ज्यांच्या चार पिढ्यांनी सलग मोलाचे कार्य केले आहे, त्या टिळक परिवाराबद्दलच्या काही अत्यंत वैयक्तिक आणि विस्कळीत अशा माझ्या आठवणी. या शब्दांना प्रातिनिधिकदेखील समजायला हरकत नाही. पण याबद्दल नंतर. आधी माझ्या आठवणींचा फ्लॅशबॅक.

दृश्य पहिले

रेव. टिळक आणि त्यांची पत्नी (साहित्य) लक्ष्मीबाई टिळक यांचा मला पहिल्यांदा परिचय झाला तो मी सहावीत असताना म्हणजेच, वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षी. पण त्याच्याही आधी, आठ वर्षांचा असताना मी त्यांचे चिरंजीव देवदत्त टिळक यांचा सॉलिड फॅन बनलो होतो. देवदत्तांनी लिहिलेल्या दोन बाल कादंबऱ्या मला तेव्हाच्या उन्हाळ्यात एका पाठोपाठ वाचायला मिळाल्या होत्या. एक होती ‘बाबू बाळाचा ग्रंथराज’. नागपुरात (सीता)बर्डी या भागात राजाराम सीताराम दीक्षित या नावाचे एक खूप जुने आणि मोठे सार्वजनिक वाचनालय आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये संध्याकाळी तिथे मुलांसाठी एक खास वाचनकक्ष उघडला जायचा. मी बर्डीवर रोज जायचो. कारण मी ज्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिकलो, ती या वाचनालयाच्या अगदी बाजूलाच आहे. तिथून थोडे पुढे गेले की, माझी आई जिथे शिक्षिका होती ते हायस्कूल होते. आणि तिच्या शाळेचे काही वर्ग लगतच्याच बुटी वाड्यातही भरत असत. या वाड्याच्या अगदी समोर, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, श्रीमंत बुटींचे राहते घर (प्रचंड आकाराची एक हवेलीच) होते. हे सगळे विस्ताराने सांगायचे कारण असे की, नागपुरात राहून ज्यांनी बुटींचे नावही ऐकले नाही, अशी व्यक्ती (अगदी माझ्या वयाची सुद्धा) तेव्हा तरी विरळाच असेल. शेगावचे संत गजानन महाराज (आणि बहुधा लोकमान्य टिळक देखील) बुटींच्या घरी आले होते, असे तेव्हा मला माझ्या वडिलांनी सांगितले होते. (मात्र ते याच राहत्या घरात आले होते की, आणखी कोणत्या, हे मला ठाऊक नाही. बुटी हे नागपुरातील एक जुने आणि प्रतिष्ठित घराणे आहे. त्यांच्या मालकीच्या अनेक जागा नागपुरात आहेत. त्यामुळे ही दोघे या पैकी इतर कुठेही वास्तव्याला असू शकतील.) याच बुटींपैकी काहींचा आणि ना. वा. टिळक यांचाही काही काळ फार जवळचा संबंध आला होता. याचा समग्र तपशील ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’ या अजरामर ग्रंथात वाचायला मिळतो.

तर, त्या एका उन्हाळ्यात राजाराम वाचनालयात जाऊन मी ‘बाबू बाळाचा ग्रंथराज’ हे पुस्तक वाचले. ते मला खूप आवडले. मुख्य म्हणजे मला लेखकाचे नाव लक्षात राहिले. त्याच उन्हाळ्यात प्रसिद्ध बाललेखक आकाशानंद उर्फ आनंदकाकांनी मला त्यांच्या प्रचंड बालसाहित्य संग्रहातली जवळपास दोनशे पुस्तके दिली. आकाशानंद म्हणजे ‘ज्ञानदीप’ या मुंबई दूरदर्शनवर एकेकाळी गाजलेल्या कार्यक्रमाचे निर्माते व लेखक आ. बा. देशपांडे. तेव्हा ते नागपुरात आकाशवाणीत कामाला होते. पुढे त्यांची बदली मुंबई दूरदर्शनला झाली. त्यांनी मला दिलेल्या या पुस्तकांच्या गठ्ठ्यात एक पुस्तक होते, ‘वेणु वेडगावात’. ते पुस्तक मी हातात घेतले आणि खरे सांगतो, खुळावून जाणे, वेड लागणे म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव त्या दिवशी मला आला. ते पुस्तक इतके, इतके, इतके जास्त मनोहर होते की, ते मी एक दमात वाचून काढले आणि नंतर मी व माझ्या धाकट्या बहिणीने त्याची शेकडो वेळा पारायणे केली. त्यातले बहुतेक प्रसंग आम्हाला शब्दशः पाठ झाले होते. आजही त्यातल्या दोन कविता मी माझ्या नातीला बडबडगीते म्हणून ऐकवत असतो.

(आनंदकाकांनी सुमारे बावन वर्षांपूर्वी दिलेल्या त्या दोनशे पुस्तकांपैकी दोन पुस्तके अजूनही माझ्या संग्रही आहेत - भा. रा. भागवतांचे ‘समुद्र सैतान’ (दोनही भाग) आणि हे ‘वेणु वेडगावात’. भागवतांचीच आणखी काही छान पुस्तके त्यात होती, फास्टर फेणेचे काही भाग आणि राबेलेच्या Gargantua and Pantagruel या मूळ फ्रेंच पुस्तकाला त्यांनी दिलेला मराठी अवतार, मायापूरचे रंगेल राक्षस हे. मात्र नंतर कोणीतरी ती पळवली. पुढे मी त्यांच्या पुनरावृत्त्या विकत घेतल्या.) ‘वेणु वेडगावात’ म्हणजे ‘Alice's Adventures in Wonderland’ या ल्युईज् कॅरलच्या जगविख्यात पुस्तकाला चढवलेला तेवढ्याच तोलाचा मराठी साज होता - आणि हे विलक्षण भारावून टाकणारे लेखन केले होते - देवदत्त टिळकांनी. एकाच लेखकाची सलग दोन उत्कृष्ट पुस्तके वाचल्यामुळे मला त्यांचे नाव कायमचे स्मरणात राहिले.

ना. वा. टिळकांच्या घरातले मला भेटलेले हे पहिले सदस्य.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal

.............................................................................................................................................

दृश्य दुसरे

नागपूरमधले एक नामवंत हायस्कूल, जिथे मी पाचवी ते दहावीपर्यंत शिकलो. इयत्ता सहावी (अ). त्या वर्षी आम्हाला मराठीच्या ‘बालभारती’ या पुस्तकात एक धडा होता, त्याचे शीर्षक आठवत नाही, पण त्यात लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्रातल्या काही प्रसंगांचे संकलन होते. ‘शब्द म्हणजे काय?’ या विचारणेपासून राजनांदगावात सुरू झालेले लक्ष्मीबाईंच्या शिक्षणाचे कार्य कसे काही मिनिटांतच संपून गेले, तिथपासून तो नंतर नागपुरात बुटी वाड्यात राहत असताना त्यांच्या पतींनी मोठ्या हौसेने आणलेली नवी कोरी दौत काही वेळातच लक्ष्मीबाईंच्या रागावर त्यांनी स्वतःच कशी वरच्या मजल्याच्या खिडकीतून खाली रस्त्यावर फेकून दिली, येथपर्यंतचा घटनाक्रम या धड्यात होता.

हा धडा मनोरंजक तर होताच, पण आमच्या बाईंनी तो फार रंगवून रंगवून आम्हाला शिकवला. तो शिकताना माझ्या हे लक्षात आले की, त्यात जो बुटी वाड्याचा उल्लेख आहे तो तर माझ्या पाहण्यातला आहे. मग मला अचानक आणि उगीचच या टिळक नवरा-बायकोबद्दल कुतूहल निर्माण झाले. आमच्या बाईंनी त्यांच्याबद्दल जुजबी माहिती आम्हाला सांगितली होती. मी घरीही आई आणि वडिलांकडून माहिती घेतली.

माझ्या उत्सुकतेचा विषय होता, टिळकांना ‘रेवरंड’ का म्हणतात आणि ते ब्राह्मण (तेही कोकणस्थ) असताना त्यांनी ख्रिस्ती धर्म का स्वीकारला, हा. त्यामुळे मग धर्म म्हणजे काय, आपण हिंदू आहोत - ब्राह्मण आहोत, खानदेशी देशस्थ आहोत म्हणजे नक्की काय; ख्रिस्ती धर्म म्हणजे काय, धर्म बदलायचा म्हणजे नक्की काय करायचे, या सर्व उप-प्रश्नांनी मला त्या वयातच घेरले. पण खूप लोकांना विचारूनही कोणीच त्यांची उत्तरे समाधानकारकरीत्या देऊ शकले नाहीत. शाळेत तर काही विचारायची सोयच नव्हती. आगाऊपणा करू नका, मुकाट्याने दिलेला अभ्यास करा, असेच उत्तर मिळण्याची शक्यता जास्त होती.

माझे कुतूहल शेवटी मलाच शमवावे लागले, पण त्यासाठी मला बरीच वर्षे थांबावे लागले. बीएचा अभ्यास करता करता मी ‘गीता’, ‘बायबल’, ‘कुराण’ या धर्मग्रंथांचा तसेच जे कृष्णमूर्ती, स्वामी चिन्मयानंद, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या अनेक पुस्तकांचा फडशा पाडला. ख्रिस्ती धर्माबद्दलचे माझे कुतुहलही वाढू लागले होते. एमए करत असताना बर्ट्रंड रसेलचा ‘Why I Am Not a Christian’ हा लेखही माझ्या वाचनात आला. नास्तिक असणे म्हणजे काय, अज्ञेयवादी कोण असतो, आगरकरांचा विवेकवाद काय होता, हेही मी वाचून काढलं. या सर्वांवरून मला माझी स्वतःची अशी मते बनवता आली.

शाळेत असतानाच माझ्या लक्षात आले होते की, माझ्या सभोवतालच्या फक्त ब्राह्मणच नव्हे तर अन्य जातींच्या हिंदूंनासुद्धा अन्य धर्मांच्या भारतीयांबाबत फारशी माहिती नव्हती, आणि ती करून घ्यायची उत्सुकताही नव्हती. यात धार्मिक अभिनिवेश नव्हता. ही मंडळी कट्टर नव्हती, पण त्यांचे विश्वच मर्यादित होते. नोकरीपेशा करणारे हे पापभिरू लोक सर्वसामान्य मध्यमवर्गीय जीवन जगत होते आणि मी बरा आणि माझे घर - माझा संसार बरा, या मर्यादेत राहण्यातच आनंद मानत होते. पाप-पुण्याच्या कल्पनेत न रमलेले आणि बऱ्यापैकी आधुनिक विचारसरणीचे माझे कुटुंबीय, माझे  शिक्षक आणि आमच्या परिचयाचे लोकही याला अपवाद नव्हते. त्यांच्या ऑफिसमध्ये अन्य धर्मीय लोक असतीलही, पण यापैकी कोणाशीच या मंडळीचे जवळचे, जिव्हाळ्याचे, घरगुती संबंध असल्याचे मला कधी जाणवले नाही.

या सगळ्याचा परिणाम असा झाला की, कुतूहल शमवण्याच्या प्रयत्नात माझे खूप वाचन झाले आणि माझ्या ज्ञानात बरीच भर पडली. मुख्य म्हणजे मी स्वतंत्र विचार करायला शिकलो. पुढे लॉ कॉलेजला गेल्यावर मला काही अतिशय चांगले पारशी, मुस्लीम आणि ख्रिश्चन मित्रही मिळाले. आता तर अनेक ख्रिश्चन लोक माझे जवळचे मित्र आहेत. लॉचा अभ्यास केल्याने आणि त्यातही, भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाने मला एक चौफेर, विस्तृत दृष्टी मिळाली. विचारांत परिपक्वता आली. भारतीय मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, शीख, हे सगळे आपलेच लोक असल्याची जाणीव झाली. जातीभेद, धर्मभेद, लिंगभेदावरचा उरलासुरला, होता-नव्हता तोही  विश्वास उडला. आणि अशोक टिळकांनी संपादित केलेले ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’ पुढे वाचल्यावर तर सारा अहंकारदेखील गळून पडला. रेवरंड टिळकांचे ऋषितुल्य जीवन, ख्रिस्तमय झालेले त्यांचे मन, ख्रिस्ताशी झालेली त्यांची तद्रूपता, त्यांची लीनता, याबद्दल त्यातली माहिती वाचून आपण मनुष्य म्हणून किती क्षुद्र आहोत, किती नालायक आहोत, हे प्रकर्षाने जाणवले. माझ्यावर सर्वांत जास्त प्रभाव टाकणारे, मला दिशा दाखवणारे कोणतेही एकच पुस्तक निवडायला मला जर कोणी सांगितले, तर मी डोळे मिटून एकच नाव घेईन. ते म्हणजे ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’. आणि त्यातही, त्यातले टिळकांच्या ख्रिस्ती होण्यापासून तर त्यांच्या मृत्युपर्यंतच्या कालखंडाचे वर्णन.

पण हे सगळे नंतरचे. या आधी, सहावीत लक्ष्मीबाईंची ओळख झाली. त्यानंतर शाळेत असतानाच ‘संक्षिप्त स्मृतिचित्रें’ पूर्ण वाचले. यानंतर पुढच्या तीन वर्षांत, नववीपर्यंत ना. वा. आणि लक्ष्मीबाई यांच्या या कविता आम्हाला शिकवल्या गेल्या- ‘ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे, मी तुझी मावशी तुला न्यावया आले’, ‘केवढे हे क्रौर्य’, आणि ‘सृष्टी तुला वाहुनी धन्य! माते, अशी रूपसंपन्न तूं निस्तुला’. लक्ष्मीबाईंची ही भरली घागर आणि ना.वां.चे केवढे हे क्रौर्य शिकताना तर डोळे भरून आल्याचे मला आठवते. ‘सृष्टी तुला वाहुनी धन्य! माते, अशी रूपसंपन्न तूं निस्तुला’ या ना.वां.च्या कवितेतले शब्द, त्यांचा अर्थ, तिच्यातला भाव आमच्या शिक्षकांनी खूप समरसतेने, अगदी उत्तमरीत्या आमच्यासारख्या निर्बुद्धांसमोर पोहचवला होता. दहावीत मराठी अवांतर वाचनाच्या (Rapid Reading) आमच्या पुस्तकात लक्ष्मीबाईंवर एक धडा होता. त्याचे लेखक बहुतेक सोपानदेव चौधरी होते. लक्ष्मीबाईंच्या अंतिम क्षणांचे त्यात हृद्य वर्णन केलेले होते. ‘जिंकुनी मरणाला, मरणाला, जीव कुडीतून गेला’, हे  प्रसिद्ध शब्द मी तेव्हा पहिल्यांदा वाचले. फार उत्कट लेखन होते ते!

अशा तऱ्हेने माझी रेवरंड टिळकांच्या परिवाराशी ओळख होत गेली.

त्यातच ‘संक्षिप्त स्मृतिचित्रें’ वाचल्यामुळे मला या कुटुंबाबद्दल अधिकच आत्मीयता वाटू लागली होती. मग काही वर्षांनी पॉप्युलर प्रकाशनने काढलेली, अशोक दे. टिळक यांनी संशोधित केलेली ‘संपूर्ण स्मृतिचित्रें’ ही अभिनव आवृत्ती दुकानात दिसली. मी ती लगेच विकत घेऊन दोन दिवसांत ती वाचून काढली. अ.दें.च्या तळटीपांमुळे आणि त्यांनी भर घातलेल्या अधिक मजकुरामुळे आता माझ्या टिळकांविषयीच्या ज्ञानात खूप वाढ झाली.

स्मृतिचित्रें! काय विलक्षण लिखाण होते ते. परतत्वाचा स्पर्श झालेले हे लेखन आहे, असे कोणीतरी त्याचे वर्णन केले असल्याचे आठवते. पुढे खूप इंग्रजी पुस्तके वाचल्यावर मला पी. जी. वुडहाऊसच्या एका पुस्तकात याला ‘divine afflatus’ (दैवी स्पर्श झालेले) असा प्रतिशब्द सापडला.

ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळक या दोघांच्याही साहित्याबद्दल म्हणता येईल-

‘वाचे बरवे कवित्व | कवित्वी रसिकत्व | रसिकत्वी परतत्व | स्पर्शू जैसा ॥’ (ज्ञानेश्वरी अध्याय १८, श्लोक ३४७)

जसे वाचेला कवित्व शोभा देते, तसेच कवित्व हे पण रसपूर्ण असावे, आणि रसास परतत्वाचा / divine afflatus चा स्पर्श असावा, म्हणजेच ते जीवनाचे रहस्य उलगडून दाखवणारे असावे. सुरसता आणि माधुर्य हे गुण ग्रंथाची श्रोत्यांशी नाळ जोडतात.  ना. वा. आणि लक्ष्मीबाई टिळक या दोघांच्याही लिखाणात सुरसता आणि माधुर्य हे गुण प्रामुख्याने आढळतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4808/Surely-Your-Joking-Mr-Feynman

.............................................................................................................................................

दृश्य तिसरे

‘संपूर्ण स्मृतिचित्रें’ वाचून झाल्यावर मला का कोण जाणे, मी लहानपणी वाचलेल्या देवदत्त टिळकांच्या ‘बाबू बाळाचा ग्रंथराज’ या पुस्तकाची आठवण आली. ते पुन्हा वाचावेसे वाटले. मधल्या काळात मी ते विसरून पण गेलो होतो. राजाराम वाचनालयात लगेच गेलो, पण त्यांच्या नव्या ग्रंथसूचीत त्याचा समावेश नव्हता. मग पुण्यातले बाल साहित्य संमेलनाचे अध्वर्यु आणि माझ्या आईचे परिचित सुधाकर प्रभु यांना विचारले. त्यांनी मला भा. रा. भागवतांच्या वहिनी मीरा भागवत यांना विचारायला सांगितले.

त्या अशोक टिळक यांच्या भगिनी आणि देवदत्तांच्या कन्या आहेत, असे त्यांनी कळवले. मीरा भागवतांनी अतिशय तत्परतेने मला अशोक टिळकांचा पत्ता दिला. मग मी अशोक टिळकांना पत्र पाठवले. त्यांचे अगदी उलट टपाली उत्तर आले. त्यांच्याकडे ‘बाबू बाळाचा ग्रंथराज’ हे पुस्तक होते आणि ते मला त्याची फोटोकॉपी द्यायला तयार होते. हे काम कोण करणार हा माझा प्रश्न माझे शेजारी आणि मित्र वसंत पाटील (आता निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश) यांनी सोडवला. काही दिवसांनीच ते नाशिकला त्यांच्या घरी जाणार होते. परत येताना वेळात वेळ काढून ते अशोक टिळकांच्या घरी गेले, त्यांच्याकडून पुस्तक घेऊन, त्याची फोटोकॉपी काढून, त्यांना ते वापस करून, वसंतराव मग नागपूरला माझ्यासाठी हा खाऊ घेऊन आले.

आणि त्या दिवसापासून मला एक नवा मामा मिळाला- ‘मा. मु. मामा’.  म्हणजे मारून मुटकून केलेला मामा, म्हणजेच अशोक मामा टिळक. आधी मी त्यांना पत्र पाठवून त्यांनी मला ते पुस्तक दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर आमचा रीतसर पत्रव्यवहार सुरू झाला. पहिल्याच एक-दोन पत्रांनंतर त्यांनी मला माझी जन्मतारीख विचारली. मी लगेच कळवली पण ते विसरून गेलो. नंतर बरोबर माझ्या पुढच्याच वाढदिवसाला त्यांचे शुभेच्छा देणारे पोस्टकार्ड आले. मग कळले की, त्यांच्याजवळ एक मोठी डायरी होती, तिच्यात ते संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख आणि पत्ता नोंदवून ठेवत असत. (पुढे मी त्यांना भेटायला गेलो असताना त्यांनी माझी स्वाक्षरी पण त्या नोंदीसमोर घेतली.) या सर्व लोकांना ते दर वर्षी आवर्जून किमान एक तरी पत्र त्यांच्या - त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाठवत असत. मी माझ्या पत्रांतून खूप शंका-कुशंका त्यांना विचारत असे आणि न कंटाळता ते मला उत्तरे देत. (एव्हाना मी त्यांना ‘अप्पासाहेब’ म्हणायला लागलो होतो.) स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक २९ मे रोजी एक नवीन पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा शिरस्ता होता. या मालिकेतली चार-पाच पुस्तके त्यांनी मला भेट म्हणून पाठवली आहेत.

पुढच्याच वर्षी अप्पासाहेब नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले. नागपुरातल्या सगळ्या चर्चच्या गायकवृंदांसाठी भक्तिगीत गायनाची एक स्पर्धा नाताळाच्या निमित्ताने घेण्यात आली होती, तिचा समारोप करायला आणि बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून त्यांना बोलावले होते. दोन दिवस ते इथे होते. म्युअर मेमोरिअल दवाखान्याच्या अतिथीगृहात त्यांची राहण्याची सोय केलेली होती. तिथे जाऊन मी अप्पांना भेटलो. ती त्यांची माझी पहिली प्रत्यक्ष भेट. त्यांना पाहिल्या क्षणीच मला असा भास झाला की, अरे, हा तर माझा बाबूमामाच उभा आहे. माझ्या आईचे मोठे बंधू (माझे बाबूमामा) आणि अप्पा टिळक यांच्यात कमालीचे साधर्म्य होते. उंची, शरीराची ठेवण सारखी, चेहऱ्यावरचे भाव पण अगदी तसेच. मी त्यांना हे बोलून दाखवले तर त्यावर अप्पा खळखळून हसले. तेही थेट बाबूंसारखेच. अप्पा म्हणाले, ‘हा तर मारून मुटकून (मा. मु.) मामा बनवण्याचाच प्रकार झाला.’ (त्यानंतर प्रत्येक पत्रात मी त्यांना ‘अप्पामामा’ असे संबोधित करू लागलो आणि ते ‘मा. मु. मामा’ अशी सही त्यांच्या पत्रांच्या शेवटी करायचे.)

या भेटीत मी माझ्या स्कुटरवरून अप्पांना फिरवले. त्यांना महानुभाव-पंथाचे प्रसिद्ध संशोधक वि. भि. कोलते यांना भेटायचे होते, त्यांच्या घरी आम्ही गेलो. आणखी एक-दोन ठिकाणी जाऊन मग मी त्यांना माझ्या घरी घेऊन आलो. अल्बम काढून त्यातले माझ्या बाबूमामाचे फोटो त्यांना दाखवले. त्यांच्यात आणि बाबूंमध्ये बरेच साम्य असल्याचे अप्पांनी मान्य केले.

अप्पांसोबत मी त्यांच्या चर्चमधल्या कार्यक्रमाला पण गेलो. तिथे एका गायक वृंदाने पेश केलेल्या ना. वा. टिळकांच्या ‘प्रभू मी उणा’ या भजनाने मला फार प्रभावित केले. किती आर्तता, किती प्रामाणिकपणा होता त्या शब्दांत! आणि त्या लोकांनी ते गायले पण होते अतिशय अंतःकरणपूर्वक.

अप्पांचे आणखी एक खास मित्र होते, ना. वा. उर्फ नानासाहेब गोखले. अप्पा नागपूरला आले त्या वेळी ते अमरावतीजवळ दर्यापूर या गावी राहत होते. या दौऱ्यात नानांना भेटता आले नाही याची अप्पांना बरीच हळहळ वाटली होती. काही वर्षांनी नानासाहेब दर्यापूर सोडून नागपूरला रहायला आले. एकदा माझी त्यांची भेट झाल्यावर मी त्यांना हे सांगितले, तेव्हा ते अप्पांविषयी भरभरून बोलले. (नानासाहेब गोखले जुन्या पिढीतले खास गांधीवादी आदर्श शिक्षक तसेच उत्कृष्ट चित्रकार  होते. १०५ वर्षांचे अत्यंत ठणठणीत, निरोगी दीर्घायुष्य त्यांना लाभले.)

यानंतर मी किमान दोन वेळा तरी अप्पांना त्यांच्या नाशिकच्या घरी जाऊन भेटलो. खूप गप्पा केल्या. त्यांनी मला लिहिलेली किमान दोनशे तरी पत्रे मी आजही जपून ठेवली आहेत. त्या प्रत्यक्ष भेटींमधून आणि त्या पत्रांमधून मला अप्पांमधला जाणकार, विद्वान साहित्यिक तर दिसून आलाच, पण ते किती चोखंदळ, किती बहुश्रुत आहेत, याचीही प्रचिती आली.

त्यांच्यात एक मिस्किल, हसरा, थोडासा खोडकर लहान मुलगा दडला होता. त्यांच्या लेखन शैलीतून, त्यांच्या विनोदांमधून हे कळायचे. अप्पा हळूच एखाद्याची फिरकी घ्यायचे. याचे एक उदाहरण. ‘अंतर्नाद’ मासिक सुरू झाले तेव्हापासून ते त्याचे वार्षिक वर्गणीदार होते. ‘अंतर्नाद’च्या पानांवर एक टीप असायची – ‘तुम्ही केव्हाही आपले सदस्यत्व रद्द करू शकता आणि तसे केल्यास तुमच्या वार्षिक वर्गणीतून शिल्लक राहिलेली रक्कम तुम्हाला लगेच परत करण्यात येईल.’ एकदा अप्पांनी याची सत्यता तपासायचे ठरवले. मला आता ‘अंतर्नाद’ नको, माझी शिल्लक वर्गणी मला परत पाठवा, असे पत्र त्यांनी संपादकांना पाठवले. लगेच अगदी आठ-दहा दिवसांतच त्यांना त्यांचे पैसे वापस करण्यात आले. त्यावर अप्पांनी संपादकांना पुन्हा पत्र पाठवले आणि आपण त्यांची परीक्षा घेतली हे कळवले. सोबत, परत मिळालेली ती वर्गणीची रक्कम पण त्यांनी पाठवून दिली. शिवाय (बहुधा) ‘महाराष्ट्र टाईम्स’ला ‘अंतर्नाद’चे संपादक भानु काळ्यांचे कौतुक करणारे एक पत्रही त्यांनी पाठवले.

पुढे, नव्यानेच सुरू झालेले इंटरनेट वापरण्यातले फायदे अप्पांना पटवून देण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांनी आपले नेहमीचे पत्रलेखन (स्नेल मेल) काही थांबवले नाही. मी तोवर ई-मेलकडे वळलो होतो. यामुळे माझा हस्तलिखित पत्रव्यवहार जवळपास थांबलाच. तरी आठवण आली की, मी अप्पांना एखादे पोस्टकार्ड पाठवत होतो. मग त्यांची पत्रे येणे कमी झाले आणि मग नंतर एक दिवस कळले की, अप्पा ख्रिस्तवासी झाले. माझ्या आयुष्यात अचानक सुरू झालेले हे आनंदमयी ‘अप्पा-पर्व’ असे अचानकच संपले. अप्पांकडून मला खूप काही शिकता आले. त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ‘प्रौढत्वी निज शैशवास कसे जपावे’ याचा वस्तुपाठच मला त्यांच्याकडून घेता आला.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram

.............................................................................................................................................

दृश्य चौथे

अप्पा टिळक नागपुरात आले होते, तेव्हा माझ्या दोन्ही मुली लहान होत्या. येताना अप्पांनी मोठ्या आवर्जून त्यांच्यासाठी खाऊ आणला होता. हा मेवा होता पुस्तक स्वरूपात. अप्पांची सुकन्या मुक्ता टिळक याही एक सिद्धहस्त बाललेखिका असून त्यांच्या तेव्हा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘कथा-इ-मुक्ताई’ या कथासंग्रहाचे दोन्ही भाग अप्पांनी माझ्या मुलींना भेट म्हणून दिले. त्या दोघी नंतर किती तरी दिवस हे दोन्ही भाग पुन्हा पुन्हा वाचत होत्या. आता मी यातल्या कथा अधूनमधून माझ्या नातीला (मोठ्या मुलीच्या मुलीला) वाचून दाखवत असतो. अजून काही वर्षांनी तिने स्वतःहून ‘बाबू बाळाचा ग्रंथराज’ आणि ‘वेणु वेडगावात’ ही पुस्तके वाचावीत असा माझा प्रयत्न आहे.

मुक्ताताईंची माझी प्रत्यक्ष भेट अजून झालेली नाही. (अप्पांकडे मी गेलो असताना त्या तिथे होत्या, पण ती ओझरतीच ओळख झाली होती.) अप्पांच्या निधनानंतर मुक्ताताईंशी फोनवर एक-दोनदा बोललो. मात्र आता आमची फेसबुकच्या माध्यमातून रोजच आभासी भेट होऊ लागली आहे. ना. वा., लक्ष्मीबाई, देवदत्त, आणि अप्पा या चारही पूर्वसुरींचे लेखन संस्कार त्यांच्यावर झालेले आढळतात. अप्पांचा बहुश्रुतपणा आणि लक्ष्मीबाईंचे ममत्व मला त्यांच्यात दिसते.

असे हे माझे टिळकांच्या चार पिढ्यांशी असलेले नाते, मैत्र आहे. सुरुवातीलाच मी म्हणालो तसे हे लेखन प्रातिनिधिक समजावे, कारण या घराण्याच्या संपर्कात आलेल्या आपल्यापैकी अनेक जणांना थोड्या फार फरकाने असेच सुखद अनुभव आजवर आलेले असतील. ना. वा. आणि लक्ष्मीबाई यांच्याशी प्रत्यक्ष संबंध असलेले कोणीच आज हयात असण्याची शक्यता वाटत नाही. मात्र देवदत्त, अशोक आणि मुक्ता टिळकांना ओळखणारे अनेक लोक आज आहेत. शिवाय ना. वा. आणि लक्ष्मीबाई यांना न भेटताही त्यांच्या लेखनाने मंत्रमुग्ध झालेले माझ्यासारखे किती तरी वाचकही आज असतील. लक्ष्मीबाई लिखित चरित्रातून प्रकट होणारी ना.वां.ची प्रतिमा माझ्याप्रमाणेच अनेकांना मोहिनी घालून गेली असेल. या साऱ्या ज्ञात-अज्ञात लाखो लाखो रसिकांच्या वतीने ना. वां.च्या १०० व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या महान घराण्याला वाहिलेली ही आदरांजली.

ज्यांच्या सलग चार पिढ्यांनी सकस, दर्जेदार साहित्य निर्मिती केली आहे, अशी घराणी अभावानेच नजरेस पडतात. टिळकांचे घराणे हे त्यातले अग्रगण्य मानता येईल. या सर्वांना माझे विनम्र अभिवादन.

.............................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Hemant Patil

Sat , 11 May 2019

प्रिय हर्षवर्धन, किती वर्षांपासुन तुम्हाला भेटायचे होते, ते आज अक्षरनामामुळे साध्य झाले. अप्रतीम लिहीले आहे. मीही हडसचा विद्यार्थी . ते दिवस तंतोतंत ऊभे केलेत. वक्ता दशसहस्रेषु हा सन्मान तुम्हाला मिळाला तो दिवस ही लक्षात आहे. तुम्ही लिहीत रहा, आम्ही वाचत राहू !


Dilip Chirmuley

Fri , 10 May 2019

Sundar vaachanIy lekh. Dhanyavaad.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......