अजूनकाही
अलीकडेच नवी दिल्लीतील पुराभिलेखागारामध्ये (archives) गेलो असता, १९५१-५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित एक माहितीपूर्ण अहवाल माझ्या वाचनात आला. कमलनयन बजाज यांनी हा अहवाल लिहिला होता. त्यांचे वडील जमनालाल बजाज हे महान देशभक्त होते. सेवाकार्यात अग्रेसर (philanthropist) असलेले जमनालाल महात्मा गांधींचे निकटचे सहकारीही होते. स्वत: यशस्वी उद्योजक असलेले कमलनयन यांचे काँग्रेस पक्षाशी घनिष्ट संबंध होते. त्यामुळे १९५२ मध्ये राजस्थानमधील सिकर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. रामराज्य परिषदेच्या उमेदवाराकडून त्यांना त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पक्षाच्या अंतर्गत वितरित करण्यासाठी त्यांनी सार्वत्रिक निवडणूक आणि राजस्थानमधील काही अनियमितता यासंबंधी ‘मला आलेले अनुभव’ या शीर्षकाखाली आठ पानी टिपण लिहिले. जवळपास सदुसष्ठ वर्षांपूर्वी लिहिलेले हे टिपण आजही उदबोधक वाटते.
काँग्रेस संघटनेत एकीकडे हिरालालजी तर दुसरीकडे वर्माजी व व्यासजी अशा दोन गटांमधील ‘अंतर्गत संघर्षावर’ लक्ष वेधत, कमलनयन बजाज आपले मनोगत व्यक्त करतात. अतिशय संतापून ते लिहितात, ‘‘कार्यकर्त्यांची आपल्यावर व्यक्तिगत निष्ठा असावी अशी या दोन्ही गटांच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे संघटनेवरील निष्ठेला दुय्यम स्थान मिळाले. परिणामी, निष्ठावान कार्यकर्ते मागे फेकले गेले आणि ज्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतील अशी (संघटनेशी दूरान्वयेही संबंध नसलेली) मंडळी अग्रभागी आली. परिणामी आपापसातील कलह आणि क्षुल्लक गोष्टींवरून होणारी भांडणे सोडवण्यातच नेत्यांचा बराचसा वेळ आणि श्रम वाया जाऊ लागले होते. याचा फटका संघटनेला बसला असून, त्यामुळे सरकार आणि जनता यामधील दुव्याचे काम प्रभावीपणे पार पाडण्यात पक्षाला अपयश आले आहे. जनतेसाठी फायदेशीर ठरतील असे काही चांगले अधिनियम सरकारने आणले, मात्र या कायद्यांचे फायदे जनतेला पटवून देण्यात काँग्रेसला अपयश आल्यामुळे या कृती निरुपयोगीच ठरल्या.’’
प्रतिस्पर्धी गटाने पक्षहिताऐवजी व्यक्तिगत हिताला प्राधान्य दिल्यामुळे राजस्थानमधील काँग्रेस पक्षाला अंतर्गत आव्हानांना तोंड द्यावे लागले. सोबतच राजस्थानातील सरंजामी अभिजन वर्गाच्या मर्जीतले आणि त्यांची आर्थिक मदत मिळवलेल्या अतिउजव्या विचारांच्या राम राज्य परिषदेच्या उमेदवाराचे आव्हानही होतेच. म्हणूनच यावर भाष्य करताना कमलनयन बजाज लिहितात, ‘‘राम राज्य परिषदेने जाणीवपूर्वक खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा प्रचार केला.’’ त्यांचे नेते उघडपणे म्हणत होते की, ‘‘काँग्रेसला मत देणे म्हणजे हजार गायींची कत्तल करण्यासारखे आहे, तर राम राज्यला (परिषदेला) मत दिले तर हजार गायींच्या संगोपनाचे पुण्य मिळेल.’’
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram
.............................................................................................................................................
मत मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गांच्या होत असलेल्या वापराबद्दल कमलनयन बजाज लिहितात, ‘‘राम राज्यला मत द्यावे म्हणून मुक्तपणे (विशेषतः ब्राह्मण समाजामध्ये) पैसा वाटला जात होता. राम राज्यसाठी घोषणाबाजी करणाऱ्या लहान मुलांना मिठाई वाटण्यात येत होती. राम राज्यच्या कार्यकर्त्यांनी हरिजन समाजामध्ये पैसे वाटण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ठिकाणी या समाजाने पैशाचे आमिष धुडकावून लावत आपण काँग्रेसलाच मत देणार असल्याचे सांगितले.’’
हिंसेमुळे निवडणूक प्रक्रिया दूषित होते, असे मत कमलनयन बजाज यांनी या अहवालात मांडले. ते लिहितात, ‘‘अनेक मतदान केंद्रांवर राम राज्यचे कार्यकर्ते हातात काठ्या आणि नंग्या तलवारी घेऊन फिरत होते. राम राज्य पक्षाला मत देणार असाल तरच केंद्रावर जा’’ असा जाहीर दम ही मंडळी लोकांना देत होती. गरीब आणि अज्ञानी जनतेला घाबरवत होते. राम राज्यचे ते कार्यकर्ते जनतेला दैनंदिन आयुष्यही जगू देत नव्हते. मात्र अशा घटनांमुळेच जहागिरदारांच्या वर्चस्वाखालील प्रदेशातही काही मते मिळवण्यात काँग्रेसला यश आले. काही झाले तरी सत्ता शेवटी काँग्रेसचीच येईल अशी येथील जनभावना होती.
राजस्थानमधील पोलीसही पक्षपातीपणे जमीनदार आणि अभिजन वर्गाकडेच झुकलेले होते, असे कमलनयन बजाज यांनी सूचित करतात, ‘‘निवडणुकी-दरम्यान माझी पक्की धारणा झाली की, भीती व घबराटीचे वातावरण तयार करण्यासाठी पोलिसांमधील एक समूह अप्रत्यक्षपणे जहागिरदारी तत्त्वांना मदत करत होता.’’ असा खुलासाही ते देतात. गैरकृत्य झाल्याची शंका उपस्थित करत ते लिहितात की, ‘‘मतपेट्यांशी छेडछाड झाल्याची मला दाट शंका येत आहे. काँग्रेस आणि किसान सभेच्या मतांसोबही असेच झाले असावे.’’
सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे घेण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत कमलनयन बजाज यांनी (सदर टिपण) लिहिले होते. सध्या सुरू असलेली निवडणूक म्हणजे याच उपक्रमाचा सतरावा भाग. इतक्या प्रचंड कालावधीनंतर, मतदारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यानंतर आणि मधल्या दशकांमध्ये देशात असंख्य आर्थिक व सामाजिक बदल झाल्यानंतरही कमलनयन बजाज यांनी १९५२ साली नोंदवलेली निरीक्षणे २०१९ सालीदेखील तितकीच प्रस्तुत वाटतात. पक्षातील नेते आपल्या पक्षाऐवजी व्यक्तिगत प्रस्थ वाढवण्यातच शक्ती खर्च करत असल्यामुळे, काँग्रेस पक्षात अनेक राज्यांमध्ये दुफळी माजली आहे. दुसरीकडे, उजव्या विचारांच्या पक्षांचा काँग्रेसविरोधी अपप्रचार सुरूच राहिला असून, पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा ‘हिंदू-विरोधी’ म्हणून रंगवली जात आहे. तोंडी अफवांची जागा आता व्हॉट्सअॅप फॉर्वर्डसने घेतली आहे. दरम्यान, निवडणुकांमध्ये पैसा आणि धनसत्ता यांना कमालीचे महत्त्व मिळू लागले आहे. मात्र दुसरीकडे, एक गोष्ट अशी आहे ज्यामध्ये अधोगतीऐवजी प्रगती पहायला मिळते आहे, ती म्हणजे मतगणना. आता ईव्हीएममुळे मत आणि मतपेट्यांशी छेडछाड करणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.
‘गोष्टी जितक्या अधिक बदलतात, त्यांमध्ये तेवढेच अधिक साम्य दिसू लागते’, या अर्थाची एक फ्रेंच म्हण आहे. कमलनयन बजाज यांच्या १९५२ सालच्या त्या टिपणातील शेवटचे वाक्य उदधृत केल्यावर या म्हणीची सत्यता पटेल. शेवटी ते म्हणतात, ‘शासकीय निवासस्थानी (Government quarters) होत असलेल्या भ्रष्टाचाराविषयी सामान्य जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला होता.’
ताजा कलम
१९५७ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत कमलनयन बजाज यांना सिकरऐवजी वर्धा येथून उमेदवारी देण्यात आली, तिथे ते विजयी झाले. आपल्या उदाहरणाद्वारे त्यांनी भारतीय निवडणुकीत पूर्वापार प्रचलित असलेल्या एका कृतीकडे लक्ष वेधले, ती कृती म्हणजे उमेदवाराकडून (निवडून येण्याची) खात्री असणाऱ्या जागेचा घेतला जाणारा शोध.
...............................................................................................................................................................
अनुवाद – समीर शेख
‘साधना’ साप्ताहिकाच्या ११ मे २०१९च्या अंकातून साभार
...............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment