मसूद अजहर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित, भारताच्या प्रयत्नांना अखेर १० वर्षांनी यश
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सुधीर अग्रवाल
  • मसूद अजहर
  • Sat , 04 May 2019
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जैश-ए-मोहम्मद Jaish-e-Mohammed मसूद अजहर Masood Azhar

भारतासह जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला अखेर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात आलं आहे. १ मे रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठी कोणत्याही एका हल्ल्याचा संदर्भ न घेता सर्व पुराव्यांची माहिती देण्यात आल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं याविषयी सांगितलं की, आम्ही अजहरनं केलेल्या दहशतवादी कारवायांचा बायोडेटा तयार करत नव्हतो. आमचा उद्देश त्याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्याचा होता आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. संयुक्त राष्ट्रमधील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना सांगितलं की, भारतानं कुटनीतीसह सर्व मार्गांचा वापर केला होता, ज्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आम्ही २००९ पासून यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर आम्हाला यश आलं. फ्रान्ससह जागतिक समुदायानं संयुक्त राष्ट्रांच्या या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे.

चीननं गेल्या आठवड्यातच मसूद अझहर प्रकरणी सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. भारताचे परराष्ट्रसचिव विजय गोखले हे चीन दौऱ्यावर गेले होते. त्यांनी चीनला ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी कारवायांचे अधिक पुरावे दिले होते. त्यामुळे चीन नरमला, असं मानलं जातं. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

मात्र हेही तितकंच खरं आहे की, गेल्या १० वर्षांपासून भारताकडून अजहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित करण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू होते. भारतानं पुराव्यांसाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. मसूदला दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव यापूर्वी दोनदा संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्यात आला होता. मात्र, भारतावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी व पाकिस्तानला चुचकारण्यासाठी चीननं दोन्ही वेळा नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला होता. चीनच्या या भूमिकेनंतरही भारतानं प्रयत्न सुरूच ठेवले होते. अनेक मार्गांनी चीनवर दबाव वाढवण्यात येत होता. अमेरिका, फ्रान्स व ब्रिटननंही चीनवर दबाव वाढवला होता. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानला बालकोटमध्ये दिलेलं प्रत्युत्तर, या घटनानंतर अनेक देशांनी भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे चीन एकाकी पडला होता. त्यातच श्रीलंकेतील आत्मघाती स्फोटांनंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आणि चीनला नमतं घेणं भाग पडलं. वाढत्या दबावामुळे चीननं या प्रस्तावातील तांत्रिक अडचण दूर करत मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्याचा मार्ग मोकळा केला असं मानलं जातं.

मसूद अझरवरील भारताला बंदीसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अजहरचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तान प्रायोजित दाहशवादी हल्ले आणि कारवाया यांमुळे त्रस्त आहे. भारतानं जागतिक स्तरावर हा मुद्दा जोरकसपणे मांडत पाकिस्तानला एकाकी पाडलं. या निर्णयामुळे पाकिस्तानचा अस्सल दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला. संयुक्त राष्ट्रांनं मसूद अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केल्यामुळे आता पाकिस्तानची पळापळ सुरू झाली असून मसूदला भूमिगत करण्याची योजना आखली जात असल्याचं कळतं.

पुलवामामध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटनेचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. पुलवामामध्ये रक्तपात झाल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं मसूदच्या नाड्या आवळण्यासाठी प्रस्ताव दिला होता. या उल्लेखावर चीननं नेहमीप्रमाणे आक्षेप घेत पुन्हा एकदा खोडा घातला होता. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्या. या चर्चेनंतर प्रस्तावामधील पुलवामा संदर्भ बाजूला केल्यानंतर चीननं आपला व्हेटो मागे घेतला.

मसूदला घोषित केल्यामुळे काय होईल?

आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे आता मसूद अझरला देश सोडता येणार नाही. त्याचे आर्थिक स्त्रोत बंद केले जातील. मसूद व त्याच्याशी संबंधित  संस्था, संघटना आणि कंपन्यांची बँक खाती सील केली जातील. संयुक्त राष्ट्राचा सदस्य असलेला कुठलाही देश त्याला व्हिसा देणार नाही. अर्थात तो ज्या देशात आहे, त्याच देशात त्याला राहावं लागेल. मसूदला कुठल्याही देशाकडून किंवा देशात शस्त्रास्त्र खरेदी करता येणार नाही. तसंच आता त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे.

दरम्यान, पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी अजहरवर तत्काळ प्रतिबंध लागू करणार असल्याचं सांगितलं आहे. पण त्यांनी हा भारताच्या कुटनीतीचा विजय असल्याचं मानण्यास स्पष्ट नकार दिला. या घटनेशी निगडीत असणाऱ्या जाणकारांनुसार भारतासाठी हा मोठा विजय असला, तरी चीनची भूमिका बदलण्याचं श्रेय अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांनाही आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......