अजूनकाही
देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे आहेत. परंतु त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. ‘गुगल ट्रेंड’नुसार मागील ३० दिवसांमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे आयपीएलच्या लोकप्रियतेच्या आसपासदेखील नाहीत.
गुगलचा मागील ३० दिवसांचा ट्रेंड
पाच दिवस चालणाऱ्या कसोटी क्रिकेटपेक्षा ५० षटकांचा एकदिवसीय सामना ७० च्या दशकात अधिक जवळचा वाटू लागला. याचाच परिपाक म्हणून १९७५ ला एकदिवसीय विश्वचषक चालू झाला. कालांतराने घासून घासून गुळगुळीत झालेल्या या क्रिकेट प्रकाराला नवीन पर्यायांची चाचपणी करण्याची गरज भासू लागली. त्यातून उगम झाला ‘टी २०’चा. आणि ‘जेंटलमन गेम’ म्हटले जाणारे क्रिकेट ‘स्पायसी गेम’ झाले.
२००७ ला ‘टी २०’ क्रिकेटच्या वर्ल्ड कपला सुरुवात झाली आणि त्यानंतर क्रिकेटच्या या नव्या प्रकाराने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारूड केले. हा प्रकार एवढा सुपर-डुपर हिट झाला की, ५० षटकांचा सामना पूर्ण एक दिवस एका जागेवर बसून बघणाऱ्यांची किंवा पाच दिवसांच्या कंटाळवाण्या कसोटी सामन्याची गर्दी आटू लागली. आणि या परिस्थितीला आयपीएलची मजबूत साथ मिळाली.
तीन-साडेतीन तासांचे सामने, जागतिक क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू, मसालेदार प्रक्षेपण, छोटी मैदाने व वीस षटकांत केली जाणारी प्रचंड धुलाई, हे क्रिकेटप्रेमींना टीव्हीसमोर खिळवून ठेवू लागले. आयपीएल लोकप्रियता आणि प्रेक्षकसंख्येच्या बाबतीतही कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ लागली. बॉलरने बॉल टाकणे आणि बॅट्समनने तो घुमवणे या दोन गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळू लागल्या.
स्थानिक शहरी अस्मितेचा टच
व्यावसायिक क्रिकेटमधील संघांना शहरांची नाव देऊन स्थानिक अस्मितेचा टच देण्याचा प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला. भारत-पाकिस्तानची मॅच असल्यानंतरचा हायहोल्टेज ड्रामा आता आयपीएलमध्ये पाहायला मिळू लागला. मुंबईचे समर्थक, चेन्नईचे फॅन्स, दिल्लीचे दिवाने, कोलकात्याचे रायडर्स, पंजाबचे शेर आपल्या आवडत्या टीमच्या, खेळाडूच्या समर्थनासाठी एकवटू लागले. मुंबईचे समर्थक विरुद्ध चेन्नईचे फॅन्स समोरासमोर उभे ठाकले. आणि शहरी अस्मितांच्या नावाने व्यावसायिक क्रिकेट सुरू झाले.
पूर्वी देशांतर्गत असो किंवा देशातील स्थानिक क्रिकेट सगळ्याला संस्कारांची बैठक होती, आयपीएलमुळे सगळेच एकदम ‘स्पायसी’, ‘ग्लॅमराइज्ड’ होऊन गेले.
क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले २०११ची एक आठवण सांगताना म्हणतात – “भारतीय संघानं विश्वकरंडक जिंकला आणि दोन दिवससुद्धा त्यांना त्या अचाट यशाचा आनंद कुटुंबीयांसोबत घेता आला नाही. लहान मुलांची शाळा सुटत असताना पालक दरवाजात आपापल्या पाल्याला घेऊन जायला तयार असतात, तसे संघमालक वानखेडे मैदानाच्या सीमारेषेवर जणू आपापल्या खेळाडूंना आयपीएल खेळायला घेऊन जायला उभे होते. खेळाडूंनाही हूं की चू करायची सोय नव्हती. कारण आयपीएल स्पर्धेतून मिळणारे पैसे भरघोस असतात. ‘दुभत्या म्हशीच्या लाथा गोड’ या म्हणीला धरून सगळे खेळाडू निमूटपणे उसनं हास्य चेहऱ्यावर आणून कामाला लागले. संघमालकांकरता विश्वकरंडकापेक्षा आयपीएल जरा जास्त मनाजवळची स्पर्धा आहे, हे खेळाडूंना कळून चुकलं होतं.”
ग्लोबल व्हॅल्युएशन अँण्ड कार्पोरेट फायनान्स अॅडव्हायझर कंपनीने दिलेल्या अहवालानुसार, २०१९च्या आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ४४ हजार कोटी एवढी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती १९ टक्क्यांनी वाढली आहे.
बीसीसीआय कितीही म्हणत असेल आम्ही क्रिकेटच्या लहान प्रकाराच्या बाजूने नाही, परंतु आयपीएलमधूनच त्यांना सर्वांत जास्त उत्पन्न मिळत असल्याचे तेही नाकारू शकणार नाहीत. आयपीएलचा फायदा उचलत बीसीसीआयसारख्या संस्थांनी रग्गड कमाई केली. अजूनही करत आहेत. आयसीसी आज कोणताही निर्णय बीसीसीआयला विश्वासात घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जागतिक क्रिकेटमधल्या उत्पन्नाच्या ८० टक्के वाटा भारतातून जातो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal
.............................................................................................................................................
आयपीएलचे फायदे
आयपीएलचे जसे तोटे आहेत, तसेच फायदे आहेत. भारतात सुरू झालेल्या बॅडमिंटन, कुस्ती, कबड्डी, फुटबॉल, हॉकीच्या लीग याचे श्रेयही आयपीएललाच द्यावे लागेल. यातून स्थानिक खेळ आणि खेळाडूंना मिळणारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून मिळणारे मार्गदर्शन, त्यांच्याकडून मिळणारे अनुभव आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे क्लास ऑफ कोचिंग. आयपीएलने भारतीय क्रिकेट टीमला अनेक खेळाडू दिले. पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, यजुर्वेंद्र चहल, मनिष पांडे हे आयपीएलचीच देण आहेत. तर काही खेळाडूंच्या टीममधल्या जागाही हिरावून घेतल्या.
वस्तुस्थिती
१२५ कोटी भारतीयांच्या देशात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्याचा क्षण, हॉकीमधील सामना जिंकल्याचा क्षण परत परत पाहणारे प्रेक्षक हाताच्या बोटावर मोजण्याइतके सापडतील. पण क्रिकेटच्या सामन्यांचे पुन्हा पुन्हा प्रक्षेपण बघणारे प्रेक्षक कमी नाहीत. असे क्रिकेटप्रेमी आहेत, तोपर्यंत क्रिकेटला आणि क्रिकेटमधील भविष्यातील वेगवेगळ्या प्रकारांना मरण नाही!
.............................................................................................................................................
लेखक ऋषिकेश नळगुणे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.
hrishikeshnalagune123@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment